गायत्री बर्वे-गोखले

टीव्हीवर म्हणा किंवा अन्य प्रसारमाध्यमांवर म्हणा, कोणत्याही नवीन वस्तूची जाहिरात दिसली की प्रत्येकाला की वस्तू घेण्याचा मोह होतो. आणि हीच ग्राहकांची नस ओळखून अनेक कंपन्या आपली प्रॉडक्ट्स जास्तीत जास्त विकली जावीत यासाठी कधी कधी ग्राहकांची दिशाभूल करत अयोग्य अश्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करतात. तर काही वेळा कंपन्यांनी दिलेली माहिती ही चुकीची नसली तरी ती पूर्ण सत्य नसते ज्यामुळे ग्राहकाचं नुकसान होऊ शकतं. केवळ डाएटच नव्हे तर रोजच्या आहाराचा विचार करताना या गोष्टींबाबत काळजी घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

एक्स्पायरी डेट तपासून घेणं, लेबल वाचून कमी तेल, साखर असलेले पदार्थ निवडणं हे आता बऱ्याच जणांच्या अंगवळणी पडलेलं दिसून येतं. हल्लीची तरुण पिढी खाण्याच्या पदार्थांबाबत अधिक जागरूक असली, आणि प्रत्येक पॅकवर लिहिलेली माहिती वाचून घेत असली तरी काही गोष्टींबाबतची सजगता येणं अजूनही गरजेचं आहे. यात कंपन्यांना दोष देणं अयोग्य ठरेल, कारण प्रत्येकाला त्यांच्या प्रॉडक्टचा खप वाढवण्यासाठी जाहिरात ही करावीच लागते पण आपण त्या प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ समजून घेऊन त्याचा वापर करायचा की नाही?, हे ठरवण्याइतकंआपण जागरूक असणं आवश्यक आहे.

तर ही जागरूकता कशी वाढेल? सर्वसाधारणपणे आपण पाहतो की खाण्याच्या पदार्थाच्या पॅकेटवर मागील बाजूस त्यात वापरले गेलेले साहित्य, कॅलरी चार्ट इत्यादी माहिती दिलेली असते. शक्यतो या चार्टमध्ये त्यात वापरले गेलेले मूळ पदार्थ आणि इतर मसाले यांची उतरत्या क्रमात यादी दिलेली असते. त्यामुळे त्यात कोणत्या पदार्थाची टक्केवारी अधिक आहे हे समजून घेऊन आपल्यासाठी तो पदार्थ योग्य आहे किंवा नाही हे ठरवणं सोपं जाऊ  शकतं.

मुख्यत्वे, कंपन्या काही गोष्टी पॅकेटवर ठळकपणे नमूद करतात ज्यामुळे त्यांचा खप वाढेल. नेमक्या याच गोष्टी वाचून ग्राहक आकर्षित होतात आणि त्या वस्तू विचार न करता खरेदी करतात. याला मार्के टिंग स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. पॅकेटवर लिहिलेली वेगळी नोट जसे ‘फोर्टिफाईड’ किंवा ‘हाय फायबर’ म्हणजेच तो पदार्थ हेल्दी आहे असा सर्वसाधारण गैरसमज असतो. ज्या पॅकेट्सवर वेगळं शुगर फ्री, सॉल्ट फ्री, लो फॅट किंवा ग्लूटेन फ्री असं तत्सम काही लिहिलेलं असेल अशा गोष्टी खाण्यासाठी ‘हेल्दी’च असतात हा समज पुसून टाकायला हवा. म्हणूनच आपण आज याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

फोर्टिफाईड/एनरिच

याचा अर्थ असा होतो की एखाद्या पदार्थात मूलत: नसलेल्या किंवा असलेल्या एका न्यूट्रिएन्टचा समावेश करून त्या पदार्थाची गुणवत्ता वाढवली जाते. उदा. दुधात मिसळायच्या पावडरी या व्हिटामिन डी फोर्टिफाईड असतात, पण फोर्टिफाईड पदार्थच खाण्यास योग्य आहेत असेही काही नाही. कित्येकदा अशा पदार्थामध्ये अन्य असे घटक असतात जे शरीरास अपायकारक ठरू शकतात उदा. खायचे रंग, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज.

ग्लूटेन फ्री

सध्या ग्लूटेन फ्री किंवा लॅक्टोज फ्री पदार्थाची बाजारात रेलचेल दिसून येते. ज्यांना खरंच ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी आहे अशा लोकांनी ग्लूटेन फ्री पदार्थ खायला हवेत, पण ज्यांना हा आजार नाही त्यांनी ग्लूटेन फ्री पदार्थाकडे वळण्याची काही गरज नाही. किंवा असे पदार्थ खाण्याचा अट्टहास टाळावा. ‘ग्लूटेन फ्री’चा अर्थ हेल्दी असा होत नाही. ग्लूटेन फ्री म्हणजे गहू आणि इतर काही धान्यांत असणाऱ्या ग्लूटेन नामक घटकाचा अभाव होय. पण ग्लूटेन फ्री असला तरी त्याचवेळी तो पदार्थ भरपूर तेल किंवा साखर वापरून केलेला असू शकतो हे लक्षात घ्यायला हवं.

नॅचरल/ऑरगॅनिक

नॅचरल किंवा ऑरगॅनिकचा अर्थसुद्धा हेल्दी असा होत नाही. अनेकदा याचा अर्थ पदार्थ बनवला जाताना तो एका स्टेजला त्याच्या नॅचरल फॉर्ममध्ये म्हणजे मूळ रुपात वापरला गेला आहे, असा अध्याहृत असू शकतो.  जे ऐंशी टक्के तयार पदार्थाच्या बाबतीत खरे असते, पण त्यामुळे हा पदार्थ इतर पदार्थाच्या तुलनेत चांगला ठरत नाही.

नो अ‍ॅडेड शुगर

प्रत्येक पदार्थात काही टक्के साखर ही मुळातच असते. ‘नो अ‍ॅडेड शुगर’चा अर्थ असा होतो की त्यात अजून वेगळी साखर घातली गेलेली नाही. पण त्याचवेळी यात साखरेव्यतिरिक्त इतर कोणताही गोडी वाढवणारा पदार्थ घातलेला असू शकतो. उदा. मेपल सिरप, मध, कॉर्न सिरप आणि असे पदार्थ मधुमेह असणाऱ्यांसाठी अयोग्य ठरू शकतात. त्यामुळे साहित्य नीट पडताळून मगच अशा वस्तूंची खरेदी करावी.

मल्टिग्रेन

‘मल्टिग्रेन’ हा शब्द डाएट करणाऱ्यांना लगेचच आकर्षित करतो. आपण मल्टिग्रेन खातोय म्हणजे काहीतरी विशेष करतोय असं नाही. ‘मल्टिग्रेन’ म्हणजे एकापेक्षा अधिक धान्य वापरून केलेला पदार्थ. हे धान्य अख्ख्या स्वरूपात वापरलं गेलं असेल तर ते नक्कीच हेल्दी आहे, पण रिफाईंड म्हणजे कोंडा काढून मग वापरलं गेलं असेल तर त्याच्या मल्टिग्रेन असण्याला काहीच अर्थ उरत नाही. याउलट ‘होल व्हीट’ किंवा ‘होल ग्रेन’ लिहिलेले पदार्थ वापरणं केव्हाही उत्तम.

हाय फायबर

हेल्थ फ्रिक्सचा खाण्यातला अजून एक आवडता प्रकार म्हणजे ‘हाय फायबर’. त्यामुळे बिस्किटांपासून ते अनेक पदार्थांपर्यंत मार्केटमध्ये अनेक हाय फायबर पदार्थ उपलब्ध असलेले आपण पाहतो. फायबर म्हणजेच कोंडा, तो समजा बिस्कीट फॉर्ममध्ये एकत्र आणायचा झाला तर त्यासाठी बाईंडिंग म्हणून मोठय़ा प्रमाणात फॅट्सची (तेल, बटर, तूप) आवश्यकता असते. त्याशिवाय हे पदार्थ बनवले जाऊ  शकत नाहीत. अशावेळी पॅकेट्सवर हाय फायबर, झिरो शुगर लिहिताना कंपनीवाले ‘हाय फॅट’चा उल्लेख सोयीस्कररीत्या टाळताना दिसतात, ज्यामुळे आपली दिशाभूल होते आणि असे पदार्थ आपण खरेदी करतो.

थोडक्यात काय, तर कोणतेही पदार्थ हे त्यांच्या ‘सिम्प्लेस्ट फॉर्म’मध्ये खायला हवेत. पदार्थ जेवढा मूळ रुपात असतो तेवढी त्यातील पोषणमूल्यं आपलं शरीर जास्त प्रमाणात शोषून घेतं. पदार्थावर जेवढी जास्त प्रक्रिया होते तेवढी त्याची पोषणमूल्यं कमी होत जातात. अर्थातच, शरीराला फार कमी प्रमाणात ते पोषक घटक मिळतात. तेव्हा शक्यतो प्रक्रिया न झालेले पदार्थ खावेत किंवा खायचे झाल्यास कमीत कमी प्रोसेस झालेल्या पदार्थाची निवड करावी. प्लॅन्टमध्ये (कारखान्यात)तयार होणारे पदार्थ खाण्यापेक्षा प्लॅन्टपासून (झाडापासून) मिळणारे पदार्थ खाणं हे  शारीरिकदृष्टय़ा, आर्थिकदृष्टया आणि सामाजिकदृष्टय़ा केव्हाही चांगलं आहे.

त्यामुळे पदार्थ विकत घेताना नुसतीच एक्सपायरी डेट न पाहता, वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन, फूड लेबल वाचण्यासाठी पुरेसा वेळ देऊन मगच अशा गोष्टींची खरेदी करावी आणि जाहिरातींना बळी पडणं थांबवावं.

viva@expressindia.com