वेदवती चिपळूणकर

फ्रिल्स लावली ड्रेसला की तो एकतर पोरकटपणा किंवा लहान मुलींसाठीचे ड्रेस अशाच पद्धतीने त्याच्याकडे पाहिले जात होते. फॅशन विश्वात सातत्याने होत असलेल्या प्रयोगामुळे कुठल्या गोष्टीला किती आणि कुठे महत्त्व मिळेल हे नेमकं सांगता येणं अवघड. त्यामुळे कधीकाळी परिसारख्या दिसणाऱ्या एखाद्या ड्रेसला किंवा वेगळी फॅशन म्हणून ब्लाऊजला दिसणारी फ्रि ल किंवा रफल साडीवरही अवतरली आहे. फ्रिल-रफल साडय़ा, ड्रेसेस आणि घेरेदार कुर्ती ही सध्या सर्वमान्य फॅशन झाली आहे..

उन्हाळा म्हटलं की पातळ कापड आणि फिके  रंग ही जोडी कायम ठरलेली! उन्हाळ्यात भडक आणि गडद रंग फारसे कधी वापरले जात नाहीत किंवा वजन असलेल्या, फॅन्सी वाटणाऱ्या, लाऊड दिसणाऱ्या डिझाइन्सनाही कोणी विशेष प्राधान्य देत नाही. मात्र २०१९च्या लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्टमध्ये अनेक डिझायनर्सनी काही हेवी एलिमेंट्स समर कलेक्शनमध्येही वापरले. थोडेसे ब्राइट रंग आणि मोठय़ा फ्रिल्स, लाऊड रफल्स किंवा हेवी फ्लेयर्स हा अनेक डिझायनर्सच्या कलेक्शनचा भाग होते. कधी नव्हे त्या या रफल्स, फ्लेयर्स आणि फ्रिल्सनी एक नवा उत्साह फॅशन विश्वात आणला आहे.

मोठय़ा फ्रिल्सनी अनेक साध्या डिझाइन्सना अधिक उठावदार लुक दिला. फिक्या रंगांना फिक्या रंगाची फ्रि ल न जोडता त्याच रंगाच्या गडद छटेतली फ्रिल लावल्यामुळे त्या हलक्या रंगाचा लुक पूर्ण झाला आणि फिका असूनही तो रंग उठून दिसला. फ्रिल्स फक्त गाऊन किंवा स्कर्टच्या घेराला न लावता स्लीव्ह्जना आणि टॉप्सनाही लावल्या गेल्या. ज्यामुळे तो संपूर्ण लुक ‘समर फ्रेश’ दिसला. लाऊड रफल्स मात्र टॉप आणि बॉटमला विरुद्ध क्रॉस किंवा फक्त टॉपला क्रॉसमध्ये दिसले. रफल्सनी डिझाइन्सना काहीसं ‘ड्रामॅटिक’ म्हणजे नाटय़मय आणि ‘फॅन्सी’ म्हणजे भपकेदार बनवलं आहे. कॅ ज्युअल्सनाही रफल्स दिल्यामुळे ते प्रत्यक्षात वापरायला काहीसं अवघड जाईल असं दिसतंय. मात्र या रफल्स आणि फ्रिल्सनी समर कलेक्शनमध्ये युथफुल एलिमेंटची नक्कीच भर घातली आहे. तिसरा महत्त्वाचा एलिमेंट लॅक्मे फॅशन वीक २०१९च्या समर रिसॉर्टमध्ये दिसला, तो म्हणजे फ्लेयर्स ! फ्लेयर्स म्हणजे खरं तर ‘घेर’ ! मोठे घेर असलेले, हेवी एम्ब्रॉयडरी किंवा वर्क असलेले आणि हलक्या कलर शेड्सचे लेहंगा, घागरा आणि गाऊन्स यांनी समर वेडिंगला कम्फर्टेबल तरीही डिझायनर बनवलं. फ्लेयर हा फक्त बॉटमपुरता न ठेवता काही डिझायनर्सनी टॉप्सनाही थोडासा फ्लेयर दिला आणि डिझाईन्सना थोडं जास्त ड्रामॅटिक केलं. पण वेडिंग म्हटलं की थोडा ड्रामा तो बनता है ! स्वत:च्या लग्नात इतर सगळ्यांपेक्षा वेगळी दिसणारी आणि सगळ्यांच्या नजरेत भरणारी ‘ती’ म्हणजे वधू, कायमच अशा डिझाइन्सची अपेक्षा करते ज्यांच्यामुळे तिला ‘स्पेशल’ फील येईल आणि ती सगळ्यांच्यात उठून दिसेल. तो स्पेशल फील देणारा एलिमेंट म्हणून फ्लेयर्स आणि मोठय़ा रफल्सकडे नक्कीच बघता येऊ  शकतं.

या सगळ्यात नसणारी आणि तरीही यांच्याशी साधर्म्य दाखवणारी एक कॅटेगरी होती ती म्हणजे क्रम्बल्ड फ्रिल्स ज्या आकाराने लहानशा होत्या, डोळ्यात भरणाऱ्या नव्हत्या आणि तरीही मुख्य डिझाइनला कॉम्प्लिमेंट करत होत्या. छोटय़ाशा फ्रिल्स आणि त्यातही क्रम्बल्ड, म्हणजे चुण्या असलेल्या किंवा चुरगळल्यासारख्या दिसणाऱ्या फ्रिल्समुळे फिक्या रंगाची डिझाइन्स खुलून दिसायला मदत झाली आणि त्या संपूर्ण लुकला नाजूकपणा आला.

उन्हाळा आहे म्हणून केवळ फिकट रंगाच्या आणि बोअरिंग वाटणाऱ्या साध्या डिझाइन्सना या लहान एलिमेंट्सनी अधिक खुलवलं. एरव्ही घेरेदार कपडे किंवा फ्रिल्सवाले कपडे हे हेवी फॅशनमध्येच गणले जातात. प्रत्येक जण इतक्या सहजपणे त्याकडे आकर्षित होत नाही. मात्र ज्या पद्धतीने फॅशन डिझाइनर्सनी रोजच्या कलेक्लशनमध्ये त्याचा खुमासदार वापर केला आहे. पेल रंग आणि त्यांना फ्रिल्सची जोड, डार्क रंगाचे घेरेदार वनपीस किंवा कुर्ता अशा रोजच्या कपडय़ांमध्येही याचा सहज वापर करण्यात आला असल्याने एक नवीच फॅशन असल्याचा फील तरुणाईत आहे. त्यामुळे अशा कलेक्शनकडे धाव घेणाऱ्या तरुणाईसाठीसमर इज नो मोअर अबाऊ ट पेल शेड्स, समर इज फ्रेश!