|| प्रियांका वाघुले

स्वत:ची आवड आणि फिटनेसची सांगड जर आपोआप होत असेल तर त्याच्यापेक्षा वेगळा आंनद काय असणार, असं आश्चर्याने आणि तितक्याच आनंदाने सांगणारी आजची फिट अ‍ॅण्ड फाइन अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. फिटनेस हा केवळ व्यायामातून साधला जात नाही तर आपल्या आवडीच्या कलेतूनही तो सांभाळता येतो असं ती म्हणते. अर्थात, मराठी चित्रपटांतून अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी नृत्यात पारंगत आहे हे तिच्या चाहत्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे नृत्यकला हीच तिच्या फिटनेसचा मंत्र असल्याचं तिने सांगितलं.

अभिनयात चोख असलेली भार्गवी भरतनाटय़म् शिकली आहे म्हणण्यापेक्षाही ती यात निपुण आहे. नृत्य कला ही सर्वार्थाने फिटनेससाठी अतिशय उत्तम आहे असं ती मानते. नृत्यामुळे माणसाच्या शरीरातील वेगवेगळे अवयव कार्यरत होत असतात. लयबद्ध हालचालींमुळे शरीरातील अवयवांच्या हालचालींतही एक ग्रेस येते, असं ती म्हणते.

नृत्य करताना माणसाला करावी लागणारी हालचाल, पदन्यास हा सामान्य किंवा सर्वसाधारण नसतो. तर वेगवेगळ्या प्रकारे शरीराची हालचाल करावी लागते. भरतनाटय़म्, कथ्थक, लावणीसारखे अनेक नृत्य प्रकार असून नर्तन हे कला म्हणून जोपासतानाच आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे भार्गवी म्हणते. नृत्य करताना फक्त शरीराचा फिटनेस राखला जात नाही तर त्यासोबत मनाचाही फिटनेस आपोआप सांभाळला जातो. कारण नृत्य ही कला असल्याने ती करताना मिळणारे समाधान मानसिक आनंद देणारे ठरते. त्यामुळेच शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक ताणतणाव आणि थकवा दूर करणारा फिटनेस प्रकार म्हणून नृत्याकडे पाहिले पाहिजे. त्यावर भर दिला पाहिजे, असं ती आवर्जून सांगते.

फिटनेसचे अनेक प्रकार आज लोकप्रिय आहेत. तिने स्वत: वेगवेगळे प्रकार करून पाहिले आहेत. पिलेट्सचाही अनुभव भार्गवीने घेतला आहे. मात्र फिटनेसचा तिचा फंडा  नृत्यावरच आधारित आहे आणि तोच तिला आनंद देऊन जातो, असं ती म्हणते.

भरतनाटय़म् शिकलेले असतानाही वेळोवेळी वेगवेगळे नृत्यप्रकार करण्याची संधी तिला मिळाली. हे नृत्यप्रकार सादर करण्याची संधी घेतल्यानंतर प्रत्यक्ष नृत्याचा सराव करताना आणि नृत्य करताना जी आव्हाने, अडचणी समोर येत गेली त्यातून एक नर्तक म्हणून खूप शिकायला मिळालं आणि नृत्याशी जोडलं गेलेलं फिटनेसचं तिचं गणित अधिक घट्ट होत गेलं, असंही भार्गवी म्हणते.

viva@expressindia.com