मे महिना संपत आला की वेध लागतात ते शाळेचे, अभ्यासाचे.. नवी पुस्तके, वह्या, अभ्यासक्रम, शिक्षक.. पण तरीही अभ्यास करायचा म्हटला की एक प्रकारचं जडत्व येतं.. खेळणं म्हटलं की जशी सुरसुरी येते तशी अभ्यास करायचा आहे असे म्हटले की नक्कीच होत नाही, कारण बहुधा अभ्यास ही आपल्यासाठी ‘एंजॉय’ करण्याची बाब नसतेच मुळी.. पण हाच अभ्यास मनोरंजक, सोपा आणि उत्साहवर्धक पद्धतीने करता येऊ शकेल का? अमोल कडू यांनी इयत्ता दहावीपासून ते अगदी आयएएससारख्या आव्हानात्मक परीक्षेचा अभ्यास मनोरंजक आणि रम्य कसा करता येईल याचा वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे- ‘अभ्यास करावा नेटका’!
अभ्यासासाठी एकाच जागेवर बसावे का? गाणी-संगीत ऐकत अभ्यास होतो का? सलग किती वेळ अभ्यास करता येऊ शकतो? अभ्यासाचं नियोजन कसं करावं? टाचणं कशी काढावीत? मित्रांसह अभ्यास करता येतो का? अशा आपल्याला आवडणाऱ्या (आणि अर्थातच आपल्या पालकांच्या शंकांचं समाधान करणाऱ्या) अनेक प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या शब्दांत आणि मार्मिक अर्कचित्रांसह या पुस्तकात देण्यात आली आहेत. आपल्या अभ्यासाच्या सवयी या आपण उत्तम निरीक्षण करू शकतो की श्रवण करू शकतो की उत्तम लेखन करू शकतो यावर अवलंबून असतात. अमोल कडू यांनी ही विभागणी स्पष्ट करून पुढे कोणत्या प्रकारासाठी कोणती अभ्यासपद्धती लाभदायक ठरू शकेल याचे विश्लेषण केले आहे. त्यासाठी त्यांनी चक्क १८ प्रश्नांची एक प्रश्नावली दिली आहे.
एकदा पद्धती ठरली की पुढचा टप्पा नियोजनाचा. लेखकाने नियोजनपूर्व, लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे नियोजन असे नियोजनाचे तीन भाग पाडले आहेत आणि त्यादृष्टीने मार्गदर्शन केले आहे. नियोजन साधलं तरी खरं गमक आहे ते त्याच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि अभ्यासाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा घटक म्हणजे एकाग्रता. या पुस्तकातील सर्वात उत्तम भाग कोणता असा प्रश्न विचारला तर नि:संशयपणे भाग तिसरा असे उत्तर द्यावे लागेल. एकाग्रतेवरील भाष्य हे लहानात लहान मुलापासून मोठय़ात मोठय़ा माणसापर्यंत कोणालाही कळू शकेल आणि ‘वळूही’ शकेल इतक्या सोप्या शब्दांत मांडले आहे. तीच बाब अभ्यासासाठी आदर्श वातावरण कोणते, या प्रकरणाचीही. यातही अभ्यास करतेवेळी संगीत ऐकता येते का आणि मला कोणते संगीत आवडते यापेक्षाही अभ्यास करताना संगीत का ऐकायचे, या प्रश्नाचा कडू यांनी उत्तम ऊहापोह केला आहे. किंबहुना या प्रश्नाच्या उत्तरात संगीताचा वेगळाच आयाम पुढे येतो.
सामान्यपणे शालेय स्तरावर आपल्याला टाचणे काढण्याची सवय नसते, पण उत्तरोत्तर जसा आवाका वाढत जातो तशी टाचणे आवश्यक ठरतात. पण ही टाचणे काढायची कशी? त्यासाठी शास्त्रीय पद्धती आहेत का? असल्यास कोणत्या आणि त्यांचा वापर कसा करता येतो? या प्रश्नांची उत्तरे सहाव्या प्रकरणात मिळतात. अभ्यासाची उजळणी आणि अभ्यास लक्षात ठेवण्याच्या प्रभावी पद्धती यांचा समावेश या पुस्तकाची उपयुक्तता वाढवतो.
सध्या स्पर्धा परीक्षांचा जोर आहे. अगदी इयत्ता बारावीपासून ते थेट प्रशासकीय सेवांपर्यंत- अगदी पीएच.डी. प्रवेशापर्यंत स्पर्धा परीक्षा देतच पुढे सरकावे लागते. या परीक्षांचे अविभाज्य अंग म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आणि नकारात्मक गुणपद्धती. याबाबतही अमोल कडू यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. स्पर्धापरीक्षांमधील नेमके आव्हान कोणते आणि या परीक्षा देणे का आवश्यक आहे, याचा सकारात्मक दृष्टिकोन कडू यांनी पुस्तकात छान दिला आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा मग ती विद्यापीठीय असो किंवा स्पर्धा परीक्षेच्या पुढील टप्प्यांवरील असो, दीघरेत्तरी प्रश्न सोडविण्याचेही एक विशष कौशल्य आहे आणि निबंध लेखनाचेही. विशेषत: आजच्या प्रचंड गतीच्या युगात निबंधलेखन आणि स्वत:चे पृथक्करण व्यक्त करणारी दीघरेत्तरे लिहिण्याचा अनेकांना आळस असतो. मात्र ही प्रक्रिया रंजक करता येऊ शकते हे कडू यांचे पुस्तक वाचताना ‘जाणवते’!

पुस्तक – ‘अभ्यास करावा नेटका’
लेखक – अमोल कडू
प्रकाशन – नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे – २००
मूल्य – १८०/-