राधिका कुंटे

मुळात असलेली संशोधनाची गोडी, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि कायम माणूसकीला दिलेलं प्राधान्य या गोष्टींच्या पायावर उभ्या राहणाऱ्या डॉ. प्रतीक चौधरी याच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.

डॉ. प्रतीक चौधरी. तो एसएससी बोर्डात पंधरावा आला होता. शाळा होती वसईतील ‘न्यू इंग्लिश स्कूल’. विज्ञान आणि गणित त्याचे आवडते विषय. त्याचं श्रेय तो त्यांच्या शाळेतील शिक्षिका वत्सला सापळे यांना देतो.  शाळा मराठी माध्यमाची असल्याने अकरावी- बारावीत अभ्यासासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागली. घरचे आणि आप्त परिवाराची इच्छा प्रतीकने डॉक्टर व्हावं अशी होती. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशपरीक्षेत आवश्यक ते गुण मिळाले नाहीत. मग इंजिनीअरिंगव्यतिरिक्त पर्याय कळला बायोटेक. त्याने अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. पुढे लोणीच्या ‘प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये एम.एस्सी. करताना संशोधनाशी पहिली गाठ पडली ती आजतागायत अतूट राहिली आहे. दुसऱ्या वर्षांच्या शेवटच्या सत्रात ग्रुप प्रोजेक्ट करायचं होतं. तेव्हा त्यांच्या ग्रुपने ‘बायोसिन्थेसिस ऑफ सिल्वर नॅनोपार्टिकल्स युजिंग व्हेरिअस बायॉलॉजिकल सोर्सेस अ‍ॅण्ड इट्स क्लिनिकल अ‍ॅप्लिकेशन्स’ यावर संशोधन केलं होतं. या प्रोजेक्टदरम्यान त्यांनी नैसर्गिक स्रोतांचा वापर करून नॅनोकणनिर्मिती केली आणि या नॅनोकणांचा वापर सूक्ष्मजीवशास्त्रात कसा होऊ शकतो हे दाखवलं. संशोधन करताना अंगी सहनशीलता मुरवणं आणि यशापयशाच्या पायऱ्यांच्या चढउतारांची सवय करून घेणं, म्हणजे काय असतं, याची झलक या सहा महिन्यांत त्याला अनुभवायला मिळाली. त्यांचा हा शोध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. यासाठी प्रा. सुरेश कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रतीकच्या करिअरमधलं हे एक महत्त्वाचं वळण होतं.

दरम्यान, त्याने पीएच.डी.साठी नवी मुंबईतील ‘टाटा मेमोरिअल सेंटर’च्या (TMC) ‘अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर’ (ACTREC)मध्ये अर्ज केला होता. प्रवेशपरीक्षा झाली. एम.एस्सी.ला प्रकाशित झालेल्या पेपरमुळे प्रवेश मिळणं थोडंसं सुकर झालं. प्रतीकने ‘मुखाचा कर्करोग’ या विषयात पीएच.डी. केली असून ‘Role of hemidesmosomal kinker proteins in neoplastic progression of squamous cell carcinomas’ हे त्याच्या शोधनिबंधाचं शीर्षक होतं. पीएच.डी.साठी डॉ. मिलिंद वैद्य त्याचे मार्गदर्शक होते. तो सांगतो की, ‘‘भारतात मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अगदी शेवटच्या अवस्थेत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांवर इलाज करणं कठीण होतं. कधी शस्त्रक्रिया करावी लागते, कधी किमोथेरपी द्यावी लागते. औषधोपचारांचा म्हणावा इतका परिणाम होतो असं नाही. त्याचे साइड इफेक्ट्स जास्त होतात. मुखाचा कर्करोग किती खोलवर पोहोचला आहे, ते सूचित करण्याची फारशी चांगली सूचनाप्रणाली उपलब्ध नाही. तशी प्रणाली अर्थात लॅबच्या भाषेत बायोमार्कर्स शोधणं आणि त्याची रुग्णांवर चाचपणी करणं, ही आमच्या लॅबच्या प्रयोगाची थीम होती. मुळात आपल्याकडे कर्करोगावर पुरेसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे थेट रुग्णांवर प्रयोग करूच शकत नाही. त्यामुळे आम्ही इनव्ह्रिटो स्टडीज केल्या. म्हणजे रुग्णाच्या सेल (पेशी) घेऊन त्याचे सेललाइन तयार करतो. त्या पेशी प्रयोगशाळेत वाढवू शकतो. प्रयोगशाळेत उंदरांवर आणि इतर प्राण्यांवर प्रयोग होतात, त्याला इनविवो स्टडीज म्हणतात. माझा पीएच.डी.चा अभ्यास इनव्ह्रिटो स्टडीज पद्धतीचा झाला. मी दोन प्रोटिनवर काम करून कॅन्सरच्या वाढीत ते काय भूमिका निभावतात, हे बघितलं. माझी पीएच.डी. साडेपाच वर्षांत पूर्ण झाली. आमच्या टीमने ‘Intermediate filament family’ आणि तत्सम वेगवेगळ्या प्रोटिन्सवर संशोधन केलं. २०१७ मध्ये माझे मार्गदर्शक निवृत्त झाले आहेत. मात्र त्यांच्या जिद्दीमुळे त्या पुढील प्रकल्प आता कर्करोगाच्या रुग्णांवर सुरू झाला आहे. लॅबमधलं खेळकर वातावरण संशोधनाला अत्यंत पूरक ठरतं. प्रत्येकाला कामाबद्दल आत्मीयता वाटते आणि काम करायला हुरूप वाटतो. सुदैवाने माझे दोन्ही मार्गदर्शक डॉ. मिलिंद वैद्य आणि डॉ. विदिता वैद्य हे माणुसकीला कायमच प्राधान्य देतात. दोन्ही लॅबमध्ये केवळ स्वत:चा विचार न करता ‘आपण सारे मिळून’ असा विचार कायमच केला जातो. पीएच.डी. करत असताना अमेरिकेत ‘गॉर्डन रिसर्च सेमिनार ऑन इंटरमिडिएट फिलामेंट्स’मध्ये प्लॅटफॉर्म प्रेझेंटेशनची आणि ‘गॉर्डन रिसर्च कॉन्फरन्स ऑफ इंटरमिडिएट फिलामेंट्स’मध्ये पोस्टर प्रेझेंटेशनची संधी मिळाली. त्यासाठी नेचर ट्रॅव्हल ग्राण्ट मिळाली होती. या कॉफरन्समध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास १५० विद्यार्थ्यांपैकी एकालाच हा बहुमान मिळतो. प्लॅटफॉर्म प्रेझेंटेशनच्या विद्यार्थ्यांच्या यादीत मी देशाचंच नव्हे तर संपूर्ण आशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. संयोजकांनी माझ्या वैज्ञानिक विचार मांडणीला दाद दिली,’ असे तो सांगतो.

पीएच.डी.नंतर पुढे काय, हा प्रश्न होता. अनेकदा बरेच जण पोस्टडॉकसाठी परदेशी जातात. घरच्यांशी विचारविनिमय केल्यावर त्याला कळलं की, त्याने इथेच राहावं असं घरच्यांना वाटत आहे. करिअरविषयी किंचितशी काळजी वाटली तरी तो काही तरी चांगलं करून दाखवेल हा विश्वासही होता. प्रतीकने आपलं संशोधनातील करिअर भारतातच करायचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये तशा मोजक्याच रिसर्च इन्स्टिटयमूट आहेत. त्यानं पहिलाच अर्ज ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’च्या ‘डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस’मध्ये डॉ. विदिता वैद्य यांच्या न्यूरोबायोलॉजी लॅबमध्ये केला. कारण संशोधक हा माणूस म्हणून चांगला आणि माणुसकीला जपणारा असावा, असं त्याला कायम वाटतं. त्याच्या करिअरचे टप्पे पाहिल्यास त्यात एकच एक विषय दिसत नाही; पण त्याला संशोधन करायला मनापासून आवडतं. त्याला वाटतं की, संशोधनाचं तंत्र बहुतांशी तेच राहातं, फक्त विषय बदलतो.

टीआयएफआरमध्ये पोस्टडॉक तीन वर्षांचं मिळालं. प्रकल्पासाठी बाहेरून आणखी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. तसा अर्ज त्याने केला. दोन टप्पे पार झाल्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बेंगळूरूला जावं लागलं. तिथे आपल्या प्रकल्पाची अवघ्या पाच मिनिटांत माहिती द्यायची असते. त्यासाठीची कसून तयारी त्याच्या मार्गदर्शक डॉ. विदिता वैद्य यांनी करून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्याचं सादरीकरणाचं कौशल्य आणखी विकसित झालं. त्याला प्रतिष्ठित आणि शिष्यवृत्तीसाठी अतिशय चुरशीची स्पर्धा असणाऱ्या ‘इंडिया अलायन्स वेलकम ट्रस्ट’ आणि ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ यांची शिष्यवृत्ती मिळाली. आजच्या घडीला भारतात पोस्टडॉक करणाऱ्या बायोमेडिकल संशोधनक्षेत्रातील (जैवचिकित्साशास्त्र संशोधनक्षेत्रातील) पीएच.डी.धारकांना मिळणारी ही सर्वोत्तम शिष्यवृत्ती आहे. जुलै २०१८ मध्ये केलेल्या अर्जाचा निकाल जुलै २०१९ मध्ये कळला आणि अर्थसाहाय्य जानेवारी २०२० पासून मिळू लागलं आहे. प्रयोगाची प्राथमिक स्तरावरची चाचपणी या काळात तो करू शकतो. हा प्रकल्प पाच वर्षांसाठी असून त्याच्या मानधनासह लॅबसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीसाठी त्याला अर्थसाहाय्य मिळतं. डॉ. विदिता यांनी केलेल्या मदतीमुळे त्याला या प्रकल्पात टीआयएफआरचे प्रा. उल्हास कोलथुर आणि स्वित्र्झलडमधील ‘इकोले पॉलिटेक्निक फेडरल डी लॉजेन’ या लॉजेनमधील संस्थेचे प्रा. कारमेन सॅन्दी यांचं साहाय्य मिळणार असून त्या प्रयोगासाठी परदेशात काही काळ व्यतीत करायचा आहे.

डॉ. विदिता यांच्या लॅबमध्ये मेंदू, भावना आणि ताणतावासंदर्भात संशोधन केलं जातं. त्यापैकी एक विषय म्हणजे अर्ली लाइफ स्ट्रेसमुळे वाढणाऱ्या नैराश्याच्या प्रक्रियेत मायटोक्रॉण्ड्रियाची भूमिका आहे का? हा होय. बालपणातल्या वातावरणाचा आपल्या आयुष्याच्या जडणघडणीवर खूप परिणाम होतो. मेंदूच्या विकासात सुरुवातीचा १० ते १२ वर्षांचा काळ महत्त्वाचा मानला जातो. तेव्हा कोणत्याही प्रकारचा ताण मनावर आला तर त्याचा परिणाम पुढच्या आयुष्यावर होऊ शकतो. विविध प्रकारचं शोषण, भावनिक-शारीरिक दुर्लक्ष, पालकांचा मृत्यू किंवा घटस्फोटामुळे आलेला दुरावा, पालकांचं व्यसन किंवा पाल्याला लागलेलं व्यसन, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ला अशा अनेक कारणांमुळे मुलांच्या मनावर ताण येऊ शकतो. मात्र प्रत्येकाची ताण सहन करण्याची क्षमता भिन्न असल्याने प्रत्येकाच्या ताणाचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होईलच असं नाही. असा लहान वयात तणावाचा सामना करावा लागल्याने प्रौढपणी तणाव आणि नैराश्याला तोंड द्यावं लागण्याचं प्रमाण वाढू शकतं. साइड इफेक्टस् म्हणून काही शारीरिक व्याधीही होऊ शकतात. आपल्या सगळ्या क्रिया-प्रतिक्रियांचं नियंत्रण मेंदूवर असतं. या बालपणीच्या वर्षांना शास्त्रीय भाषेत ‘क्रिटिकल पीरिअड’ म्हणतात. याविषयीची ही अल्प माहिती यापूर्वी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमुळे उपलब्ध झाली आहे.

तो सांगतो की, ‘अर्ली लाइफ स्ट्रेसच्या प्रयोगात एक मॉडेल आहे, मॅटर्नल सेपरेशन. उंदरांची पिल्लं (पप्स) जन्माला आल्यावर पहिले दोन आठवडे रोज त्यांना आईपासून तीन-तीन तास दूर ठेवतो. या तीन तासांत त्यांची आई त्यांची काळजी घेऊ शकत नाही. यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत अशा तऱ्हेनं ताण आल्यानं मोठेपणी ताण आणि नैराश्य येणं, मेंदूमध्ये प्रौढत्वाची प्रक्रिया अकाली वाढीस लागणं आणि त्याचे परिणाम शरीरावर दिसणं या गोष्टी होतात, असं निरीक्षण होतं. ते कशामुळं होतं, हे आमच्या लॅबमध्ये प्रयोगाद्वारे शोधायचं आहे. मी मायटोक्रॉण्ड्रियावर (Mitochondria) लक्ष्य केंद्रित केलं आहे. मेंदूत सर्वाधिक ऊर्जेच्या पुरवठय़ाची मागणी असते. मात्र मायटोक्रॉण्ड्रियाच्या कार्यशैलीत बदल होत असेल तर त्याचा परिणाम मेंदूशी निगडित विकारांच्या स्वरूपात दिसू शकतो, असं आढळून आलं असून त्याचा सखोल अभ्यास व्हायचा आहे.’

दोन आठवडे पप्सना आईपासून दूर ठेवल्यावर माणसाच्या आयुष्यासारखेच उंदराच्या पिल्लाच्या वयाचे चार टप्पे निश्चित केले. मेंदूतही भावनांशी संबंधित असणारे सर्किट निवडून त्यांचा या चार टप्प्यांत कसा परिणाम-प्रवास होतो ते बघायचं ठरवलं. आताच्या निरीक्षणावरून ढोबळमानाने सांगायचं झालं तर प्रौढ उंदरांमधला आईपासून दुरावल्यावर मायटोक्रॉण्ड्रिया प्रोटिनचा स्तर थोडा कमी झालेला दिसतो. आता त्याचं आणखी तपशीलवार निरीक्षण आणि अभ्यास करायचा आहे. अभ्यासानंतर त्यावरचा उपाय शोधणं आणि त्याचे फायदे-तोटे विचारात घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यापुढच्या टप्प्यात रुग्णांच्या पेशींवर काम करून त्या संदर्भात संशोधन करता येऊ शकेल.

प्रतीक डॉ. विदितांना भेटला तेव्हा त्याला या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांच्याकडे या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. सेल बायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केल्याने त्यात त्यानं सक्रिय सहभागी व्हावं, असं त्यांनी सुचवलं. हा प्रकल्प खूप मोठय़ा कालवधीचा आहे. उंदरांवर प्रयोग करताना जवळपास पंधरा महिने थांबावं लागतं. त्यांच्या लॅबमध्ये इतर प्रकल्पांमध्येही काम करता येतं. त्यामुळे तो पीएच.डी. आणि मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसोबत आणि ते त्याच्यासोबत काम करतात. प्राण्यांवर काम असल्याने, एखाद्या प्रयोगात कधीकधी शनिवारी किंवा रविवारी किंवा सणाच्या दिवशीही लॅबमध्ये यावं लागतं. त्यासाठी सहकारी एकमेकांच्या वेळा सांभाळून घेतात. काही वेळा दुसऱ्याने एखाद्याच्या प्राण्यांना हाताळलं तर त्याचाही ताण प्राण्यांना येऊ शकतो. त्यामुळे काम असल्यास कुठल्याही दिवशी कामाला जायची त्याची तयारी असते. त्याचं क्षेत्र बदलल्याने तो न्यूरोसायन्स, न्यूरोबायोलॉजी, मानसशास्त्र आदी विषयांबद्दलचं वाचन करून शिकतो आहे.

तो म्हणतो की, ‘माझ्या प्रकल्पानंतर पुढे काय करायचं हा विचार केला नाही. छोटी पण दमदार पावलं टाकण्यावर माझा विश्वास आहे. मला संशोधनक्षेत्रातच राहायचं असून शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करायचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासंदर्भात जागृत करण्याची इच्छा आहे. अलीकडेच मी आणि माझी बायको-शलाकाने आनंदवनातल्या एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना ‘करिअर ऑप्शन्स इन रिसर्च फिल्ड’ या विषयावर व्याख्यान दिलं. शिवाय भोवतालच्या विद्यार्थ्यांना जमेल तसं उच्चशिक्षणाबद्दल मार्गदर्शन करतो. माझ्या दहावीच्या यशात आई-बाबा-भावासह आजीचा खूप मोठा वाटा आहे. गेली अनेक वर्ष माझी आजी सुनंदा चौधरी हिच्या स्मरणार्थ आम्ही राहत असलेल्या वसईमधील पापडी गावातील एम.एस्सी., एम.बी.ए. होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार देतो आहे.’ त्याच्या मते, संशोधनक्षेत्रात यायचं तर मनापासून आवड, समर्पण वृत्ती आणि मेहनतीची तयारी हवी. सातत्याने प्रयोग करत राहिल्याने माझी सहनशीलता वाढली आहे. कधी फावला वेळ मिळाल्यास मी आणि बायको आवडीने बागकाम करतो. खेळणं आणि फिरण्याचीही आवड आहे. गेल्या वर्षी आनंदवनातल्या श्रमसंस्कार शिबिरात गेल्याने खूप फरक पडला. केवळ स्वत:त गुंतून न राहता दुसऱ्याचाही विचार केला पाहिजे, हे कळलं. येत्या काही वर्षांत अनाथ मुलं आणि निराधार वृद्धांसाठी तसेच पर्यावरणासाठी काहीतरी काम करायचा विचार सुरू आहे. प्रतीकच्या ‘मी’कडून ‘आम्ही’कडे सुरू झालेल्या या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.

viva@expressindia.com