|| अपूर्वा काळे

माणसाने मनाशी ठरवलं, की जिद्दीनं चालत राहायचं. तर त्याच बळावर तो ठरल्या मुक्कामी पोहोचतो; हा माझा अनुभव आहे. तसं म्हटलं तर आठवीपासूनच डोक्यात होतं आर्किटेक्चर करायचं. अर्थात आर्किटेक्चरबद्दल फार माहितीही नव्हती. मला मिळणारे चांगले गुण लक्षात घेता आईबाबांना वाटायचं की, मी मेडिकलला प्रवेश घेईन. मला पेंटिंगची वगैरे आवड होती. दहावीनंतर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट केल्यावर त्यातही कल कलात्मकतेचाच आला. तरी माझ्या डोक्यातली गोष्ट प्रत्यक्षात येईल का, याविषयी थोडीशी साशंक होते. त्यामुळे पाटकर महाविद्यालयातून अकरावी-बारावी विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं. आर्किटेक्चरचा अभ्यास सुरू होता. दुसरीकडे इंजिनीअरिंगसाठीच्या प्रशिक्षण वर्गानाही जात होते. सीईटीची परीक्षा दिली.

मग ठरवलं आर्किटेक्चर करायचं. ठअळअची प्रवेश परीक्षा दिली. आयईएस महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पदवीनंतर ज्युनिअर म्हणून मुंबईतील फर्ममध्ये नोकरी लागली. सगळ्या क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही थोडी धडपड करावी लागली. विशेषत: स्वत:च्या क्षमतेवर करिअर करायचं असतं तेव्हा ही धडपड अनुभवाला येते, मात्र परदेशात जाऊन शिकायचं तेव्हा डोक्यातही नव्हतं. मुंबईच्या रचना महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला. हा अभ्यासक्रम अर्धवेळ असल्याने शिकताना नोकरीही करता येणार होती. त्यासाठीची प्रवेश परीक्षाही दिली. त्याच सुमारास तो अभ्यासक्रम बंद केला आणि आशेनं जणू काही काळाचा पॉज घेतला. मग अहमदाबादच्या उएढळ विद्यापीठात प्रवेशासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. मात्र या प्रयत्नांत मला यश मिळालं नाही. मन फार खट्टू झालं. तरीही जिद्दीने प्रयत्न करणं सुरूच ठेवलं. भारतातलं शिक्षण-काळ-खर्च आदी मुद्दय़ांविषयी काही सीनिअर्सशीही बोलत होते. दरम्यान परदेशी जाऊन शिकावं, असा विचारही मनात आला.

परदेशी शिक्षणाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वत: बारकाईने माहिती काढणं गरजेचं होतं. त्यासाठी मी नोकरी सोडली. एका क्षणी अमेरिकेला जायचा विचार आला; पण खर्चाचं प्रमाण आणि काहीसं अस्थिर वातावरण लक्षात घेता तो विचारच राहिला. दुसरा चांगला पर्याय होता जर्मनी. योगायोगाने याच विद्यापीठात डिझाईन मॅनेजमेंट करणाऱ्या मैत्रिणीशी फेसबुकवर गप्पा झाल्या. तिच्या अभ्यासक्रमाविषयी कळलं. तो मला भावला. मला मुख्य प्रवाहापेक्षा वेगळं करिअर करायचं मनात होतंच. म्हणून मी डिझाईन मॅनेजमेंटचा विचार केला. जर्मनीमधल्या बाबांच्या मित्रांनी विद्यापीठात जाऊन नीट चौकशी केली. त्यानंतर म्युनिकमधल्या ‘मायक्रोमीडिया युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस’ या विद्यापीठात प्रवेशअर्ज केला. इंटरव्ह्य़ू कॉल होऊन प्रवेश मिळालादेखील.

शिक्षणासाठी परदेशी येताना मानसिक तयारी खूपच महत्त्वाची असते. जर्मनीत इंग्रजी संभाषणाचं प्रमाण अत्यल्प आहे. भारतातून येताना मी ‘ए१’ लेव्हल शिकले असले तरी इथली जर्मन भाषा लगेच आत्मसात करणं थोडं कठीण गेलं. पहिला आठवडा तर आईबाबांना फोन करून मी परत येते, मला जमत नाही, असं म्हणून रडण्यातच गेला. त्यांनी मला परोपरीने समजावलं. गेल्या वर्षभरात मी व्यवस्थित स्थिरावले आहे. महाविद्यालय सुरू व्हायच्या आधीच इथे पोहोचले होते. म्युनिकमध्ये राहायची जागा मिळणं हा मोठ्ठा प्रश्न असतो, कारण इथे अनेक विद्यापीठं आहेत. विद्यापीठात हॉस्टेल नव्हे तर स्टुडण्ट अ‍ॅकोमोडेशन असतं. खूप वेळा घर बदलावं लागतं. महाविद्यालयातर्फे ‘बडी’ची नेमणूक केली जाते. म्हणजे स्थानिक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नवीन विद्यार्थ्यांला व्यावहारिक गोष्टींसाठी मदतीचा हात देतात. ओरिएंटेशनच्या दिवशी डीननी विद्यापीठ, अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. लेक्चर्स आणि नोकरी या गोष्टींचा तोल साधला जाईल याची काळजी अभ्यासक्रमाच्या आराखडय़ात घेतली जाते. लोकांना वाटतं की, परदेशी गेल्यावर सगळं ऑल इज वेल असतं. तर ते तसं नसतं, कारण बाकी रोजच्या जगण्यातली धडपड इथेही अनुभवास येते.

जपान, ब्राझील, कोलंबिया आदी देशांतील आणि स्थानिक विद्यार्थी माझ्या वर्गात आहेत. हा अभ्यासक्रम दीड वर्षांचा आहे. प्राध्यापकांचं वागणं अगदी सौहार्दपूर्ण आणि मैत्रीचं असतं. आपले प्रश्न असोत किंवा खटकणाऱ्या गोष्टी असोत, त्या मोकळेपणाने बोलता येतात. त्यामुळे मतं मांडता येतात, आपल्या मनातल्या कल्पना सांगता येतात. आमच्या अभ्यासात थिअरी असते. मुख्य म्हणजे रिसर्च पेपर लिहायला लागतात. आपण घेतलेल्या संदर्भाची यादी द्यावी लागते आणि ते जसेच्या तसे लिहिता येत नाहीत. अर्थातच, कॉपी-पेस्ट संस्कृतीला थाराच नाही. तसं झालंच तर पेपर नाकारला जातो. सगळ्या गोष्टी ऑनलाइन होतात. आर्किटेक्चरमध्ये मला थिअरीची सवय नसल्याने थोडी वाचन-लेखनाची सवय लावून घ्यायला लागली. याचा फायदाच होऊन स्व-अभ्यासाची सवय लागली. पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये ग्रुप प्रोजेक्ट होते. तो टीमवर्कचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी वेगवेगळी आहे. त्यामुळे विचारशक्ती आणि दृष्टिकोन वेगळे आहेत. त्यामुळे शिकायलाही खूप मिळालं. मला पहिल्या सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांमुळे शिष्यवृत्ती मिळाली. खरं तर गुणांपेक्षा विद्यार्थी किती शिकतो आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास किती झाला आहे, या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. मला जाणवलं की, आपल्याला नवी जीवनदृष्टी मिळाली आहे. विचारधारणा बदलते आहे. स्वावलंबन आणि निर्णयक्षमता वाढली आहे.

सध्या डिझाईन मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ऑलिव्हर स्झासझ यांच्या मार्गदर्शनाखाली माझं प्रबंधलेखनाचं काम सुरू आहे. एखादी संस्था असो किंवा व्यावसायिक कंपनी असो, त्यांची ध्येयधोरणं किंवा कॉर्पोरेट कल्चर अबाधित ठेवून त्या संस्था किंवा कंपनीच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती कशी काय पोहोचवता येईल, याचा शोध डिझाईन थिंकिंगची तत्त्वं वापरून या प्रबंधाच्या माध्यमातून घेते आहे. परदेशात कानोसा घेतल्यास डिझाईन मॅनेजमेंट आणि डिझाईन थिंकिंग या गोष्टींचा खूपच बोलबाला झालेला आहे. अभ्यासक्रम संपल्यावर मी डिझायनर मॅनेजर म्हणून काम करू शकते. मार्केटिंग किंवा अन्य डिझायनशी संबंधित विभागांसोबत काम करता येईल. उदाहरणार्थ- एखाद्या उत्पादनाच्या कल्पनेपासून ते वितरणापर्यंतच्या सगळ्या टप्प्यांवर डिझायनर देखरेख करू शकतो. आमच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये एक अकॅडमिक प्रोजेक्ट बीएमडब्ल्यूसोबत होता. या प्रोजेक्टमध्ये या कंपनीचाही समावेश होता. याच कंपनीत मला नोकरी लागली. तिथे मी बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून काम करते. त्याआधी मी टेक्चरशी संबंधित नोकरी शोधत होते; पण त्यासाठी जर्मन भाषा खूप चांगली लागते. कारण क्लाएंट आणि सॉफ्टवेअर्स जर्मनमध्ये असतात; पण माझी भाषा चांगली नसल्याच्या मुद्दय़ावरून मला नोकरी मिळत नव्हती. या कंपनीत मी नॉलेज ट्रान्स्फर स्ट्रॅटेजीज डेव्हलप करते आहे. ग्राफिक डिझायनिंग करते आहे. डिझाईन मॅनेजमेंटची तत्त्वं वापरून काम करते आहे.

माझा पेंटिंग-स्केचिंगचा छंद जोपासते आहे. इथे अनेक छोटे इव्हेंट्स होतात. जर्मन भाषा शिकते आहे. फेसबुकवरच्या ग्रुप्समध्ये आणि विद्यापीठातल्या मित्रमंडळींसोबत वीकएण्डचा वेळ जातो. इथली संस्कृती, खेळ – विशेषत: फुटबॉल, वर्ककल्चर, एकमेकांच्या देशांतील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीविषयी भरपेट गप्पा होतात. इथली भारतीय रेस्तराँ बरीच चालतात. आम्ही एकत्र स्वयंपाकही करतो. इथल्या जीवनशैलीत अनेक आरोग्यदायी सवयी आहेत. मग तो फिटनेस असो किंवा डाएट असो, त्या अंगी बाणवून घेत स्वत:कडे लक्ष द्यायला थोडा वेळ काढतेच. महाविद्यालयात मुव्ही नाइट्स, स्पोर्ट्स इव्हेंट, नवीन विद्यार्थ्यांसाठी सिटी टूर्स, सायकल टूर, हायकिंग वगैरे गोष्टी सुरू असतात. या सगळ्या गोष्टींत व्यग्र राहिल्याने घरची आठवण थोडी कमी येते. कारण अधूनमधून घरची आठवण होऊन व्याकूळ झाल्याशिवाय राहावत नाही. विशेषत: घरच्या जेवणाची खूपच आठवण येते. येत्या काही काळात आपण एक बुककॅफे काढावा, असा मानस आहे. सध्याच्या नोकरीचा कालावधी संपल्यावर दुसरी नोकरी शोधेन. कदाचित शहरही बदलेन किंवा कदाचित अमेरिका अथवा कॅनडामध्ये संधी आहे का, ते शोधेन. अविरत अभ्यास, प्रयत्न, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मी इथवर पोहोचले आहे. भविष्यात आणखी चांगल्या संधी असतील, याचीही खात्री आहे.

कानमंत्र

  • मनातून काही शिकायची, साध्य करायची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतोच. फक्त पेशन्स ठेवायला लागतात. आशा सोडू नका.
  • केवळ सगळे जात आहेत, ट्रेण्ड आहे म्हणून परदेशात जाऊ नका. खरंच इच्छा असेल आणि सगळ्या गोष्टींना तोंड द्यायची मानसिक तयारी असेल तर जरूर या.

viva@expressindia.com

शब्दांकन : राधिका कुंटे