|| शेफ अनघा गोडबोले

उन्हाळ्याची खाद्यसंस्कृती सीरिजमधील शेवटचा लेख लिहिताना थोडं वाईट वाटतंय, कारण यापुढे आपली भेट होणार नाही. तुम्ही सीरिजला जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्व वाचकांचे मी मनापासून आभार मानते!! भारताइतकाच उन्हाळा हा ऋतू अमेरिकेत लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात काय करायचे याची योजना फार आधीपासूनच अमेरिकेत सुरू असते. तिथल्या सुट्टय़ादेखील एकदम उन्हाळ्याच्या अनुषंगाने प्लॅन केल्या जातात.

‘मेमोरियल डे’ जो मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी असतो त्या दिवशी अमेरिकेत समर सीझनची सुरुवात होते. ‘लेबर डे’ जो सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी असतो तोपर्यंत इथे समर सीझन सुरू असतो. समर या शब्दावर आधारित किती तरी गाणीदेखील अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. ब्रायन अ‍ॅडम्सचे ‘समर ऑफ सिक्स्टी नाइन’, ‘समर ब्रीझ’, ‘समर टाइम’ अशी कित्येक गाणी आहेत ज्याची यादी संपणारच नाही.

अमेरिकेतील समर म्हटले की पाच गोष्टी अगदी नक्की डोळ्यासमोर येतात आणि त्या म्हणजे बारबेक्यू, बीच, फटाके, कॅम्पिंग आणि थीम पार्क्‍स. समर सीझनमध्ये अमेरिकन लोक गाडीमध्ये सामान भरून रोड ट्रिप्स करायला जातात. तिथे उन्हाळ्यात कॅम्पिंग करायला खूपच मज्जा येते. तंबू उभा करायचा, झोपायची व्यवस्था करायची आणि मग बाकीचे कार्यक्रम सुरू. इथे स्वयंपाक करायला छोटासा स्टोव्ह किंवा लाकडाचा उपयोग करतात, त्यावर भाजून खाल्लेल्या मक्याच्या कणसाची चव काही औरच असते. रात्री शेकोटी पेटवून त्याच्याभोवती बसून गप्पागाणी असे कार्यक्रम समर सीझनमध्ये इथे सर्रास होताना दिसतात.

उन्हाळ्यात इथे ‘स्मोअर्स’ हा पदार्थ केला जातो. कुरकुरीत बिस्किटं, चॉकलेट आणि आगीवर शेकून घेतलेले मार्शमेलो असं कॉम्बिनेशन अफलातून लागते.

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की डिस्नेसारख्या थीम पार्क्‍समध्ये गर्दी वाढू लागते. छान छान राइड, आकर्षक शो आणि आवडती मिकी आणि मिनी माऊस यामुळे छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण इथे मोठी गर्दी करतात.

फिरत फिरत हातात घेऊन खाण्यासारखे अनेक पदार्थ इथे उन्हाळ्यात चाखायला मिळतात. नाचोज, फ्रेंच फ्राइज, पॉपकॉर्न, प्रेटझेल, आइस्क्रीम अशा खाद्यपदार्थाची रेलचेल इथे असतेच. वेगवेगळ्या प्रकारचे शेक रंगीबेरंगी भांडय़ात घालून पिताना लहान मुलांना अगदी मजा येते. शेक्सच्या प्रकारामध्ये इथे जजो शेक्स आणि फ्लोट प्रसिद्ध आहे. कधी मिल्कशेकमध्ये तर कधी कोकाकोलामध्ये एक मोठा गोळा घालून केलेला हा फ्लोट फारच छान लागतो. वेगळ्या कल्पना वापरून हाच पदार्थ अगदी स्पॉइस्टिकेटेडदेखील बनवता येतो.

उन्हाळ्यात हवा गरम झाली की फार्मर्स मार्केटदेखील ताज्या फळांनी व भाज्यांनी तुडुंब भरून जातात. फ्रेश टोमॅटो, पीच, चेरी, स्ट्रॉबेरी यांची रेलचेल इथे अधिक पाहायला मिळते. ताज्या भाज्यांमुळे इथे उन्हाळ्यात सलाडवर अधिक भर दिला जातो. वेगवेगळी ड्रेसिंग वापरून, सुका मेवा घालून आरोग्याला फायदेशीर असणारे सलाड इथे चवीने खाल्ले जातात.

अमेरिका हा थंड हवेचा देश आहे. किती तरी ठिकाणी इथे उन्हाळ्यात बर्फ पडतो. त्यामुळे हवा गरम झाली की लोक जास्तीत जास्त वेळ बाहेर मोकळ्या हवेत घालवतात. त्यामुळे बारबेक्यू हा इथला अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्यांना मसाले लावून, चिकनचे वेगवेगळे कबाब, दोन पावांच्या तुकडय़ामध्ये घालून खाल्ला जाणार बर्गर, मक्याची कणसे, भाजलेला बटाटा असे किती तरी प्रकार बारबेक्यूमध्ये केले जातात, एवढंच काय तर फळंदेखील ग्रिल करून खाल्ली जातात.

अमेरिकेतील उन्हाळी खाद्यसंस्कृती जास्तीत जास्त पेयांवरच आधारलेली आहे. इथे अनेक कॉमन थंडगार पेये घरोघरी बनवली जातात. लेमोनेड, वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक, उष्ण हवेत शरीरात गारवा निर्माण करणाऱ्या कलिंगडासारख्या फळांचा रस, बीअर असे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात.

उन्हाळ्यात भारतात ज्याप्रमाणे आपण एकमेकांना कैरीचं पन्हं देतो तसेच इथे लेमोनेड दिलं जातं. अमेरिका हा देश अन्य देशांतून आलेल्या लोकांनी तयार केलेला देश असल्यामुळे इथल्या खाण्यामध्येदेखील अनेक देशांमधील प्रकार पाहायला मिळतात. मेक्सिकोमध्ये प्रिय असलेला मिचेलाडा किंवा कॅरेबियनमधून आलेले मोहितो तर स्पेनमधून आलेली संग्रिया ही अमेरिकेतील उन्हाळ्यातील आवडती पेये आहेत. फक्त पेयेच नाही तर टाको, पिझ्झा असे किती तरी बाहेरच्या देशांचे पदार्थ इथे लोकप्रिय आहेत.

स्मोअर्स चीज केक

हा चीज केक उन्हाळ्यात अमेरिकेमध्ये जागोजागी मिळतो.

साहित्य : १ ते १/२ कप चॉकलेट चिप्स, ३/४ कप क्रीम, १० ते १२ डायजेस्टिव्ह बिस्किटं चुरून घेतलेली, ५ टेबलस्पून लोणी वितळवून घेतलेले, १/४ कप साखर, १ चिमूट मीठ, ४५० ग्रॅम क्रीम चीज (नॉर्मल टेंपरेचरला येऊ द्यावे), ३/४ कप पिठीसाखर, १ ते १/२ कप क्रीम, १ टी स्पून व्हॅनिला इसेन्स, छोटे मार्शमेलो.

कृती : गनाश बनवण्यासाठी १ ते १/२ कप चॉकोलेट चिप्स एका भांडय़ात घ्या. क्रीम मध्यम आचेवर गरम करून घ्या. गरम क्रीम चॉकलेट चिप्स वर घाला आणि चमच्याने ढवळा, चिप्स वितळून एकजीव मिश्रण तयार होईल. तयार मिश्रणाला गनाश म्हणतात. एका मोठय़ा भांडय़ात बिस्किटाचा चुरा, वितळवलेले लोणी, साखर आणि मीठ घालून नीट एकजीव करून घ्या. स्पिंगफोला लोणी लावून घ्यावे. त्यावर बिस्किटाचे मिश्रण घालून दाबून घ्यावे.  गनाश क्रस्टवर ओतून घ्या. एका भांडय़ात क्रीम चीज घेऊन नीट फेसून घ्यावे. त्यात साखर घालून परत नीट मिक्स करून घ्यावे. क्रीम घालून मिश्रण छान फुलून येईपर्यंत फेसून घ्यावे. व्हॅनिला घालून मिक्स करावे. हे चीज मिश्रण चॉकलेट आणि क्रस्टवर ओतून घ्यावे. त्यावर मार्शमेलो लावून घ्यावेत. सर्व केक फ्रीझरमध्ये ५-६ तास ठेवावे. सव्‍‌र्ह करायच्या आधी ब्रॉयलरच्या खाली ठेवावे, मार्शमेलो छान खमंग होतील आणि त्याची कडवी चव बाकी गोड गोष्टींबरोबर छान लागते.

रास्पबेरी क्रीम फ्लोट

साहित्य : फ्लोटसाठी – ७५० मिली श्ॉम्पेन किंवा सफरचंद ज्यूस किंवा द्राक्षांचा रस (थंड), १ व्हॅनिला आइस्क्रीमचा डबा, १० ते १५ रास्पबेरी.

रास्पबेरी सॉससाठी – ३२५ ग्रॅम रास्पबेरी, १/४ कप साखर, १/४ टी स्पून व्हॅनिला इसेन्स.

कृती : एका छोटय़ा भांडय़ात रास्पबेरी आणि साखर एकत्र करून मंद आचेवर गरम करा. रास्पबेरी मऊ  होतील आणि साखरेला पाणी सुटेल. हळूहळू लाकडी चमच्याने रास्पबेरीला ठेचा म्हणजे त्यातील रस बाहेर येईल. जेव्हा सर्व मिश्रण छान एकजीव होईल तेव्हा ते गॅसवरून बाजूला करून त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. हे मिश्रण बारीक चाळणीवर गाळून घ्या. म्हणजे खाली अगदी मुलायम सॉस तयार होईल. एका लांबुळक्या ग्लासमध्ये १ ते २ चमचे वर तयार केलेला रास्पबेरी सॉस घालावा. त्यावर आइस्क्रीमचे २ ते ३ छोटे गोळे ठेवावेत. आता ग्लास पूर्ण भरेपर्यंत श्ॉम्पेन किंवा ज्यूस घाला. वरून १ ते २ रास्पबेरी घालून सव्‍‌र्ह करावे.

मिचेलडा

साहित्य : लिंबाचा रस, वुरसेस्टरशायर सॉस, सोया सॉस, हॉट सॉस, लागर बीअर

कृती : ग्लासच्या किनाऱ्याला लिंबाचा रस लावून घ्या, त्यात तिखटमीठ बुडवून घ्या म्हणजे तिखटमीठ ग्लासच्या किनाऱ्याला चिकटेल. एका ग्लासमध्ये वुरसेस्टरशायर सॉस, सोया सॉस, हॉट सॉस आणि थोडेसे तिखट घालून मिक्स करा. त्यावर तुमची आवडती बीअर घालून ढवळून लगेच सव्‍‌र्ह करा.

viva@expressindia.com