|| माधव गवाणकर

एक कोल्हा सारखी कटकट करायचा. तक्रारी आणि वटवट करायचा. त्याचं नावच पडलं ‘कोल्होबा कटकटे’. स्वभावामुळेसुद्धा आडनाव मिळू शकतं बरं का!

‘माणसांना नदीवर पूल बांधायला काय झालं? पावसाळ्यात आम्ही प्राण्यांनी मोठी नदी ओलांडायची कशी? काकडय़ा चोरायला नदी ओलांडून पलीकडे जायचं कसं?’ अशीही त्याची कटकट चालायची. ‘सगळा ऊस तोडून का नेता? आम्हाला थोडा ठेवा की!’ असं तो मळेवाल्या चंदूला म्हणायचा. चंदूला काही कोल्होबाची भाषा कळायची नाही. त्याला फक्त ‘कुई कुई’ आवाज ऐकू यायचा. ‘कटकटे’ भाडय़ाने गुहेत राहायचा. ती गुहा होती अस्वलाची, पण अस्वलभाऊकडे दोन गुहा होत्या. म्हणून त्याने एक गुहा कोल्होबाला दिली. तिथेही कोल्हा कटकट करू लागला. ‘ या गुहेत उजेडच येत नाही! डासच चावतात. इथे आवाजच घुमतो. या गुहेत पावसाळ्यात पाणीच गळतं’ तक्रारीच तक्रारी. अस्वलाला भाडं द्यायला कोल्होबा कटकटे टाळाटाळ करायचा. फार लबाड होता तो! कोल्हा गुहेत एकटाच राहायचा. कारण तो चोरीमारी करायचा. चोराला कोण बायको देणार? शिवाय. त्याच्या तक्रारखोर वृत्तीला कोल्हीणही कंटाळली असती. अस्वलाने पाच-सहा वेळेला त्याच्याकडे भाडं मागितलं. पण हा काही भाडं द्यायचं नावच घेईना. मग अस्वलाची हुशार बायको अस्वली त्याला म्हणााली, ‘‘अहो, त्या भाडेकरू कोल्होबाला कुठेतरी कामाला लावा. त्याची कमाई असल्याशिवाय तो कसं भाडं भरणार? कामाला लागला तर लग्नही जमेल त्याचं.’’ त्याच दिवशी वाघोबा अस्वलाला रानवाटेवर भेटला. वाघ म्हणाला, ‘‘प्राण्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी असतात. कामं रखडलेली असतात. काही प्राणी माझ्या दरबारात माझ्यासमोर यायला घाबरतात. तर मला एक ‘तक्रार-निवारण केंद्र काढायचंय. तिथे तक्रारी लिहून घ्यायला, त्या मला सांगायला कुणीतरी हुशार प्राणी बघ. तसा प्राणी मला मिळवून दे. तू व्यायामशाळा चालवतोस म्हणून, नाहीतर तुलाच नेमलं असतं.’’ वाघ नोकरी देण्यासाठी प्राणी शोधतोय आणि नेमकं आपल्यालाच विचारतोय याचा अस्वलाला आनंद झाला. ही सगळी वनदेवाची कृपा! असेच त्याला वाटलं. अस्वल लगेच वाघोबाला म्हणाले, ‘‘एक प्राणी आहे माझ्या बघण्यात. मी घेऊन येतो त्याला तुमच्याकडे. उद्याच आणतो.’’ तक्रार निवारण केंद्राचं उद्घाटन हत्तीसारख्या ताकदवान प्राण्याच्या हस्ते करायचं हेसुद्धा वाघोबाने ठरवलं होतं.

मग अस्वल डुलत डुलत कोल्होबाने भाडं न भरता भाडय़ाने घेतलेल्या त्या गुहेकडे गेलं. त्याला अस्वलाने नीट समजावलं. अस्वल म्हणाले, ‘‘कटकटे, तू किती दिवस नुसत्याच चोऱ्या आणि लबाडय़ा करणार? या गुहेत फुकट राहतोस. वर तक्रारी करतोस. एकदा फक्त माझ्यासाठी मध घेऊन आलास. तो पण चोरीचा माल! याला काय अर्थ आहे? मी तुला नोकरी आणलीय. ती ‘तक्रार निवारण केंद्रातली नोकरी आहे. वाघोबा प्राण्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हे केंद्र सुरू करतोय. मीच तिथं प्राणी नेमणार आहे! मला तो अधिकार दिलाय. कटकटय़ा, तू आत्तापर्यंत सारख्या तक्रारी करत आलास. आता यापुढे इतरांच्या तक्रारी लिहून घेण्याचं काम कर. इतरांची दु:खं काय असतात हे कळलं की, तुझ्या तक्रारी किती फालतू होत्या. हे तुला कळेल!’ कोल्होबाही उनाडक्या, चोऱ्या, रिकामटेकडेपणा यांना कंटाळलाच होता. पण त्याला काही मार्ग सुचत नव्हता. इतर कोल्हेभाऊ त्याच्यापासून दूर राहात. नोकरी मिळणार म्हटल्यावर कटकटय़ा कोल्ह्य़ाने आनंदाने उडीच मारली! तो खरोखरच वाघोबाच्या ‘तक्रार निवारण केंद्रात’ दाखल झाला. चांगली नोकरी मिळाल्यावर त्याचा जीवनाचा मार्गच बदलला की राव! तो नीटनेटका राहू लागला. पहिल्या पगारातच त्याने अस्वलाच्या गुहेचं सगळं भाडं भरून टाकलं. वाघाने त्याला पगारही भारी दिला!

कोल्ह्य़ाने चोरीमारी तर सोडलीच, पण इतर प्राण्यांच्या तक्रारी झाडाच्या मोठय़ा पानांवर लिहून घेताना आणि त्याबाबतीत काय करता येईल हे प्राण्यांना सांगताना, वाघोबाचा सल्ला घेताना तो अगदी दमून जाऊ लागला. त्याला स्वत:च्या तक्रारींसाठीही आता वेळ मिळत नाही. रानात आता त्याला मान आहे. आणखी काय हवं!