जीजिविषा

सोडय़ाची बाटली उघडली आणि ग्लासमध्ये ओतली की पहिलं उत्तेजित, उथळ बुडबुडे येतात आणि मग हळूहळू ते शांत होऊ  लागतात. प्रेमाचेही काहीसे तसेच असते. पहिल्या काही दिवसांतले बुडबुडे जेव्हा शांत होतात खरंतर तेव्हाच खरे प्रेम सुरू होते.

जीजिविषा

प्रिय वाचक मित्र,

माझा सगळ्यात आवडता महिना म्हणजे फेब्रुवारी. कारण खूप सोप्पे आहे, या महिन्यात माझा वाढदिवस असतो. लहानपणापासून मला कायमच वाढदिवसाची उत्सुकता आहे. दरवर्षी दिवसाचा पहिला भाग मी, आई आणि बाबा एकत्र असतो आणि संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जाते. मात्र या वर्षी कामामुळे मला घरी जाता येणार नाही याचे जरा वाईट वाटते आहे. पण काय करणार? हरकत नाही. पण हो, तुमच्या सर्वाचे प्रेम हक्काने मागते आहे.

जसा मला या कारणाने हा महिना प्रिय आहे तसाच इतरांना वेगळ्या कारणाने प्रिय आहे. त्यात काही गुपित नाही.

आज व्हॅलेंटाइन्स डे आहे आणि तुमच्या तरुण मनातल्या तरुण भावना आज नक्कीच किनाऱ्यावर आल्या असतील. कदाचित काही लोकांचे व्हॅलेंटाइन्स डेच्या अलीकडेच सेलिब्रेशन सुरू झाले असतील. चॉकलेट डे, रोज डे आणि अजून काय अन् काय. बघायला गेलं तर या सगळ्या मार्केटिंगच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या युक्त्या आहेत, पण माणूसप्राणी भावनिक असल्याने आपल्या भावना अगदी सहजच कोणत्याही गोष्टीशी जुळून जातात. अगदी तरुण असताना प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पना अगदी काही मोजक्या अनुभवांवर आधारलेल्या असतात. चित्रपट, आपल्या जवळचे नातेवाईक म्हणजे आईवडील, भावंडे, तत्सम किंवा मित्रमंडळी. लहानपणापासून मग आपण ही नाती बघतच मोठे होतो. आपल्या प्रेमाच्या अपेक्षाही त्यावरच आधारित असतात. आपल्याला वाटते की कुणीतरी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल आणि बास! मग डन, आपण फिरायला जाऊ , पिक्चरला जाऊ , बाहेर खाऊ , मजा करू वगैरे वगैरै. हेच आयुष्य अणि हेच प्रेम, असं आपल्याला वाटत असतं. पण जसजसं वय वाढेल तसतसं तुमच्या प्रेमाच्या संकल्पनाही बदलू लागतील. तेवढंच नाही तर आजूबाजूला बघाल तर तुम्हाला हेही जाणवेल की प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल. प्रत्येक व्यक्तीचीच नाही तर प्रत्येक जोडप्याचीही. तसेच आपल्या समाजात जोडीदार / साथीदार असण्याबद्दलही खूप दबाव असतो. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की हे दबाव बाह्य़ आहेत. प्रत्येकजण प्रेमावर प्रेम करेलच असे नाही. आणि यात काही गैर नाही. काही लोक स्वत:चीच सोबत पसंत करतात आणि त्यात सुखी असतात. पण एक मात्र खरे की लोकप्रिय संकल्पनेप्रमाणे प्रेम हे बिनशर्त असावे. त्यात स्वार्थ नसावा. अपेक्षा नसाव्यात.

मला मात्र हे कोणत्याही परिकथेप्रमाणे वाटते, कदाचित कुणाकुणाची नाती असतीलही बिनशर्त, पण अगदी मोजक्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच.. कोणतंही नातं म्हटलं की त्यात अपेक्षा आल्याच, शर्ती आल्या आणि त्यात काही गैर नाही. दुर्दैवाने जेव्हा त्या अपेक्षा जुळत नाहीत, तेव्हा मग सगळे त्रास होतात आणि मगच ते अपेक्षांचे ओझे का काय म्हणतात ते वाटू लागते. कोणत्याही नात्यातून आपल्याला काही ना काही तरी अपेक्षित असते म्हणूनच आपण एकत्र येतो किंवा राहतो. माझ्या एका मित्राची गर्लफ्रेंड नेहमी त्याच्याशी भांडायची, कारण काय? तर आपण कधीच कोठे जात नाही आणि त्याचा ‘पझेसिव्हनेस’. त्यावर त्याचे नेहमीचे एकच टुमणे.. माझ्या आईवडिलांनी नाही केले यातले काही; त्यांच्यात कसं बरं सगळं अजूनही चांगलं आहे? माझ्या वहिनीला खूप मित्र आहेत आणि दादाला ते आवडत नाही, त्यामुळे ती तिच्या मित्रांना आता फारशी भेटत नाही. हिला कसे कळत नाही मी हिच्या चांगल्यासाठीच सांगतोय, असे दादाचे म्हणणे..

यात जर का तुम्ही मुलाच्या बाजूने असाल तर हे पत्र तुमच्यासाठी नाही, कारण त्याच्या आईला कधी त्याच्या वडिलांनी कुठे नेले नाही. यात आई काही बोलली नाही याचे कारण प्रेम नसून दबाव आहे, तसेच दादा-वाहिनीबाबतही. म्हणून आपला जोडीदारही तसाच असेल असे नाही. डोळे उघडून नीट बघायला शिका. प्रेम म्हटले की अपेक्षा आल्या, मनं सांभाळणं आलं. त्याचबरोबर जसजसे तुम्ही जास्त काळ एकमेकांसोबत घालवाल तसतसं पहिल्या काही दिवसांतल्या भावना या बदलू लागतील. सोडय़ाची बाटली उघडली आणि ग्लासमध्ये ओतली की पहिलं उत्तेजित, उथळ बुडबुडे येतात आणि मग हळूहळू ते शांत होऊ  लागतात.

प्रेमाचेही काहीसे तसेच असते. पहिल्या काही दिवसांतले बुडबुडे जेव्हा शांत होतात खरंतर तेव्हाच खरे प्रेम सुरू होते. खरी चव तेव्हा कळते. गोड, तुरट, हलकी चुरचुरीत.. सगळ्या सगळ्या चवी आकळत जातात. तेव्हा जरा पेशन्सनी काम घ्या, एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्या आणि नाते एन्जॉय करायला विसरू नका.

जाता जाता आजची टीप – मेसेज पठावताना कायम विरामचिन्हे, प्रश्नचिन्हे, उद्गारचिन्हे वापरा! मेसेजवर संभाषण करताना बऱ्याचदा याचअभावी गैरसमज होतात. नसते वाद टाळा, गप्पी मासे पाळा.. आपलं सॉरी; नसते वाद टाळा, विरामचिन्हे वापरा.

कळावे,

जीजि