प्रियंका वाघुले

काही कलाकारांना पाहिलं रे पाहिलं की पहिले त्यांची देहयष्टी डोळ्यात भरते. आणि मग साहजिकच असं शरीर त्यांनी कसं कमावलं असेल, नक्की कोणत्या प्रकारचा व्यायाम, डाएट सांभाळलं जात असेल, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. फिटनेसचं दुसरं नाव देवदत्त नागे असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतकं  हे समीकरण प्रेक्षकांच्याही मनात चपखल बसलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘जय मल्हार’ मालिकेतून खंडोबा म्हणून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या आणि पाहताक्षणीच त्याच्या फिटनेसच्या प्रेमात पडायला लावणारा कलाकार म्हणजे देवदत्त. प्रेक्षकांच्या मनात खंडोबाची प्रतिमा उभी करत असताना भूमिकेची गरज म्हणूनही शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचेच होते. त्यामुळे इतकी वर्ष मालिका सातत्याने सुरू असतानाही देवदत्ताच्या फिटनेसमध्ये कधी खंड पडला नाही. उलट मालिकेच्या निमित्ताने आपोआपच स्वत:च्या फिटनेसकडे चांगल्या रीतीने लक्ष देता आले असं तो म्हणतो.

आपण साकारत असलेल्या पात्राची मागणी काय असते ते लक्षात घेऊन कलाकारांना ती पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे खंडोबाची भूमिका साकारताना स्वत:च्या देहबोलीवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागल्याचं त्याने सांगितलं. खंडोबा हा देव मुळातच तम शरीरयष्टी असलेला आहे त्यामुळे मलादेखील त्या निमित्ताने स्वत:च्या शरीरयष्टीकडे अधिक लक्ष देता आले, असं सांगतानाच मुळात त्याला फिटनेसची पहिल्यापासूनच आवड होती हेही त्याने स्पष्ट केलं.

शाळेत असल्यापासून बॅट मॅन, सुपर मॅन, हिमॅन यांची आवड होती आणि त्यांचे मसल्स पाहून आपणही असंच व्हायचं, असं नेहमी वाटायचं. म्हणून मग स्वत:चं शरीर फिट कसं दिसेल याकडे शाळेत असल्यापासूनच लक्ष होतं, असं त्याने सांगितलं. घरात सगळ्यांनाच पहिल्यापासून लवकर उठायची सवय असल्याने ती सवय आपल्याला सहज लागल्याचं देवदत्त सांगतो. त्यामुळे सकाळी अगदी ५ ते ६ च्यादरम्यान उठल्याने आवश्यक तितकीच झोप होते. आणि झोप पूर्ण होऊन वेळ वाया जात नाही. आताही आठवडय़ातून दोन ते तीन वेळा सायकलिंग करत असल्याचं त्याने सांगितलं. काहीही झालं तरी सायकलिंगसाठी वेळ दिला जातोच. तसंच सकाळी जरी लवकर उठलो तरी वेट एक्सरसाइझ सकाळी करण्याचे शक्यतो टाळतो, असं सांगतानाच त्याने त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. सकाळी उठतो तेव्हा शरीरातील अवयव संथ झालेले असतात. त्यामुळे त्या वेळी हवा तसा, मनाला हवा तसा व्यायाम होत नाही म्हणून मग दुपारनंतर वेट एक्सरसाइझ क रण्यावर आपण भर देत असल्याचं त्याने सांगितलं.

सुपरसेटिंग व्यायाम करत असल्याचंही तो म्हणतो. सुपरसेटिंग म्हणजे ठरावीक व्यायाम आणि त्याचे जास्त प्रमाणात रिपिटेशन्स करण्यासाठी लागणारा जो वेळ असतो त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळात तेवढा व्यायाम करणे. अर्थात, अशा पद्धतीने व्यायाम करण्यासाठी खूप जास्त ताकद लागत असल्याचंही त्याने सांगितलं. मात्र त्याच्याकडे पाहिलं की नेमक्या कोणत्या पद्धतीने आणि किती वेळ देऊन तो व्यायाम करतो हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. त्यामुळे त्याच्याकडून फिटनेसचा सल्ला घेणाऱ्यांची संख्याही जास्त असली तर नवल वाटायला नको!

viva@expressindia.com