– सुनिता कुलकर्णी

उष्ण कटिबंधात असलेल्या आपल्या देशातल्या माणसांचे निमगोरा, सावळा, कृष्णवर्ण हेच नैसर्गिक रंग आहेत. त्यामुळे शंकर, विठ्ठल, राम-कृष्णांसारखे लोकप्रिय देवही याच रंगाचे. जशी माणसं तसेच त्यांचे देवही. पण ब्रिटिशांनी १५० वर्षे राज्य करून आपल्या डोळ्यांवर गोऱ्या रंगाची आपल्यावर जी भुरळ पडली आहे ती काही जायला तयार नाही.

गोऱ्या रंगाचं हे झापड लग्नाच्या बाजारात तर फारच उठून दिसतं, तेही अर्थात मुलींच्याच बाबतीत. गुडघ्याला बाशिंगं बांधून उभ्या असलेल्या बंड्याला त्याचा रंग कुठलाही असला तरी बायको मात्र गोरीच हवी असते. त्यामुळे एखादी मुलगी कितीही गुणी असली, तरी तिचा रंग गोरा नसेल तर लहानपणापासूनच तिला ‘तुला आता कसं खपवायचं?’ हे उठताबसता ऐकून घ्यावं लागतं.

सामान्य घरातल्या सामान्य मुलींनी आपल्या रंगामुळे आपल्याला चार बोल सतत ऐकून घ्यावे लागणार, हे वास्तव लहानपणापासूनच स्वीकारलेलं असतं. एखादी ते सगळं झुगारून देते, पण बाकीच्या बहुतेकजणी ते ऐकून घेतात आणि मुकाट्याने फेअरनेस क्रीमही वापरायला लागतात.

पण हे ‘तिच्या’ही वाट्याला यावं? होय तिच्याच…साक्षात किंग खान, द शाहरूख खानच्या लाडक्या लेकीच्या? सुहाना खानच्या?

सुहाना खानने नुकतीच आपल्या इन्स्टाग्रामवर टाकलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात शाहरूखच्या या लेकीनं आपल्याला, आपल्या आई-वडिलांना आपल्या सावळ्या रंगामुळे काही फरक पडत नाही. पण बाकीच्या लोकांना कसा तो आवडत नाही आणि त्यावरून आपल्याला अगदी दहाव्या- बाराव्या वर्षापासून कसं ‘काली- कलुटी’ हे ऐकून घ्यावं लागलं आहे, त्याबद्दल लिहिलं आहे. काळ्या- सावळ्या रंगाबद्दल असलेल्या या मानसिकतेबद्दल नाराजी व्यक्त करून सुहाना म्हणते, पण मी पाच फूट तीन इंच उंच आहे. रंगाने निमगोरी आहे आणि तरीही आनंदी आहे. तुम्हीही तुमचा जो रंग असेल त्यावर खूश रहा. #एण्डकलरिझम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरूख खानच्या मुलीनेच अशी पोस्ट टाकल्यावर फिल्मी माध्यमांमध्ये तिची चर्चा होणं साहजिकच होतं. अर्थात शाहरूख खानने केलेली पुरूषांसाठीच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात पुढे करत, अनेकांनी तिला असं असेल तर आधी तुझ्या वडिलांना सांग असंही टोकलं आहे.  पण तिच्या वडिलांच्या भूमिकेसाठी तिला कशाला टोकायचं? तिने तिच्यासाठी घेतलेली भूमिका योग्यच आहे. नाही का? तुम्हाला काय वाटतं?