– सुनिता कुलकर्णी 

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी त्यांचे सोपस्कार इथे पृथ्वीवरच पार पाडायचे असतात. ते असे दोघाचौघांनी कोर्टात जाऊन नुसत्या सह्याबिह्या करून पार पाडणं हे भारतीय मनाला अजिबात पटत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी ऋण काढून लग्नाचा सण साजरा करणं आपल्याला जराही चुकीचं वाटत नाही. नंतर कर्ज फेडू, पण लग्न थाटामाटात करू असंच सगळ्यांचं म्हणणं असतं. थाटामाटात लग्न करायचं म्हणजे किमान १००-२०० माणसं पंगतीला हवीतच. मामाच्या काकाचा चुलत सासरा आणि आत्याच्या नणंदेची मावस सासू इथपर्यंत नाती जुळवून लग्नाची आमंत्रणं जातात.

लग्नाला नुसती माणसं येत नाहीत तर ती ‘वऱ्हाडी’ असतात. त्यांना एकेकाळी लग्नाला बोलवलं जात नसे, तर ‘मांडवशोभे’ला या असं आग्रहाचं आमंत्रण असे. लग्नाच्या कपड्यांची नुसती खरेदी होत नाही तर बस्ता बांधला जातो. लग्नाचं नुसतं जेवण नसतं तर शंभर दोनशेच्या एकेक पंगती उठतात. हजार पाचशे पानं सहज जेवतात. पूर्वीच्या लग्नांमध्ये मंडळी पैजेवर जिलेब्या आणि लाडू रिचवत. मांडवउभारणीच नाही तर मांडवपरतणी देखील विधीवत केली जात असे.
यंदा आमच्याकडे ‘कर्तव्य’ आहे असं काहीजणांनी जाहीर केलं की पुढचे ‘कांदापोह्या’चे सोपस्कार होऊन यथासांग लग्न ठरतं. घरात लग्न निघालं की ‘लगीनघाई’ आहे असं उगाच म्हणत नाहीत. नव्या जोडप्याला नव्या नवलाईची घाई, सासूला हाताखाली सून येण्याची घाई आणि आजीला सूनमुखच काय तर नातवंडंही बघायची घाई. लहानपणीच्या भातुकलीच्या खेळापासूनच जणू ही घाई करायला शिकवलं जातं.

आता लग्नाचे इव्हेंट होऊ लागले आहेत. दारात मांडव घालून घरी सगळ्यांनी जमून कामं वाटून घेत लग्नं लावायचा जमाना केव्हाच गेला आहे. पण असं असलं तरी लगीनघाई आहेच. रुसव्याफुगव्याला वऱ्हाडीमंडळी असतातच आणि ‘मांडवशोभे’ला बाकीचे नातेवाईक जमतातच.

दिवाळीनंतर तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडच्या मुहूर्तांना सुरूवात होते. कुणाला दागिने मिरवायचे असतात तर कुणाला साड्या, कुणाला हौसमौज करून घ्यायची असते तर कुणाला त्या मांडवातच पुढची लग्नं जमवायची असतात.
पण लोकहो, आमंत्रण आलं की ‘लग्नाला चला हो, लग्नाला चला’ म्हणत आनंदाने ‘मांडवशोभा’ म्हणून जाणारी सगळी मंडळी यंदा सरकारमान्य ५० जणांच्या यादीत आपण आहोत का विवंचनेत आहेत. खर्च वाचला म्हणून वधूकडची मंडळी खुशीत आहेत आणि मिरवता येणार नाही म्हणून वरमाय, करवल्या दु:खी आहेत. एकूण करोनाने यंदाची ‘मांडवशोभा’ घालवली आहे.