News Flash

ओ रंग बरसे..

रंगपंचमी साजरा करायला जाताना काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

रंगपंचमीचा सण म्हणजे रंगांची उधळण असते. रंगांसोबत गाणी, खानपान, मित्रमंडळी, कुटुंब यांचा उत्साही मिलाप म्हणूनही होळी, रंगपंचमीच्या या सणाकडे बघितलं जातं. जवळपास अगदी लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळेच या सणामध्ये उत्साहाने भाग घेतात. या उत्साही सेलिब्रेशनचा अनेकदा त्रास मात्र दुसऱ्या दिवशी जाणवतो. आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त रंगांमुळे दुसऱ्या दिवशी त्वचा फुटते, चेहऱ्यावर पुरळ येतात; परंतु या वर्षी तुमच्या आनंदावर विरजण न पडू देता रंगपंचमी साजरा करायला जाताना काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही देत आहोत.

रंग खेळायच्या आधी..

*  सनक्रीम : सनक्रीमचा वापर उन्हाळ्यातल्या महिन्यातच होतो, परंतु तुम्ही रंग खेळायला जाण्याआधी आवर्जून सनक्रीमचा वापर करा. रंग खेळताना रंग तर त्वचेवर लागतोच, पण सोबतच धूळ, घाम आणि सूर्याची किरणं याचाही तेवढय़ाच प्रमाणात मारा होतो. सनक्रीम लावल्यास आपल्या त्वचेवर एक लेअर तयार होतो. सनक्रीम लावताना चेहऱ्यासोबत बाकीच्या ठिकाणीही क्रीम लावायला विसरू नका.

*  मॉइश्चरायझर : रंग खेळायला बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या अंगाला उत्तम दर्जाच्या मॉइश्चरायझरने मॉइश्चरायझ करायला विसरू नका. मॉइश्चरायझरचा वापर करत नसाल तर नारळ तेलाने अंगाची हलकी मालिश करायला विसरू नका. रंग खेळायला जायच्या १५ मिनिटे आधी तरी मॉइश्चरायझर क्रीम किंवा नारळाचं तेल लावा. कारण मालिश केलेलं तेल किंवा मॉइश्चरायझर क्रीम त्वचेमध्ये शोषले जाईल. यामुळे नंतर रंग त्वचेवरून काढून टाकायलाही सोप्पं पडेल. सनक्रीम किंवा मॉइश्चरायझर लावताना ओठांना, मानेच्या पाठच्या बाजूला, कानाच्या पाळीवर आणि मागच्या बाजूलाही लावायला विसरू नकात.

*  केसांसाठी : होळीच्या आदल्या दिवशी केसांना आवर्जून तेल लावावे. तेल लावताना फक्त वरच्या केसांनाच न लावता डोक्याच्या आतल्या त्वचेलाही तेल लागेल याची काळजी घ्यावी. असं केल्याने केसांना पोषण मिळेल आणि केस रंग लागल्यावरही पटकन कोरडे पडणार नाहीत. केसांवर तेल असल्यामुळे रंग लवकर निघायला मदत होते. सध्या हेअर टर्बनचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे तुम्ही केसांना प्रोटेक्ट करण्यासाठी वेगवगळ्या पद्धतीने टर्बन नक्कीच बांधू शकता. मुलंही स्कार्फला त्रिकोणी फोल्ड करून केसांना कव्हर करू शकतात.

*  नखांची काळजी : त्वचेच्या केअरमध्ये आपण अनेकदा आपल्या छोटय़ाशा नखांना विसरून जातो; पण नखांची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण हाताने जेवताना नखात अडकलेले रंगाचे छोटे छोटे पार्ट त्रासदायक ठरू शकतात. मॉइश्चरायझर, तेल किंवा सनक्रीम लावताना नखांनाही लावायला विसरू नका. रंग खेळायला जायच्या आधी आवर्जून नखं कापा. मुलींनी नखांना डार्क रंगाची नेलपॉलिश लावायला विसरू नका.

*  कव्हरअप : रंगपंचमी घराच्या बाहेर उघडय़ा जागेवरच सेलिब्रेट केली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त कपडे घालण्याचा प्रयत्न करा. फुल-स्लीव्ह कुर्ते, टी-शर्ट किंवा टॉप्स, ट्राऊ झर्स, सलवार, पूर्ण लांबीचे जॉगर्स अशा कपडय़ांची निवड करा. यामुळे रंगाचा तुमच्या त्वचेशी डायरेक्ट संपर्क होणार नाही. कपडय़ांचे रंग ठरवताना पांढऱ्यापेक्षा कोणत्याही गडद रंगांचा वापर करा. कारण गडद घातल्यामुळे पाण्यामध्ये रंग मिसळल्यावर सहजपणे त्वचेवर येत नाहीत. कॉटनचे कपडे घालायचा प्रयत्न करा, कारण बाकीच्या मटेरियलमुळे अनेकदा रॅशेस पटकन येण्याची शक्यता जास्त असते.

रंग खेळून झाल्यावर..

*  जर होळी खेळण्यासाठी वापरण्यात आलेले रंग रसायनांनी भरलेले असतील तर ते त्वचेवरून काढायला थोडा त्रास होतो. विशेषत: चेहऱ्याची त्वचा जास्त नाजूक असल्याने आपण त्याला जोरदारपणे घासू शकत नाही. म्हणून कोणताही रंग काढून टाकण्यासाठी पहिल्यांदा रेग्युलर क्लीन्सरने चेहरा धुवा. यासाठी आठवणीने थंड पाण्याचा वापर करा. कारण गरम किंवा कोमट पाण्यामुळे रंग त्वचेपासून निघायला जास्त वेळ लागतो. क्लीन्सरने चेहरा धुतल्यावर तेलात कापसाचा बोळा बुडवून त्याने चेहऱ्याला मसाज करा. ५ मिनिटं तरी ही प्रक्रिया करायला विसरू नकात. यामुळे हळूहळू त्वचेला त्रास न होता रंग चेहऱ्यावरून निघायला मदत होते. यानंतर तुमच्या रेग्युलर  फेसवॉशने चेहरा धुवा. त्वचा थोडी कोरडी वाटत असेल तर मॉइश्चरायझिंग लोशन लावा.

*  रंगरूपी झालेला केमिकलचा मारा कितीही काळजी घेतली तरी त्वचेला थोडं तरी हार्म करतो. म्हणून पुढच्या दिवशी नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला पुन्हा एकदा हेल्दी बनवू शकता. घरच्या घरी फळ, दही, मध, तेल यांचा वापर करून फेस पॅक बनवून लावा. ब्लीचिंग एजंट म्हणून दही आपल्या त्वचेवर उत्तम काम करतं. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो.

*  होळीच्या सणानंतर तापमानात वाढ होते आणि त्यामुळे त्वचा जास्त कोरडी होते. अशा वेळी बर्फ चेहऱ्यावर चोळायला विसरू नका. यामुळे तुमची त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि तुमची त्वचा नितळ दिसते.

ल्ल  होळीनंतर लगेच कोणतीही सलोन ट्रीटमेंट करू नका. जर थ्रेडिंग, वॅक्सिंग, शेव्हिंग असं काहीही करायचं असेल तर चार ते पाच दिवसांनंतर करा. होळीचे रंग, सूर्यप्रकाश यामुळे आपली त्वचा थोडी खराब झालेली असते. सलोनमधल्या कोणत्याही ट्रीटमेंटमुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ  शकतो. होळीनंतर काही दिवस तरी  मिनिमल मेकअपचाच वापर करा.

*  त्वचेची काळजी घेण्यासाठी सध्या बाजारात अनेक सिरमसुद्धा उपलब्ध आहेत. होळीनंतर सिरम वापरल्यावर काय फायदा होतो  याबद्दल अ‍ॅड्रोइट बायोमेडचे को-फाऊंडर आणि डायरेक्टर सुशांत रावराणे सांगतात, ‘‘बाजारात प्रीमियम लक्झरी स्किनकेअरची उत्पादनं उपलब्ध आहेत. अशा सिरमचा नियमित वापर तुम्हाला काही दिवसांतच तुमची त्वचा ठीक होण्यास मदत करतात. आमचं अ‍ॅड्रोइट ग्लूटोन सिरमही याच पद्धतीचं आहे. पाण्यावर आधारित या सिरमचा वापर तुमची त्वचा लवकर हील होण्यास मदत करते आणि चेहऱ्याची चमक, तेज वाढवण्यास मदत करते.’’

*  रंगपंचमीनंतर केस धुताना कोणत्या प्रकारच्या शॅम्पूचा वापर करावा याबद्दल अन्वेया या ब्रॅण्डचे को-फाऊंडर आणि सी.इ.ओ. विवेक सिंह सांगतात, ‘‘रंग खेळून आल्यावर केस धुताना योग्य शॅम्पूची निवड करा. जो शॅम्पू तुमच्या केसांना हायड्रेट करू शकेल अशाचीच निवड करा. मॉइश्चरायझरयुक्त शॅम्पूमुळे आपले केस नरीश व्हायला मदत होते. यामुळे तुमची डोक्याची त्वचाही हायड्रेट होईल. तिथला रंग संपूर्णपणे निघून त्वचा मॉइश्चरायझ होणं गरजेचं असतं. तसं नाही झालं तर तुमचे केस गळू शकतात. रंगामुळे कोरडय़ा झालेल्या केसांना केमिकलविरहित शॅम्पूने धुतल्यास जास्त फायदा होतो.’’

एकंदरीत तुम्ही रंग खेळताना आवर्जून आधी आणि नंतर काळजी घ्यायला हवीच. प्री किंवा पोस्ट कोणत्याही काळजीमध्ये छोटय़ा छोटय़ा गोष्टी राहिल्या तरी त्वचेच्या मोठय़ा अडचणी निर्माण होऊ  शकतात. त्यामुळे काळजी घ्या आणि मस्त रंगाची उधळण करा!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 4:42 am

Web Title: article on before playing holi color abn 97
Next Stories
1 संशोधनमात्रे : नदी (वीज) वाहते..
2 बुकटेल : बकुळा
3 माध्यमी : सकल माध्यमी
Just Now!
X