तेजश्री गायकवाड

जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्यांदाच ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीम सज्ज झाली होती. नुकत्याच दुबईत झालेल्या आकर्षक ‘ग्लोबल चॅलेन्ज २०१९’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व ५ मुलींच्या टीमने केलं.  मुंबईतील ४ शाळांमधून ९ ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या मुलींमधून पाच मुलींची निवड करण्यात आली. या टीमला ‘गियर्ड अप गर्ल्स टीम’ असं नाव देण्यात आलं होतं. रोबोटिक्समध्ये आपलं कौशल्य पणाला लावणाऱ्या या टीमने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत देशाचा लौकिक वाढवला आहे. अद्वितीय ऑलिम्पिक-स्टाइल रोबोटिक्स चॅलेन्जमध्ये सागरी प्रदूषणासंबंधीचे (ओशन पॉल्युशन) आव्हान लोकांना समजावून देणारे रोबोट्स आरुषी शाह, राधिका सेखसरिया, आयुषी नैनन, जसमेहर कोचर आणि लावण्या अय्यर या मुलींनी बनवले. इतकेच नाही तर या रोबोट्सचा वापर त्यांनी उत्तमरीत्या करूनही दाखवला..

जगभरातील १९१ देशांतील २,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी (वय वर्षे १४ ते १८) दुबई येथे झालेल्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेन्ज’च्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. ‘दि फर्स्ट ग्लोबल चॅलेन्ज’ ही अमेरिकेतील विना-नफा संस्था असून आपल्या ग्रहासमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?, या संकल्पनेवर आधारित रोबोटिक्स ऑलिम्पिक्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी जगभरातील देशांना आपली टीम पाठवण्यासाठी आमंत्रित केले होते. ही स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर दुबईत पार पडली. या वर्षांची संकल्पना ‘सागरी संधी’ (ओशन अपॉर्च्युनिटी) अशी होती. यात सागरी जीवन आणि लोकसंख्येवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या सागरी प्रदूषणावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या संस्थेने सहभागी टीमला आपले महासागर आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी काय काय करता येईल, यासंदर्भातील प्रशिक्षण दिले. आणि प्रशिक्षणानंतर तरुण व होतकरू वैज्ञानिकांसमोर प्रदूषित महासागर स्वच्छ करण्यासाठी रोबोट कसे तयार करता येतील, हे आव्हानही समोर ठेवले. ही स्पर्धा सीरियाच्या तरुण ‘टीम होप’ने जिंकली, मात्र या स्पर्धेत आपल्या देशातील मुलींच्या टीमने ज्या धडाडीने सहभाग घेतला, परिश्रम घेतले त्याची दखल घ्यायलाच हवी. अत्यंत उत्साही अशा ‘गियर्ड अप गर्ल्स’च्या ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीमने ऑक्टोबर २४-२७ दरम्यान झालेल्या या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेन्ज’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी या स्पर्धेत भारताला लौकिक मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ज्या वेळी आपल्यातली धमक सिद्ध करून दाखवण्याची वेळ येते त्या वेळी भारतातील महिला नेहमीच पुढाकार घेतात हेच पुन्हा एकदा या टीमने अधोरेखित केलं आहे. या स्पर्धेत निवड होण्यासाठी पाचही मुलींना कठोर निवड प्रक्रियेतून जावं लागलं. ज्यात तांत्रिक मुलांखतींच्या चार फेऱ्यांचाही समावेश होता. २० संघांशी सामना करून त्यांनी टीम इंडियाच्या प्रतिष्ठित संघात स्थान मिळवले आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल आरुषी शाह (बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल) सांगते, ‘आम्ही जागतिक व्यासपीठावर एसटीईएम / रोबोटिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी प्रथम ऑल-गर्ल्स टीम म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी अत्यंत आत्मविश्वासाने प्रयत्न केले. आमचा विश्वास आहे की, ज्या मार्गाने आम्ही या टप्प्यावर पोहोचू शकलो, त्याच पद्धतीने आपल्या देशातील अनेक प्रतिभावान मुलं या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेऊन देशाचं नाव मोठं करू शकतात. आम्ही या स्पर्धेत जी कामगिरी केली त्यामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही त्याच जिद्दीने प्रयत्न करतील,’ असा विश्वास आरुषीने व्यक्त केला.

या टीमने आपल्या रोबोटचे नाव ‘शक्ती’ असे ठेवले होते. या शक्तीचे वेगळेपण सांगताना त्याचे प्रोग्रॅमिंग करणाऱ्या राधिका सेखसरिया हिने सांगितले की, शक्ती ही रोबोट इतरांपेक्षा वेगळी आहे, कारण त्याचे मेकॅ निझम हे युनिव्हर्सल आहे. एकाचवेळी मॅक्रो आणि मायक्रो प्रदूषक उचलण्याचे कामही ती योग्य पद्धतीने करू शकते. तर याच टीममधील लावण्या अय्यर जिने या रोबोटच्या संरचनेत मोलाची भूमिका बजावली. तिच्या मते शक्ती ही वैविध्यपूर्ण काम करणारी आहे. त्याच वेळी ती सातत्याने कार्यरत असणारी आणि जिच्यावर पूर्ण विश्वास टाकून काम करता येईल अशी असल्याचे स्पष्ट केले. अर्थात, शक्ती या आपल्या रोबोटवर पूर्ण आत्मविश्वासाने काम करणाऱ्या या मुलींना जिंकण्याची आशा होती. मात्र, स्पर्धेतील विजय एवढाच त्यांचा माफक उद्देश नव्हता. आम्ही भविष्य घडवत आहोत, असं सांगणाऱ्या या मुलींना आपण मुलींची टीम आहोत, याचाही खूप अभिमान आहे.

या टीमला घडवणाऱ्या मीनल मजूमदार यांच्या मते, ही एकमेव टीम अशी आहे ज्यांनी खरे म्हणजे रोबोटिक्सचे कुठलेही अधिकृत शिक्षण घेतलेले नाही. तरीही या मुली खूप आधीपासून एका मोठय़ा रोबोटिक्स ग्रुपअंतर्गत सहभागी होऊन काम करत होत्या. मात्र त्यांना तिथे फारसा वाव मिळत नव्हता. त्यांना वरवरची कामं दिली जात होती. पहिल्यांदाच या मुलींनी त्यांची ही चौकट मोडून इतक्या मोठय़ा स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी केली. या मुलींचं वैशिष्टय़ असं की, त्या फक्त या स्पर्धेत सहभागी होऊन तिथवरच थांबलेल्या नाहीत. त्यांनी याआधीच वंचित मुलांसाठी बरेच काम केले आहे. वंचित मुलांना विविध समस्यांबद्दल जाणीव करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, चांगल्या योजनांसाठी निधी उभारणे अशा अनेक कार्यात एसटीईएम या ट्रस्टअंतर्गत त्या कार्यरत आहेत. या पाच धडपडय़ा, उत्साही मुलींची रोबोटिक टीम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवू शकली नसली, तरी त्यांच्या सहभागामुळे देशभरातील मुलांना नक्कीच प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे हाच त्यांच्या प्रयत्नांचा खरा विजय म्हणता येईल.

* आरुषी शाह हिने रोबोट डिझाइन, रचनात्मक आणि इलेक्ट्रिक भागांवर काम केले.

* राधिका सेखसरियावर रोबोटचे प्रोग्रॅमिंग आणि त्यासाठी निधी उभारण्याची जबाबदारी होती.

* आयुषी नैनन हिने धोरणात्मक आणि रचनात्मक कामांवर प्राथमिक लक्ष केंद्रित केले होते.

* जसमेहर कोचरने रोबोटचे प्रोग्रॅमिंग आणि धोरणात्मक मांडणीची बाजू सांभाळली.

* लावण्या अय्यरवर रोबोटची रचना आणि त्यासंदर्भातील नियोजन अशा कामांची जबाबदारी होती.