गेल्या शतकातले प्रसिद्ध आणि लोकप्रिय कथाकार य. गो. जोशी यांच्या वाङ्मयीन शैलीचा एक आविष्कार त्यांच्या ‘अनौपचारिक मुलाखती’ या संग्रहातून आपण बघितला होता. परंतु त्या वाचल्यावरही य. गो. जोशी यांनी लिहिलेले नाटक असे म्हटल्यावर नवल असे वाटतेच. त्यातून ते संगीत नाटक. त्यामुळे वाचकांना अधिकच कुतूहल वाटणार. पुन्हा हे नाटक १९३० साली प्रकाशित व प्रथम प्रयोगित झाले. त्या वेळी संगीत रंगभूमी फार भरभराटीत होती. बालगंधर्वाची लोकप्रियता कल्पनातीत होती. या सगळ्या वातावरणाने य. गो. जोशींना संगीत नाटक लिहायची स्फूर्ती आली होती का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचकांशी हितगुज या प्रस्तावनेत जोशींनी सांगितले आहे की, ‘‘त्या वेळी वाचनात येणाऱ्या नाटक-कादंबरीत प्रथम प्रेम-ठरावीक पद्धतीची देवघेव- नंतर लग्न असा क्रम दिसत असे. हीच कल्पना, उलट बाजूने पाहिल्यास- झालेले लग्न नाकबूल करायला लावून- जरा ‘गंमत’ लिहिता येईल असे वाटले. म्हणून अगोदरच लग्न झालेले जोडपे अविवाहितपणाच्या पेहरावात रंगवले आहे.

अधिक सुटसुटीतपणे किंवा मोजक्या शब्दांत सांगायचे तर हे एक ‘फार्स’ या प्रकाराशी जवळीक साधणारे हे नाटक आहे. कथानक जाणण्याअगोदर नोंद घ्याव्या अशा काही गोष्टी. प्रथम-  या तीन अंकी नाटकाचा प्रयोग ३१ मे १९३० रोजी भारत गायन समाज, पुणे यांनी सिद्धेश्वर थिएटर सातारा येथे केला. या तीन अंकी नाटकात १४ प्रवेश अणि २३ पदे आहेत. पदांना यमन, भूप, बागेश्री, शंकरा, मालकंस, सोरट, सारंग, देस, मिश्र समाज, भीमपलास अशा अस्सल रांगांबरोबरच कवालीच्या चाली (२ पदांना) आहेत. ही सर्व पदे जोगळेकर वकील व त्यांचे बंधू डॉ. जोगळेकर यांनी लिहिली होती व त्यांना भारत गायन समाजाच्या बापुराव केतकरांनी  चाली दिल्या होत्या. नाटकातल्या १० व्यक्तिरेखांत तीन स्त्रियांच्या आहेत आणि त्या तिन्ही भूमिका हरी मोरेश्वर घाणेकर (बी. जे. मेडिकल स्कूल) गोविंद माधव गोळे (सर परशुरामभाऊ कॉलेज) व पांडुरंग विष्णू गोडसे यांनी केल्या होत्या.

आता प्रत्यक्ष कथानकाकडे वळू. कॉलेजमध्ये असताना दोन मित्र व दोन मैत्रिणी ‘प्रेमविवाहच’ करायचा अशी प्रतिज्ञा करतात. एका मुलीचा व एका मुलाचा प्रेमविवाह होतो. दुसऱ्याचे लग्न ‘पाहून’ ‘ठरवून’ होते. ज्यांचे लग्न ठरवून होते त्यांनी आपल्या मित्र व मैत्रिणीला (ज्यांचा प्रेमविवाह झालेला असतो त्यांना) सांगत नाहीत, कारण प्रतिज्ञा पालन न झाल्यामुळे कमीपणा वाटत असतो. गंमत अशी की, ज्यांचा प्रेमविवाह झालेला असतो त्या नवरा-बायकोचे हे प्रेमविवाह न झाल्यामुळे नवरा-बायको मित्र व मैत्रीण असतात हे एकमेकांना माहीत नसते.

पारंपरिक पद्धतीने ‘पाहून’ लग्न झालेल्या जोडप्याचा दिवाळसण पुढे ढकलला जातो. नवरा- बायकोला त्यांचे मित्र-मैत्रीण बोलावतात. आपण एकाच ठिकाणी जाणार आहोत हे परंपरागत जोडप्याला ठाऊक नसते. मित्राच्या गावात गाठ पडल्यावर नवरा बेत आखतो की आपण लग्न झाले हे लपवून ठेवायचे आणि ‘रोमान्स’ची हौस भागवायची. त्याप्रमाणे नाटक सुरू होते. प्रेमविवाह झालेल्या जोडप्याने या पारंपरिक विवाहित जोडप्याला जोडपे म्हणून बघितले नसल्याने ते त्यांना उपवधू-उपवर समजून लग्न लावण्याचा विचार करतात. त्यासाठी दोघांच्या आईबापांना पत्र धाडतात. त्यामुळे नायक-नायिकेचे आई-वडील हैराण होतात. प्रेमविवाहित जोडप्याच्या घरी पत्नीचा भाऊ- उल्लू असा- असतो. त्याला एक मुलगी सांगून येते. पण प्रेमविवाहित पुरुष नायकाला- हा माझा मेव्हणा म्हणून पुढे करतो. नायक-नायिकांना एकमेकांशी रोमँटिक वगैरे बोलण्याची संधीच मिळत नाही. उल्लू मेव्हणा नायिका व सांगून आलेली मुलगी कोणाशी लग्न करायला तयार असतो. तसे तो दोघींना सूचितही करतो. त्याला सांगून आलेली मुलगी लग्नाला उतावीळ असते. उल्लू मेव्हणा खोटय़ा प्रेमचिठय़ा सर्वाना पोहोचवतो. त्यामुळे नायिका व मेव्हणा यांच्याबाबत संशय निर्माण होतो. अखेरीस फार्सच्या पद्धतीने नायिकेचा मामा येऊन सर्व खुलासे होतात.

म्हटले तर कथानक फार्सचे आहे. पण फार्सला जी गती आवश्यक असते ती २३ पदांमुळे निश्चितपणे कमी होत असावी. नाटकातली सर्व पात्रे ब्राह्मणी मराठी बोलतात. पण त्यांच्या संवादात संस्कृतचा प्रभाव नाही. रोजच्या बोलीभाषेतील ती वाटते. मात्र पदे आहेत ती खास स्वयंवर सौभद्र पद्धतीची. उदा.

प्रणयासी भुलुनि किती मूढ खचित हा झाला

करी कपिसम लीला नच गणतीही तयाला

बघुनि निकटी नव सुंदर बाला. भुलुनि मानस गेला

भ्रमण करित जणू भ्रमर भोवती मधु-रस चाखायला.

शब्दरचना केवळ जुन्या पद्धतीची आहे असे नाही तर दोन गाणी चक्क स्वयंवरमधील ‘सुजन कसा मन चोरी’ आणि सौभद्रमधल्या ‘नच सुंदरी करु कोपा’ या लोकप्रिय पदांवर बेतली आहे.

१) तस्करासम नसे कृति काय, हरिले नकळत हृदय धनाला

२) बघ सुंदरी शरण तुला दास असे हा आला

सोडुनिया कोप आता वरि अनुरागाला॥धृ.॥

दुसऱ्या पदाचे शब्द ‘नच सुंदरी करु कोपा’ या पदाच्या चालबरहुकूम आहे. तंतोतंत. कदाचित पदांचे लेखक संगीत नाटकांच्या प्रभावाखाली असल्याने हे झाले असेल.

य. गो. जोशी यांच्या प्रस्तावनेतील आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करणे जरूर आहे. पहिली त्यांनी आपण नवखे नाटककार असल्याचे म्हटले आहे. शिवाय सुप्रसिद्ध नाटककार श्री. माधवराव जोशी, नटवर्य गणपतराव बोडस व श्रीदत्त प्रिंटिंग प्रेसचे मालक रा. बाबुराव खाडिलकर यांनी या नाटकात आपलेपणाने काही सूचना केल्या होत्या. त्यामुळे असेल कदाचित, पण या नाटकाच्या नावाखेरीज नवखेपणाच्या खुणा आढळत नाहीत. श्री-मुखात हा शब्दप्रयोग श्रीमुखात भडकविणे या वाक् प्रचाराच्या संदर्भात आहे. त्याचे अस्तित्व नाटकात चार-पाच ठिकाणी येते. त्यापलीकडे फारसे महत्त्व त्याला नाही. ही एकच खूण नवखेपणाची म्हणता येईल. दुसरं हे नाटक लिहून झाल्यावर ‘विनोदी’ सदरात मोडले जाईल असे नाटक लिहिण्याबद्दल य. गों.चा आत्मविश्वास वाढला असावा. कारण याच नाटकाच्या संहितेच्या पुस्तकात (जे लेखनानंतर सहा महिन्यांनी प्रकाशित झाले.) य. गो. जोशी यांच्या ‘अगदी नव्या धर्तीचे सामाजिक हास्यरसात्मक नवीन नाटक ‘हाताला हात’ (अंक १ ते ३)’ अशी आणखी एक जाहिरात आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे नाटक रूपांतरित/भाषांतरित असल्याचे त्यांच्या (य. गो. जोशी यांच्या) काही मित्रांना वाटले आणि त्याबद्दल य. गों.नी काही सात्त्विक निषेधाचे शब्द लिहिले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रस्तुत नाटक स्वतंत्र असेलही, पण त्याचे १४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘संशयकल्लोळ’ या नाटकाशी सहज जाणवणारे साम्य दुर्लक्षिता येत नाही. फरक एवढा मात्र आहे की, ‘संशयकल्लोळ’ आधारित असले तरी मुळात संशय घेणे वाईट हेच प्रतिपादन त्यात होते. ‘श्रीमुखात’मध्ये संशय घेतल्याचा पश्चात्ताप आहे, पण तो उपप्रवाह म्हणून. त्या वेळच्या तरुणांना वाटणारे प्रेमविवाह या प्रकरणाचे आकर्षण आणि त्याच्या विवाहोत्तर जाणवणाऱ्या मर्यादा हा केंद्रविषय आहे. शिवाय पैशाकडे पाहून मुलीचा विवाह ठरविणे आणि मुलामुलींच्या मताला किंमत न देता आई-वडिलांनी लग्न ठरविणे असे विषय ओझरते येतातच.

य. गो. जोशींना फार्स हा प्रकारही अवगत होता हे सिद्ध करणारे नाटक म्हणून ‘श्रीमुखात’ची नोंद करावी लागेल हे निश्चित.

लेखक : य. गो. जोशी.

प्रकाशक : गणेश महादेव आणि कंपनी. प्रकाशन- जून १९३०.  मूल्य : १२ रुपये.  ल्ल

vazemukund@yahoo.com

मराठीतील सर्व विस्मृतीत गेलेली पुस्तके बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on y g joshi
First published on: 11-10-2015 at 00:32 IST