वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

दहावीच्या परीक्षेत काठावर पास झालेल्या मुलापासून ते शंभर टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचीच मनसोक्त थट्टा सोशल मीडियापासून प्रत्यक्ष भेटीपर्यंत सगळ्या ठिकाणी केली गेली. अगदी अभिनंदन करायला फोन केलेल्या नातेवाईकांनीसुद्धा ‘करोना बॅच’ची तळटीप जोडली.

गेल्या वर्षी एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेटवर ‘करोना बॅच’ असं चक्क लिहून दिलं. त्यावर आक्षेप घेतला गेला, खूप सारी चर्चा झाली आणि मग त्या विद्यापीठाने तो निर्णय मागे घेतला. तेवढय़ापुरता ‘करोना बॅच’ हा विषय संपला. नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल हाती आला. अनेक शाळांचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अनेकांना शंभर टक्के  मिळाले आणि अनेकांच्या त्यावर आधारित अ‍ॅडमिशन्सही झाल्या. या दहावीच्या विद्यार्थ्यांवर बोर्डाने नाही तर त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी, मोठय़ा बहीण-भावंडांनी, अशा अनेक जणांनी ‘करोना बॅच’चा शिक्का मारला आणि वेळोवेळी त्यांची खिल्ली उडवायची संधी साधून घेतली. काठावर पास झालेल्या मुलापासून ते शंभर टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचीच मनसोक्त थट्टा सोशल मीडियापासून प्रत्यक्ष भेटीपर्यंत सगळ्या ठिकाणी केली गेली. अगदी अभिनंदन करायला फोन केलेल्या नातेवाईकांनीसुद्धा ‘करोना बॅच’ची तळटीप जोडली.

प्रत्यक्षात मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांनी २०२० – २१ या शैक्षणिक वर्षांत किती आणि कसे कष्ट घेतले आहेत याची दखल फारशी कोणी घेतली नाही. करोना, लॉकडाउन आणि या वर्षीची दहावीची बॅच यांनी खरंतर एकत्रच दहावीत प्रवेश केलाय. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अभ्यास स्वत:चा स्वत:च करावा लागला आहे. ही परीक्षा आपल्या शालेय जीवनात अति महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थी आणि शिक्षकही त्यासाठी कसून तयारी करत असतात. कितीही अडचणी असल्या तरीही दहावीच्या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थी आपलं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो. करोनाच्या परिस्थितीतसुद्धा हे विद्यार्थी मनापासून अभ्यास करत होते. ‘घरी बसून तर अभ्यास करायचाय, त्यात काय अडचणी येणार,’ असा विचार करून या विद्यार्थ्यांंच्या मेहनतीचं श्रेय त्यांना न देणारे अनेकजण आहेत. त्यांना अजूनही सर्वागाने विचार करता येत नाही असंच म्हणावं लागेल.

महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क येत नाही त्याही भागातल्या मुलांनी मनापासून अभ्यास केला. नेटवर्क आलं तर इलेक्ट्रिसिटी नाही, मोबाइल घ्यायला पैसे नाहीत, घरात अभ्यास करायला जागा नाही, शांतता नाही, अशा अनेक अडचणींना तोंड देत मुलांनी वर्षभर मेहनत घेतली. केवळ मोठय़ा शहरांपुरता विचार केला तर कधीच समजून घेता येणार नाहीत अशा अनेक अडचणी राज्याच्या कित्येक भागांत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी करोनामुळे आपले पालक गमावलेत, कुटुंबातली एखादी व्यक्ती गमावली आहे, काहींच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, मुलांनाही घराला हातभार लावण्यासाठी धडपड करावी लागली आहे आणि तरीही ती मुलं परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज होती. या सगळ्या प्रॅक्टिकल अडचणींसोबतच त्या मुलांच्या मानसिकतेचा आणि मेंटल हेल्थचा विचार होणंही गरजेचं आहे. शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटणं, एकमेकांशी अभ्यासाची चर्चा करणं, शिक्षकांची अभ्यासात मदत घेणं या सगळ्या शाळेतच होणाऱ्या गोष्टी त्यांना या वर्षी अनुभवायला मिळाल्याच नाहीत.

खूप सहजपणे एखाद्याची खिल्ली उडवून मोकळं होताना हा विचार केलाच जात नाही की त्या व्यक्तीने कोणकोणत्या अडचणींना तोंड दिलं आहे, त्याची मानसिक स्थिती कशी आहे, त्याने किती मेहनत घेतली आहे. परीक्षा द्यायला मानसिक आणि बौद्धिकरीत्याही तयार असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयत्या वेळी रद्द झाली यात त्यांचा काहीच दोष नाही. सगळ्यांनीच थोडा संवेदनशीलतेने विचार केला तर त्या विद्यार्थ्यांनाही या परिस्थितीला सामोरं जाणं सोपं होईल. दहावीनंतर विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने विचार करून विद्याशाखा निवडावी लागते. आणि त्यासाठी वर्षभर विद्यार्थी कसून अभ्यासही करतात. मात्र या विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून त्यांच्या परीक्षा योग्य पद्धतीने घेणे, शाळेकडून त्यांचे अंतर्गत मूल्यमापन चोख करणे या प्रक्रियेत शिक्षण व्यवस्थाच सपशेल अपयशी ठरली आहे. या अपयशाचे गंभीर परिणाम मात्र विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत. दहावीची परीक्षा संपून निकाल त्यांच्या हाती आली असले तरी अजून सामायिक प्रवेश परीक्षेपासून ते प्रत्यक्ष महाविद्यालयीन प्रवेशापर्यंत अजून अनेक आव्हानांचा सामना या विद्यार्थ्यांना करायचा आहे. त्यामुळे सरसकट त्यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करोना बॅचचा शिक्का न मारता त्यांच्यासमोरील आव्हानांमधून मार्ग कसा काढता येईल? यंदा दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपुढेही हेच वाढून ठेवले आहे का?, असे कित्येक प्रश्र अजूनही अनुत्तरित आहेत. त्यांची उत्तरे शोधून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी वर्तमानात काही ठोस प्रयत्न के ले पाहिजेत. ते न करता के वळ या बॅचची खिल्ली उडवण्यात सध्या समाज मग्न आहे.