02 June 2020

News Flash

गड दुर्गा

नवरात्रीतील दुर्गाशक्तीच्या जागराच्या निमित्ताने अशाच काही गडदुर्गाची ओळख

(संग्रहित छायाचित्र)

दीपेश वेदक

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दुर्ग त्यांच्या तटाबुरुजांनी, सह्य़ाद्रीच्या रौद्रभीषणतेने नटलेले आहेत. त्याचप्रमाणे हे गडकोट तेथील गडदेवतांच्या वास्तव्याशिवाय अपूर्ण आहेत. हे गडदुर्ग पालथे घालायचे तर उभे आयुष्य आपल्याला अपुरे पडेल. या भटकंतीसाठी आधुनिक मावळ्यांना खऱ्या अर्थाने बळ देतात, त्या या गडांवरील दुर्गा. आणि महाराष्ट्र पालथा घालताना गडावरील या दुर्गांच्या पुढे नतमस्तक होणार नाही तो भटका कसला? गडकिल्ल्यांच्या भटकंतीत या दुर्गांची छोटेखानी मंदिरे पाहिल्याशिवाय, त्यांचे तिथले अस्तित्व समजून घेतल्याशिवाय गडाच्या गोष्टी अर्धवटच वाटतील. नवरात्रीतील दुर्गाशक्तीच्या जागराच्या निमित्ताने अशाच काही गडदुर्गाची आपण आज ओळख करून घेणार आहोत.

प्रतापगडची तुळजाभवानी

शिवाजी महाराजांना तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घेणे शक्य नव्हते. अशा वेळी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केली. नेपाळच्या गंडकी नदी पात्रातीलच दगड मूर्ती घडवण्यासाठी उत्कृष्ट मानला जातो. या भवानीमातेची मूर्ती घडवण्यासाठी येथूनच पाषाण आणले गेल्याचे म्हटले जाते. गड चढून वर गेलात की गडाच्या पूर्वेला तुम्हाला हे देऊ ळ दिसेल आणि बाजूलाच असलेल्या भव्य दीपमाळा तुमचे लक्ष वेधून घेतील. काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती पाहण्यासारखी आहे.

सज्जनगडावरील श्रीआंगलाईदेवी

स्वराज्याची धार्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सज्जनगडावर श्रीआंगलाईदेवीचे मंदिर आहे. समर्थ रामदासांना अंगापूरच्या डोहात या देवीची मूर्ती सापडली. त्यांनी ही मूर्ती सज्जनगडावर आणून तिची स्थापना करत मंदिर बांधले. समर्थ असताना ज्या प्रमाणे गडावर उत्सव साजरे व्हायचे, त्याचप्रमाणे आजही त्यांचे शिष्य नित्यनियमाने सर्व उत्सव साजरे करतात. त्यामुळे सज्जनगडावरील श्रीआंगलाईदेवीचे महत्त्व आजही टिकून आहे.

देवगिरीवरील भारतमाता

देशातील भारतमातेचे एकमेव मंदिर देवगिरी किल्लय़ावर आहे. सध्या हे मंदिर जेथे आहे, त्या ठिकाणी यादवकाळात दहाहून अधिक मंदिरांचा समूह होता, असे मानले जाते. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या आक्रमणानंतर मुघलांनी किल्लय़ावरील मंदिरे उद्ध्वस्त केली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर ग्रामस्थांनी भारतमातेचे हे नवे मंदिर उभारले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मंदिरे आहेत. मात्र भारतमातेचे दर्शन घ्यायचे असेल तर देवगिरीला भेट द्यायलाच हवी.

तोरणावरची मेंगाई देवी

प्रचंडगड म्हणून ख्याती असलेला तोरणा किल्ला ताब्यात घेऊ न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हा भला मोठा किल्ला पाहायचा तर निदान दोन दिवस तरी हाती हवे. पण, किल्लय़ावरील भुतांच्या गोष्टी ऐकून आजही अनेक जण किल्लय़ावर वास्तव्य करण्यास धजावत नाहीत. अशा वेळी मेंगाई देवी मात्र किल्लय़ावर आलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहते. अगदी पन्नास एक माणसे सहज झोपू शकतील असे मोठे देऊ ळ या किल्लय़ावर आहे. मेंगाई देवीचा हा परिसरही अत्यंत रम्य असा आहे. त्यामुळे अनेक जण किल्लय़ावरील वास्तव्याच्या वेळी याच मंदिरात झोपण्यास प्राधान्य देतात. जवळच तोरणजाई देवीची घुमटीसुद्धा तुमच्या नजरेस पडते. याच घुमटीच्या जागी महाराजांना गुप्तधन सापडले होते, याच धनाच्या साहाय्याने महाराजांनी राजगड बांधला. या घटनेचे स्मरण म्हणून महाराजांनी ही घुमटी बांधल्याचे म्हटले जाते.

राजगडावरची पद्मावती देवी

राजगडाच्या बालेकिल्लय़ावर ब्रह्मर्षीची गुहा आहे. या ऋषींची पत्नी म्हणजे पद्मावती. राजगडाच्या पद्मावती माचीवर या पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिरात पद्मावती देवीच्या दोन मूर्ती आढळतात. त्यातील एक शिवकालीन तर एक भोर संस्थानचे पंतसचिव यांनी बसविलेली मूर्ती असल्याचे म्हटले जाते. राजगडावरील भेटीमध्ये अनेक दुर्गभटके याच मंदिरात वास्तव्याला असतात.

शिवनेरीवरील शिवाई देवी

शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरी गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे. कोरीव लेण्यामध्ये असलेल्या देवीची मूळ मूर्ती तांदळा स्वरूपात आहे, तर या शिळेच्या मागेच सिंहावर आरूढ देवीची चतुर्भूज मूर्ती आहे. ही मूर्ती १९४८ साली कुसुर ग्रामवासीयांनी बसवली. ही शिवाई देवी जुन्नर परिसरातील आदिवासी, ठाकर, कोळी समाजाची कुलदेवता होय. याच शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘शिवाजी’ हे नाव ठेवले असे मानले जाते.

रायगडची शिर्काई 

दुर्गदुर्गेश्वर रायगडावर गेलात की शिर्काई देवीचे दर्शन घेऊ नच गडदर्शनाला सुरुवात होते. स्वराज्याची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या या देवीचा उत्सव आजही पाचाडवासी मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. शिवकाळात येथे झालेले उत्सव, गोंधळ, आदीचे संदर्भ अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये सापडतात. त्यामुळे रायगडाला भेट दिलीत तर शिर्काई मातेच्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका.

सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी

नाशिकच्या सप्तशृंगगडावर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले हे सप्तशृंगी देवीचे मंदिर. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भक्त महाराष्ट्रभरातून येतात.  ५१० पायऱ्या चढून भक्तांना गडावरील मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. त्यामुळे नाशिक भागात गेलात तर सप्तशृंगीगडावरील या मंदिराला नक्की भेट द्या.

सुधागडावरील भोराईदेवी

महाराजांनी राजधानीसाठी ज्या किल्लय़ाचा विचार केला होता, त्या सुधागडावर भोराईदेवीचे मंदिर आहे. ही देवता भोरच्या पंतसचिवांच्या घरण्याची कुलदेवता मानली जाते. नवरात्रीमध्ये आजही भोराईदेवीचा उत्सव साजरा करण्यात येतो.  कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपाप्रमाणेच या देवीची मूर्ती कोरण्यात अली आहे. या देवीच्या वास्तव्यामुळेच किल्लय़ाला भोराईचा डोंगर म्हणून ओळखले जाते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 12:02 am

Web Title: gad durga navratri festival abn 97
Next Stories
1 फॅशनेबल नवरात्र
2 मिशन फिटनेस
3 क्षण एक पुरे! : सोशल दंतवैद्य
Just Now!
X