News Flash

कथा : आठवणींच्या हिंदोळ्यावर…

हळूहळू दिवस पुढे चालले होते. भैरवीचं कॉलेजही आता मध्यावर येऊन पोहोचलं होतं.

एक अशीच सुस्तावलेली दुपार.. नेहमीसारखीच.. दीड- दोन वाजलेले. खडाड ऽऽऽ खडाड करत ती लाल एस.टी. गावातल्या रस्त्यांवरून वळणे घेत घेत आलीसुद्धा अन् तिच्याबरोबर तिला म्हणजे या कथेतल्या नायिकेला ‘भैरवी’लाही सोबत घेऊन आली. बसथांब्यापासून चालत घराकडे निघालेल्या भैरवीला दुरूनच आपल्या घराच्या अंगणात थांबलेला तो भलामोठा ‘ट्रॅक्टर’ सहजच नजरेस पडला. तशी तिथे चुलत्यांचं , तिचं अन् शेजाऱ्यांचं एक अशी तीनच घरं. तरीपण तिने चालतानाच उत्सुकतेने त्या ट्रॅक्टरकडे पहिलं अन् लगबगीने घराची पायरी चढली. बघते तो काय चुलत्यांच्या घराची नेहमी बंद असणारी खोली आज चक्क उघडलेली हेती. तशी आतली कुजबुज तिच्या कानी पडलीच होती. घरात गेल्यावर तिला बातमी लागलीच की त्या बंद खोलीची दारं आता किमान सहा महिने तरी उघडी असणार आहेत. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ती जागा चुलत्यांनी काही दिवस वापरायला म्हणजेच राहण्यासाठी दिली होती.

हळूहळू दिवस पुढे चालले होते. भैरवीचं कॉलेजही आता मध्यावर येऊन पोहोचलं होतं. शेजारीच राहणाऱ्या त्या पाच विद्यार्थ्यांशी अधनंमधनं बोलणं व्हायचं, विचारपूस व्हायची. एकंदर घरातल्यासारखेच झाले होते ते.

त्यातील एकजण म्हणजे सारंग. विनम्र, सुसंस्कारी, सर्वाशी खेळीमेळीने वागणारा. उच्चशिक्षित आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा, आजोबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी. असा तो.. सारंग.. तारुण्यसुलभ भावनांच्या उंच लाटा मनी उसळण्याचा तो काळ, ते वय.

भैरवीच्या कोकणातल्या त्या गावाला निसर्गरम्य सुंदर सागरकिनारा लाभलेला. तर सारंग कोकणातलाच, पण डोंगरांच्या कुशीत विसावलेल्या एका गावातील की ज्या गावाच्या निसर्गसौंदर्याला तोड नाही. पावसाळ्यात खळखळून वाहणारे दुधाळ धबधबे, गर्द हिरवी झाडी, अन् लाल लाल मातीतून शानदार गेलेले वळणदार रस्ते अशा निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या मातीत जन्मलेल्या भैरवी अन् सारंगचं मनही तितकंच सुंदर, सुसंस्कारी अन् विचारी. अशातच एक दिवस सारंगने भैरवीजवळ त्याच्या मनात जपलेल्या खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त केल्या व तिच्या सहवासाची आयुष्यभराची सोबत त्याने विनयशीलपणे मागितली. भैरवीसाठी हा खरंतर खूप मोठा धक्का होता, कारण तिने कधीही त्याच्याकडे ‘त्या’ नजरेने पाहिले नव्हते. पण म्हणतात ना विवाहगाठी या ब्रह्मदेवानेच जुळवलेल्या असतात. त्यानुसारच योग घडून येत असतात. सारंग तिला मित्र म्हणून आवडायचा, पण त्याच्या अशा विचारण्यानंतर तिलाही त्याच्याबद्दल खूप काहीतरी खास वाटायला लागले. हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या. त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमीही उत्तम होती व त्याहून जास्त त्याचा स्वभाव खूप छान होता पण…

पण दोघांच्या जाती पूर्ण भिन्न. शेवटी व्हायचा तो विरोध झालाच. एखादं नाजूक काचेचं भांडं धक्का लागून फुटावं तशी त्यांच्या मनाची अवस्था झाली. खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर, पण घरचे म्हणतायत तसा त्यांनाही क्षणभर पोरकटपणा, बालिशपणा वाटला. घरच्यांच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही हे मात्र दोघांचं नक्की ठरलेलं होतं.

यथावकाश सारंग त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याच्या गावी निघून गेला. त्याच्या बहिणीमार्फत या सगळ्याची कल्पना त्याने वेळेतच घरी दिली होती, पण तिथूनही विरोधाचं हत्यार उगारलेलंच होतं. फक्त भैरवीचाच विचार करून नैराश्य येऊ देणाऱ्यांमधला तो नव्हता. प्रेम आणि शिक्षण यांची गल्लत त्याने कधीच होऊ दिली नाही. आई- वडिलांची मान शरमेनं खाली जाईल असं कुठलंही पाऊल भैरवीदेखील केव्हाच उचलणार नव्हती. मधली जवळजवळ चार वर्षे भैरवी- सारंगने त्यांचं जुळलेलं नातं संपवून टाकलं होतं. ना फोन, ना ई-मेल, ना पत्र.. पण मनात आठवण मात्र रोजच असायची. तब्बल चार वर्षांनी भैरवीने पुन्हा एकदा पण शेवटचा प्रयत्न म्हणून घरी हाच विषय काढला व त्या वेळी मात्र तिच्या मनाची घालमेल घरच्यांनी सुदैवाने समजून घेतली व तिला होकार मिळाला. ती तर अगदी हरखूनच गेली. हे वास्तवात होतंय की स्वप्न पडलंय मला.. असं काहीसं तिला वाटलं. अनपेक्षित असा सुखद धक्का तिला बसला होता. केव्हा एकदा हे सारं अचंबित करणारं सत्य सारंगला सांगते – त्याला भेटते असं तिला झालं होतं आणि अचानक ती भानावर आली, कारण खरा अजून एक प्रश्न पुढय़ात होता की एवढय़ा वर्षांनंतर सारंग आता नक्की कुठे असेल? आजही त्याची तिच्याविषयी तीच भावना, तेच प्रेम असेल का? त्याच्या आई- वडिलांची परवानगी मिळेल का? अर्धी लढाई तर तिने जिंकली होतीच.. पण पुढे काय?

मग सुरू झाले सारंगशी पुन्हा संपर्क करण्याचे प्रयत्न. त्याच्याही घरून विरोध होताच, त्यामुळे भैरवीने तिच्या एका मित्रातर्फे सारंगच्या घरी फोन करून चौकशी करता असे समजले की, तो आता मराठवाडय़ात आंबाजोगाईला नोकरी करतो. तसेच त्याने पदव्युत्तर अभ्यासही पूर्ण केलाय. तिथला दूरध्वनी क्रमांक काही मिळू शकला नाही. तसेच नोकरीचे नेमके ठिकाणही त्याच्या आई- वडिलांनी कळू दिले नाही. पण तरीसुद्धा ही एक खूप महत्त्वाची माहिती भैरवीला समजली होती. मग काय? म्हणतात ना ‘‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’’. भैरवी कोकणात अन् सारंग मराठवाडय़ात. ना आजच्यासारख्या तेव्हा सहज संपर्क होणाऱ्या यंत्रणा. लॅण्डलाइन फोनचाच काय तो आधार.. त्याच्या अभ्यासक्रमाशी संबंधित विषयाचे अंदाज बांधत तिने डिरेक्टरीतून काही नंबर्सवर संपर्क केला तर प्रत्येक ठिकाणी तिला अशा नावाची कुणीही व्यक्ती इथे काम करत नाही हेच निराशाजनक उत्तर मिळत होते. हळूहळू सारंगशी आपला संपर्क कसा होणार, असे साशंकतेचे ढग तिच्या आजूबाजूला जमू लागले. अस्वस्थता वाढू लागली. कारण अशा पद्धतीने सारंगला शोधणे अजिबातच सोपे नव्हते. १-२ क्रमांक जे बाकी होते त्यावर तिने अनिच्छेने, निराशेनेच फोन केले आणि विश्वासच बसणार नाही अशा पद्धतीने त्यातील एका नंबरवर तिचा सारंगशी तब्बल साडेचार वर्षांनी संपर्क झाला. पलीकडील व्यक्तीने जेव्हा सारंग नामक व्यक्ती इथे काम करते असे सांगितले तेव्हा तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. सारंगशी प्रत्यक्ष बोलून खातरजमा होईपर्यंत तो तिचाच ‘सारंग’ असेल की कुणी दुसराच असेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. जिवाचा कान करून ती त्याच्या आवाजाची प्रतीक्षा करत होती अन् तो क्षण आला जेव्हा त्याने ‘‘हॅलो.. कोण?’’ असं विचारलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या. बोलायचं भानही तिला राहिलं नाही. पुन्हा जेव्हा तो ‘‘हॅलो..हॅलो..’’ म्हणत राहिला तेव्हा ती उत्तरली ‘‘मी..मी..भैरवी’’ तर तो थबकलाच. आसपासच्या कार्यालयीन वातावरणाचं भान ठेवत त्याने कसंबसं स्वत:ला सावरलं.. अन् आवरलंही अन् विचारलं ‘‘भैरवी.. तू? कशी आहेस?’’ तिनेही जडावलेल्या मनाने त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. नंबर कसा मिळवलास? इतक्या वर्षांनी कसं काय वाटलं फोन करावा? हे आणि अशा त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिने त्याने नं विचारताच दिली. सर्वात आधी तिने विचारलेल्या प्रश्नाच्या त्याने दिलेल्या उत्तराने तर तिला जग जिंकल्याचा आनंद दिला होता. आजही, इतक्या वर्षांनी तुझं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे? आणि सारंग उत्तरला, ‘‘हा काय प्रश्न आहे का? अर्थात हो..’’ भैरवीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या क्षणी तिला जगातील सर्वात नशीबवान ती असल्यासारखं वाटलं होतं. त्यानंतर भैरवी सारंगला प्रत्यक्ष भेटण्यासाठी तिच्या आत्याच्या सहकार्याने मराठवाडय़ात आंबाजोगाईला गेली. सारंगनेही जराही वेळ न दवडता बहिणीमार्फत आपल्या आई- वडिलांजवळ हा विषय पुन्हा काढला व त्यांनीही त्यांचा ‘होकार’ कळवला. सारं सहजच सोपं होत गेलं. अर्थात दोन्हीकडून होकार जरी या विवाहासाठी मिळाला असला तरी साऱ्यांच्याच मनात शंका-कुशंका होत्याच आणि ते स्वाभाविकच होते. लवकरच भैरवी- सारंगचा विधिवत विवाह पार पडला व त्यांच्या नव्या नवलाईच्या नव्या संसाराला सुरुवात झाली. सारं मळभ निघून गेलं होतं. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या चालीरीतींशी जुळवून घेत त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलंही उमलली. कुटुंबाची चौकट पूर्ण झाली होती.

‘‘टिंग टाँग.. टिंग टाँग..’’ दारावरील घंटेच्या आवाजाने एकदम भानावर आली. हे सारे भूतकाळातील १५ वर्षांपूर्वीचे प्रसंग आज भैरवीला का कुणास ठाऊक पुन्हा पुन्हा आठवत होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात कितीतरी अनपेक्षित वळणे येत असतात. तेव्हा लग्नाला झालेला विरोध, रुसवेफुगवे, नाराजी, साशंकता, तसेच जातीबाहेरील विवाहामुळे विविध शंका घेणाऱ्या नजरा या साऱ्यांवर मात करून आज एक उच्चस्तरीय, आदर्शवत आनंदी आयुष्य ते दोघेही जगतायत. शंका घेणाऱ्यांची तोंडं तर केव्हाच बंद झालीयेत. जखमा जरी भरून निघाल्या तरी त्याचे व्रण मात्र कायम राहतात. शेवटी काय जातीपेक्षा मनं जुळणं जास्त महत्त्वाचं. आज भैरवीच्या हळवेपणाचं कारण बहुधा हेच होतं. मनाच्या खोल कप्प्यात दडून बसलेल्या.. नव्हे दडवून ठेवलेला हळवेपणा केव्हा ना केव्हा अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त होतोच. हे प्रत्येकाबाबत घडतं. त्या भावनांमागे आपला एक अनपेक्षित, अनामिक वाटेवरचा प्रवास असतो. वेळप्रसंगी केलेल्या तडजोडींची जाणीव असते, आठवणी असतात व भूतकाळातील आणि वर्तमानातील आयुष्याची तुलनाही असतेच. पण जेव्हा काही कठिणातून सोपे होत जाते तेव्हा मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची एक वेगळीच सोनेरी, चमचमणारी किनार असते. अगदी भैरवी- सारंगच्या सुखी संसाराला आहे तशीच…
रिमा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:15 am

Web Title: memories
Next Stories
1 कथा : नवं नातं
2 भ्रमंती : रानातील एक दिवस
3 आवाहन : रेसिपी पाठवा 
Just Now!
X