विशाखा कुलकर्णी

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी शोधताना एका जागेसाठी हजारो अर्ज येतात, अनेक स्पर्धा परीक्षांच्या कट—ऑफ गुणांनी  तर नव्वदीचा आकडा केव्हाच ओलांडला आहे. बारावीमध्ये बोर्ड— सीईटी अशा परीक्षांचा मेहनतीने केलेला अभ्यास आणि पुढे स्पर्धेत टिकून राहायचे म्हणून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी जीव तोडून केलेला अभ्यास या गोष्टींमुळे परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळतातही, पण नोकरी मिळवताना अनेक विद्यार्थ्यांंना उत्तम गुणांसह सारखीच पदवी असल्याचं दिसतं. एकीकडे अनेक पदवीधर – उच्चशिक्षित विद्यार्थी योग्य नोकरीच्या शोधार्थ कष्ट घेताना दिसतात, तर दुसरीकडे अनेकदा उच्चशिक्षित नसलेले, परंतु आयटीआय किंवा अशा प्रकारचे कौशल्य विकास होणारे कोर्सेस केलेले तरुण—तरुणी आपल्या कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर यशस्वी झालेले दिसतात.  असे उमेदवार वेगळे ठरतात, ते त्यांच्या ‘स्किल्स’ किंवा कौशल्यामुळे. या कौशल्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाभिमुख म्हणता येतील अशी कौशल्ये दोन प्रकारची.. सॉफ्ट स्किल किंवा व्यवहार कौशल्य आणि टेक्निकल स्किल्स म्हणजे तांत्रिक कौशल्ये.

यापैकी सॉफ्ट स्किल्स ही प्रत्येक क्षेत्रात गरजेची असतात. यामध्ये फार साध्या आणि सोप्या गोष्टींचा समावेश होतो, उदाहरणार्थ प्रभावीपणे संवाद साधणे, प्रेझेन्टेशन, इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, विश्वासार्हता, एखादी समस्या सोडवण्याची पद्धत, दबावाखाली किं वा वेळेच्या मर्यादांमध्ये काम करण्याची क्षमता अशा काही अत्यंत महत्वाच्या कौशल्यांचा समावेश होतो. ही कौशल्ये काही फार वेगळी किंवा आत्मसात करण्यासाठी अवघड नाहीत, परंतु शिक्षण झाल्यावर या कौशल्यांमुळे आपल्याला नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरी मिळाल्यावर आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आपण इतरांपेक्षा निश्चितच एक पाऊल पुढे असतो.  अनेकदा आपण बघतो की एखाद्या संस्थेत सारख्या पदावर, सारखे शिक्षण असलेल्या व्यक्ती काम करतात. काही वर्षांंनी त्यातली एक व्यक्ती आपल्या क्षेत्रात खूप पुढे निघून गेलेली असते, तर दुसरी व्यक्ती तिथे नोकरी लागल्यानंतर फारशी प्रगती करत नाही. इथे महत्त्वाची कौशल्ये ‘करिअर ग्रोथ’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कौशल्य विकासाच्या बाबतीत बोलताना कौशल्य विकास प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पुण्यातील ‘कम्युनिकेयर ट्रेनिंग सोल्युशन्स’ संस्थेचे  प्रा. कुशल राऊत सांगतात,‘एखाद्या मुलाखतीला गेल्यावर तुमच्या पदवीपेक्षा तुमचे स्किल्स पाहिले जातात.  मुलाखतीमध्ये अगदी महत्वाचे कौशल्य म्हणजे प्रभावी संवाद, सकारात्मक दृष्टिकोन, स्वयंशिस्त अशा गोष्टीही जोखल्या जातात. या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, ही कौशल्ये तुमच्याकडे असतील तर तुमच्या करिअरची ग्रोथ होते’.

आता ही कौशल्ये आत्मसात करायची असतील तर इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहेत. तसेच याबद्दल सखोल मार्गदर्शन करणाऱ्या अनेक कार्यशाळा उपलब्ध आहेत, परंतु या कार्यशाळा आपल्याला फक्त ही कौशल्ये मिळवण्यासाठी मदत करू शकतात. हे करण्यासाठीचे प्रयत्न आणि त्यासाठी लागणारी प्रेरणा, स्वयंशिस्त ही आपल्याला जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागते. ही कौशल्ये आत्मसात करणे ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. पदवी मिळाल्यानंतर नोकरी शोधताना ही कौशल्ये आवश्यक आहेत अशी जाणीव अनेक तरुणांना होते, परंतु आधीपासूनच अशी कौशल्ये आत्मसात करणे, शिकणे गरजेचे आहे, यासाठी लागणारी स्वयंप्रेरणा असलीच पाहिजे. त्यानंतरच ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठीच्या कार्यशाळा ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी उपयुक्त ठरतील. ही व्यवहार कौशल्ये कोणती असावीत, हे व्यक्तिपरत्वे बदलते. याचे उदाहरण देताना महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अनेकदा इंग्रजी बोलण्याविषयी न्यूनगंड दिसून येतो, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि संवाद प्रभावीपणे साधता येत नाही. इथे भाषेवर प्रभुत्व, आत्मविश्वास आणि प्रभावी संवाद अशी तिन्ही कौशल्ये एकमेकांशी निगडित आहेत. अशावेळी तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवे की इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ज्याचा वापर संवाद साधताना होईल. त्यात अवघड असे काहीही नाही. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि संवाद प्रभावीपणे होईल, अशा प्रकारे एक कौशल्य दुसऱ्याशी निगडित असते, असे राऊत सांगतात. ही कौशल्ये विकसित करणे आणि ‘अपडेट’ करत राहणे ही अगदी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.

व्यवहार कौशल्याच्या बरोबरच नोकरी किंवा व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेची असतात ती तांत्रिक कौशल्ये. म्हणजे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात पदवीबरोबरच आवश्यक अशी जी कौशल्ये लागतात ती म्हणजे तांत्रिक कौशल्ये. प्रत्येक पदवी—पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्या पदवीनंतर आवश्यक असणाऱ्या गोष्टी अंतर्भूत असतातच. पण नोकरी मिळवताना ही पदवी तर सगळ्यांकडेच असते. मग नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्या क्षेत्रातली कौशल्ये आत्मसात केल्यास आपण सहजपणे यशस्वी होऊ शकतो.  अशा प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी शिक्षण घेत असताना पदवीच्या पहिल्या वर्षांपासूनच महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होता येईल. यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्या विषयात आपला कल आहे, याची कल्पना आपल्याला येऊ शकेल, पुढे पदव्युत्तर शिक्षण घेताना आपल्याला हव्या त्या क्षेत्रातील विविध लहान लहान कोर्स, वर्कशॉप, इंटर्नशिप या माध्यमातून आपण आपले स्किल्स डेव्हलप करू शकतो.  याविषयी बोलताना मुलुंड येथील वझे महाविद्यालयाच्या, जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली कारखानीस सांगतात,‘महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पुढील करिअरसाठी आवश्यक असणारी कौशल्ये अभ्यासक्रमात यावीत यासाठी अभ्यासक्रम वेळोवेळी सुधारित होत असतोच, पण आपल्याला गरजेची असणारी कौशल्ये यावीत यासाठी विद्यार्थ्यांंनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्राशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पदवी मिळाल्यानंतर इंटर्नशिप, वर्कशॉप या माध्यमातून प्रत्यक्ष कामाशी ओळख करून घेता येईल’.

अशाच प्रकारचा अनुभव कुठलाही व्यवसाय करतानाही गरजेचा असतो. ग्रामीण भागामध्ये डेअरी, पोल्ट्री इत्यादी गोष्टींचे व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारे डॉ. बापू भोगटे सांगतात, ‘आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल, तर त्याच्या कागदोपत्री प्लॅनबरोबरच प्रत्यक्ष काम करताना त्यातले बारकावे समजून घेतल्याशिवाय एखादा व्यवसाय यशस्वी होत नाही. कुठलाही अनुभव नसताना फक्त एखाद्या कार्यशाळेच्या जोरावर सरळ व्यवसाय करणे चुकीचे आहे. ग्रामीण भागातील युवक उत्साहाने पोल्ट्री, डेअरी, फार्मिग या गोष्टींचे प्रशिक्षण घेतात, त्यांची कष्ट करण्याची तयारीही दिसते, पण यासोबत त्या व्यवसायासाठी आवश्यक अशी मूलभूत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी किमान तीन ते सहा महिने एखाद्या फार्मवर प्रत्यक्ष काम करून अनुभव घेणे गरजेचे आहे’. यातून नवीन व्यावसायिकांना कार्यशाळेत शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्याविषयी अनुभव घेता येईल.

नोकरी शोधायला लागल्यावर कौशल्य विकास करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणल्यासारखे होईल. विद्यार्थीदशेत परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनत घेऊन अभ्यास करतात, त्याचवेळी अशा छोटय़ा छोटय़ा परंतु महत्त्वपूर्ण कौशल्यांची जोड देण्याचा प्रयत्न आपण शिक्षण सुरू असतानाच केला तर नोकरी शोधताना आपण इतरांपेक्षा नक्कीच सरस ठरू.

viva@expressindia.com