राधिका कुंटे

समाजोपयोगी संशोधन, साधनं, उपकरणं तयार करताना आणि विज्ञानाच्या क्षेत्रात वावरताना आपली तत्त्वं आणि देशप्रेम जपणारा संशोधक वैज्ञानिक आहे विक्रांत कुरमुडे. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी फिजिक्स केल्यानंतर विक्रांतने सोलार सेल्सवर आणि नंतरच्या काळात ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ अर्थात एनसीआरएमध्ये कृष्णविवराच्या गाभ्यात असणाऱ्या दीर्घिकांवर त्याने संशोधन केलं.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
ग्रामविकासाची कहाणी
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

असं म्हणतात की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसंच काहीसं संशोधक वैज्ञानिक विक्रांत कुरमुडे याचं झालं. लहानपणापासून विज्ञानाची गोडी असल्यामुळं तो बदलापूरच्या खगोल मंडळात जायचा. तेव्हाच त्याच्या मनाशी पक्कं झालं होतं की अ‍ॅस्ट्रोनॉमी किंवा अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करायचं. बारावीनंतर इंजिनीअरिंगची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाला तरीही अ‍ॅस्ट्रोफिजिक्स शिकायचं असल्याने त्याने फिजिक्स विषय निवडून बी.एस्सी.साठी डी. जी. रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. फिजिक्स के लं. त्या दोन वर्षांत सोलर सेल्सवर आणि नंतरच्या काळात ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ अर्थात एनसीआरएमध्ये ‘सक्रिय आकाशगंगेचा गाभा’ (active galactic nuclei) या कृष्णविवराच्या गाभ्यात असणाऱ्या दीर्घिकांवर त्याने संशोधन केलं.

त्यानंतर तो होमी भाभा विज्ञान शिक्षण कें द्रात अडीच वर्ष कार्यरत होता. भारतातर्फे  फिजिक्स आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या ऑलिम्पियाडसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणं हे त्याचं काम होतं. २०१५ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिप्मियाड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी एक्सपिरिमेंट (प्रयोगपरीक्षा) तयार करण्याच्या कामात त्याचा सहभाग होता. जवळपास ९० देशांतल्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता. हे एक्सपिरिमेंट याआधी कधीही केलं गेलेलं नसावं आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं नसावं अशी अट असल्याने तशा प्रकारचे एक्सपिरिमेंट यजमान देशाला तयार करावं लागतं. विक्रांत सांगतो की, ‘मी तिथे रुजू होईपर्यंत र्अध काम झालं होतं. एक्सपिरिमेंट तयार करणारी आमची दहाजणांची टीम होती. त्या एक्सपिरिमेंटच्या तंतोतंत अशा ४५० कॉपी तयार कराव्या लागल्या होत्या. दोन महिन्यांच्या आत त्यांची चाचपणी करायची होती. त्यासाठी भारतभरातून जवळपास तीस शिक्षकांना बोलवण्यात आलं होतं. त्यायोगे त्या एक्सपिरिमेंटच्या सेटअपची खात्री केली गेली. त्यांनी जवळपास २०० टेस्ट केल्या होत्या. तरीही २५० टेस्ट करणं बाकी होतं. तेव्हा वाटलं होतं की ‘या टेस्ट कोण करणार?’ मग मीच दिवसाला दहा-दहा टेस्ट करून, शब्दश: रात्रंदिवस एक करून ते टार्गेट पूर्ण केलं होतं. हा सततचा सराव केल्याने त्या एक्सपिरिमेंटमध्ये तसूभरही फरक झाला तर मला तो लगेचच जाणवायचा’. सुदैवाने स्पर्धेत कोणताही अडथळा न येता स्पर्धा चांगली पार पडली. हा सगळा सेटअप उभारताना गुप्तता पाळणं अपेक्षित असल्याने ते बंद दरवाजाआड आणि रात्री चालत असे, अशी माहितीही त्याने दिली.

दुर्गम भागातल्या शाळांना चांगल्या दर्जाची, उपयुक्त आणि अल्प किमतीत उपलब्ध होऊ  शकतील, अशा काही शैक्षणिक-प्रायोगिक साधनं-उपकरणांचं डिझाइन तो करतो. ‘मायकेल्सन – मोर्ले इंटरफेरोमीटर’चा उपयोग आज विविध क्षेत्रांत केला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी, प्रकाशाची तरंग लांबी मोजणं, पदार्थ किंवा वस्तूंच्या अणू-रेणूचं विश्लेषण करण्यासाठी आणि अलीकडेच शोधण्यात आलेल्या गुरुत्वलहरींचा शोध घेण्यासाठीही इंटरफेरोमीटरचा उपयोग केला गेला. तो सांगतो की, ‘मी आणि माझे तत्कालीन मार्गदर्शक – शिरीष पाठारे अशी आम्ही दोघांनी ‘मायकेल्सन – मोर्ले इंटरफेरोमीटर’ची अल्प किमतीतली आवृत्ती तयार केली. त्याचबरोबर या उपकरणाचा वापर करून गुरुत्वीय लहरी वेधशाळेचं कार्य स्पष्ट करणारं जगातलं पहिलं प्रात्यक्षिक मॉडेलही बनवलं. याची दखल ‘लिगो इंडिया’चे (Laser Interferometer Gravitational-wave Observatory (LIGO) समन्वयक आणि आर.आर.आई.चे प्राध्यापक बाला अय्यर यांनीदेखील घेतली. आम्ही बनवलेल्या मायकेल्सनवर व्याख्यान देण्यासाठी २०१६ मध्ये जकार्तात भरलेल्या सातव्या ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ फिजिक्स कॉम्पिटिशन’ अधिवेशनात आमंत्रित केलं गेलं आणि त्याच वेळेस त्यांचं सभासदत्व बहाल करण्यात आलं’. हे दोघंच या संस्थेचे भारतातले सभासद आहेत. या उपकरणाला ‘इंडियन फिजिक्स टीचर्स असोसिएशन’तर्फे  पुरस्कार मिळाला आहे. या उपकरणाच्या पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला आहे. दरम्यान भुवनेश्वरला २०१६ मध्ये अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड झालं होतं. त्यासाठी विक्रांतने परीक्षक आणि ग्रेडर म्हणून काम पाहिलं.

सध्या तो पवई आयआयटीमध्ये असलेल्या भारत सरकारच्या प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि अनुसंधान संस्था अर्थात ‘सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च’ (समीर) या संस्थेमध्ये गेली अडीच वर्ष ‘वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स’ विभागात संशोधक वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. या विभागात विविध सॉफ्टवेअर वापरून रेषीय प्रवेगक (linear accelerator – लिनॅक) विकसित करण्यासाठी लागणारी संगणकीय आकडेमोड आणि प्रवेगाची चाचणी करणं हे त्याचं काम आहे. या विभागात मुख्यत्वे कर्करोगावर उपचार करणाऱ्या आणि रेडिएशन उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या रेषीय प्रवेगकावर संशोधन केलं जातं. या रेडिएशन थेरपीमध्ये रेषीय प्रवेगाद्वारे इलेक्ट्रॉनचा वेग आणि ऊर्जा वाढवून त्यांचा तांब्यापासून बनलेल्या पडद्यावर मारा करून क्ष किरणांची निर्मिती केली जाते. हे किरण कर्करोगग्रस्त भागावर पाडून तेथील कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. के वळ संशोधनच नव्हे तर लिनॅकची निर्मितीही इथेच केली जाते.

‘समीर’ या देशातील एकमेव संस्थेत वैद्यकीय अनुप्रयोगांसाठी लिनॅक हे उपकरण (मशीन) विकसित केले आहे. या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या संशोधनामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणांपेक्षा समीरची उपकरणं साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी स्वस्त आहेत. ही उपकरणं जागतिक आरोग्य संस्था (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) आणि परमाणू ऊर्जा नियामक परिषद ( अ‍ॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड) या संस्थांच्या मानवी आरोग्याच्या सुरक्षाविषयक अटींची पूर्तता करतात. आतापर्यंत ४ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ते ६ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जाक्षमता असलेले लिनॅक भारतातील इस्पितळांमध्ये यशस्वीरीत्या स्थापित केले असून त्यांचा रुग्णांना खूप फायदा होतो आहे. याव्यतिरिक्त सध्या कर्करोग उपचारासाठी १५ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी उच्च ऊर्जाक्षमता असलेले लिनॅक अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. त्यामुळे कर्करोगावर आणखी उत्कृष्टरत्ीया उपचार करता येऊ  शकतील आणि भविष्यात कर्करोगावरील उपचारांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकेल.

विक्रांतच्या मते, संशोधनाच्या क्षेत्रात येण्यासाठी संशोधन वृत्तीखेरीज प्रचंड सबुरी अंगी बाणवावी लागते. कदाचित पहिल्या फटक्यात आपल्याला निष्कर्षांपर्यंत पोहोचता येईलच असं नाही. तरीही खचून न जाता संशोधनात सातत्य ठेवावंच लागतं. कठोर मेहनतीची तयारी ठेवावी लागते. किमान चौकस बुद्धी आणि चांगली निरीक्षणशक्ती असली तर समोर उभे ठाकलेले प्रश्न पटापट सुटण्यास मदत होते. आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करायची क्षमता असणं किंवा ती विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं चांगलं, असं तो सांगतो. संशोधनाच्या विषयासंबंधी अधिकाधिक वाचन करायला हवं. वाचनाचा कंटाळा असेल तर यूटय़ूबवरचे तुमच्या अभ्यासाला पूरक ठरणारे व्हिडीओ बघावेत. कोणत्याही संशोधनात निष्कर्ष शोधायचे असतात, त्यासाठी विषयाचा अभ्यास करून विविध दिशांनी प्रयत्न करून मग निष्कर्षांपर्यंत पोहोचायचं असतं. हे सारं करताना पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यासाची बैठक पक्की असेल तर प्रयोग करण्यातला वेळ निश्चितच वाचू शकेल. लोकोपयोगी संशोधन हे लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असल्याने अधिकाधिक लक्ष संशोधनावर केंद्रित करायला हवं, असं तो म्हणतो.

‘आपल्या ध्येयनिश्चितीच्या वाटा कोणत्या हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. पॅशन म्हणून संशोधन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपापल्या संशोधन विषयांच्या अभ्यासात ते खूश असतात. त्यात त्यांना समाधान मिळतं. परदेशात शिक्षण घेऊन भारतात परतणं आणि त्या ज्ञानाचा फायदा देश, समाजोपयोगी संशोधनासाठी होणं हे खूप गरजेचं आहे. केवळ भरमसाट पैसे खर्च करूनच संशोधन करावं किंवा करता येतं असं अजिबात नाही’, हेही विक्रांत स्पष्ट करतो. बोलता बोलता तो एक आठवण सांगतो की, ‘महाविद्यालयात असताना ताऱ्याचा जन्म कसा होतो, या विषयावर प्रात्यक्षिक द्यायचं होतं. तेव्हा तो आणि मित्रांनी मिळून अवघ्या पन्नास रुपयांत तयार केलेल्या त्या प्रात्यक्षिकाला ऊअश् पब्लिक स्कूलकडून प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि २०१०साठी ‘विज्ञान श्री’ हा पुरस्कार देण्यात आला होता’. विद्यार्थ्यांच्या चांगल्या करिअर घडणीसाठी त्यांना जाणकारांकडून मार्गदर्शन कसं लाभेल, यावर विक्रांत काम करतो आहे. बदलापूरमधील ‘काका गोळे फाउंडेशन’ या एनजीओतर्फे पारधी तसंच गरजू विद्यार्थ्यांच्या शाळेत विज्ञान विषय शिकवतो. विज्ञान-शिक्षण क्षेत्रात स्वत:ला आणखी झोकू न देऊ न काम करण्याची त्याची इच्छा असून पीएचडी करण्याचा त्याचा मानस आहे. त्याची ध्येयं साध्य होवोत, या शुभेच्छा.

viva@expressindia.com