रेषांमुळे जसे जाड- बारीक दिसण्यासारखे दृष्टिभ्रम निर्माण होतात,  तसे कपडय़ांचे रंग आणि टेक्श्चर यातून नजरेचे खेळ  होतात.
मागील लेखात आपण फक्त रेषांमुळे निर्माण होणाऱ्या दृष्टिभ्रमाबद्दल चर्चा केली, पण कपडय़ांचे रंग आणि त्यात वापरलेल्या कापडाचा पोत (टेक्श्चर) यातून नजरेचे खेळ कसे होतात याची ओळख अजून राहिलीच आहे. या सर्व घटकांच्या स्वतंत्र किंवा एकत्रित दृश्य परिणामांतून निरनिराळे विभ्रम तयार होतात. याच कारणासाठी कपडे डिझाइन करताना प्रत्येक ग्राहकाच्या गरजेप्रमाणे ‘कस्टमाइज्ड डिझायिनग’ केले जाते.   
आतापर्यंत आपण कपडय़ांच्या रंगांबद्दल बरीच माहिती घेतली. तेव्हा प्रथम रंगांमुळे निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या आभासांचा  विचार करू या. साधारणपणे कपडे चार प्रकारच्या रंगांत असू शकतात. ते म्हणजे गडद (डार्क), फिकट (लाइट), मळखाऊ (डल), उठावदार (ब्राइट). तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे, रंगांच्या  कलाविश्वात पांढरा आणि काळा हे खरे तर रंग नव्हेतच. सर्व रंगांचे एकत्रित दृश्य अस्तित्व म्हणजे पांढरा रंग, तर कोणत्याच रंगाचे नसणे म्हणजे काळा रंग असे मानले जाते. वेगवेगळ्या रंगछटा मिळविण्यासाठी या दोन रंगांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या रंगात आपण काळा रंग मिसळतो तेव्हा आपल्याला त्या रंगाची गडद छटा मिळते, तिलाच ‘शेड’ असे म्हटले जाते. याउलट फिकट रंगछटेसाठी पांढरा रंग मिसळला जातो, त्यालाच आपण ‘टिन्ट’ असे म्हणतो. एकूण काय, फॅशनच्या दुनियेत डार्क कलर्स ‘शेड्स’ असतात, तर लाइट कलर्स ‘टिन्ट’ असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्राइट आणि डल कलर्स कसे तयार होतात, तर जेव्हा एखादा रंग कोणत्याही इतर रंगांच्या भेसळीशिवाय त्याच्या मूळ स्वरूपात वापरला जातो तेव्हा त्याची परिणामकारकता सर्वात जास्त असते, शिवाय लाइट रिफ्लेक्शनच्या परिणामामुळे असे रंग ब्राइट भासतात, तर रंगात पाणी किंवा ग्रे(करडा) रंग मिसळल्यावर रंगाची मूळ चमक नष्ट होऊन ते डल किंवा मळखाऊ भासतात.     
गडद किंवा डार्क रंग प्रकाश शोषून घेतात हे तर सर्वज्ञातच आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या सोलर कुकरची रचना आठवून पाहा बरं! त्यांच्या आतील बाजू पूर्णपणे काळ्या रंगात रंगवलेली असे, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व उष्णता शोषली जाऊन आत ठेवलेले अन्न लवकर शिजेल. हेच तत्त्व कपडय़ांमध्ये वापरायचे झाले तर आपल्या लक्षात येईल की प्रकाश आणि उष्णता जास्त प्रमाणात शोषल्यामुळे गडद रंगाचे कपडे घातल्यावर आपल्याला उबदार वाटते, पण पुन्हा प्रश्न उभा राहतो की, गडद रंगांनी शोषून घेतलेला प्रकाश आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम करतो? इथेच घडतो नजरेचा खेळ, कारण प्रकाश शोषून घेतलेला भाग आपल्या दृष्टीस आकारमानाने लहान भासतो. थोडक्यात काय, तर तुम्ही डार्क रंगाचे कपडे वापरता तेव्हा तुलनेने बारीक दिसता. इतकेच नव्हे, तर गडद रंग तुमच्या त्वचेच्या रंगाशी विरोधाभास निर्माण करतात आणि व्यक्तीचा रंग उजळ असल्यासारखेही भासवतात. मग आहे की नाही गंमत! तेव्हा स्लिम आणि फेअर दिसायचे असेल तर बेटर टू गो फॉर ब्लॅक!   
फिकट रंगाच्या बाबतीत मात्र नेमके उलट घडते. प्रकाशाचे परावर्तन झाल्याने फिकट रंगाचा पृष्ठभाग नजरेला तुलनेने मोठा भासतो. फिकट रंगछटा असलेल्या कपडय़ात तुमचा आकार उगीचच वाढल्यासारखा वाटतो, शिवाय आपल्या त्वचेच्या रंगात फिकट रंग मिसळून गेल्याने आपला रंग आहे त्यापेक्षा काळसर भासतो ते वेगळेच; पण याचा अर्थ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरायचेच नाहीत असे मुळीच नाही, कारण एखादा कपडा डिझाइन करताना रंगांचा वापर कसा केला जातो यावर बरेच काही अवलंबून असते, एकंदरीत कपडे डिझाइन करताना वेगवेगळ्या रंगछटांची सांगड घालणे केव्हाही उत्तम.  
ब्राइट रंगाच्या कपडय़ांचा विचार करायचा झाला तर त्यांचा परिणाम लाइट रंगाप्रमाणेच उलट जास्त ठळकपणे जाणवतो, कारण मूळ स्वरूपात या रंगांचा वापर झाल्याने, प्रकाशाच्या परावर्तनाचा परिणाम उग्र रूपात जाणवतो. त्यामुळे कपडय़ांचे फिकट रंग निदान नजरेला थंडावा तरी देतात, पण ब्राइट रंग सौम्यता, मार्दवता तर सोडाच, उलट पाहणाऱ्याच्या नजरेला टोचतात. या तुलनेत डल कलर्स मुळातच उदासीन असल्याने अशा रंगांच्या कपडय़ांचा कोणताच विशिष्ट परिणाम जाणवत नाही.    
टेक्श्चर इफेक्ट
यानंतर आपण कपडय़ांसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कापडांचा विचार करू या. यांचाही रंगांच्या परिणामकारकतेशी खूप जवळचा संबंध आहे. कापडाच्या बाबतीत दृष्टिभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे कापडाचा पोत किंवा टेक्श्चर, कापडाचा फॉल आणि त्यावर रेखाटण्यात आलेलं डिझाइन किंवा िपट्र किंवा एम्ब्रॉयडरी वगरे. गुळगुळीत कापड प्रकाश अधिक परावर्तित करून कापडाचा पृष्ठभाग मोठा असल्याचा आभास तयार करते. कल्पना करा की, तुमचा पूर्ण ड्रेस गुळगुळीत सॅटिनच्या कापडाचा आहे. प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा तुमचा आकार उगीचच मोठा वाटेल. समजा तोच ड्रेस भडक लाल रंगाचा आहे, मग तर याचा परिणाम फारच विचित्र होईल, त्यातही लाल रंगाच्या सुती कपडय़ापेक्षा, त्याच रंगाचा सॅटिनचा कपडा डोळ्यांना अधिक त्रासदायक भासतो. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, कपडय़ांचा फक्त रंगच नाही, तर त्याच्या कापडाचा पोतही महत्त्वाचा असतो. आता रफ किंवा खरबरीत कापड तुलनेने जास्त प्रकाश शोषून घेते आणि तुम्ही आहात त्यापेक्षा बारीक असल्याचा भ्रम निर्माण करते. आता पारदर्शक कापडाबद्दल बोलायचे झाले तर हा प्रकार डिझायनर्ससाठी खूपच युजरफ्रेंडली. कपडय़ातली एखादी गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आणून द्यायची असेल तरीही आणि डिझाइनमधील वैगुण्य लपवायचं असेल तरीही पारदर्शक झिरझिरीत कापड सहज उपयोगात येते. अर्थात याच्या वापरालाही नियम तोच, कापडातील काळा रंग पांढऱ्या रंगापेक्षा तुम्हाला सडपातळ दिसायला मदत करेल.
आता कापडाच्या ‘फॉल’चा विचार करू या. पातळ किंवा वजनाने हलके कापड अंगासरशी बसते आणि आपण सडसडीत दिसल्याचा भास होतो. याउलट जाड, कडक, वजनाने जड कापड आपल्या असलेल्या मूळ आकारात अजून भरच घालते. यापेक्षा शिफॉन, जॉर्जेट किंवा अगदी पातळ सुती कापड यापासून बनवलेले कपडे आपण आहोत त्यापेक्षा बांधेसूद दिसण्यास मदत करतात.
आता शेवटच्या मुद्दय़ाकडे वळू या, तो म्हणजे कापडावरील रेखाटन म्हणजे िपट्र किंवा एम्ब्रॉयडरी, यामुळेही बारीक किंवा जाड असे आभास निर्माण होत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, मोठे िपट्र किंवा डिझाइन असलेले कपडे, आपण आहोत त्यापेक्षा जाड किंवा रुंद बांध्याचे असल्यासारखे भासवतात, तर नाजूक िपट्र असलेल्या कपडय़ात व्यक्ती आकाराने लहान किंवा बारीक असल्यासारखी भासते. तीच गोष्ट कापडावरील भरतकामाची, भरगच्च एम्ब्रॉयडरी असलेला कपडा आपल्यालाही बल्की लूक देतो. तेव्हा आपल्याला आकर्षक, प्रेझेन्टेबल दिसायचे असेल तर कपडा निवडताना त्यावरील डिझाइन हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
आता तुमच्या लक्षात आले असेल की, पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या व्यक्तीला आपल्या कामात किती व्यवधाने पाळावी लागत असतील. कलर्स, कापडाचा प्रकार, कट्स, िपट्र्स आणि शिवाय ग्राहकाची अंगकाठी या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो.
अनुवाद : गीता सोनी