19 September 2020

News Flash

नवे कार्यधागे

सध्याच्या करोनाकाळातील परिस्थितीमुळे नोकरी-व्यवसायाबाबतची परिस्थिती तशी नाजूकच आहे

वैष्णवी वैद्य

नवरा-बायको अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात असले की कामाचा तसा अंदाज एकमेकांना येत नाही. तासन्तास कॉल्सवर असणं, स्क्रीनसमोर बसून राहाणं हे सगळंच थोडय़ाफार प्रमाणात आपण गृहीत धरतो. अनेकदा फार महत्त्वाच्या गोष्टी वगळता कामाबाबतीतल्या फार कमी गोष्टी एकमेकांना माहिती असतात. बऱ्याचदा असंही होतं की, कामातल्या अडचणींबद्दल एकमेकांशी बोलता येत नाही. ते कामाचं प्रेशर नेमकं काय हे समोरचा पूर्णपणे समजू शकत नाही. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे एकमेकांच्या नोकरी-व्यवसायाच्या बाबतीतला हा संवादाचा धागा पुन्हा जुळू पाहतोय..

सध्याच्या करोनाकाळातील परिस्थितीमुळे नोकरी-व्यवसायाबाबतची परिस्थिती तशी नाजूकच आहे. पण जिथे शक्य आहे त्या क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनच्या निमित्ताने सुरू झालेलं ‘वर्क फ्रोम होम’ कल्चर आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडतं आहे. अगदी शालेय शिक्षणासारख्या परस्परसंवादी क्षेत्रांमध्येही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं आहे. चार-पाच महिन्यांच्या या काळात आता एकमेकांचे काम जवळून अनुभवण्याची संधी अनेक जोडप्यांना मिळाली आहे. तो आणि ती यांचा कामाचा रगाडा किती आणि कशा प्रमाणात असतो हेही एकमेकांच्या लक्षात येऊ लागले आहे.  या अनुभवांमुळे एकमेकांबद्दलच्या कामाची-व्यवसायांची नव्याने माहिती मिळाली असेल का? कार्यालयीन कामांबरोबर घरकामाचा उरक दोघांनी कसा करायचा याचीही समीकरणं बदलली आहेत का?  या प्रश्नांना सध्या खूप मजेशीर आणि वेगळी उत्तरं वर्किं ग क पल्सकडून मिळत आहेत..

मीनल ही कॉर्पोरेट वकील आहे आणि तिचा नवरा राहुल आय.टी. क्षेत्रात. ‘वकील असल्यामुळे माझ्या कामाचे व्याप बरेच वेळा बौद्धिक असतात. त्यामुळे कामासाठी शांत वातावरण लागते. या उलट नवऱ्याचे काम अखंड वेळ कॉन्फरन्स कॉल्स, स्क्रीन शेअर अशा पद्धतीचे असते.  साहजिकच माझा समज व्हायचा की मला काम करताना मानसिक तणाव जास्त असतो, पण या दिवसांत लक्षात आलं की काम करण्यापेक्षा काम करून घेणं जास्त अवघड असतं,’ असं मीनल सांगते. माझ्याबाबतीत समोर असलेल्या कामाची आखणी, व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्याला टीम वर्कचा संपूर्ण भार सांभाळायचा असतो जे जास्त जोखमीचं असतं हेही पहिल्यांदाच जाणवल्याचं ती सांगते. तर दोघांच्याही कामाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्याने एकाच घरात राहून दोघांसाठी स्वतंत्र वर्कस्पेस बनवावी लागली, असं राहुल सांगतो. मुलींच्या शाळा सुरू झाल्यावर जरा कठीण गेलं. पण त्यांचा अभ्यास आणि एकंदर सांभाळण्याची जबाबदारी मीनलकडेच आहे, पण घरकामं आम्ही वाटून घेतली आहेत. सुरुवातीला ऑफिस आणि घरातील कामं दोन्ही सांभाळण्याची कसरत व्हायची, पण आता सवय झाली आहे. यानिमित्ताने एकमेकांच्या कामाच्या डेडलाइन्स आणि इतर गोष्टींची आधीपासून कल्पना असली तरी त्या आता एकत्र अनुभवता येत आहेत, असं राहुल सांगतो.

आय.टी.सारख्या क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना नवीन नाही, पण इतर अनेक व्यवसाय आणि सेवाक्षेत्रं अशी आहेत ज्यात पहिल्यांदाच घरी बसून काम करण्याचा अनुभव तरुणाईने घेतला आहे. मीडिया आणि पत्रकारितेसारख्या वेळेच्या बाबतीत गुंतागुंतीच्या क्षेत्रातही सध्या बहुतांश प्रमाणात घरून काम के लं जात आहे. ‘बीबीसी मराठी’ची पत्रकार अमृता दुर्वे सांगते, ‘मी पत्रकार आहे आणि नवरा टेलिकॉम क्षेत्रात. एकमेकांचं काम बऱ्यापैकी माहिती होतं, पण त्यातली तपशीलवार प्रक्रिया या काळात कळली. घरकामाबाबत बोलायचं झालं तर घरातले सगळेच त्यात सुरुवातीपासून सहभागी असतात, त्यामुळे बायकोला गृहीत धरणं वगैरेचा प्रश्न नाही. मुलीची कामंही आम्ही मिळून करतो, त्यामुळे तो प्रश्नही कधी आला नाही. एकमेकांच्या कॉल्सच्या वेळा सांभाळून काम करत असताना एकमेकांचे या व्यवसायातील प्रावीण्य आणि कामासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीचे स्वरूप प्रामुख्याने जाणवले.’ एक टीम लीडर म्हणून तो कसा आहे हे पहिल्यांदाच मला जवळून अनुभवता आलं. त्याचप्रमाणे एरव्ही अगदी लहान वाटणारी बातमी किं वा व्हिडीओ करतानाही त्यामागे काय मेहनत घ्यावी लागते. अध्र्या तासाचे बुलेटिन असते तेव्हा मी काय करते? एखाद्या मुलाखतीसाठीची तयारी कशी करते? थोडक्यात पडद्यावर दिसण्यासाठी पडद्यामागे नेमके  काय करावे लागते हे पहिल्यांदाच घरच्यांनी किं वा जोडीदाराने अनुभवले आहे, असे ती सांगते.

भारतात आय.टी., टेलिकॉम, मेडिकल, अशी काही आघाडीची क्षेत्रं आहेत. देशातील बहुतांश लोकसंख्या यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहे किंबहुना लोकांना साधारण माहितीतली ही तंत्रज्ञानातील क्षेत्रं आहेत. पण अजूनही अनेक इतर  संशोधनात्मक क्षेत्रं आहेत जिथे पहिल्यांदाच ‘वर्क फ्रॉम होम’ची पाळंमुळं रुजू लागली आहेत. नेहा फणसळकर ‘आर्केडिस ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म’साठी पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून काम करते, तर तिचा नवरा विशाल वैद्य हेल्थ केअर क्षेत्रात ‘अ‍ॅबॉट’ कंपनीत व्यवस्थापक आहे. नेहा सांगते, ‘एकमेकांच्या कामाच्या वेळा आणि वर्क स्पेस सांभाळणं आधीपासून होतंच, पण लॉकडाऊनच्या काळात ते सुरुवातीला थोडं आव्हानात्मक वाटू लागलं, कारण हाताशी नेहमी येणारे मदतनीस नव्हते. पण ऑफिस कामांच्या वेळेनुसार घरातील कामं वाटून घेतली. विशालचे बरेचवेळा परदेश दौरे असतात, पण आता तीच सगळी कामं घरून करत असल्याने तो व्यवस्थापक म्हणून कसा आहे हे जवळून बघता आलं. त्याच्या क्षेत्रातली माहिती आधीसुद्धा होती पण कामाचा व्याप, त्याच्या जबाबदाऱ्या हे सगळं आता अनुभवता आलं, असं ती सांगते. तिच्या स्वत:च्या कामाच्या बाबतीत तिचे पर्यावरणाशी निगडित प्रोजेक्ट, कामाच्या जबाबदाऱ्या त्यालाही जास्तीत जास्त जाणून घेता आल्या. लॉकडाऊनमुळे कामाचाही हा एकत्रित वेळ अनुभवता आल्याबद्दल ती समाधान व्यक्त  करते.

‘वर्क लाइफ बॅलन्स’ ही संकल्पना या काळात अधिक व्यापक होताना दिसते आहे.  नात्यातला समजूतदारपणा, अनुरूपता हे नातं टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे पैलू वाटू लागले. आताचा काळ हा प्रत्येक नात्याचीच परीक्षा पाहणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. १२ तास घराबाहेर राहून घरी आल्यावर सुटकेचा नि:श्वास आपण टाकतो, पण २४ तास एकमेकांचं काम सांभाळून एकत्र राहून जोडप्यांना तेच नातं आता नव्याने गवसतं आहे. न संपणारे ते कॉल्स, कामाचं प्रेशर त्या दिवसापुरतं संपवून गर्दीत काही तास प्रवास करून घरी येणं कसं असेल हे आता कळतंय, असे अनुभवही तरुण जोडप्यांकडून शेअर के ले जात आहेत. #न्यूनॉर्मल या टॅगखाली हे वर्क फ्रॉम होम आणि त्याच्या अवतीभवती फिरणारी नवीन जीवनशैली सगळे अनुभवत आहेत. वाईटातून चांगलं होतं ते बहुतेक असंच असावं.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 1:28 am

Web Title: article about work from home zws 70
Next Stories
1 हातमागाशी जुळले डिजिटल धागे
2 क्षितिजावरचे वारे  : वेलकम प्रतिसृष्टी – २
3 अशीही मैत्री..
Just Now!
X