05 April 2020

News Flash

बदलती वाचनसंस्कृती

वाचनाच्या तंत्रस्नेही असण्याबद्दल बोलतानाच केवळ पुस्तके सोडून इतरही अनेक माध्यमांद्वारे वाचनाची आवड जोपासली जाते

(संग्रहित छायाचित्र)

विशाखा कुलकर्णी

मोबाइल आले, तसे प्रवासातील पुस्तकांची आणि निवांत वेळेतल्या वाचनाची जागा मोबाइलने घेतली आणि वाचकांची संख्या बरीच कमी झाली हे जरी खरं असलं तरी, ‘‘तरुण पिढी वाचतच नाही’’ हे विधान मात्र सत्य नाही. याउलट वाचनसंस्कृतीचा प्रसार करणारे, वाचनाची आवड जोपासणारे आणि वाढवणारे अनेकजण एकत्र येऊन काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतात!

वाचन हा हल्लीच्या ‘नर्ड कल्चर’चा महत्त्वाचा भाग झाला आहे. पुस्तकाच्या विश्वात हरवून जाऊन तासन्तास वाचन करणाऱ्यांची संख्या खूप आहे. पूर्वी म्हणजे मोबाइल आगमनपूर्व काळात लोकल प्रवासात वर्तमानपत्रे, मासिके मोठय़ा प्रमाणावर वाचली जायची. महिलांची काही ठरलेली मासिके आवर्जून वाचताना स्त्रिया दिसायच्या. दीड-दोन तासांच्या प्रवासात दुसरं करणार तरी काय म्हणा! पण हे वाचन करणे, वाचक आणि पुस्तकापुरतेच मर्यादित असे, फारतर त्या पुस्तकाची माहिती वैयक्तिक डायरीत नोंद होई. पण असे उदाहरणदेखील क्वचितच! मोबाइल आले, तसे प्रवासातील पुस्तकांची आणि निवांत वेळेतल्या वाचनाची जागा मोबाइलने घेतली आणि वाचकांची संख्या बरीच कमी झाली हे जरी खरं असलं तरी, ‘‘तरुण पिढी वाचतच नाही’’ हे विधान मात्र सत्य नाही.

याउलट वाचनसंस्कृतीचा प्रसार करणारे, वाचनाची आवड जोपासणारे आणि वाढवणारे अनेकजण एकत्र येऊन काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतात! आणि यांच्याच अशा प्रयत्नाने वाचन हे केवळ एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित न राहता त्याचे स्वरूप व्यापक होत जाते आहे.

याचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे ज्या ‘‘स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून’’ सगळेजण बसलेले दिसतात, तो स्मार्टफोनच आहे. सोशल मीडियावर केवळ वाचनासाठी असणारे अनेक ग्रुप्स आहेत, ज्यावर केवळ वाचन, पुस्तकं, साहित्याविषयी चर्चा होते. वाचनवेडा, मराठी पुस्तकप्रेमी, पुस्तकबिस्तक अशा काही ग्रुप्सची सदस्यसंख्या खूप आहे. वाचनाची आवड असलेले लोक या ग्रुपवर आपल्याला आवडलेल्या पुस्तकांची माहिती टाकत असतात, यामुळे मोठय़ा प्रमाणावर माहितीचे संकलन आणि देवाणघेवाण होते आहे.  या ग्रुपवर चालणाऱ्या चर्चाकडे एक नजर टाकली असता हे लक्षात येते की या चर्चेमुळे केवळ पुस्तकाची माहितीच कळते असे नाही तर एखाद्या पुस्तकाविषयीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण, त्यातल्या विषयाबद्दल असलेला वाचकाचा दृष्टिकोन यांसारख्या गोष्टींवर चर्चा होते, एखाद्या वाचकाला या चर्चेतून ते नव्याने समजते. या पुस्तकांच्या ग्रुपवर दुर्मीळ पुस्तकांचीदेखील माहिती मिळणे सोपे झाले आहे. पूर्वी पुस्तकांची, पुस्तक प्रदर्शनाची माहिती केवळ वर्तमानपत्रातून वाचायला मिळत होती, मात्र सोशल मीडिया साइटमुळे ही माहितीदेखील योग्य त्या वाचकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. याविषयी सांगताना वाचनप्रेमी विजय बेंद्रे आपल्या एका अनुभवाविषयी सांगतात, सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चेमुळे वाचकांच्या पुस्तकांच्या खरेदीचा कलदेखील बदलताना दिसतो. लहान लहान गावांपर्यंत, जिथे वर्तमानपत्रदेखील लवकर पोहोचत नाही अशा ठिकाणी सोशल मीडियातील ग्रुप्सवरून माहिती घेऊन नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात लहान गावातील लोक पुस्तकांची खरेदी करत होते. सोशल मीडियाचा वाचनसंस्कृतीवर होणारा हा प्रभाव निश्चितच लक्षणीय आहे.

सोशल मीडियावर असलेले हे ग्रुप्स केवळ सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर पुढेही या ग्रुपचे सदस्य एकत्र येऊन खूप छान ‘मैफल’ जमवतात, याचेच उदाहरण पुण्यातील अनिल आठलेकर यांनी सुरू केलेली वाचकमैफल, यामध्ये नियमितपणे वाचनाची आवड असलेले सदस्य एकत्र येऊन आवडलेल्या पुस्तकाची माहिती देतात, त्याचे अभिवाचन के ले जाते, या उपक्रमात नामांकित लेखकदेखील वाचकांची भेट घेतात. वाचनाच्या ग्रुप्सद्वारे केला जाणारा आणखी एक उपक्रम म्हणजे पुस्तकांची देवाणघेवाण, यात आपल्याला आवडलेली, दुसऱ्याने आवर्जून वाचावीत अशी वाटणारी पुस्तकं प्रत्येकाने आणून ती इतरांना द्यायची, आणि आपणही इतरांनी सुचवलेले पुस्तक त्यांच्याकडून वाचायला घ्यायचे!

हल्ली वाचनाच्या पद्धतीच्या बाबतीतसुद्धा दोन गट पडले आहेत, स्क्रीनवर पुस्तके वाचू शकणारे आणि फक्त कागदावरच, प्रत्यक्षपणे पुस्तक वाचले तरच पुस्तक वाचल्याचा ‘फील’ येतो असे म्हणणारे! याचा सुवर्णमध्य काढला आहे तो ‘किंडल’ने. डिजिटल असूनही डोळ्यांवर ताण न येता कागदावरच पुस्तके वाचल्याचा अनुभव देणारे ‘अ‍ॅमॅझोन’चे किंडल मराठी वाचकांमध्ये, विशेषत: तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे.

स्क्रीनवर पुस्तक वाचणाऱ्या वाचकांमध्येही रीतसर ई बुक विकत घेऊन वाचणारे आहेतच, पण पीडीएफ स्वरूपातील पुस्तके मोफत वाचणारे वाचकदेखील आहेतच. कॉपीराइट हक्क संपलेली पुस्तके पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवर मिळतात आणि अनेकजण ते डाउनलोड करून वाचनाचा आनंद घेतात, मात्र यात अवैधरीत्यासुद्धा पुस्तके व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावर अशा पद्धतीने होणाऱ्या पीडीएफच्या देवाणघेवाणीवर विविध ग्रुप्सच्या माध्यमातून कडक निर्बंध लावले गेले आहेत, त्याचप्रमाणे वाचकांचादेखील अशा प्रकारे बेकायदेशीर पुस्तके वाचण्याला विरोध होताना दिसतो. तंत्रस्नेही काळात बदलणाऱ्या वाचनसंस्कृतीसोबत अशा प्रकारे कायदेशीर मार्गाचे होणारे अवलंबन निश्चितच महत्त्वाचे आणि सकारात्मक आहे.

वाचनाच्या तंत्रस्नेही असण्याबद्दल बोलतानाच केवळ पुस्तके सोडून इतरही अनेक माध्यमांद्वारे वाचनाची आवड जोपासली जाते. प्ले स्टोअरवर एकच दीर्घकथा, अनेक ब्लॉग्सचे संकलन अशा प्रकारचे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. फेसबुकवर लिखाण करणारे जसे अनेकजण आहेत, तसेच फक्त फेसबुकवरच्या पोस्ट्स आवडीने वाचणारे वाचकदेखील आहेतच! फेसबुकवरील लिखाणात विषयाचे कोणतेही बंधन नसल्याने अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांचा स्वत:चा असा वाचकवर्ग झाला आहे. वाचनासाठी प्रत्येक वेळी पुस्तके  खरेदी करू न शकणाऱ्या, अगदी लहान लहान गावातील वाचकांपर्यंतदेखील हे फेसबुकवरचे लिखाण पोहोचलेले दिसते, अर्थात फेसबुकवर आहे म्हणून या लिखाणाचा दर्जा कुठेही कमी झालेला दिसत नाही. ‘ब्लॉग’च्या माध्यमापेक्षा फेसबुकवर केलेले लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचते.

फेसबुकसारख्या साइटवर केलेल्या लिखाणात लेखकांना प्रत्यक्ष आर्थिक फायदा नसला तरी पेजेसच्या माध्यमातून तो मिळू शकतो. याव्यतिरिक्त ‘लेखक ऑनलाइन’ यासारख्या वेबसाइटच्या माध्यमातून नाममात्र सबस्क्रिप्शन भरून विविध लेखकांचे लिखाणदेखील वाचता येते.

अल्पावधीत मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झालेल्या वाचनासाठीच्या माध्यमांमध्ये समावेश होतो तो ‘प्रतिलिपी’ आणि ‘स्टोरीमिरर’ यासारख्या वेबसाइट्सचा. या वेबसाइटवर लेखन करणारे अनेक लेखक आपले लिखाण कथा, दीर्घकथा, कविता अशा वेगवेगळ्या माध्यमातून टाकू शकतात, आणि या कथा वाचकांसाठी मोफत उपलब्ध आहेत. आजच्या घडीला आखो वाचक अगदी रोज या अ‍ॅप्सवर वाचन करत असतात. या अ‍ॅप्सवर भरवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धामध्ये वाचकदेखील भाग घेऊ  शकतात. पुस्तकांच्या माध्यमातून होणारे वाचन हे केवळ वाचकाच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून होते, लेखकाचे पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याची आणि वाचकाची भेट फक्त पुस्तकाच्या माध्यमातून होते, तर अशा प्रकारच्या अ‍ॅप्समध्ये वाचक प्रत्यक्ष लेखकाशी संवाद साधू शकतात.

बदलत्या वाचनामध्ये प्रत्यक्ष वाचन होत नसले तरी ऑडिओ बुक्सचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. यू टय़ूबवर तसेच ऑडिओ बुक्सच्या अ‍ॅपवर अनेक मराठी पुस्तकांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. स्टोरीटेल, स्नोव्हेल, बोलती पुस्तके यांसारखे अनेक अ‍ॅप्स दर्जेदार ऑडिओ बुक्स उपलब्ध करून देतात.

अगदी काही वर्षांपूर्वी केवळ पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे एवढय़ा मर्यादित साधनांच्या माध्यमातून होणाऱ्या मराठी वाचनाने आपल्या कक्षा विस्तारल्या आहेत. यापुढेही वाचनाची आवड कोणत्या नव्या नव्या माध्यमातून जोपासली जातेय हे पाहणे उत्सुकतेचे आहेच. तंत्रज्ञान जसजसे ‘अपडेट’ होते आहे तसेच वाचनाच्या सवयीसुद्धा बदलत आहेत, वाचनाचे वेड मात्र तसेच आहे!

हल्ली वाचनाच्या पद्धतीच्या बाबतीतसुद्धा दोन गट पडले आहेत, स्क्रीनवर पुस्तके वाचू शकणारे आणि फक्त कागदावरच, प्रत्यक्षपणे पुस्तक वाचले तरच पुस्तक वाचल्याचा ‘फील’ येतो असे म्हणणारे! याचा सुवर्णमध्य काढला आहे तो ‘किंडल’ने. डिजिटल असूनही डोळ्यांवर ताण न येता कागदावरच पुस्तके वाचल्याचा अनुभव देणारे ‘अ‍ॅमॅझोन’चे किंडल मराठी वाचकांमध्ये, विशेषत: तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 4:16 am

Web Title: article on changing reading culture abn 97
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : शोध गुंतवणूकदारांचा!
2 डिजिटल संन्यास!
3 संशोधनमात्रे : वाचनाचं तंत्र : अभ्यासाचा मूलमंत्र
Just Now!
X