07 December 2019

News Flash

प्रेमाची परिभाषा

तत्त्वज्ञानातून मांडला गेलेला प्रेमाचा विचार किंवा प्रेमाची फिलॉसॉफिकल परिभाषा मांडण्याचा हा प्रयत्न..

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.. ही कविता मनाशी कवटाळून बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दाखवलेल्या त्याच त्याच रोमँटिक चौकटीतून आपण प्रेमाची भाषा समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो किंवा त्यालाच प्रमाण मानून आपल्या प्रेमाच्या कल्पना, विचार निश्चित करतो. मात्र यापलीकडे तत्त्वज्ञानातही प्रेम या विषयाला स्पर्श झालेला आहे, अध्यात्मातही प्रेम आहेच. तत्त्वज्ञानातून मांडला गेलेला प्रेमाचा विचार किंवा प्रेमाची फिलॉसॉफिकल परिभाषा मांडण्याचा हा प्रयत्न..

फिलॉसॉफी या शब्दातच मुळात ‘प्रेम’ किंवा ‘लव्ह’ हा शब्द सामावलेला आहे. फिलॉसॉफीची फोड ‘फिलो’ म्हणजे ‘लव्ह’ आणि ‘सोफिया’ म्हणजे ‘विस्डम.’ फिलॉसॉफी म्हणजे ‘लव्ह फॉर विस्डम’ अर्थात शब्दश: शहाणपणाबद्दलचं प्रेम! स्वत:ला शहाणं करण्याचा ध्यास म्हणजे फिलॉसॉफी! या शहाणपणामध्ये जगातले अस्तित्वात असलेले-नसलेले सगळे विषय अंतर्भूत असतात. मग प्रेमाने तरी त्यात मागे का राहावं? प्रेम म्हटलं की बदामाच्या आकाराचं हृदय, गाणी, थंड वारा, फुलं, पाऊ स, समुद्र वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. मात्र या सगळ्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींपलीकडचं प्रेम पाहिलं आणि जगाला दाखवलं ते निरनिराळ्या भाषेच्या, निरनिराळ्या देशांच्या आणि निरनिराळ्या काळातल्या तत्त्वज्ञांनी! वेस्टर्न असोत वा इस्टर्न, जर्मन वा फ्रेंच, ग्रीक वा भारतीय सगळ्यांनी आपापल्या परीने आपापल्या लेखनात अस्तित्वाचा प्रश्न वगैरेंसोबतच प्रेम या विषयालाही महत्त्वाचं स्थान दिलं आहे.

अगदी आताचा, विसाव्या शतकातील फिलॉसॉफर म्हणजे ‘हायडेगर’! प्रेम या भावनेकडे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ या दृष्टिकोनातून बघणारा, काहीसा कविमनाचा असणारा आणि काव्यात्मक फिलॉसॉफी मांडणारा हा तत्त्वज्ञ ! प्रेम म्हणजे स्वत:ला बदलण्याची प्रक्रिया, प्रेम म्हणजे एका भावनेने पछाडलेला प्रवास आणि प्रेम म्हणजे जगाचं सूत्र उलगडण्याकडे वाटचाल! आपल्याला ज्या गोष्टीबद्दल प्रेम असतं त्याच्यापर्यंत आपण स्वत:ला नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तरीही आपलं ‘स्व’त्व जपलेलं असतं, अशी त्याची संकल्पना आहे. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल प्रेम वाटणं म्हणजे स्वत:ला त्यात सामावून जावंसं वाटणं आणि त्यासाठी स्वत:मध्ये आपोआप बदल घडत जाणं, असं हायडेगर म्हणतो. काही अंशी त्याचं म्हणणं खरं असलं तरी जगाच्या सूत्राचा वगैरे विचार करून कोणी आजकाल प्रेम करतं असं पाहण्यात येत नाही. म्हणजे खरं तर तो म्हणायला आपल्या काळाच्या खूप जवळ पण आपल्या संकल्पनांपासून काहीसा दूरच राहतो.

त्याच्या बऱ्यापैकी काळ मागे असणारा, पण फिलॉसॉफीने आपल्या विचारांच्या जवळ असणारा वेस्टर्न फिलॉसॉफर म्हणजे ‘नीचे’. आत्ताच्या काळाला, आताच्या तरुणाईच्या विचारांना आणि ‘कुछ कुछ होता है’च्या ‘प्यार दोस्ती है’ला एकदम चपखल बसणारी फिलॉसॉफी त्याने दिलेली आहे. प्रेमाचा अत्युच्च बिंदू म्हणजे मैत्री असं तत्त्वज्ञान त्याने सांगितलेलं आहे. लग्न न टिकण्याची किंवा त्यात समाधान नसण्याची कारणं कितीही असली तरी ती तात्कालिक असतात. मात्र आपल्या जोडीदारासोबत राहूनही, ते आपलं प्रेमाचं माणूस असतानाही आणि आपण स्वत:च ते निवडलेलं असलं तरीही आपली सोबत दीर्घकाळ राहात नाही याचं कारण प्रेमाचा अभाव नसून मैत्रीचा अभाव आहे, असं ‘नीचे’ म्हणतो. जे प्रेम म्हटलं जातं त्यात अपेक्षा येतात आणि पाठोपाठ बंधनंही ! ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ‘अलीजे’ने ‘अयान’कडे फक्त मैत्रीतल्या प्रेमाचा आग्रह धरला होता. प्रेम म्हणजे शरीराने जवळ येण्यापेक्षा मनाने जवळ येणं महत्त्वाचं आणि त्यासाठी ‘रिलेशनशिप’पेक्षा मैत्री उपयोगी ठरते. ‘प्यार मे जुनून है, पर दोस्ती में सुकून है’ असं ‘अलीजे’ म्हणते आणि तेच ‘नीचे’सुद्धा!

या सगळ्यांच्या मागे जात कधीकाळी प्लेटोने स्वत:ची वेगळीच प्रेमाची संकल्पना जगाला देऊ  केली. जगाने ती तेव्हाही किती स्वीकारली हा वादाचा विषय! मात्र त्याची प्रेमाची  व्याख्या ही काहीशी काल्पनिक किंवा स्वप्नातली वगैरे म्हणता येईल. शारीरिकतेच्या पार निघून जाणारं प्रेम ही प्लेटोची प्रेमाची संकल्पना! शारीरिक नसून भावनिक पातळीवरचं एकमेकांशी होणारं ‘इंटरॅक्शन’ हे खरं प्रेम ! एकमेकांशी तारा जुळलेल्या असणं, म्हणजे वेव्हलेंग्थ जुळलेली असणं, हा प्रेमाचा आविष्कार आहे. भावना समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोलण्याची गरज न भासणं हे प्रेमाचं प्रतीक आहे. शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकरूप होणं म्हणजे प्रेम! आत्म्याची एकरूपता साधण्यासाठी काही वेळा शरीर हे माध्यम ठरतं. मात्र प्लेटोच्या दृष्टीने शरीराची एकरूपता हे प्रेमाचं ध्येय किंवा साध्य नाही, तर  तो केवळ एक मार्ग आहे. त्या शारीरिक आणि तात्कालिक भावनांच्या माध्यमातून बुद्धी, विचार आणि भावना या पातळ्यांवर एकमेकांशी जोडलं जाणं हे अंतिम उद्दिष्ट आहे असा प्लेटोचा विचार आहे.

थोडीशी आदर्शवादी असणारी ही प्रेमाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येईल अशा मानसिक आणि भावनिक उंचीला पोहोचणारे मानवावतार विरळेच! मात्र आपल्या प्रेमाला एखाद्या ठाम विचाराचा आधार असावा हे सगळ्याच तत्त्वज्ञांचं म्हणणं नि:संशय खरं आहे. विचार करून प्रेम कसं करता येतं या प्रश्नाला इथे वाव नाही. कारण विचार करून प्रेम करा असं म्हणणं कोणत्याच तत्त्वज्ञाचं नाही. प्रेम केल्यानंतर एकत्र साध्य करायच्या उद्दिष्टांचा विचार करा आणि एका ध्येयाच्या दिशेने एकत्र वाटचाल करा असं त्यांचं सांगणं आहे. तेही कोणत्याही ‘मटेरिअलिस्टिक’ गोष्टींबद्दल त्यांनी सुचवलेलं नसून त्यापलीकडे असणाऱ्या भावना आणि एकरूपता या तत्त्वांवर ही फिलॉसॉफी त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे ‘प्लेटॉनिक’ प्रेम करायला जमलं नाही आणि ‘नीचे’ला फॉलो करायचं असेल तरी विचारांचा पाया हा भक्कमच असावा लागणार आहे.

यावेळी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने काहीतरी वेगळं म्हणून ‘प्रेम’ या संकल्पनेबद्दल थोडा गांभीर्याने आणि सखोलपणे विचार करू या ! हॅपी व्हॅलेंटाइन डे!

viva@expressindia.com

First Published on February 8, 2019 1:36 am

Web Title: article about love definition
Just Now!
X