सेलेब्रिटींच्या नावानं ब्रॅण्डिंग करण्याची पद्धत हॉलीवूडमध्ये नवी नाही.आपल्याकडे मात्र सेलेब्रिटी जाहिरातींमधूनच दिसतात. बिपाशा, सुझॅन आणि मलाईकाच्या नावानं आपल्याकडेही नुकतंच सेलेब्रिटी ब्रॅण्डिंग सुरू झालंय आणि त्यामागची कल्पना आहे, प्रीता सुखटणकर या उद्योजिकेची. ‘द लेबल कॉर्प’ या इ-कॉमर्स ब्रॅण्डमागचा मराठमोळा चेहरा.
आज कपडय़ांपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत काहीही घ्यायचे असेल, तर पहिल्यांदा ऑनलाइन साइट्सवर नजर टाकली जाते. त्यावर डिस्काऊंट, नवीन कलेक्शन्स यांची खातरजमा केल्यानंतर मग खरेदी कुठून करायची याचा निर्णय घेतला जातो. पण बहुतेकदा ऑनलाइन शॉॅपिंगचा मार्ग सोप्पा आणि सुकर म्हणून स्वीकारला जातो. कारण त्यात तुम्हाला चार दुकानांची पायपीट करावी लागत नाही, घासाघीस करण्याचा प्रश्न नसतो, ना घामाच्या धारा ना पावसात भिजणे. मस्त हातात कॉफीचा कप घ्यायचा आणि कॉफीचा आनंद घेत लॅपटॉपवर एका क्लिकच्या साहाय्याने आपल्याला हवे ते मागवायचे. त्यात घरपोच डिलिव्हरी, फिटिंग आणि नाही आवडले तर परत करण्याची सोय पण उपलब्ध असते. त्यामुळे सध्या ऑनलाइन मार्केटिंगचे ‘अच्छे दिन आये है’ असं म्हणायला हरकत नाही.
या ई-कॉमर्सच्या जगात प्रीता सुखटणकर हे एक मराठी नाव सध्या बरंच गाजतंय. २०१३ साली सुरू झालेल्या ‘द लेबल कॉर्प’ ही प्रीताची बॅ्रण्ड आयडिया. या ब्रॅण्डअंतर्गत तिने तीन वेगवेगळी लेबल अर्थात ब्रॅण्ड्स डेव्हलप केले आहेत. त्यातील एक होम डेकॉरचे आहे, दुसरे स्टाइल लेबल, तर तिसरे अ‍ॅक्सेसरीजचे लेबल आहे. या तिन्ही लेबल्सची खासियत म्हणजे प्रत्येक लेबलला प्रीताने एकेका सेलेब्रिटीचा चेहरा दिला आहे. तो ब्रॅण्ड त्या सेलेब्रिटीच्या नावाने ओळखला जातोय. यातील होम डेकॉरवर आधारित ‘द होम लेबल’ला सुझॅन खान रोशनचा चेहरा आहे. सुझॅनची इंटिरिअर पाश्र्वभूमी लक्षात घेऊन होम लेबलसाठी सुझॅन होम डेकॉरचे पर्याय उपलब्ध आहेत. तर स्टाइलवर आधारित ‘कॉर्सेट लेबल’साठी मलाइका अरोरा-खानची निवड करण्यात आली आहे.
 या लेबलमध्ये तुमच्या दैनंदिन वापरापासून ते पार्टीवेअपर्यंत ड्रेसिंगचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.  बिपाशा बासूकडे अ‍ॅक्सेसरीजच्या ‘द ट्रंक लेबल’ची जबाबदारी आहे, ज्यामध्ये बॅग्सपासून ते नेकलेसपर्यंत विविध अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे.
याबद्दल आधिक माहिती देताना प्रीता सांगते, ‘सध्या जमाना ‘टेस्ट मेकर्स’चा आहे. टेस्ट मेकर म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या शॉपिंगमध्ये मार्गदर्शन करू शकेल. कित्येकदा तुम्ही शॉपिंग करीत असताना गोंधळता, नक्की काय खरेदी करावे हे कळत नाही. अशा वेळी टेस्टमेकर तुमच्या मदतीस येतो. यासाठी प्रत्येक ब्रॅण्डला योग्य चेहरा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा मी होम डेकॉरचा विचार केला तेव्हा सुझॅनशिवाय इतर कोणताही चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला नाही. तिच्या इंटिरिअर क्षेत्रातील कौशल्याबद्दल सर्वानाच कल्पना आहे. मलाइका तिच्या इझी आणि कम्फर्टेबल स्टाइलसाठी ओळखली जाते. त्यामुळे स्टाइल लेबलसाठी तिचे नाव समोर आले आणि  अ‍ॅक्सेसरीजचा विचार करता बिपाशापेक्षा उत्तम नाव कोणते असूच शकत नाही. त्यामुळे या तिघींची निवड मी केली आणि त्यांनाही ही संकल्पना आवडली.’
या साइटचे स्वरूप केवळ शॉपिंग साइट न ठेवता त्याला ‘एडिटोरियल ई-कॉमर्स’ साइटचे स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रीताने केला आहे. एडिटोरिअल ई-कॉमर्स साइटचे स्वरूप एखाद्या मॅगझिनसारखे असते. या वेबसाइट्सवर तुम्हाला वेगवेगळ्या ब्लॉग्सच्या माध्यमातून स्टाइलविषयक धडे दिले जातात, तुम्हाला केवळ वस्तू आणि किमती दिसत नाहीत, तर त्यांना स्टाइल करण्याच्या विविध पद्धतींची माहिती पण दिली जाते. ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जातो आणि अशा प्रकारचा प्रयोग करणारी प्रीताची वेबसाइट भारतातील पहिली वेबसाइट असल्याचे तिने सांगितले.
एखादा ब्रॅण्ड सुरू करताना इंटरनेटसारखे आभासी माध्यम निवडण्यामागची तिची भूमिका स्पष्ट करताना प्रीता सांगते, मला ई-शॉपिंगच्या ब्रॅण्डमध्ये वेगळेपणा आणायचा होता. एखाद्या बुटिकला लोकांपर्यंत पोहचण्यात मर्यादा येतात. जागेचा अभाव, मार्केटिंग पॉलिसी यांचा खूप परिणाम पडतो. पण ही बंधने ऑनलाइन मार्केटिंगमध्ये येत नाहीत. दिवसाला १० लाख लोक आमच्या साइटला वेगवेगळ्या कारणासाठी भेट देतात आणि रोज किमान १०० लोक वस्तू विकत घेतात. आमची वेबसाइट लक्झुरिअस गुड्सची असल्याने आम्हाला ग्राहकांची मर्यादा येते, पण दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या वेबसाइट्सवर हीच संख्या दरदिवशी १ लाख आहे. त्यामुळेच ई-मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही सध्या वाढल्याचे आणि पुढील दहा वर्षांत हे क्षेत्र अजून विस्तारेल, अशी आशा प्रीता करते.
 ई-कॉमर्स हे प्रीताचे मूळ स्वप्न नव्हतंच मुळी. प्रीता मुळात फॅशन जर्नालिस्ट होती. ‘एले’ या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये ती स्टाइलिंग आणि फोटोशूटची जबाबदारी सांभाळत होती. त्यानंतर तिने ‘एम टीव्ही’वर ‘मोस्ट फॅशनेबल’सारखे शोजचे केले. काही शोजच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये पण ती सहभागी झाली होती. त्यानंतर तिने तिचा मोर्चा सेलेब्रिटीजच्या पब्लिक रिलेशन्सकडे वळवला. त्यातून तिला सेलेब्रिटीज आणि ते एण्डॉर्स करीत असलेले ब्रॅण्ड्स यांच्यातील व्यवहार जवळून पाहता आले आणि कित्येक सेलेब्रिटींशी घनिष्ठ संबंधही प्रस्थापित झाले. सूझॅन, बिपाशा आणि मलाइका यांच्याशी ओळखही यादरम्यान झाल्याचे प्रीता  सांगते.
सेलेब्रिटीज आणि त्यांची ब्रॅण्ड एण्डॉर्समेंट आपल्यासाठी नवीन नाही. आजच्या घडीला सर्वच आघाडीचे कलाकार कोणत्या ना कोणत्या ब्रॅण्डचा पुरस्कार करताना दिसतात. मग यात आणि लेबल कॉर्पमध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करताना प्रीता म्हणते, ‘जेव्हा शाहरूख खान टीव्हीवर एखाद्या ब्रॅण्डची जाहिरात करीत असतो तेव्हा प्रत्यक्षात तो ब्रॅण्ड वापरत नाही हे आपल्याला ठाऊक असते, पण लेबल कॉर्पमध्ये असे होत नाही. या तिघींनीसुद्धा लेबल कॉर्पच्या सुरुवातीच्या काळापासून ब्रॅण्ड घडवण्यात सहभाग केला आहे. सुझ्ॉन आपल्या प्रत्येक परदेशवारीतून होम डेकॉरच्या नवनवीन कल्पना घेऊन येते. त्या होम लेबलमध्ये राबवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. या ब्रॅण्डची सुरुवात झाली, तेव्हा हृतिकपासून ते करण जोहपर्यंत सर्वानीच ट्विटर अपडेट करून सुझ्ॉन आणि ब्रॅण्डला पाठिंबा जाहीर केला होता. मलाइकाने तर कॉर्सेट लेबलसाठी खास फोटोशूट केले आहे, तर बिपाशा प्रत्येक अ‍ॅक्सेसरीज बनवताना वर्कशॉपमध्ये जाऊन प्रत्यक्ष डिझाइनिंगमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करते. तसेच रोजच्या रोज तिच्या स्टाइलिंग टिप्स ती ट्विटरवर शेअर करीत असते.’
प्रीताने तिच्या डोळ्यांसमोर २४ ते ३५ वयोगटांतील करियरिस्ट मुलींना डोळ्यांसमोर ठेवल्याचे सांगते. तिच्या ब्रॅण्डअंतर्गत मिळणाऱ्या सर्व वस्तू या कस्टम-मेड असतात. त्यामुळे ग्राहकांना एक्स्लुझिव्ह कलेक्शनचा आनंद घेता येतो, असे ती सांगते. याच कारणामुळे फक्त मुंबई, दिल्ली अशा शहरांतूनच नाही तर हैदराबाद, बंगळुरूसारख्या शहरांमधूनही तरुणी वस्तू ऑर्डर करीत असल्याचे ती सांगते. अर्थात इतके सगळे असले तरी मार्केटिंगमध्ये ती काही अंशी कमी असल्याचे मान्य करते. अजूनही ब्रॅण्डिंगमध्ये आम्ही उतरलो नाही. पण ई-मार्केटिंग ही लाँग टर्म गुंतवणूक आहे आणि ही केवळ एक वर्ष जुनी कंपनी आहे, त्यामुळे थोडय़ा सबुरीने काम केल्यास येथे चालू शकते. त्यात जाहिरातीचा खर्च पुष्कळ असतो. माझी साइट लाइफस्टाइलवर आधारित असल्यामुळे या भागात पावले सावधरीतीने टाकावी लागतात. कारण ग्राहकाची संख्या इतरांच्या तुलनेत कमी असते. २०१६ पर्यंत बेबी क्लोदिंग आणि स्टेशनरीच्या क्षेत्रात उतरण्याचा मानसही प्रीताने या वेळी बोलून दाखवला. त्यासाठी सेलेब्रिटीजचा चेहरा शोधण्याची सुरुवातही तिने केली आहे.