-सुनीता कुलकर्णी

नोकरदार माणसं रजा मागताना कोणकोणती कारणं सांगू शकतात ?  म्हणजे रजा मागण्यासाठी कोणकोणती कारणं असू शकतात ? स्वत:चं आजारपण, घरातल्यांचं आजारपण, कुणाकुणाचे मृत्यू स्त्रियांसाठी बाळंतपण, पुरूषांसाठी घरी मूल जन्माला येणं, गावी जाणं, मुलांच्या परीक्षा, स्वत:चं, मित्रमंडळींचं किंवा नातेवाईकांचं लग्न, सणसमारंभ, परीक्षा, घरकाम, कंटाळा, नाटक-सिनेमा पाहणं, बॉस किंवा सहकाऱ्यांबरोबर भांडण, पर्यटन, मित्रमैत्रिणींच्या भेटी, घरी पाहुणे येणं…
रजा मागण्यासाठी ही रोजच्या जगण्यामधली अगदी व्यवहार्य कारणं आहेत. कुणाच्याही आयुष्यात अगदी सहज घडू शकणारी आणि त्यासाठी रजा नाकारताच येणार नाही अशी…

पण मध्य प्रदेशात एका पोलीस हवालदाराने चक्क आपल्या म्हशीसाठी रजा मागितली आहे. आता त्याच्या साहेबाने त्याला रजा दिली की नाही, ते माहीत नाही पण या महाशयांनी म्हशीची देखभाल करण्यासाठी रजा मागितली आहे, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

गंमत म्हणजे या रजेच्या अर्जात रजेसाठी दोन कारणं दिली आहेत. एक म्हणजे आई आजारी आहे आणि दुसरं म्हणजे म्हैस व्याली आहे. आईसाठीचा मजकूर एका ओळीत संपवला आहे आणि म्हशीवर मात्र परिच्छेदच्या परिच्छेद खर्ची घातले आहेत.

हे हवालदार महाशय म्हणतात, माझी आई आजारी आहे म्हणून मला गावी जायचे आहे. त्यासाठी मला रजा गरजेची आहे. कारण आई आजारी असल्यामुळे घरी नुकत्याच व्यालेल्या म्हशीची आणि तिच्या वासराची काळजी घ्यायला कुणीच नाही.

साहेब, या म्हशीचं दुध पिऊनच मी दणकट आणि बळकट झालो. त्यामुळेच मी पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सहज पास होऊ शकलो. तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि आता त्यांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. मला गरज असताना तिने तिचे पौष्टिक दूध देऊन मला धडधाकट व्हायला मदत केली. आता तिच्या गरजेच्या वेळी मी तिथे असणे आवश्यक आहे. कृपया मला सहा दिवसांची रजा द्यावी. म्हणजे मी माझ्या आजारी आईवर औषधोपचार करेन आणि म्हशीची आणि तिच्या वासराची देखभाल करू शकेन.

तुम्ही ‘साहेब’ असाल तर या रजेच्या अर्जाचं काय कराल? अनेकदा खरोखरच महत्त्वाच्या कामासाठी रजा मागितली जाते. तर अनेकदा रजा मिळण्यासाठी महत्त्वाचं कारण पुढे केलं जातं. म्हणजे एखाद्या वेळी ती व्यक्ती खरोखरच आजारी असते तर एखाद्या वेळी ‘राजकीय’ आजारी असते. रजा मंजूर करून घेण्यासाठी अनेकांना कधीकधी आपापलं व्यवहारचातुर्य पणाला लावावं लागतं. पण इतक्या प्रांजळपणे रजा मागणारा माणूस खरोखरच विरळा. मुख्य म्हणजे रजेसाठी अशी इतकी वास्तववादी कारणे देण्याचा पायंडा पडला, तर भल्याभल्यांची किती भंबेरी उडेल याचा विचारही न केलेला बरा.