vv11एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
काही शब्दांचे उच्चार आणि पाणी यात खूपच साम्य असावं असं वाटतं. पाणी ओंजळीत धरायचा प्रयत्न केला की ते निसटून जातं. तसंच काही उच्चारांच्या बाबतीत म्हणता येईल. आजचा शब्द याच वर्गातला आहे. Hour या शब्दाचा अवर, आवर, आर, हवर असा उच्चार आपल्या कानी पडलेला असतो. यातला अचूक उच्चार म्हणायचा तर तो आहे ‘आवर’. पण हा उच्चारही पाण्यासारखाच हातातून नव्हे तर तोंडातून निसटतो. म्हणजे तो तोंडी बोलून दाखवता येईल पण लिखाणात त्याचं अचूक रूप पकडणं जरा मुश्कील. हा मराठीतल्या आवराआवरमधल्या आवरपेक्षा खूपच निराळा आहे. यातला ‘र’ खेचायचा नाही. जीभ थोडी पाठी घालून र ला हलकासा र्र र्र चा फील दिला की हा इंग्रजी ‘आवर’ तयार.
शब्द म्हणजे काही एखादी रेसिपी नाही. अमुक प्रमाणात पॉज घ्या. तमुक प्रमाणात शब्द खेचा अशा मोजमापाने शब्द तयार होत नाही. हा संस्कारांचा भाग असतो. लहानपणापासून त्या शब्दांचे कानावर पडणारे उच्चार आपल्यावर नकळत त्या शब्दाचे संस्कार करत असतात. अनेक इंग्रजी शब्द असेही असतात की, त्यांचा अर्थ तर कळलेला असतो पण उच्चार बुचकळ्यात टाकतात. Hour म्हणजे तास हा अर्थ तर कळतो, पण उच्चाराची नानासंख्य रूपं लहानपणापासून कानावर पडतात आणि आपण गोंधळतो. एका प्राध्यापिकाबाईंचा   ‘आर’ हा उच्चार आजही कानात आहे. इतका गोड की हाच अगदी हाच तो उच्चार असं ठामपणे वाटायचं. गावाकडल्या शाळेतील एका शिक्षकांचा स्पेलिंगबरहुकूम ‘हवर्स’ असा उच्चारही आठवतो. इंग्रज व अमेरिकन मंडळींनी मात्र ‘आवर’ हाच उच्चार निश्चित केला आहे. स्पेलिंगमधल्या H चं गायब होणं आता धक्का देत नाही. कारण इंग्रजी अक्षरे कधीही मौनव्रत धारण करू शकतात हे एव्हाना आपल्याला माहीत झालंय. मुळात हा Hour  लॅटिन Hora या शब्दापासून निर्माण झाला आहे. प्राचीन काळाचा विचार करता दिवसाची बारा भागांत विभागणी होत असे. तर रात्रीचे चार प्रहर मानले जात. चौथ्या शतकापर्यंत दिवसाच्या प्रकाशानुसार दिवस विभागला जाई, पण त्यालादेखील मर्यादा होती. कारण वर्षभरात हा दिवसाच्या प्रकाशाचा काळ ऋतूनुसार बदलत राही. त्यामुळे दिवसाची समान भागात अचूक विभागणी करण्यात अडथळा येई. त्यातून मग पुढे ही तासाची गणना प्रत्यक्षात आली. मात्र सुरुवातीच्या काळातही ही तासांची विभागणी समान नसायची. इक्वल आवर्स आणि अनइक्वल आवर्स अशी विभागणी होती. आज बहुतांश ठिकाणी आवर्स आणि मिनिट्स अशाच स्वरूपात वेळेचं एकक मांडलं जातं. आणि पर्यायाने आवर्स किंवा आवर हा शब्दही तितक्याच सातत्याने उच्चारला जातो. काही उच्चार अडचणीत आणणारे असतात, पण त्यांचा वापर क्वचित होत असल्याने तितकासा विचार करण्याची वेळ येत नाही. मात्र hour  सारखे शब्द रोजच्या वापरातले आहेत. त्यांचा उच्चार जितका अचूक तेवढीच हातातून काही निसटल्याची वा काही अपूर्ण राहिल्याची भावना कमी. So let’s spend at least an hour for knowing right pronunciation.
viva.loksatta@gmail.com