विनय नारकर – viva@expressindia.com

उत्तरीय, शाल, शेला, उपरणे आणि इतर काही पांघरायची वस्त्रे याबद्दल आपण मागील दोन लेखांत जाणून घेतले. ही सगळी वस्त्रे एक प्रकारे अभिजनांची चैन होती. सामान्यजनांना हा विलास परवडणारा नव्हता, सामाजिक दर्जातील अंतरामुळेही ते शक्य नव्हते आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे ती त्यांची गरजही नव्हती.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

संत नामदेवांचा एक अतिशय मार्मिक आणि सुरेख अभंग आहे, ‘पाटोळा’. यामध्ये अभिजन आणि सामान्यजन यांच्या जीवनशैलीतील फरक किंवा प्राधान्यक्रम यात कसा फरक आहे हे खूप सुंदर पद्धतीने आले आहे. हे सांगणे अभावितपणे आले आहे, कारण हे सांगणे हा काही या अभंगाचा हेतू नव्हे. वस्त्रांची तुलना नामदेवांनी इथे एक दृष्टांत म्हणून दिली आहे.

‘पाटोळा तिमला रे, मजवरी घाली कांबळे’

पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र. या अभंगात नामदेव म्हणतात, पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र पावसात भिजून जाईल, त्याचा मला काय उपयोग, मला पावसापासून रक्षण करण्यासाठी कांबळे किंवा घोंगडीच लागेल. यात पुढे म्हटलंय, ‘झिरमिर झिरमिर रे कैसा वर्षतो मेघू, जाळीचे घोंगडे बा मजवरी घाली सेवू’. थोर संगीत अभ्यासक अशोक रानडे म्हणतात, ‘मराठी भाषा ही खूप सूचक आणि मार्मिक आहे. घोंगडी, धाबळी किंवा कांबळी म्हटल्यानंतर तेच वस्त्र सुचवलं जात नाही. या प्रत्येक वस्त्राबरोबर एक वेगळा भावसमुद्र येत असतो’. हे किती महत्त्वाचं निरीक्षण आहे, याचं प्रत्यंतर मला पदोपदी येत असतं. याच कारणामुळे मी एखाद्या वस्त्राबद्दल माहिती देताना, त्या वस्त्राचा उल्लेख मराठी साहित्यात कसा आला आहे आणि त्या वस्त्राने मराठी भाषेत काय भर घातली आहे, हे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. विविध वस्त्रोल्लेख आणि वस्त्र प्रतिमा जुन्या मराठी साहित्यात फक्त अलंकरण म्हणून येत नाहीत. त्या त्या वस्त्राच्या संदर्भामुळे साहित्यात नेमकी भावनिर्मिती होत असते. याचे रहस्य जनसामान्यात रुजलेली मराठी वस्त्र संस्कृती व मराठी भाषेतील मार्मिकता यात सामावले आहे.

संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे रेशमी वस्त्राचा, पाऊस – पाणी किंवा ऊन यापासून संरक्षणासाठी काहीच उपयोग नाही. त्यासाठी सामान्यजनांना  घोंगडी, कांबळे किंवा पासोडी यांचाच आधार होता. बहुजन मराठी माणसांचं हे वर्णन बरंच प्रातिनिधिक होतं, ‘पायि वहाणा हाती काठी खांद्यावर घोंगडी’. ही वस्त्रे साधी, जाडीभरडी व कमी किमतीची असली तरी ही काही फक्त शोभेची वस्त्रे नव्हती. बहुजनांना थंडी, ऊन, पाऊस यापासून संरक्षणासाठी यांचा वापर होत असे. गुराखी माणसाची काठी आणि कांबळे ही प्रतीके असल्यासारखी आहेत. गोकुळातील श्रीकृष्णाच्या वेषास ‘काठीकांबळा’ म्हटले जाते.

संत एकनाथांनीही असेच वर्णन केले आहे.

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । चारितसे धेनू सावळा जग जेठी ॥

संत ज्ञानेश्वरांची तर ‘घोंगडी’ ही अतिशय लाडकी प्रतिमा आहे. ‘घोंगडी’ व ‘चवाळें’ या प्रतिमा किंवा रूपक वापरलेले ज्ञानेश्वरांचे १३ अभंग मला आतापर्यंत सापडले आहेत. यापैकी बहुतेक अभंगांमध्ये शरीरासाठी घोंगडी हे रूपक ज्ञानेश्वरांनी वापरले आहे.

कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।

आम्हांसि कां दिली वांगली रे ॥१॥

स्व  गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व – गुणें विणली रे ।

तसेच ‘चवाळें’ ही प्रतिमा सुदधा ज्ञानेश्वरांनी वापरली आहे. चवाळें म्हणजे लहान घोंगडी.

चवाळ्याची सांगेन मातु ॥

चवाळें पांघुरे पंढरीनाथु ॥

गोधनें चारितां हरि पांघुरला ।

मज चवाळ्याचा त्यागु पैं दिधला ॥

बापरखुमादेविवरू श्रीगुरूराणा ।

चवाळें पांघुरवी निरंजनागे माये ॥

सामान्यांच्या पांघरण्याच्या वस्त्रांमध्ये ‘घोंगडे’ हे सर्वात महत्त्वाचे वस्त्र आहे हे आपल्या लक्षात येते. पांघरण्यासोबत अंथरण्यासाठीही घोंगडीचा वापर होतो. हे मेंढीच्या लोकरीपासून विणले जाते. घोंगडीशिवाय आणखीही काही लोकरीची वस्त्रे असायची.  लोकरीच्या वस्त्रांना ‘ऊर्णावस्त्र’ ही म्हटले जाते. घुशा, बुरणूस, पट्टू, धाबळी, फलानीन, कांबळीट ही काही ऊर्णावस्त्रांची नावे आहेत. यापैकी पट्टू हे सर्वात उंची वस्त्र समजले जायचे. हे लालसर तपकिरी, घोडय़ासारख्या रंगाचे असायचे. या रंगास ‘तेल्याबोर’ असे नाव आहे. ‘धाबळ’सुद्धा पांघरण्याचेच एक लोकरी वस्त्र होते. यास ‘लोई’ असेही म्हणत. हे नेहमीच शुद्ध समजले जात असल्याने सोवळ्यातही वापरले जात असे. कधी न धुताही हे वस्त्र पवित्र व शुद्ध समजले जाते. धाबळ ही घोंगडीपेक्षा वजनाला हलकी पण जास्त उबदार असायची. बुरणूस हे मात्र एक विशिष्ट वस्त्र असायचे. हे ‘न विणलेले वस्त्र’ होते. बुरणूस बनवताना पिंजलेल्या लोकरीला खळ लावत, नंतर ती लाटली जात असे व शेवटी तिच्यावर दाब दिला जात असे.