दिवंगत चतुरस्र अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या आठवणी जागवणारे हे लेख..
एक त्यांच्या जिवलग मित्राचा आणि दुसरा त्यांच्या गुरुपत्नीचा ..

प्रिय विनय,
जवळच्या सगळ्यांना चकवा देऊन, सर्व जिवलगांना मागे सोडून, सर्वाच्या काळजाला चटका लावून तू एकटाच एका अज्ञात प्रदेशात निघून गेला आहेस. तुझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध अशी ही गोष्ट तू करू कसा शकलास?
‘गॉसिप ग्रुप’मध्ये तू आलास तो केवळ अपघाताने! टिळक मंदिरासमोरच्या रस्त्यावरून जाताना सुनील शेंडे तुला म्हणाला, ‘चल विनय, इथे विजय बोंद्रे राज्य नाटय़स्पर्धेसाठी नाटक बसवतोय. ‘मेन विदाऊट श्ॉडोज.’ तो नटमंडळी शोधतोय.’
तू वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या होत्यास. तेवढय़ा बळावर तू नाटय़वाचनात भाग घेतलास. तुझा खर्जातला दमदार आवाज, शब्दोच्चारण आणि शब्दांची जाण ऐकूनच विजयनं तुला हेन्रीची मध्यवर्ती भूमिका देऊ केली.
ही भूमिका पेलणं येरागबाळ्याचं काम नव्हतं. सात्र्चा अस्तित्ववाद शब्दांमधून, अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणं ही कमालीची अवघड जबाबदारी. पण कुठलाही अनुभव गाठीशी नसताना तू ती सहज सुंदररीत्या पेललीस. आंगिक व वाचिक अभिनयाचा एक उत्कट आविष्कार तू रंगमंचावर सादर केलास. आणि प्रथम पदार्पणातच राज्य नाटय़स्पर्धेत अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवलंस. या स्पर्धेनंतर ‘विनय आपटे’ या नावापुढे ‘उत्कृष्ट अभिनेता’ ही पदवी आपोआपच जोडली गेली आणि तुझ्याभोवती एक वलय निर्माण झालं.
पाहता पाहता तू गॉसिप ग्रुपचा हीरो झालास. आधार बनलास. मुख्य म्हणजे तू विजयचा पट्टशिष्य झालास. आणि मग गुरू-शिष्याच्या या अतुट जोडीमुळे अनेकांना तुझा हेवाही वाटायला लागला. गॉसिप ग्रुपच्या प्रवासात ‘मेन विदाऊट शॅडोज’नंतर ‘ब्रांद’, ‘गुहाघर’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग झाले. सात्र्, इब्सेन, अनरेल्ड वेस्कर अशा अनेक पाश्चिमात्य नाटककारांचं विचारविश्व मराठी रंगभूमीवर अवतरलं. विजयच्या या नित्यनव्या प्रयोगांमध्ये अनेक वेळा तू आणि मी नायक-नायिकेच्या भूमिकांमध्ये रंगमंचावर वावरलो.
रंगभूमीवरच्या नटासाठी सर्वात आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठांतर. याबाबतीत तुझी कामगिरी अगदी पक्की होती. तर माझ्या बाबतीत पाठांतर किंवा स्मरणशक्ती कधी दगा देईल, सांगता येणार नाही. एकदा कधी तरी असंच मी वाक्य विसरले, ब्लँक झाले आणि मग न राहवून तुझ्याकडे आशेनं पाहायला लागले. माझा गोंधळ लोकांना कळू नये म्हणून लोकांकडे पाठ केली. अपेक्षित वाक्य माझ्याकडून न आल्याने तूही गोंधळलास, मग वैतागलास आणि शेवटी माझं वाक्य गाळून टाकून स्वत:चं वाक्य म्हणून मोकळा झालास. नाटकाची अडलेली गाडी पुढे सुरू झाली.
पाठांतराच्या मुद्दय़ावरून आठवली- ‘धमाल’ या हिंदी सिनेमातली तुझी पाठांतराची कमाल! ‘नाव सांगता सांगता गोवा येईल’ असं म्हणून मारुतीच्या शेपटासारखं लांबलचक, न संपणारं नाव सांगणारा तामीळ टॅक्सी ड्रायव्हर तू काय बहारदार रंगवला होतास! पाठांतरात आणि अभिनयात तू बापमाणूस आहेस, हे तू केवळ दोन-तीन मिनिटांत सिद्ध केलंस.
गॉसिप ग्रुप वाढत होता, फुलत होता आणि अचानक ग्रहण लागल्यासारखा तो दुभंगला. अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध केल्यानंतर तुला आता नाटकाचं दिग्दर्शन करून एक पाऊल पुढे जायचं होतं. ग्रुपमध्ये दुमत तयार झालं. विजय, मी आणि काही जणांचं असं मत होतं की, ‘दिग्दर्शकाला आवश्यक असा रंगभूमीचा अभ्यास आणि अनुभव या गोष्टी तुझ्यापाशी कमी आहेत.’ प्रकरण अटीतटीला पोचलं. मतदान झालं. आणि बहुमताने निर्णय घेतला गेला- ‘विनयने नवीन नाटकाचं दिग्दर्शन करू नये.’  ग्रुप फुटला. तुझा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. या काळात आपल्यात वैचारिक दरी तर होतीच; पण कटुता आणि कडवटपणाही आला. आणि असं वाटलं- संबंध संपले. तू नव्या दमानं स्वत:ची शक्ती अजमावून पाहायला सुरुवात केलीस. एकांकिका स्पर्धेत रुईया कॉलेजची एकांकिका दिग्दर्शित केलीस. पहिल्याच वर्षी तुझ्या एकांकिकेनं ‘सवरेत्कृष्ट एकांकिका’ हा मान मिळवला. आणि मग तू दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेनं स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवायचा- हा सिलसिला कित्येक र्वष चालू राहिला.
तू सिद्ध केलंस की, जसा अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला प्रत्येक जण यशस्वी अभिनेता बनत नाही, तसंच केवळ पुस्तकी ज्ञानाने दिग्दर्शक होता येत नाही. आम्ही आमची चूक मनापासून मान्य केली. इतकंच नाही, तर तुझ्या एकांकिका आणि पुढच्या प्रवासातली सर्व नाटकं आवर्जून पाहिली. ‘मित्राची गोष्ट’, ‘अफलातून’, ‘कुसुम मनोहर लेले’.. असं तुझं प्रत्येक नाटक म्हणजे रंगभूमीवरचे नवनवे प्रयोग. हीच तुझी प्रयोगशीलता ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’पासून ‘आभाळमाया’पर्यंत सर्व मालिकांमध्ये प्रकर्षांने जाणवली.  टेलिव्हिजनवरची नोकरी सोडल्यानंतर प्रचंड धडपड करून, ठेचा खाऊन, ताणतणाव सहन करून शेवटी तू यशस्वी निर्माता झालास. पण मिळालेलं यश मिरवीत निवांतपणे जगेल तर तो विनय कसला? तू एकदम ‘शिवाजी’सारखा मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतलास. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू खूप झटलास. तरीही काही तरी गणित चुकलं आणि मालिका मधेच बंद झाली. याचा तुला मानसिक त्रास झालाच; पण फार मोठा आर्थिक फटकाही बसला. तुझं घरदार गहाण पडलं. तुझ्या दरबारातल्या काही मंडळींनी काढता पाय घेतला. पण याच काळात तुला असाही खरा मित्र भेटला, की ज्याने त्याचं राहतं घर गहाण टाकून ते पैसे तुला दिले. वैजयंतीनेही तुला शंभर टक्के साथ दिली. यानंतर लवकरच तू एक शहाणपणाचा निर्णय घेतलास. तुझ्या शब्दात सांगायचं तर ‘निर्मात्याचं दुकान बंद करून मी आता अ‍ॅिक्टगचं दुकान टाकलंय. चांगला धंदा!’ तुझ्या अ‍ॅिक्टगच्या दुकानानं तुला खरंच तारलं. तू परत एकदा नव्या जोमानं, नव्या उत्साहानं स्वत:ला कामात बुडवून टाकलंस. पण हे अतिरेकी कामच तुला भारी पडलं का मित्रा? काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी ते प्रश्नच मनातून काढून टाकलेले बरे!

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!