झटपट वजन कमी करणं किंवा वाढवणं यासाठी डाएट करण्याचं फॅड वाढलं आहे. पण अशा इन्स्टंट रिझल्टच्या नादात फॅड डाएट केलं तर दुष्परिणामच जास्त उद्भवण्याचा धोका असतो.

7आकांक्षाचं अचानकपणे कमी झालेलं वजन तिच्या मैत्रिणींसाठी चर्चेचा विषय झाला होता, याचं रहस्य विचारलं तेव्हा तिने ‘लिक्विड डाएट’ हे त्या मागचं कारण असल्याचं सांगितलं. तिच्याकडून मग हे डाएट काय असतं, हे जाणून घेऊन इतर दोघींनी ते करून पाहिलं. पण त्याचा काही म्हणावा तसा फायदा  झाला नाही. उलट त्यांच्यापैकी एक जण पुरती अशक्त झाली. अशा फॅड डाएटचा फंडा सर्वाना लागू पडतो असं नाही.
झिरो फिगर, वेटलॉस हे शब्द आता नेहमीच कानावर येत असतात. सडपातळ, सुडौल दिसणं कुणाला आवडणार नाही? त्यासाठी मग निरनिराळे प्रयत्न केले जातात. पण ऋजुता दिवेकर म्हणतात त्याप्रमाणे आपल्या सौंदर्याच्या व्याख्येचंच पुनरावलोकन करावं लागणार आहे. सडपातळ म्हणजे सुंदर नव्हे. सौंदर्य हे फिटनेसशी संबंधित असलं पाहिजे. व्यायाम आणि डाएट तर फिटनेससाठी योग्य प्रमाणात आणि योग्य ते हवंच.
वेट लॉस किंवा वेट गेनचे झटपट रिझल्ट यावेत यासाठी काही जण फॅड डाएटच्या नादी लागतात. काही जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यात अमुक दिवसात तमुक किलो वजन कमी करा वगैरे प्रलोभनं दाखवली जातात. काही जणांना अशा डाएटचे रिझल्ट दिसतातही. पण त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम होत असतात. वेट लॉससाठी फॅड डाएट केव्हा केलं जातं.. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासारख्या सोहळ्यासाठी एखादी मुलगी बारीक व्हायचं ठरवते आणि मग दोन महिन्यांत तसं व्हायचं चंग बांधते. पण हे इन्स्टंट उपाय अंगाशी येऊ शकतात. कुठल्या एका कार्यक्रमासाठी बारीक व्हायचंय की, ओव्हरऑल फिटनेससाठी याचा विचार आधी केला पाहिजे. फॅड डाएटचा उगम या अशा इन्स्टंट उपायांतून झाला.
फॅड डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी ठरवून कमी खाल्लं जातं. त्यामध्ये लिक्विड डाएट, फ्रूट डाएट, प्रोटिन डाएट वगैरे प्रकार आहेत. काही फॅड डाएट तर चक्क उपासमार करायला सांगतात. फक्त फळे किंवा फक्त ज्यूसवर राहणं कधीच शरीरासाठी चांगलं नसतं. एकच पदार्थ खाल्ला जातो ज्याला ‘मोनो डाएट’ असं म्हटलं जातं. कधी केवळ सॅलड्सवर भागवायला सांगितलं जातं. बहुतेकदा अशा फॅड डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ खाणं टाळलं जातं.
एम.एस्सी. क्लिनिकल न्यूट्रिशन अ‍ॅण्ड डायटेटिक्सच्या आहारतज्ज्ञ भक्ती मेहता म्हणाल्या, ‘फॅड डाएटपेक्षा बॅलन्स वेट लॉस केव्हाही चांगला. फॅड डाएट हे सर्वासाठी सारखं असतं. फिटनेस हा प्रकार मात्र व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीच्या दृष्टीने त्याला किंवा तिला सूट होणारे पदार्थ वेगवेगळे असू शकतात. त्याचं प्रमाण वेगळं असतं. हे फॅड डाएटमध्ये फारसं लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक गरजा – ज्यात कॅलरी कंट्रोल करणं, व्यायाम, तसंच सकस आहार या गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत. यामुळे कमी दिवसांत जास्त वजन जरी कमी होत असलं तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.’
फॅड डाएटचे काही दुष्परिणामदेखील समोर आलेले आहेत. हे डाएट काही दिवसांपुरतंच मर्यादित असतं. त्यामुळे जेव्हा पुन्हा आपण नियमित आहार सुरू करतो तेव्हा वजन वाढतं. या प्रकारच्या डाएटमध्ये बॉडी फॅट्स कमी होण्याचं प्रमाण कमी असतं. तसंच चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती यावर परिणाम होतो. काहींना चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा जाणवणे, केस गळती तसेच मूत्रपिंडाचे त्रास उद्भवतात.
स्केच क्लिनिकचे डॉ. रिद्धेश जानी म्हणाले, ‘फॅड डाएट केल्यामुळे अगदी लगेच वजन कमी होतं. मात्र ते काही ठरावीक कालावधीपुरतंच राहतं. त्यामुळे जसे याचे फायदे आहेत तसेच त्याचे दुष्परिणामदेखील समोर येतात. फॅड डाएटपेक्षा सुयोग्य आहार असणं आवश्यक आहे. सडपातळ शरीरापेक्षा सुदृढ शरीर असणं आवश्यक आहे. त्यासाठी समतोल आहाराची गरज असते आणि अशा फॅड डाएटपेक्षा नियमित आहार आणि व्यायामाने वजन कमी करणं कधीही चांगलं हेच खरं!

आयडियल डाएट चार्ट
प्रत्येकाच्या आहाराच्या सवयी, गरजा वेगळ्या असल्याने प्रत्येकासाठी वेगळा डाएट चार्ट लागेल. पण त्यात कोणते पदार्थ असावेत आणि कोणते असू नयेत, हे सांगता येईल. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या, फळं आणि धान्य आहारात असलेच पाहिजेत. शाकाहार-मांसाहार हा त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.
नाश्ता : पोहे, उपमा, इडली, थालीपीठ असा भरपेट असावा. ओट्स, सीरिअल्स, पॅकेज्ड फ्रूट ज्यूस पूर्णपणे टाळावं.
जेवण : जेवणात ज्वारी-बाजरी, तांदूळ, ताज्या भाज्या, तूप, दही/ताक यांचा समावेश आवर्जून करावा.
संध्याकाळचं खाणं : काजू, शेंगदाणे, चुरमुरे आदी पदार्थ
जेवण : पोळी/भाकरी/भात आणि भाजी

पाच सुपर फूड्स
आपल्या प्रांतात पिकणारे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. ते आपल्या शरीराला पूरक असतात आणि योग्य पोषणमूल्य देणारे असतात. बिस्किटं, सीरिअल्स, पिझ्झा, चायनीज, ओट्स हे पाच पदार्थ टाळायला हवेत आणि त्याऐवजी खाली दिलेले पाच पदार्थ आहारात नियमितपणे घ्यायला हवेत. १५ ते ३० वर्षांतल्या तरुणाईनं हे पाच पदा nर्थ खाल्लेच पाहिजेत. हे पदार्थ हाय कॅलरी फूड आहे, कोलेस्ट्रॉल असलेले आहेत वगैरे सगळ्या गैरसमजुती आहेत. नुकत्याच स्वित्र्झलडमधील एका मोठय़ा फूड केटरिंग स्कूल असलेल्या रिसर्च इन्स्टिटय़ूटने फणसावर संशोधन करून फणसापासून बनवणाऱ्या अनेकविध रेसिपी प्रसिद्ध केल्या आहेत. येणाऱ्या काळात फणस हे सुपर फूड ठरणार आहे. हार्मोनल बॅलन्स ठेवण्याबरोबरच फणस फर्टिलिटी बूस्टर ठरणारा पदार्थ आहे.
१. कुळीथ, २. केळं किंवा फणस,
३. भात, ४. काजू, ५. तूप