12 July 2020

News Flash

माध्यमी : माध्यमातली नवी वाट

वेब शोजची स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर अशा अनेक भूमिका निभावणारी ‘नवमाध्यमी’ म्हणजे पॉला मॅकग्लिन.                 

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

वेब कंन्टेन्ट तयार करण्यात आणि त्याला प्रेक्षक म्हणून प्रतिसाद देण्यात तरुणाई सुरुवातीपासून आघाडीवर राहिली आहे. इंग्रजी ते हिंदी ते मराठी असा प्रवास केलेलं हे माध्यम मराठीत पॉप्युलर केलं ते ‘भाडिपा’ अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या यूटय़ूब चॅनेलने.. या वेब शोजची स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर अशा अनेक भूमिका निभावणारी ‘नवमाध्यमी’ म्हणजे पॉला मॅकग्लिन.

बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे असं म्हणतात. मग तो बदल शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत कोणत्याही क्षेत्रातला असतो. कधीकाळी हाती वर्तमानपत्र असणाऱ्या माणसाच्या हातात आता सतत स्मार्टफोन दिसतो. पूर्वी वर्तमानपत्रातून जे मिळत असे ते आता फोनमधून मिळवण्याचा प्रयत्न माणूस करतो. तसंच कोणे एके काळी एका ठरावीक वेळेला दूरदर्शनवर लागणाऱ्या बातम्या बघण्यासाठी चाललेली धडपड लुप्त होऊन आता हातातल्या फोनमध्येच मनोरंजनाची सगळी साधनं अगदी सहज मिळू लागली. या बदलत्या माध्यमांना तरुणाईने सहज आपलंसं केलं. वेब कंन्टेन्ट तयार करण्यात आणि त्याला प्रेक्षक म्हणून प्रतिसाद देण्यात तरुणाई सुरुवातीपासून आघाडीवर राहिली आहे. इंग्रजी ते हिंदी ते मराठी असा प्रवास केलेलं हे माध्यम मराठीत पॉप्युलर केलं ते ‘भाडिपा’ अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या यूटय़ूब चॅनेलने.. या वेब शोजची स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर अशा अनेक भूमिका निभावणारी ‘नवमाध्यमी’ म्हणजे पॉला मॅकग्लिन.

भाडिपाची सुरुवात करणाऱ्या थिंक टँकमधली एक असलेली पॉला. मराठी भाषेची आणि मराठी माणसाची नस तिने अचूक ओळखली आहे. फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेऊनही चित्रपटांकडे न वळता तिने या तरुण माध्यमाला आपलंसं केलं आहे. ती म्हणते, ‘स्वत:ला उत्तमरीत्या व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून मी फिल्म स्कूलकडे वळले होते. केवळ चित्रपटच करायचे आहेत असा माझा उद्देश कधीच नव्हता. मी मीडियाकडे वळले कारण मला तो टिपिकल ९ ते ५ वाला जॉब करायचा नव्हता. आठवडाभर काम करा आणि वीकएंडला मजा करा, यापेक्षा मला सगळेच दिवस मजा करण्यात घालवायचे होते. त्यामुळे मला जे आवडतं त्यालाच कामामध्ये कसं आणता येईल ते मला बघायचं होतं. वेब कंन्टेन्ट करताना मला कोणताही विषय निवडण्याचं जे स्वातंत्र्य मिळतं ते खूप छान असतं’. या माध्यमाबद्दल आणखी विस्ताराने सांगताना ती म्हणते, मला एखादी गोष्ट आवडली, त्यावर काही करावंसं वाटलं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल बोलावंसं वाटलं तर माझ्याकडे असलेलं माध्यम मला रोखत नाही, तर उलट प्रोत्साहन देतं. मी फिल्म स्कूलला गेलेले ती मला जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळावी म्हणून! माझे विचार, मला आवडलेल्या गोष्टी व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून मी चित्रपटाकडे बघत होते. चित्रपट हे काही माझं प्रमुख उद्दिष्ट नसल्याने मला वेब कंन्टेन्टच्या क्षेत्रात कधीच असं वाटलं नाही की मी काहीतरी लहान करतेय किंवा मी फिल्म्स करायला हव्या होत्या’. पॉला तिने निवडलेल्या क्षेत्राबद्दल उत्साही आणि आनंदी आहे आणि ती करत असलेल्या कामाबद्दल तिला समाधानही आहे.

काही धारणा आणि समज हे कोणत्याही भाषा, प्रांत, देश या सगळ्याच्या पलीकडे ‘युनिव्हर्सल’ असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती. कधी पुरुषांकडूनच त्या संस्कृतीची जाणीव करून दिली जाते तर कधी इतरांकडून स्त्रीच्या क्षमतांवर शंका घेतली जाते. भाडिपाची सुरुवात झाली त्या वेळी अनेकदा पॉलानेही हा अनुभव घेतला. ‘आमच्या टीममध्ये मी, अनुषा आणि सारंग असे तिघेच सुरुवातीला होतो. त्या वेळी एखाद्या कामासाठी भेटायला गेल्यावर असे अनुभव काही वेळा आले आहेत,’ असे ती सांगते. ‘एखाद्या माणसाकडे काही बिझनेसच्या गोष्टी बोलायच्या असल्या की आपसूकच समोरचा माणूस सारंगशी बोलायला लागतो, असं काही वेळा झालेलं आहे. डिसिजन मेकिंगमध्ये मी आणि अनुषा असणारच नाही या पूर्वग्रहासहित माणसं आमच्याशी काही वेळा बोलत असत. जेव्हा मी एखाद्याला त्याची जाणीव करून दिली त्यानंतर त्यांनी त्यांची चूक मान्य करण्याऐवजी आमच्यासोबत काम न करणं पसंत केलं. अशा विचारसरणीच्या लोकांसोबत काम करण्यापेक्षा त्यांनीच आमच्यासोबत काम करणं नाकारलं हे नक्कीच जास्त चांगलं झालं’, असं पॉला ठामपणे सांगते.

कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होण्यासाठी क्रिएटिव्ह मीडिया हे उत्तम माध्यम असतं. सर्व आवडीनिवडी, सर्व मतं, निरीक्षणं अशा एक ना अनेक गोष्टींचा त्यात समावेश करून घेता येऊ शकतो. पॉला म्हणते, ‘मला स्वत:ला फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज इंडस्ट्रीबद्दल प्रचंड कुतूहल आहे. प्रत्येक ठिकाणचे स्वत:चे काही वैशिष्टय़पूर्ण पदार्थ असतात, ड्रिंक्स असतात, काही प्रकारचे स्पाइसेस असतात जे फक्त तिथेच बनतात. अशा प्रकारच्या गोष्टी समजून घेण्यात, करून बघण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. मात्र ही माझी वैयक्तिक आवड आम्ही काही व्हिडीओजच्या सिरीजमध्ये कन्व्हर्ट केली आहे. हीच या क्षेत्राची खरी ब्युटी आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही दाखवू शकता, ज्याबद्दल तुम्हाला रस वाटेल ते एक्सप्लोर करू शकता आणि त्याला तुमच्या हातात असलेल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवू शकता’. पॉलाला केवळ व्हिडीओ करणं किंवा सिरीज करणं आवडतं असं नाही, तर तिला फिरण्याचीही आवड आहे. ‘चोवीस तास तुमच्या डोक्यावर काम असलं की तुम्ही स्वत:कडे, स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देणं विसरून जाता. माझंही तसंच झालं आहे. त्यामुळे सध्या तरी मी ऑफिसला जाताना सायकल वापरायला सुरुवात केली आहे’, असे ती म्हणते.

पॉलाची वर्क – लाइफ – बॅलन्सची संकल्पना अगदी स्पष्ट आहे. तिच्या मते प्रत्येकासाठीच हा बॅलन्स अवघड असतो. मात्र आपल्या आवडीचं काम करत असलो तर तो बॅलन्स सांभाळताना मानसिक ओढाताण होत नाही. ‘जेव्हा थोडासा मोकळा आणि निवांत वेळ मिळेल तेव्हा स्वत:शी संवाद साधावा आणि स्वत:ला विचारावं की जे मी करतेय त्यात मला समाधान मिळतंय का,’ असं पॉला म्हणते. या संवादाने आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मकतेने क्रिएटिव्हिटीला चालना मिळते असं तिचं मत आहे.

अनेकदा आपण इतरांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे धावत असतो आणि आपल्या इच्छांकडे दुर्लक्ष करत असतो. जेव्हा हे टीममध्ये घडतं तेव्हा तुम्हाला तुमची स्वत:ची जागा भक्कम करावी लागते, त्यासाठी काही वेळा स्वत:ला सिद्धही करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे, मला कधीच असं वाटलं नाही की मी वीकएन्डला आनंदाने काम करेन. मात्र आता मला त्यात मजा येतेय. तरीही मी याचं भान ठेवलं पाहिजे की मी माझ्या पॅशनसाठी काम करतेय आणि तो केवळ एक जॉब नाही आहे.

-पॉला मॅकग्लिन

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:08 am

Web Title: article on script writer director paula mcglynn abn 97
Next Stories
1 ‘मी’लेनिअल उवाच : लव इज लव भाग २
2 बुकटेल : द क्रिष्णा की
3 डाएट डायरी : चला, इम्युनिटी वाढवू या..
Just Now!
X