आसिफ बागवान

हेडफोनचा वापर किती, कसा करावा, यासाठी काही एक मर्यादा असणे आवश्यक आहे. अर्थात ही मर्यादा स्वत:ची स्वत: घालून घेणे उत्तम.

तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य यांची परस्पर गुंतवणूक इतकी वाढली आहे की, एकाचा विषय काढल्यास दुसऱ्याबद्दल बोलणे ओघाने येतेच. उदाहरणार्थ आपण स्मार्टफोनच्या अतिवापराबद्दल बोलतो तेव्हा त्याचे शारीरिक, मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम सांगावेच लागतात किंवा जेव्हा आपण एखाद्या फिटनेस गॅजेटबद्दल माहिती देतो, तेव्हा शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने ते किती हितकारक याची चर्चा करावीच लागते. एकूणच मानवी जीवनाशी तंत्रज्ञान इतके समरस झाले आहे की, त्याला वेगळे करणे अशक्य आहे. आरोग्याचेही तसेच आहे. आज ज्या विषयावर येथे भाष्य करतो आहे, तो विषय म्हणजे, हेडफोनचा कानाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. तसं पहायला गेलं तर हा विषय आरोग्याशी संबंधित आहे. मात्र, त्याच्या मुळाशी हेडफोन हे तंत्रज्ञान असल्याने या सदरात त्यावरील चर्चा आवश्यक ठरते.

लोकलमधून प्रवास करताना, सार्वजनिक ठिकाणी फिरताना किंवा अगदी रस्त्यावरून चालताना आपल्याला हेडफोन कानाला लावलेले अनेक जण दिसतात. यापैकी एखाद्याच्या जवळून जाणाऱ्या व्यक्तीलाही हेडफोनवर वाजत असलेले संगीत ऐकू येते. इतक्या मोठय़ा आवाजात हेडफोनवर संगीत वाजवले जात असते. साहजिकच याचा कर्णेद्रियांवर ताण येतो. हा ताण इतका आहे की, तरुण पिढीमध्ये बहिरेपणा वाढत असल्याचे वैद्यकीय संशोधनातून उघड झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका निरीक्षणानुसार, हेडफोनसारखी उपकरणे वापरण्यामुळे जगभरातील एक अब्ज तरुणांना बहिरेपणाच्या तक्रारी उद्भवण्याचा धोका आहे. याच संघटनेच्या आणखी एका अहवालानुसार, जगभरातील २० टक्के किशोरवयीनांमध्ये श्रवणदोषाची लक्षणे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, ९०च्या दशकाच्या तुलनेत श्रवणदोषाच्या तरुण रुग्णांच्या संख्येत जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

साहजिकच ही वाढ तंत्रज्ञानातील विशिष्ट उपकरणाकडे बोट दाखवते. ते म्हणजे हेडफोन. मोबाइल आणि स्मार्टफोनचा उदय होण्यापूर्वी वॉकमन, एमपीथ्री प्लेअर यांच्या माध्यमातून वैयक्तिक संगीत श्रवणानंद घेतला जात होता. हेडफोनमध्ये उपलब्ध झालेले प्रकार आणि ध्वनीचा उत्तमोत्तम दर्जा हे यामागील एक कारण आहेच; पण त्याचबरोबर स्मार्टफोनमुळे त्याच्या उपयोगाच्या मर्यादा आणखी विस्तारल्या. त्यामुळेच २०१२पासून हेडफोनच्या विक्रीत सातत्याने वाढ होते आहे.  २०१२ या एका वर्षांत हेडफोनच्या विक्रीत ३२ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ मध्ये हेडफोन उद्योगातील उत्पन्नाचा आकडा जवळपास चार अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हेडफोनच्या विक्रीचे हे आकडे केवळ त्या उद्योगाबद्दलच सांगत नाहीत तर, त्यातून हेडफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचेही दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने तरुणांतील बहिरेपणाबद्दल मांडलेले निरीक्षण हे या आकडेवारीशी सुसंगत आहे.

हेडफोनचा वापर किती करावा, कसा करावा याचे काही ठरावीक नियम नाहीत. मात्र, त्यावर स्वनियंत्रण असणे आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ८५ डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा आवाज आठ तासांहून अधिक वेळ सलग ऐकणे बहिरेपणाला निमंत्रण देऊ शकते. अनेक जण दिवसभरात यापेक्षा अधिक वेळ हेडफोन कानाला लावून बसलेले असतात. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये जवळपास १२० डेसिबलपेक्षा अधिक आवाज फेकण्याची क्षमता असते. त्यामुळे आवाजाची पातळी उच्चतम असते, तेव्हा सहाजिकच त्याचा कानांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अर्थात, हे सगळं लगेच घडत नाही. मोठय़ा आवाज पातळीवर संगीत ऐकल्यामुळे कमी पातळीवरील आवाज ऐकू येणे कठीण होत जाते. खरं तर ही प्रक्रिया वयोपरत्वे घडतच असते. मात्र, हेडफोनच्या अतिवापरामुळे तरुण वयातच ही समस्या अधिक उद्भवू लागली आहे.

याचा अर्थ हेडफोनचा वापर करूच नये, असा नव्हे. संगीत ऐकणे ही प्रक्रिया केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे त्यात वावगे काही नाही. मात्र, हे करताना काही गोष्टी नक्कीच पाळल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोठय़ा आवाजात संगीत ऐकण्याची सवय सोडली पाहिजे. सतत संगीत ऐकण्याऐवजी त्यात काही काळ कानाला विश्रांती दिली गेली पाहिजे. याखेरीज अन्य काही पथ्ये पाळून आपण कानांवरील हेडफोनचा अतिताण कमी करू शकतो. ध्वनीचा हा मारा कमी करण्यासाठी सध्या ‘नॉइज कॅन्सलिंग हेडफोन’ हा एक चांगला पर्याय आहे. हे हेडफोन आतून फेकल्या जाणाऱ्या आवाजाचा प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या अवतीभवतीचा आवाज कमी करण्यास मदत करतात. अशा प्रकारच्या हेडफोनमध्ये विशिष्ट डिजिटल प्रोसेसर बसवलेले असतात. हे प्रोसेसर बाहेरील किंवा अनावश्यक ध्वनीलहरी प्रतिध्वनी लहरींचा मारा करून रोखतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किंवा गोंगाट सुरू असतानाही तुम्ही हेडफोनचा आवाज मोठा न करता या हेडफोनवर संगीत ऐकू शकता. अर्थात असे असले तरी, या हेडफोनची आरोग्यविषयक उपयुक्तता अद्याप सिद्ध व्हायची आहे.

हेडफोनवर संगीत ऐकण्याचा अतिसोस जर कर्णबधिर करणार असेल तर तो वाईटच. अशा वेळी या वापरावर नियंत्रण आणणे, हे सर्वात महत्त्वाचे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हेडफोनमध्ये नवनवीन बदल नक्कीच पाहायला, अनुभवायला मिळतील. पण त्यासाठी सावध ऐकणे गरजेचे आहे.

viva@expressindia.com