News Flash

‘पिझ्झागेट’चं भूत बाटलीबाहेर

अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा वेध

संग्रहित छायाचित्र

सुनिता कुलकर्णी

मागच्या महिन्यात इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झालेला एक चार मिनिटांचा व्हिडिओ. प्रसिद्ध गायक जस्टीन बीबर त्यात डोकावतो आणि त्याच्या डोक्यावरच्या टोपीला हात लावतो. त्यात काय मोठं, असं कुणालाही वाटेल, पण जस्टीन बीबरच्या या कृतीवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्याच्या १३० दशलक्ष चाहत्यांसाठी त्याची ही साधीशी कृतीदेखील महत्वाची होती.

गेल्या महिन्यात हॉलिवूडमधल्या एका स्टंटमॅनने ‘आऊट ऑफ शॅडो’ असा एक व्हिडिओ तयार करून युट्यूबवर पोस्ट केला. तो होता ‘पिझ्झागेट’ प्रकरणासंबंधी. त्यावर कॉमेंट करताना जस्टीन बीबरच्या एका चाहत्याने बीबरला उद्देशून म्हटलं होतं, की तू जर कधी ‘पिझ्झागेट’ला बळी पडला असशील तर एखाद्या व्हिडिओमध्ये फक्त तुझ्या हॅटला स्पर्श कर. या कॉमेंटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ही मूळची कॉमेंट आणि नंतरच्या कॉमेंट्स जस्टीन बीबरपर्यंत पोहोचल्या की नाही, हे त्याच्या चाहत्यांना कळलं नव्हतं. पण त्याने आपल्या डोक्यावरच्या टोपीला मात्र हात लावला.

मग त्याच्या या कृतीवर पुन्हा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लोकांनी विश्लेषण करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकले. फक्त इंग्रजीतच नव्हे तर वेगवेगळ्या भाषांमधले लाखो व्हिडिओ आले. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या समाजमाध्यमांमधील खात्यांवर काळजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया लिहिल्या. ‘तू नीट रहा बाबा’ असं त्याला मनापासून सांगितलं. गुगलवर जस्टीन बीबर आणि पिझ्झागेट असा लाखो लोकांनी शोध घेतला.

#सेव्हबीबर ट्रेण्ड झाला

पिझ्झागेट हे खोडसाळ प्रकरण चार वर्षांपूर्वीचं. २०१६ मध्ये अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या काळात हिलरी क्लिंटन आणि डेमोक्रेटिक पक्षातल्या काही धुरिणांची वैयक्तिक इमेल अकाऊंट हॅक झाली आणि त्यानंतर ही मंडळी ज्यांना हवं आहे त्यांना लैंगिक संबंधांसाठी लहान मुलं उपलब्ध करून देतात, असं करणाऱ्यांची एक साखळीच आहे असा आरोप झाला होता. वॉशिंग्टन डी. सी. मधलं कॉमेट पिंग पाँग नावाचं पिझ्झा विकणारं दुकान या सगळ्याचं केंद्र आहे, तिथे लहान मुलांचा लैंगिक वापर होतो असाही आरोप संबंधितांनी केला होता.

२०१६ च्या निवडणुकांनंतर काही आठवड्यांनी इगलर वेल्श नावाचा ३२ वर्षांचा माणूस उत्तर कॅरोलिनामधल्या त्याच्या राहत्या ठिकाणाहून सहा तासांचा प्रवास करून कॉमेट पिंग पाँगला आला. तिथे खरोखरच लहान मुलांना कामाला लावलं जातं आणि त्यांचा लैंगिक छळ केला जातो या समजुतीतून त्याने अगदी लष्कराच्या स्टाइलमधून आपल्या रायफलीमधून कॉमेटच्या कुलुपबंद दारावर फैरी चालवल्या. आणि मग जाऊन त्याने स्वतला पोलिसांच्या हवाली केले. त्याला २०१७ मध्ये चार वर्षांचा तुरुंगवास झाला.

या पिझ्झागेट प्रकरणातले सगळे आरोप खोटे असल्याचं नंतर सिद्ध झालं. पण कोणतीही वस्तुस्थिती नसताना समाजमाध्यमांचा वापर करून एखादी कल्पना खोडसाळपणे कशी पसरवली जाऊ शकते याचं ते उदाहरण होतं. पिझ्झागेट प्रकरणाचा रीतसर तपास होऊन ते तथ्यहीन असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फेसबुक, ट्वीटर, युट्यूब या समाजमाध्यमांनी पिझ्झागेट प्रकरण सतत लावून धरणाऱ्या सदस्यांची खाती गोठवली आणि संबंधित लाखो पोस्ट काढून टाकल्या. फेसबुक एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी #पिझ्झागेटरियल असा कुणाला सर्चच करता येणार नाही अशी व्यवस्था केली तर युट्यूबने असा सर्च करणाऱ्यांना तो सगळा खोडसाळपणा होता, कटकारस्थान होतं असं उत्तर मिळेल अशी व्यवस्था केली.

पण ‘आऊट ऑफ शॅडो’ या वर सांगितलेल्या कथित व्हिडिओनंतर पुन्हा पिझ्झागेटचं भूत बाटलीबाहेर आलं आहे. फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सगळ्यांनी पिझ्झागेटवर निर्बंध आणलेले असल्यामुळे संबंधित लोकांनी आता टिकटॉकला हाताशी धरलं. बीबरला त्यात ओढलं. साहजिकच टिकटॉकवरच्या तरूण पिढीने तो व्हिडिओ आणि बीबरची प्रतिक्रिया असं दोन्ही ट्रेण्ड केलं. पण नंतर काही जणांनी त्याविरोधात बोलायला सुरूवात केल्यानंतर आता टिकटॉकनेही पिझ्झागेट आणि त्यासंबंधीच्या सगळ्या कॉमेंट्स काढून टाकल्या आहेत.

जस्टीन बीबरला या सगळ्यात ओढण्याबरोबरच फेसबुकवरही खासगी ग्रुप्समध्ये पिझ्झागेट प्रकरणाचे मेमे टाकत नव्या पिढीला खोट्या माहितीच्या आधारे गंडवण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. पण आता त्यात राजकारण्यांना नाही तर मोठमोठे व्यावसायिक, सेलेब्रिटी यांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. मुख्य म्हणजे आता हे लोण अमेरिकेपुरतं न राहता इटली, ब्राझील, टर्की असं सगळीकडे पसरलं आहे.
टिकटॉकने पोस्ट केलेल्या #पिझ्झागेट या पोस्ट गेल्या महिन्यात ८२ दशलक्ष वेळा बघितल्या गेल्या. गुगलवरदेखील पुन्हा पिझ्झागेटचा प्रचंड सर्च झाला. फेसबुकवर ८ लाख तर इन्स्टाग्रामवर ६ लाख वेळा पिझ्झागेटसंबंधी माहितीचं शेअरिंग, लाइक्स आणि कॉमेंट्स होत्या. कॉमेट या पिझ्झारियाच्या मालकालाही पुन्हा हत्येच्या धमक्या यायला सुरूवात झाली.

अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकांना काही महिने उरलेले असताना पुन्हा पिझ्झागेटच्या भुताने डोकं वर काढणं, टिकटॉकसारख्या तुलनेत नवमाध्यमाला हाताशी धरणं, जस्टीन बीबरसारख्या तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या गायकाला त्यात गोवणं या सगळ्याला एक अर्थ आहे. समाजमाध्यमांमधून परसवली जाणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा तिच्याकडे किती काळजीपूर्वक बघितलं पाहिजे हा धडा यातून घेण्यासारखा आहे.

(न्यूयॉर्क टाइम्सची ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:06 pm

Web Title: the ghost of pizzagate is out of the bottle aau 85
Next Stories
1 साहेब, रजेस कारण की…
2 अन’फेअर’ जाहिरातीचा ‘लव्हली’ शेवट
3 प्रासंगिक : साथींच्या इतिहासाचे साक्षीदार
Just Now!
X