तो  त्याच्या मागे हात धुवून लागलाय आणि तो दुसरा  त्याला हरतऱ्हेने चकवतोय, वेगवेगळ्या युक्तीने त्याला नामोहरम करतोय, पकडणाऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटवतोय. पकडणारा मोठा, शक्तिमान आहे आणि पळणारा ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ मानणारा.. तो इवलासा पण महाउपद्व्यापी जीव त्या मोठय़ा जिवाला अगदी मेटाकुटीला आणतो आणि मग पकडणाऱ्यालाच पळता भुई थोडी होते.. आणि हा खेळ बघणारे आपण या दोघांच्या स्पर्धेत अगदी गुंतून जातो. निखळ मनोरंजनाचा हा डाव. हा उंदीर- मांजराचा खेळ बघताना आपण वयाचं भान हरपून त्यात हरवून जातो. आवडती कार्टून मालिका कोणती असं विचारलं तर नव्या-जुन्या सगळ्या पिढीच्या लोकांकडून एकच नाव येतं – ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी.’

खरं तर आजच्या लहान मुलांना काटरूनच्या जगात रमायला पूर्वी नव्हते एवढे पर्याय आहेत. तरीही आजच्या लहान मुलांनादेखील हा उंदरा-मांजराचा खेळ आवडतो, हेच याचं विशेष आहे. एकही संवाद नसलेला, केवळ क्रिया-प्रतिक्रियेतून रंगत जाणारा हा पाठशिवणीचा खेळ. का आवडतो बरं एवढा सगळ्यांना? साधी, हालचालींमधून विनोद साधणारी कार्टून फिल्म म्हणून ती पाहिली जाते आणि भावतेही. टॉम कॅट आणि जेरी माऊस एकमेकांना नामोहरम करण्यासाठी काय काय उद्योग करतील याचा नेम नाही. टॉमच्या चित्रविचित्र, हास्यास्पद, अवास्तव हालचालींमुळे आपल्याला हसायला येतं, तसं जेरीच्या डोकेबाजपणालादेखील आपण दाद देतो. ‘स्लाप्स्टिक कॉमेडी’ या प्रकारातला विनोद असला, तरी तो कधी अश्लीलतेकडे जाणारा नसतो. पुन्हा पुन्हा बघतानाही त्या अतिशयोक्तीपूर्ण कल्पनाशक्तीने हसायला येतं. हातोडय़ाचा मार खाऊन चपटा झालेला टॉम एकदा गदागदा अंग हलवून सुस्थितीत येतो. जेरीदेखील टॉमच्या पंजात अडकून शेपटी तुटेल एवढी ताणली गेली तरी पुढच्या सेकंदाला धावतो. टॉमची शेपटी तर उंदीरमामाची लाडकी. ती कधी सापडतेय याचीच तो मिस्कील डोळ्यांनी वाट बघत असतो. या उंदरा-मांजराच्या खेळात  ही अतिशयोक्तीपूर्ण कल्पनाशक्तीच हसवते. तीच आवडते. अ‍ॅनिमेशनपटात चेहऱ्यावरचे भाव वगैरे दाखवण्यावर बंधनं असतात. त्यातून ही मालिका तर फार पूर्वीची. तरीही चेहऱ्याच्या वेडय़ावाकडय़ा हास्यास्पद हालचालींमधून, डोळ्यांमधून टॉमचा वेंधळेपणा अचूक कळतो आणि जेरीच्या आविर्भावातच त्याचा आत्मविश्वास दिसतो. त्याचे डोळेही बोलके. ही दोन प्रमुख पात्रे सोडता त्यात नियमित येणारी बाकीची पात्रेही अफलातून जमली आहेत. ती मालिकेमध्ये आणखी मजा आणतात. स्पाइक या मोठय़ा बुलडॉगशी टॉमला नेहमीच सामना करायला लागतो आणि अर्थातच त्याला जेरी जबाबदार असतो. जेरीबरोबर छोटा करडय़ा रंगाचा निबल्सही कधी कधी धमाल आणतो.

विल्यम हाना आणि जोसेफ बार्बेरा यांनी १९४०मध्ये निर्माण केलेली ही दोन पात्रे अजरामर झाली आहेत. वास्तविक याचे ६८ सालापर्यंतचे भागच या मूळ लेखकांनी लिहिले. नंतर या मालिकेची लोकप्रियता बघून अनेक जण याच्या निर्मितीप्रक्रियेत ओढले गेले. वॉर्नर ब्रदरपासूनची ही यादी आहे. पाच मिनिटांपासून २० मिनिटांच्या छोटय़ा फिल्म्स ही टॉम अ‍ॅण्ड जेरीची ओळख. पुढे त्यातून पूर्ण लांबीचा चित्रपटही निघाला. पण भारतीय टीव्हीवर २५ वर्षांपूर्वी आलेली ही मालिका अजूनही फॉर्मात आहे, हे खरं.
अरुंधती जोशी