ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘आजची पिढी त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहे’ आणि या प्रामाणिक पिढीचे प्रतिनिधित्व ‘यू टय़ूब चॅनल्स’ करतात. ‘मी आहे ही अशी आहे, पटले तर सांगा नाहीतर सोडा,’ आलियाने तिच्या व्हिडीओमधून काही न बोलता हे सांगितलं आणि तरुणाईला ते vn21पटलेही. ‘मालिकेतील कथानक, पात्रे काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही,’ टीव्हीवरील मालिकांच्या सुरुवातीला येणाऱ्या या पट्टीच्या अगदी विरुद्ध ‘यू टय़ूब चॅनेल्स’चा कारभार चालतो. इथे सर्व खरं असतं, तुमच्याआमच्या आजुबाजूला घडणारं. बोलताना शिव्यांचा, इंग्रजाळलेली भाषा, दारू-सिगरेट यांचा वापर असे मित्रांच्या टोळक्यात दिसणारे चित्र इथे दिसते. मेकअप, ट्रेंडी कपडय़ांची जागा नॅच्युरल लूकने घेतलेली असते. कित्येक व्हिडीयोजमध्ये तर कलाकार त्यांच्या घरचे कपडे घालतात. त्यामुळे इथे सफाईशीर पद्धतीने नेलआर्ट करणारी ब्युटी एक्स्पर्ट बनते, एरवी लोकांच्या चेष्टेचा विषय ठरलेले विनोदवीर येथे युथचे हिरोज बनतात. रोजच्या जीवनातील प्रसंग, उपहासाच्या रूपाने किंवा रुपक वापरून लोकांना दाखवण्यासाठी यू टय़ूबच्या मुक्त व्यासपीठाचा अनेक तरुण वापर करीत आहेत.
यातील चॅनलवर सुरुवातीला घरच्या घरी चित्रित केलेले व्हिडीओज अपलोड केले जायचे, हळूहळू विविध विषयांवर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तरुणांसाठी हे उत्तम माध्यम बनू लागले. कोणी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तानी आणि भारतीय तरुणांचा संवाद घडवू लागले तर कोणी सामाजिक प्रश्नावर चर्चा करू लागले.