गायत्री हसबनीस

अनुष्काचा पांढऱ्या ठिपक्यांचा ड्रेस असो, ‘बिनोद’ हा शब्द असो वा ‘रसोडे में कौंन था?’ हे गाणे.. या सगळ्यांवरच्या मीम्सनी २०२० गाजवले. नव्या वर्षांतही मीम्सचा हा सिलसिला त्याच वेगाने सुरू आहे. वर्षांच्या सुरुवातीलाच आणखी एक नवा कोरा मीम व्हायरल झाला आहे, त्याचे नामकरण झाले नसले तरी  #इंडियावर्सेसअमेरिकामीम हा हॅशटॅग सोशल मीडियावर सर्च केला तरी तुमच्या सहज लक्षात येईल हा मीम कोणता ते..

अगदी कॉमन मॅनपासून ते सेलिब्रिटींपर्यंत मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झालेला हा मीम कुठून आला, कोणी प्रथम तयार केला, वगैरे गोष्टींचे कुतूहलही मागे पडले आहे. हे मीम फॉरवर्ड करणे किं वा त्यात स्वत:ची भर घालून वेगळे काही तरी करणे यात सध्या तरुण मंडळी फारच गुंतली आहे. एरवी केवळ फॉरवर्डपर्यंतच मर्यादित असलेली तरुणाई सध्या मीम्समध्ये आपल्या बुद्धिचातुर्याची भर घालत पोस्ट करण्यात रमली आहे. यूटय़ूबर आणि डिजिटल क्रिएटर आपल्या कौशल्यचातुर्याने नेहमीच काही तरी वेगळे देत असतात, आता त्यांच्याकडूनही मीम्सची निर्मिती केली जाते आहे. खरे तर, लिली सिंग या यूटय़ूबरने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ तयार केला होता. त्याच व्हिडीओपासून प्रेरणा घेऊन बनवलेला हा इंडिया वर्सेस अमेरिका मीम सध्या व्हायरल होतो आहे.

मुळात या मीमची आयडिया फार चपखल आहे आणि त्यामुळेच ती सर्व भारतीयांना रिलेट होते आहे. येथे फक्त भारत आणि अमेरिका हे देशच नाहीत. भारत आणि इतर देशांतील समस्या, यंत्रणा, आवडनिवड वेगवेगळी आहे. सोबतच चालीरीती, परंपरा, भाषा आणि व्यक्त होण्याची पद्धतही वेगळी आहे. इतर कुठल्याही देशात कोणत्याही गोष्टीवर प्रॅक्टिकली आणि मनमोकळेपणाने व्यक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे, आपल्याकडे मात्र मेलोड्रामा करून व्यक्त होणे जास्त आहे. त्यामुळेच अनेकदा ज्या गोष्टी किं वा भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत त्यांना या उपहासात्मक, विनोदी शैलीतील मीम्सच्या माध्यमातून वाट मोकळी क रून दिली जाते. पूर्वी समाजमाध्यमे नसताना राजकीय-सामाजिक विषयांवरच्या या गप्पा मित्रमंडळींमध्ये सहज रंगत असत. समाजमाध्यमांच्या या युगात बदल इतकाच झाला आहे की समोरासमोर प्रत्यक्ष संवाद साधून गंमत एकमेकांशी शेअर करणारे लोक आता मोबाइलच्या आडून या मीम्सच्या माध्यमातून गमतीजमती शेअर करत आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे दृश्यस्वरूपात दिसणाऱ्या या मीम्सचा विरंगुळा म्हणून जरी वापर होत असला तरी भाषा, शब्द आणि अर्थ यांच्या जोरावर विनोदनिर्मिती करण्याचे कौशल्य या मीम्सने सर्वाना दिले असे म्हणता येईल. अनेक छोटे-मोठे ब्रॅण्ड्स या मीम्सचा प्रसिद्धीसाठी म्हणूनही उपयोग करून घेत आहेत. या मीम्समध्ये प्रामुख्याने करोना, लस, नेपोटिझम, बॉलीवूड, राजकारण असे काही ठळक विषय वारंवार पाहायला मिळतात. याशिवाय बिग बॉस, गाणी, सिनेमे, क्रीडा, खाद्यपदार्थ या सगळ्यांतील वैशिष्टय़े, ताज्या घटना लक्षात घेत त्यावर भाष्य केले जाते. या मीम्समधून दु:ख, राग, चिडचिड, आनंद, यश इत्यादी भावना व्यक्त करताना आपण त्यांच्यापेक्षा कसे वेगळे आहोत हेही मांडण्याचा प्रयत्न केला जातो. या मीम्सच्या सादरीकरणातले हे नाटय़च त्यांच्या व्हायरल होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. चित्रपटातील संवादांसह बऱ्याच दृश्यांचा अचूक वापर करत हलकीफुलकी विनोदनिर्मिती या मीम्समधून केली जाते.

मागच्या वर्षी गाजलेले विषय, घटना यंदाही मीम्सच्या आशयाचा भाग बनले आहेत, ज्यात करोना आणि नेपोटिझम हे दोन विषय प्रामुख्याने आढळतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आणि कौशल्याने यावर मीम्समधून भाष्य करताना दिसतो आहे. समाजमाध्यमांनी सर्वाच्याच हाती मीम्सचे असे एक हक्काचे साधन दिले आहे, ज्यातून गंमतही येते आणि भावनाही प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळेच नव्या वर्षांत गमतीशीर मीम्सचा हा सिलसिला अधिक बहरेल यात शंका नाही.

viva@expressindia.com