चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com
आजच्या तरुणाईच्या दृष्टीने शिक्षण, करियर, पैसा या सगळ्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप. असं असेल तर तरुण मुलं त्यांच्या आयुष्यातल्या या नात्याकडे नेमकं कसं बघतात? तरुणाईची नात्यांविषयीची स्पंदनं टिपणारे सर्वेक्षण

सर्वेक्षण : ‘लोकप्रभा’ युथफूल टीम
विशेष सहभाग : संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ, पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, साठय़े महाविद्यालय, विले पार्ले, मुंबई, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर, सर्वेक्षण समन्वय : सुहास जोशी

सहज गंमत म्हणून आजच्या १८ ते २५ या वयोगटातल्या तरुणाईचं बॉडी आणि ब्रेन मॅपिंग करायचं ठरवलं तर आपल्याला काय दिसेल? मेंदूच्या अध्र्या भागात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच्या वायरींचा प्रचंड गुंता दिसेल. कानाला हेडफोनला जोडलेला फोन, फोनला जोडलेली पॉवर बँक, फोनमध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या एकाच वेळी उघडून ठेवलेल्या खिडक्या, मांडीवर लॅपटॉप आणि हातात किंडल. अणि मेंदूच्या अध्र्या भागात? रिलेशनशिपचासहज गंमत म्हणून आजच्या १८ ते २५ या वयोगटातल्या तरुणाईचं बॉडी आणि ब्रेन मॅपिंग करायचं ठरवलं तर आपल्याला काय दिसेल? मेंदूच्या अध्र्या भागात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच्या वायरींचा प्रचंड गुंता दिसे गुंता! व्हॉट इज युअर स्टेट्स? या प्रश्नाला उत्तर देण्यात मेंदू सतत व्यग्र असेल. हे उत्तर कदाचित सतत बदलत असेल किंवा नसेलही. पण कमिटमेन्ट, ब्रेक अप, पॅच अप, कम्पॅटिबिलिटी हे शब्द डोक्यात िपगा घालत असतील हेही नक्की.

सातत्याने आपले फेसबुक स्टेट्स बदलण्याचा मोह होणारी आजची युवापिढी रिलेशनशिपकडे नेमकी कशी बघते? मानवी संबंध आणि त्यातील गुंतागुंत हा माणसाचा गेली अनेक वर्षे कुतुहलाचा विषय आहे. त्याचे प्रतििबब सर्व भाषांमधील प्राचीन, अर्वाचीन साहित्य प्रकारांतून तर कधी चित्रपटांमधून दिसते. रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध ही तशी व्यापक संकल्पना, पण आजच्या तरुणाईमध्ये रिलेशनशिप ही बॉयफ्रेण्ड-गर्लफ्रेण्ड याच नात्यांभोवती फिरताना दिसते. त्यामुळे हेच डोळ्यासमोर ठेवून तरुणाईच्या दृष्टीने रिलेशनशिपमध्ये असणं म्हणजे काय, त्यात मत्री, प्रेम, कमिटमेन्ट आणि शारीरिक संबंध यांचे नेमके स्थान काय आहे, त्याच्यावर प्रभाव पाडणारे घटक कोणते हे जाणून घेणे बदलत्या काळात गरजेचे ठरते. त्यासाठी ‘लोकप्रभा’ने १८ ते २६ या वयोगटातील तरुणतरुणींमध्ये सर्वेक्षण केले.

सहभागींमध्ये ६३ टक्के मुली आहेत तर ३७ टक्के मुलांचा समावेश आहे. सर्वेक्षणाची प्रश्नावली ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आली. सर्वेक्षणामध्ये तरुणांच्या दृष्टीने रिलेशनशिप म्हणजे काय, रिलेशनशिपमध्ये असण्याची त्यांची कारणं, आजूबाजूच्या लोकांचा आणि इतर काही घटकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो का, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट असते का, त्याचे ओझे वाटते का, असल्यास त्याची कारणं, लिव्ह इन रिलेशनशिप याही मुद्दय़ांवर तरुणांनी आपली मतं मांडली आहेत. सर्वेक्षणात शहरी भागाचा वरचष्मा असला तरी ग्रामीण भागातून देखील काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

सहभागींपैकी ३९ टक्के हे सध्या रिलेशनशिपमध्ये असून ५७ टक्के जणांना रिलेशनशिपचा अनुभव नाही. तर ४ टक्के जणांना ते रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही हे नक्की सांगता येत नाही. पण यापूर्वी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांची संख्या ही ४७ टक्के आहे. म्हणजेच ८ टक्के जणांचे सध्या ब्रेक-अप झाले आहे. किती वेळ रिलेशनशिपमध्ये होता याबद्दलच्या उत्तरात बरेच वैविध्य आहे. अगदी एक-दोन महिन्यांपासून ते पाच-सहा वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये असणारेही यामध्ये आहेत. अपवादात्मकपणे एक दोघे जण पहिल्या ब्रेक-अप नंतर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये आहेत. समवयस्क मित्र-मैत्रिणी, समवयस्क भावंडं यांच्या बरोबर वावरताना कधी कधी काही गोष्टी केवळ समूहाच्या दबावामुळे म्हणजेच पीअर प्रेशरमुळे केल्या जातात. रिलेशनशिपमध्ये असण्यासाठी पीअर प्रेशर हा घटक कितपत कारणीभूत असतो याबद्दल ६० टक्के जणांनी असं काही प्रेशर असतं असं वाटत नाही, असं सांगितलं. २६ टक्के जण असं प्रेशर असतं असं थेट सांगतात, तर इतरांना काही प्रमाणात, काळ-वेळेनुसार असं प्रेशर असल्याचे जाणवते.

रिलेशनशिप म्हणजे काय या प्रश्नावर बहुतेकांच्या उत्तरामध्ये विचार जुळणाऱ्या दोन व्यक्तींच्या भावनिक गुंतवणुकीचा उल्लेख होता. अडीअडचणीच्या काळात ज्याचा भावनिक आधार वाटेल, असे कुणीतरी समविचारी असावे या इच्छेतून तरुणवर्ग रिलेशनशिप स्वीकारतो असे लक्षात येते. मत्री, प्रेम, जिव्हाळा, आकर्षण हे सगळं म्हणजे रिलेशनशिप असे तरुण म्हणत असले तरी हे सर्व शब्द रिलेशनशिप या शब्दाला पर्याय म्हणून वापरले जात नाहीत. मत्रीमध्ये बंधनं नसतात, अमुक एक गोष्ट करायलाच हवी अशी जबरदस्ती नसते, जी रिलेशनशिपमध्ये असते. त्यामुळे एकाअर्थी रिलेशनशिपमध्ये कमिटमेन्ट येते, कमिटमेन्टमध्ये मालकी हक्काची भावना नकळत येते जी मत्रीमध्ये नसते. किंवा मत्रीमध्ये ती थोडीफार असली तरी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जाब विचारू शकत नाही असे तरुण सुचवत आहेत. फ्रेण्डशिप आणि रिलेशनशिपमधला फरक तो हाच अशी मतं काही तरुणांनी मांडली. परंतु ५० टक्के तरुणांनी कमिटमेन्टशिवायही रिलेशनशिप असू शकते असं मत मांडलं. त्यांना आपण एकमेकांबरोबर आहोत असा परस्पर विश्वास अपेक्षित आहे, प्रतिबद्धता नाही.

रिलेशनशिप घट्ट होण्याच्या प्रवासातला मत्री हा पहिला टप्पा असेल तर त्याचे अंतिम पर्यवसान लग्नात होते का, या संदर्भात सर्वेक्षणातून पुढे आलेली काही मतं खूप बोलकी आहेत. ‘रिलेशनशिप म्हणजे सहवास. जो आवडला तर फ्रेण्डशिप, कमिटमेन्ट आणि त्यातून दोघांचं पटलं की लग्न. सुरुवातीलाच रिलेशनशिपचं भविष्य ठरवता येत नाही. पटलं तर सुरू ठेवायची, नाही तर नाही. कारण भविष्यात मत्री, दिलेला शब्द, प्रेम यापेक्षा दोघांची एकमेकांना समजून घेण्याची क्षमता जास्त महत्त्वाची ठरते. रिलेशनशिप जशी मुरत जाते तशी तिची क्षमता समजत जाते.’ रिलेशनशिप म्हणजे प्रेमाचं नातं, आणि या नात्याचा यशस्वी शेवट म्हणजे लग्न.’ वरील विचारांमधून स्पष्ट होणारी गोष्ट म्हणजे तरुणांना आपल्या नात्याला कोणत्या टप्प्यावर कोणतं वळण द्यावं हे ठरवण्याची असलेली मुभा. हे या पिढीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावं लागेल. हे मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्याही बाबतीत घडताना दिसते. हा पस ते उपभोगत आहेत कारण समाजही तो त्यांना देतो. लग्नाच्या नात्यामध्ये या पिढीच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांचा परीघ प्रगल्भ झाल्यामुळे न पटल्यास कोणत्याही वळणावरून आहे त्या नात्याचा आदर ठेवून तरुण परत फिरण्यास मागे-पुढे बघत नाहीत. समाजातल्या मोठय़ा वर्गाला हा स्वैराचार वाटेल पण ‘आहे हे असं आहे’ असंच तरुण यातून सुचवत आहेत.

सोशल मीडिया आणि तरुणाई यांचं नातं अगदी जवळचं असल्यामुळे रिलेशनशिप आणि सोशल मीडिया यांचा अनोखा संबंध आहे. अगदी फेसबुकवर तर रिलेशनशिपच्या प्रत्येक टप्प्याची यथायोग्य मांडणी करणारी स्टेट्स दिसून येतात. त्यामुळेच सोशल मीडियावर मिरवण्यासाठी रिलेशनशिप असू शकते का, हा प्रश्न सर्वेक्षणामध्ये विचारला होता. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. ५१ टक्के तरूण काही प्रमाणात ही शक्यता थेट स्वीकारताना दिसतात. तर ३४ टक्के तरूण सोशल मीडियावर मिरवण्यासाठी रिलेशनशिप नसते असं सांगतात. उरलेला वर्ग काही प्रमाणात या प्रकाराला होकार देताना दिसतो.

रिलेशनशिपमध्ये कमिटमेन्ट आहे असं ज्यांना वाटतं त्यातील ४५ टक्के तरुणांनी त्याचं ओझं वाटतं असं नमूद केलं. हे ओझं प्रामुख्याने एकमेकांप्रति असलेल्या जबाबदारीचं असतं. आपल्याला भविष्यात कुणी वेगळं आवडू लागलं तर दुसऱ्याला ते कसं सांगायचं या भीतीचं असतं. म्हणजेच एकावर- एकीवर प्रेम असताना दुसरा-दुसरी न आवडणं म्हणजे कमिटमेन्ट हा तरुणांच्या धारणेमधील विरोधाभास येथे ते स्वत:च मान्य करतात. नातेसंबंध  ताण निर्माण करतात की ताणावर उपाय म्हणून काम करतात याचं ठोस उत्तर तरुण देऊ शकले नाहीत. ५० टक्के तरुणांच्या मते नातेसंबंध ताणाला जन्म देतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकमेकांना वेळ देता न येणं तसंच संशयी वृती. तरुणांच्या मते रिलेशनशिपमध्ये एकमेकांवर हक्क गाजवण्याची वृत्ती कितीही अमान्य केली तरी येतेच. त्यामुळे संशयातून येणारा अविश्वास, निर्माण होणारे गरसमज या भानगडी होतात आणि त्याचा ताण येतो. रिलेशनशिपमध्ये असताना इतर गोष्टी तपासून घेतलेल्या असतात पण एकमेकांना किती वेळ देऊ शकतो याची खात्री देता येणं अशक्य असतं. सर्वेक्षणादरम्यान वारंवार उल्लेख केलेला मुद्दा हा एकमेकांप्रति असलेल्या अवास्तव अपेक्षांचा आहे. यालाच जोडून सिनेमा, टीव्ही या माध्यमांचा रिलेशनशिपवर प्रभाव पडतो का आणि कसा हा प्रश्न विचारला. जवळजवळ सर्व तरुणांनी याचा परिणाम वाईट होत असल्याचे नमूद केलं. सिनेमा वास्तव आणि कल्पना यातील भेद विसरायला लावतो. सिनेमामधील नायक-नायिका जो रोमान्स करतात तोच प्रत्यक्षात उतरला पाहिजे या धारणेतून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. त्या अर्थातच पूर्ण होत नाहीत आणि त्या नातेसंबंधांमधील तणावास कारणीभूत ठरतात. प्रत्यक्षातले नातेसंबंध हे कल्पनेपेक्षा नेहमीच सपक आणि कमी रोमांचकारी असतात. कारण वास्तवात व्यक्तींना रोजच्या आयुष्यातील आव्हानांना सामोरं जायचं असतं. ते करताना पाश्र्वभूमीवर कुणीही गिटार किंवा व्हायोलिन वाजवत नसतं. किंवा शिफॉनच्या साडय़ा नेसून बर्फातून पळतही येत नसतं. प्रेयसी किंवा प्रियकराच्या वाढदिवसाला भेट म्हणून सिनेमात मिळते तशी बीएमडब्ल्यू मिळत नाही आणि किंवा व्हॅलेन्टाइन डेला बेडरूम गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवणं प्रत्येकाला जमेल असंही नसतं. पण या सर्व अपेक्षा नकळत प्रत्यक्षातही केल्या जातात. पोर्नो फिल्म्सचा वैवाहिक नातेसंबंधांवर होणारा परिणाम सर्वश्रुत आहे. पोनर्ो फिल्म्समध्ये दाखवले जाणारे स्त्री- पुरुषांमधील संबंध हे अतिरंजित असतात. असं प्रत्यक्ष घडावं असा आग्रह धरण्यात आला तर ते नातं दीर्घकाळ टिकणार नाही हे नक्की. अनेकदा एकमेकांप्रति असलेली असूया, मत्सर या मालिकांमध्ये सर्रास दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचं रोपण प्रत्यक्षातही नकळत होतं.

रिलेशनशिपची नौका कधी फक्त मत्री, कधी मत्री आणि प्रेम, कधी मत्री, प्रेम आणि कमिटमेन्ट अशा लाटांवर िहदकळताना तिला नात्याचं लेबल देणं आवश्यक वाटतं का, असा प्रश्न आम्ही तरुणांना विचारला. १५ टक्के तरुणांच्या मते नात्याला नाव असावं तर बाकीचे ‘नात्याला काही नाव नसावे, तुही रे माझा मितवा’ याच विचारांवर पक्के राहिले. नात्याला नाव दिलं की त्यामागून येणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यामागची भूमिका यावर ठाम राहावं लागतं. ते नको असेल तर फ्रेण्ड्स विथ बेनिफिट्स असं राहायला हरकत नाही अशाही मताचे काही तरुण होते. ‘नात्याला नाव देण्याची गरज समाजाला असते, आपण प्रामाणिक असू तर त्याची काय गरज? पण तरुण-तरुणी एकमेकांबद्दलच्या भावनांशी प्रामाणिक असतील तर त्या नात्याला नाव दिले काय किंवा न दिले काय, आम्हाला फरक पडत नाही’ अशी उत्तरं यायला हवी होती. पण सर्वेक्षणामध्ये नात्याला नाव दिलं की मोकळेपणा जातो आणि अपेक्षा येतात अशी निरीक्षणं मांडली गेली आहेत. म्हणजे इथे परत जबाबदारी स्वीकारण्यामधील अपरिहार्यता आणि त्याचं दडपण हे मुद्दे अधोरेखित होतात. यासंदर्भात एका तरुणाचं मत अत्यंत सूचक होतं; ‘नात्याला नाव आहे, पण भावना नाहीत असं असेल तर काय उपयोग?’ नाव असलेल्या पण भावनिक ओलावा नसणाऱ्या नात्यापेक्षा एकमेकांप्रति प्रेम आणि आदर असलेल्या अनामिक नात्याला तरुणाई अधिक महत्त्व देते असं लक्षात येतं.

अनेक वर्षे एकमेकांबरोबर काढल्यानंतर आपण कम्पॅटिबल नाही हे लक्षात येऊन वेगळी होणारी विवाहित जोडपी किंवा प्रियकर-प्रेयसी आपण आजूबाजूला पाहतो. रिलेशनशिपमध्ये पुढे जाताना तरुण कम्पॅटिबिलिटी बघतात म्हणजे नेमकं काय बघतात हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. यात मूल्यव्यवस्था, स्वप्न, आयुष्याकडून हव्या असणाऱ्या गोष्टी, आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन आणि आवडी निवडी हे बघितलं जातं. लग्नाच्या वेळी जशी चेकलिस्ट वापरली जाते तशी रिलेशनशिप सुरू करताना वापरली जाते का असाही प्रश्न या सर्वेक्षणामध्ये विचारला. २० टक्के तरुणांनी याचं उत्तर हो असं दिलं. ३० टक्के तरुणांनी माहीत नाही असं मत नोंदवलं, तर बाकीच्या ५० टक्के तरुणांना याची गरज नाही असं वाटतं.

लग्नात २४ तास एकत्र राहायचं असतं, दोन कुटुंबांचा सहभाग महत्त्वाचा असतो पण रिलेशनशिपमध्ये तसं नसतं. अनेक ठिकाणी तरुणांनी उल्लेख केला आहे की, रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट असली तरी त्या दोघांचं लग्न होईल, असं गृहीत धरलेलं नसतं. तसा आग्रहही नसतो, असे विचार तरुणांनी मांडले. त्यामुळे लग्न करताना लक्षात घेतले जाणारे निकष आणि रिलेशनशिपमध्ये शिरताना विचारात घेतले जाणारे मुद्दे निराळे असतात. मुळातच रिलेशनशिपमध्ये आपण एकमेकांच्या सहवासात कितपत राहू शकतो, विचार कितपत पटतात, एकमेकांना किती ‘सहन’ करू शकतो याचा अंदाज बांधणं अपेक्षित असतं, असं तरुणांच्या बोलण्यातून लक्षात येतं. आणि या सगळ्याची उत्तरं ‘हो’ आली तर ती गाडी लग्नाच्या स्थानकावर थांबण्याची शक्यता निर्माण होते. थांबेलच असं नाही.

घरातील वडीलधाऱ्यांनी ठरवलेलं लग्न ते आजचे प्रेमविवाह हा गेल्या काही वर्षांतील आपल्याकडचा बदल आहे. केवळ वडीलधाऱ्यांनी ठरवलं या पलीकडे जाऊन एकमेकांशी बोलून, समजून घेऊन प्रेमात पडणारे देखील अनेक जण असतात. याच टप्प्यावरून पुढे जात अशा कम्पॅटिबिलिटी चेकमध्ये सेक्श्युअल कम्पॅटिबिलिटीला कितपत महत्त्व दिलं जातं या संदर्भातदेखील आम्ही प्रश्न विचारला होता. ५० टक्के तरुणांना हे पाहणं गरजेचं वाटत नाही. त्यांच्या मते हे तपासणं दरवेळी शक्यही नाही आणि त्यात फारसं तथ्यही नाही. कारण शारीरिक संबंध आणि त्यातून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. तुम्हाला एकमेकांचा सहवास आनंददायी असेल तर सेक्स दुय्यम आहे असं या तरुणांना वाटतं. पण त्याचवेळी ५० टक्के तरुणांना शारीरिक संबंध हा नातेसाबंधांमधील महत्त्वाचा भाग आहे आणि दोघांच्या संमतीने शारीरिक जवळीक झाल्यास हरकत नाही असं वाटतं हेही इथे नमूद केलं पाहिजे.

एकंदरीतच सध्या रिलेशनशिपचे अनेक प्रकार दिसून येतात. त्यातील अलीकडच्या काळातील संकल्पना म्हणजे फ्रेण्ड्स विथ बेनिफिट. यातील बेनिफिट हा थेट सेक्सशी निगडित असतो. त्यात प्रेम, ओढ वगैरे बाबींपेक्षा एकमेकांच्या संमतीने सेक्सचा आनंद घेण्यासाठी निर्माण झालेले नाते असते. या ‘फ्रेण्ड्स विथ बेनिफिट’ संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतं असं विचारलं असता, बहुतेकांना याविषयी काहीच माहिती नव्हती असं लक्षात आलं. ज्यांना ही संकल्पना माहीत होती ते याच्याशी सहमत होते. एकमेकांच्या संमतीने विशिष्ट हेतूने हे नातं टिकवलं जात असेल तर त्याला काहीच हरकत नाही. तर काहींच्या मते शरीर ही उपभोगाची वस्तू नाही त्यामुळे भावना नसतील तर शारीरिक जवळीक करू नये, अशाही प्रतिक्रिया समोर आल्या. साधारण ४६ टक्के तरुणांनी फक्त सेक्ससाठी नातेसंबंध ठेवले जातात का याला ‘हो’ असं उत्तर दिलं. आणि त्यांच्या मते अशी नाती ताणास कारणीभूत ठरतात. काहींनी प्रत्यक्ष अनुभव आला की सांगू असं उत्तर दिलं. उरलेल्या ५० टक्के तरुणांच्या बाबतीत सेक्सशिवायही नातेसंबंध टिकून राहत असतील तर त्याची कारणं काय हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. एक गमतीदार मत ऐकायला मिळालं आणि ते म्हणजे भविष्यात कधीतरी सेक्स करायला मिळेल या आशेने रिलेशनशिप टिकते. एकमेकांच्या मानसिक गरजा पूर्ण केल्या तर सेक्स हा नात्यामधला अविभाज्य घटक राहत नाही. प्रेम मनापासून केलेलं असेल, खरं असेल तर त्याचं स्वाभाविक आणि सहज पर्यवसान शारीरिक संबंधांमध्ये होतं, अशा काही प्रतिक्रिया आढळल्या.

गेल्या चार-पाच वर्षांत उदयाला आलेला आणि नातेसंबंधांवर प्रभाव टाकणारा एक भाग म्हणजे सेक्सटिंग. ६० टक्क्य़ांहून अधिक तरुणांच्या मते सेक्स चॅट हा आजच्या पिढीच्या रिलेशनशिपमधला महत्त्वाचा भाग आहे. परंतु सेक्स चॅट म्हणजे नेमकं काय याविषयी अनभिज्ञ असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सेक्स चॅट हा रिलेशनशिपमधील सेक्सला पर्याय असू शकतो का या प्रश्नावर ४० टक्के मुलांनी याविषयी विशेष माहिती नसल्याचं नोंदवलं, तर ३० टक्के तरुणांनी हो असं उत्तर दिलं. ज्यांना व्हच्र्युअल सेक्सचा आनंद घ्यायचा आहे, ते सेक्सटिंगचा वापर करतात का, रिलेशनशिपच्या ताणातून मुक्त होण्याचा तो मार्ग असतो का, असे विचारले असता ३३ टक्के जणांनी हो असं उत्तर दिलं, तर ४७ टक्के तरुणांनी माहीत नाही असं सांगितलं. तर २० टक्के तरुणांना  सेक्सटिंग हा रिलेशनशिपमधील सेक्सला पर्याय ठरू शकत नसल्याचं सांगितलं. सेक्सटिंगबाबत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याद्वारे सायबर क्राइम, ब्लॅकमेल अशा घटनांना सामोरं जावं लागण्याची भीती. ५० टक्के जणांना ही भीती सार्थ वाटते. सेक्सटिंगविषयी नकारात्मक भूमिका असणाऱ्यांमध्ये सेक्स चॅटमध्ये एकमेकांना जाणून घेण्याची संधी नसते असा सूर होता. तर लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये याचा उपयोग होऊ शकतो, असं मत काहींनी नोंदवलं.

लिव्ह इन रिलेशनशिप हा गेल्या काही वर्षांत चांगलाच चर्चिला गेलेला विषय. त्यामध्ये अगदी न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावले गेले आहेत. अर्थात हा विषय नोकरी व्यवसाय करणाऱ्या पुढील टप्प्यातील वयोगटाचा अधिक आहे. पण याकडे आजची तरुणाई कशी पाहते हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. लिव्ह इन रिलेशनशिपविषयी खूप मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. लिव्ह इन रिलेशनशिप ही एक नेट प्रॅक्टिस असते. तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकता का हे चाचपण्याची संधी यामुळे मिळते. दोघांची संमती असेल तर काहीच हरकत नाही. कुटुंबव्यवस्था ही लग्नाद्वारेच तयार होते ही संकल्पना चुकीची आहे, असा बहुतांश उत्तरांचा सूर होता. तर काहींनी मात्र या प्रकाराला नाकं मुरडली. तुम्ही लग्न करणार असाल तर ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यात काही चूक नाही अशीही एक प्रतिक्रिया आली. लग्नासारख्या समाजमान्य कुंपणाच्या आत तुम्ही हव्या त्या गोष्टी करा, पण ते ओलांडून मात्र जाऊ नका असंच कदाचित तरुणाई यातून सुचवत आहे. अनेकांना हे मॉडेल हवंहवंसं वाटतं, पण भारतीय परंपरेला ते साजेसं नाही त्यामुळे त्याला विरोध होऊ शकतो अशी मतं काहींनी मांडली.

रिलेशनशिप, प्रेम, विश्वास, कमिटमेन्ट, कम्पॅटिबिलिटी, लैंगिक आकर्षण, लैंगिक संबंध अशा अनेक मुद्दय़ांचा परामर्श घेताना आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असतो. त्याची गरज गेल्या अनेक वर्षांत अनेक स्तरांवरून अधोरेखित होते. काही प्रमाणात शालेय स्तरावरदेखील हा विषय गांभीर्याने घेतला जातो. तो म्हणजे लैंगिक शिक्षण. आपल्याकडे मुळातच अपवित्र, अस्पश्र्य मानल्या गेलेल्या या विषयाची कोंडी गेल्या काही वर्षांत फोडली जाताना दिसते आहे. मात्र त्यातदेखील अनेकदा हे शिक्षण विज्ञानाच्या अंगाने न देता अर्धवट देणं, मुला-मुलींना स्वतंत्रपणे देणं या सर्वातून लैंगिकतेचं कुतूहल शमवण्यासाठी अन्य मार्गाचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर या सर्वाचा रिलेशनशिपवरदेखील परिणाम होऊ शकतो का हेदेखील  जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यावर बहुतांश तरुण-तरुणींनी सकारात्मक मतं मांडली आहेत. योग्य त्या वयात लैंगिक शिक्षण योग्य प्रकारे मिळालं नाही तर उत्सुकतेपोटी अनेक घटना घडू शकतात, असं ते सांगतात. ज्या गोष्टींची माहिती नसते त्यासाठी हल्ली सर्वाच्या माहिती गुरूचा, गुगलचा आधार घेतला जातो. त्यातून नेमकं काय घ्यायचं हे कळलं नाही तर गडबड झालीच म्हणून समजावं, असं मत अनेकांनी मांडलं. शाळांमधील अर्धवट शिक्षण मुलांच्या लैंगिक कुतूहलाला रोखून टाकतं असं मतदेखील दिसून आलं. केवळ शिकवणं नाही तर या विषयाचे सर्व घटक समजावून देणं महत्त्वाचं असल्याचं एकंदरीत मतांवरून जाणवतं.

रिलेशनशिप या तरुणाईच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील ही एकंदरीत मतमतांतरं. साहित्य, चित्रपट, मालिका, वेबसीरिज अशा अनेक माध्यमांतून चर्चिल्या जाणाऱ्या या विषयावरील तरुणाईच्या मतांचा धांडोळा घेताना अनेक मुद्दे नव्याने कळतात, काही अधोरेखित होतात. चित्रपटांमधून हा विषय कैक वेळा हाताळला गेला आहे. त्यांचा आधार घेताना सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘कासव’ हा सिनेमा आठवतो. मानवी नातेसंबंधांवर नेमकं भाष्य करणारा हा चित्रपट. त्यात एक संवाद आहे. ‘कुटुंब जरूर असावं पण त्याचं स्वरूप बदलायला हवं, त्याचा परीघ अधिक विस्तारायला हवा.’ कुटुंबात अपेक्षित असलेल्या परस्पर नात्यांचा पोत हळूहळू बदलत आहे हे आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून समोर येतं. या पिढीला नात्याला नाव देण्याची घाई नाही. स्वत:ला आणि त्याचबरोबर समोरच्याला आजमावण्याची संधी ही पिढी देते. स्वत: वेळ घेते, दुसऱ्याला वेळ देते. जमलं नाही तर कासवासारखं पाय जवळ ओढून घेण्याचीही तयारी ठेवते. ही मुभा आधीच्या मोजक्याच सुदैवी पिढय़ांना होती. नातेसंबंधांमध्ये द्वैत होतं. लग्न व्हायचं किंवा नाही व्हायचं. सोबत वेळ घालवू, बघू जमतंय का वगरे विचार करायला वैयक्तिक आणि सामाजिक अवकाश नव्हता. पण आजच्या तरुण वर्गासाठी ‘इश्केदा रंग यारा ग्रे वाला शेड’ आहे. तो काळाही नाही आणि पांढराही नाही. या स्वातंत्र्याचा ही पिढी पुरेपूर उपयोग करताना दिसते. हे योग्य की अयोग्य हा मुद्दा चर्चिला जाऊ शकतो, त्यावर स्वतंत्र लेख होऊ शकतो. पण ही पिढी असे पुस्तकी प्रश्न विचारण्याच्या फंदातही पडत नाही. ती थेट कृती करून मोकळी होते.

विवाह संस्थेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत गेले. वडीलधाऱ्यांच्या आदेशाने होणाऱ्या लग्नापासून ते प्रेमविवाहापर्यंत हा प्रवास झाला आहे. आज मुलं-मुली प्रेमात पडतात, आम्हाला लग्न करायचंय असं सांगतात आणि वडीलधारे लग्न लावतात अशी मांडणी झाली. अनेकांनी हे बदल स्वीकारले, काहींनी जुन्याच पठडीत वाटचाल चालू ठेवली, काहींना या बदलांनी चांगलेच धक्केदेखील बसले. त्या पाश्र्वभूमीवर आजच्या रिलेशनशिपचं वास्तव पाहताना आतापर्यंतचे बदल स्वीकारलेल्यांना देखील धक्के बसू शकतात. पण हे वास्तव आहे हे मात्र नक्की. आजच्या पिढीसाठी कुठलंही नातं अपरिहार्य राहिलेलं नाही. मुलांसाठी ते कधीच नव्हतं. मुलीसुद्धा लौकिकार्थाने पवित्र मानल्या जाणाऱ्या लग्नाला पर्याय शोधत आहेत. मुली विचारांनी खूप पुढे गेल्या आहेत. त्यामानाने मुले आहेत तिथेच आहेत. मुला-मुलीतील रिलेशनशिपची अंतिम सफलता म्हणजे लग्न असं क्षणभर मान्य करायचं ठरवलं तरी मुलींची लग्न करण्यामागील भूमिका बदलते आहे. शहरी मुलींना लग्नाआधीच आíथक स्थर्य मिळतं. आíथक स्थर्यामुळे सामाजिक प्रतिष्ठाही हळूहळू मिळत जाते. राहता राहिला प्रश्न भावनिक आधाराचा आणि वैचारिक सोबतीचा. ती मिळाली नाही तर लग्न करून पश्चात्ताप करण्यापेक्षा आधी एकमेकांना जाणून घेऊ असा विचार केला जातो. लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबतीत मुलींमध्ये असलेला मोकळेपणा कदाचित याचेच द्योतक असावे. तरुण वर्गाच्या मते ती आधुनिक काळाची गरज आहे. कारण एकदा व्यक्तीच्या शारीरिक गरजा मान्य केल्या की आपण त्या भागवण्यास समर्थ आहोत का हे लिव्ह इन रिलेशनशिपदरम्यान लक्षात येते, असे या सव्‍‌र्हेमधून स्पष्ट होते.

नुकताच येऊन गेलेल्या ‘मनमर्जिया’ चित्रपटातील प्रत्येक तरुण व्यक्तिरेखा सध्याच्या नातेसंबंधांतील लहानसहान छटांचं अत्यंत अचूक चित्रण करते. निव्वळ शारीरिक संबंधांवर बेतलेलं नायक – नायिकेचं नातं कमिटमेन्ट, रिस्पॉन्सबिलिटीच्या पातळीवर कच खातं आणि तात्पुरतं उन्मळून पडतं. या कमिटमेन्टची अपेक्षा अर्थातच नायिका करते. नायक मात्र ‘माझं तुझ्यावर प्रेम असताना, शारीरिक संबंधांवर बंधनं नसताना लग्नाचं पालुपद का लावतेस’, असंच शेवटपर्यंत म्हणत राहतो. नायिकेशी लग्न झालेला दुसरा तरुण लग्नाच्या आधी आणि नंतरही प्रियकराकडे परत जाण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवतो. ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही पण तू मला आवडायला लागला आहेस’, असं म्हणून नायिका संसार सुरू ठेवते. पण तरीही नायिकेचे विवाहबाह्य़ संबंध चालू आहेत हे पाहून ‘मी निवडीचा पर्याय समोर ठेवूनही तिने माझी फसवणूक केली’ या भावनेने तो तिला सोडण्याचा निर्णय घेतो वगरे वगरे. सिनेमाच्या शेवटी हे सगळं पाहून डोकं सुन्न होत असलं तरी अनेकांची आयुष्यं या सर्व विचारांच्या आणि भावनांच्या आंदोलनांमधून जात असणार. सर्वेक्षणामधील निरीक्षणंही काही बाबतीत हेच सूचित करतात. यातून स्वैराचार फोफावेल, भारतीय कुटुंबव्यवस्थेला धक्का लागेल अशी भीती वाटणाऱ्यांना ‘आम्ही आमची नात्यांची व्याख्या बदलली आहे’, असं उत्तर तरुण वर्ग देत आहे. नात्यांमधील भावनिक स्थर्य कुणाला नको आहे? ते आधीच्या पिढीला लग्न करून मिळतं असं वाटायचं, तर आत्ताच्या पिढीला त्यासाठी थोडा प्रवास करावा लागतो असं वाटतं, असंच या एकूण सर्वेक्षणामधून दिसतं.

एकंदरीतच आजच्या पिढीचा रिलेशनशिपकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे. पिढी बदलते तसा दृष्टीकोनही बदलतो. कदाचित पुढची पिढी याहीपेक्षा आणखीनच काहीतरी वेगळे विचार करणारी असू शकेल.

नात्यांची बदलती रूपं

‘माय इयरफोन्स आर टँगल्ड, सो इज माय रिलेशनशिप’ फेसबुकवरील एक अपडेट. इअरफोन आणि नात्यांना एकाच तराजूत तोलणारी आजची ही पिढी तिच्या नात्यांबद्दल आणि जवळच्या माणसांबद्दल किती गंभीर असेल याबद्दल शंका निर्माण होते. ‘लोकप्रभा’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नात्यांबद्दलची तरुणांची मते काहीशी त्यांच्या या प्रतिमेशी सुसंगत तर काही विसंगत असलेली जाणवली. आज या वयोगटाच्या पुढील टप्प्यातून पाहताना हे अधिक जाणवते.

या सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सहभाग होता, त्यामुळे एखाद्या नात्याबद्दल असलेली त्यांची मतं ही खरं तर बदलत्या (ट्रान्झिशनल) स्वरूपातील असण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे नाती या संकल्पेनबद्दल अजूनही नसलेली परिपक्वता, नात्यांची एकमेकांशी होणारी सरमिसळ आणि स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीच्या जाणिवेचा अभाव त्या मतांमधून जाणवला. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ किंवा ‘फ्रेण्ड्स विथ बेनिफिट्स’सारख्या संकल्पना तरुणांना हव्याहव्याशा वाटतात, हे त्याभोवती निर्माण केलेल्या स्वातंत्र्याच्या वलयामुळे की त्या नात्यांची सुसंगती पटल्यामुळे हे मात्र स्पष्ट होत नाही हे येथे अधोरेखित करायला हवे.

महाविद्यालयीन काळातील स्वप्नाळू दृष्टिकोन काही अंशी इथेही जाणवतो. मात्र त्याचबरोबर नमूद करण्यासारखा एक बदल म्हणजे, आजची पिढी ही समोरच्याच्या मतांबाबतीत आणि त्यांच्या विचारांबाबतीत तितकीच सजग होण्याचा प्रयत्न करतेय. नात्यांना आणि पर्यायाने समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणे ती कटाक्षाने टाळतेय आणि तिथूनच सुरुवात होते आजच्या पिढीला सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्दय़ाची. ती म्हणजे ‘माझी स्पेस’. आजकाल आपली नाती, बव्हंशी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायको, ही प्रेम आणि बॉिण्डगपेक्षा जास्त स्पेस या संकल्पनेवर आधारभूत असतात. स्पेसचा हाच धागा गुंफला जातो त्यापुढे येणाऱ्या कम्पॅटिबिलिटी आणि कमिटमेंट या दोन संकल्पनांमध्ये. तरुणवर्ग कमिटमेंटला जास्त महत्त्व देताना दिसतो. नात्यामध्ये कमिटमेंट हवीच, असे म्हणणारा हा वर्ग, त्याच वेळी, नात्यांना लेबल लावण्याच्या मात्र विरोधात दिसतो.

याच वेळी अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे, सोशल मीडिया तसंच चित्रपटांचा तरुण नात्यांवर असलेला पगडा. अगदीच बर्फात जाऊन नाचणे किंवा एकमेकांना होळीचे रंग लावून प्रेमात पडण्याइतका फिल्मीपणा ही तरुणाई करत नसली तरी आपलं जुळलेलं किंवा अगदी तुटलेलं नातंसुद्धा जगजाहीर करणं यात त्यांना काही गर वाटत नाही. समाजमान्यता या जुन्या संकल्पनेचं नवीन स्वरूप म्हणजे ‘सोशल मीडिया लाइक्स’. आजचा आपण समाजशील नाही तर समाजमाध्यमशील आहे यावर तरुणाई शिक्कामोर्तबच करते.

या सर्वेक्षणामध्ये समावेश न केलेला एक वयोगट म्हणजे साधारण २५ ते ३०च्या मधला वर्ग. महाविद्यालयातून बाहेर आल्यावर जसं आजूबाजूचे पोकळ आणि नाजूक वासे मोडकळीस यायला लागतात तसेच नात्यांच्या संकल्पनासुद्धा बरेचदा उलथापालथ होऊन नव्याने पक्क्या व्हायला लागतात. प्रामुख्याने पार्टनरबद्दलच्या अपेक्षा आणि त्या अनुषंगाने नात्याचं स्वरूप हे वेगळ्या रीतीने आकाराला येतं हे आजच्या काळातील २५ ते ३० वयोगटातील तरुणांच्या नजरेतून पाहिल्यावर लक्षात येतं.

फँटसीवाल्या प्रेमाची जागा स्थर्याने घेतलेली असते. एकमेकांचे आíथक स्वातंत्र्य आणि स्थर्य हे बरेचदा त्या नात्याचे दिशादर्शक असते. ‘प्रेम वगरे ठीक आहे, पण पोटापाण्याचे काय’ इतका पॅ्रक्टिकल विचार येतो. लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेण्याआधी समाज काय म्हणेल याहीपेक्षा जास्त, खर्च आणि महागाई झेपेल का याची काळजी जास्त असते. ‘फ्रेण्ड्स विथ बेनिफिट्स’मध्ये नंतर होणारे भावनिक गुंते टाळणं हे मिळणाऱ्या शारीरिक सुखापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं. तरुणपणी भावणारी बेदरकारी, पंचविशीनंतर बेजाबदारपणा वाटू लागतो. तेव्हाचं प्रेमात झोकून देणं हे नंतर ‘नजर हटी दुर्घटना घटी’ अशा पवित्र्यात केलं जातं. थोडक्यात काय, तर आपण मोठे होत असताना आपली आजूबाजूची नाती ही मोठी होत असतात, बदलत असतात. मात्र नात्यांचं गुंतलेपण आधीही तितकंच असतं आणि नंतरही.
– प्राची साटम