मितेश जोशी

१ सप्टेंबर हा दिवस जागतिक दाढी दिवस म्हणून साजरा केला जातो. हल्लीच्या काळात दाढी-मिश्यांचा आगळावेगळा रुबाब तरुणाईत भलताच प्रसिद्ध आहे. थोडं मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की काही वर्षांपूर्वी दाढी वाढवणाऱ्या व्यक्तीकडे ‘तो दु:खात आहे किंवा बेरोजगार आहे. म्हणून याने दाढी वाढवली’, अशी समाजाची पाहायची नजर होती. परंतु आता जो उठतो तो हा दाढीधारी लुकचा ट्रेण्ड फॉलो करत दाढी वाढवतो. तो टापटीप किंवा ‘कुल गाय’ म्हणून ओळखला जातो. या दाढी दिनाच्या निमित्ताने तरुणाईत दाढीचे नाना ट्रेण्ड्स प्रसिद्ध आहेत. त्यातल्या चलती असलेल्या ट्रेण्ड्सविषयी लूक डिझायनर विवेक लोखंडे यांनी दिलेली माहिती..

खेळाडू, चित्रकार, लेखक, उद्योजक, अभिनेता, प्रोफेशनल व्यक्ती, अगदी सर्वसाधारण तरुण कोणालाही डोळ्यासमोर आणा व त्यांच्यातील समान धागा शोधण्याचा प्रयत्न करा. त्यांचा चेहरा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, यातील प्रत्येक पुरुषाने दाढी-मिशीचा रुबाब जपला आहे. कॉलेज तरुणांमध्ये दाढी वाढवण्याचं खूळ आधीपासूनच होतं. परंतु पुरुषांना चकचकीत, गुळगुळीत गाल ठेवण्यात अभिमान व शहाणपणा वाटायचा. गेल्या तीन वर्षांपासून दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. सर्वानाच दाढी वाढवण्याचं खूळ लागलं आहे.

पूर्वीपासूनच आपल्याकडे बॉलीवूड चित्रपटातील अभिनेत्यांची नक्कल करण्याची परंपरा आहे. त्यांच्यासारखी वेशभूषा, केशरचना अगदी त्यांच्यासारखंच चालणं-बोलणं असायचं. आता चालणं-बोलणं जरी नसलं तरी केशभूषा व वेशभूषा आजही फॉलो केली जातेय. सणासुदीला किंवा घरगुती कार्यक्रमांना मुलं पारंपरिक पेहराव घालून केश व दाढीरचना आकर्षक व ट्रेण्डी ठेवत आहेत. खेळाच्या मैदानावरदेखील दाढीचा रुबाब पाहायला मिळतोय. टी-२०, आयपीएलपासून ते प्रो-कबड्डीच्या खेळाडूंपर्यंतच्या प्रत्येकाच्या दाढी-मिश्यांच्या स्टाइल्स तरुणाई धडाधड कॉपी करून प्रचलित करते आहे. थंडीच्या मोसमात नोव्हेंबर महिन्यापासूनच ‘नो शेव्ह’ हा ट्रेण्ड तरुणांमध्ये भलताच प्रसिद्ध असतो. पुढे तो कित्येक महिने कायम राहतो. या ट्रेण्डच्या नावाखाली दाढी वाढवणारे तरुण याच वाढत्या दाढीची स्टाइल करवून घेताना दिसून येत आहेत. त्यासोबतच हेअर स्टाइल व दाढी एकमेकांना सूट कशी होईल?, याचा ताण गुगलच्या किंवा आमच्यासारख्या लुक डिझायनरच्या मदतीने हलका केला जातो.

दाढीचा विचार करताना थिक बिअर्ड, लाइट बिअर्ड व मीडियम बिअर्ड असे तीन प्राथमिक प्रकार पडतात. या तीन प्रकारांमध्ये मग सध्या अनेक प्रमुख व चलती असलेले उपप्रकार तुम्हाला पाहायला मिळतील.

  • लाइट बिअर्ड

कूल लुक : लाइट बिअर्डमध्ये कूल लुक हा एकुलता एक लुक ट्रेण्ड ‘हायजिनिक लुक’ या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. या लुकची फार काळजी घेतली जात नाही. ज्या मुलांना शॉर्ट हेअर आणि शॉर्ट लुक पसंत आहे. ज्या मुलांना जास्त दाढी सहन होत नाही. अशा मुलांसाठी हा लुक उत्तम पर्याय आहे.

  • थिक बिअर्ड

अंडरकट विथ थिक बिअर्ड : या लूकमध्ये केशरचनादेखील तेवढीच तगडी लागते. कानाचा वरचा भाग ज्याला साइड लॉक म्हटले जाते. तो साइड लॉक पूर्णपणे (पान ३ वर) (पान १ वरून) झिरो मशीनच्या साहाय्याने क्लीन केला जातो. व केसांचा वरचा / मधला भाग उभा करून (स्पाइक करून) त्यांचा चंपू केला जातो. गालावर थिक बिअर्ड ठेवली जाते. व्यायाम करणाऱ्या तगडय़ा मुलांवर हा लुक सूट होतो.

वर्दी बिअर्ड : २०१८ या वर्षांतला मोस्ट स्टायलिस्ट व ग्लॅमर लुक ठरलेला वर्दी बिअर्ड हा लुक रणवीर सिंगच्या खलजी या पात्रासाठी डिझाइन करण्यात आला होता. या लुकमध्ये ‘व्ही शेप थिक बिअर्ड’ ठेवली जाते. व जोडीला हॅण्डलबार मिशी ठेवली जाते. मिश्या पिळायचा शोक असलेल्या मुलांनी हा लुक ठेवावा. या लुकमध्ये ओतप्रोत रॉयलपणा आहे.

युनिफॉर्म बिअर्ड : अंडरकट बिअर्ड या लुकमध्ये कानाच्या वरचा भाग क्लीन ठेवला जातो. युनिफॉर्म लुकमध्ये तो भाग किंचित क्लीन ठेवला जातो व गालावर थिक बिअर्ड ठेवली जाते. हनुवटीवर दाढी ही किंचित टोकदार व एकवटलेली असते. ज्याला डकटाइल बिअर्ड असे म्हणतात. वर्दी बिअर्ड लुकमध्ये मिशी आकर्षित होते. तर या लुकमध्ये हनुवटीवरील केसाळ बिअर्ड आकर्षित होते. आर्टिस्ट लोक हा लुक फॉलो करतात. सध्या या लुकला चांगलीच पसंती मिळत असल्याने २०३० मध्ये सुद्धा हा लुक तसाच जिवंत व ट्रेण्डी राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते.

मॅन बन विथ बिअर्ड : मॅन बन विथ बिअर्ड हा लुक सांभाळणं अतिशय सोपं आहे. या लुकसाठी मुलांच्या डोक्यावर बक्कळ केस हवे. त्या बक्कळ केसांचा बन व गालावर बक्कळ दाढी असं या लूकचं स्वरूप आहे. या लुकसाठी गालावर दाढीच्या केसांना किंचित आकार देऊन नैसर्गिकरीत्या दाढी वाढवून हा लुक सेट केला जातो. हा लुक आपल्याला ‘नो शेव्ह’ नोव्हेंबरमध्ये अधिक पाहायला मिळतो.

किंग लुक : काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी-मिश्यांसारखा लुक बॉलीवूड अभिनेते आणि खेळाडूंमध्ये लोकप्रिय ठरला होता. आजही त्याचे आकर्षण कायम आहे. वाढलेल्या दाढीला अनेक जण चक्क शिवाजी महाराजांच्या दाढीप्रमाणे सेट करतात. या दाढीसोबत केसही वाढवायला हवेत. या लुकला अजून जन्नत आणण्यासाठी तरुण मुलं कपाळावर चंद्रकोरीचा टिळाही लावतात. हा लुक फॉलो करणारी बहुसंख्य मुलं ही ‘महाराजप्रेमी’ असतात.

  • मीडियम बिअर्ड

कॉर्पोरेट लुक : मीडियम बिअर्डमध्ये ऑलटाइम हिट असणारा लुक म्हणजे कॉर्पोरेट लुक होय. हा लुक अतिशय सुंदर आहे. ब्लेझर, इंडो-वेस्टर्न, सूट, ट्रॅडिशनल, कॅज्युअल कोणत्याही वेशभूषेवर झळकणारा मीडियम लेंथचा हा लुक मुलींना आकर्षित करणारा आहे. कॉर्पोरेटमध्ये ऊठबस करणाऱ्या तरुणांनी हा लुक कधीही अंगीकारावा.

मुलांचा थिक बिअर्ड वाढवण्याकडे कल अधिक आहे. हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच, या वाहत्या ट्रेण्डनामक गंगेत आपले हात स्वच्छ धुण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी स्पेशल दाढी वाढवण्यासाठी आणि ग्रुमिंगसाठी विविध जेल, तेल, क्रीम बाजारात आणले आहेत. ज्याचा वापर तरुणाई मोठय़ा संख्येने करते आहे. २०१८ च्या मध्यावर थिक बिअर्ड मिरवण्याचा ट्रेण्ड आहे. पुढल्या वर्षी कोणता ट्रेण्ड असेल त्याचं भाकीत आता होऊ शकत नाही. परंतु दाढी मिरवण्याची फॅशन अबाधित राहील यात दुमत नाही!!