गायत्री हसबनीस

दागिन्यांच्या डिझाइनला पूर्वी स्वत:ची एक ओळख होती, त्यामुळे त्याला काही मर्यादा होत्या. आता मात्र त्या मर्यादा फारशा राहिल्या नसून त्याची जागा आता दागिन्यांमधल्या जिवंतपणाने घेतली आहे. आजकाल वाढत जात असलेल्या फॅशन वीक, रेड कार्पेटमुळे जग ज्वेलरीच्या बाबतीतही जवळ आले आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण दागिन्यांच्या निमित्ताने ग्लोबल फॅशन ही आता जास्त प्रमाणात ग्राहकांपर्यंतही पोहोचते आहे.

दागिन्यांच्या जगात प्रत्येक वेळी एकच असा ट्रेण्ड पाहायला मिळत नाही तर दरवेळी विविध अंगांनी विचार करून बनवलेल्या आणि वेगळी धाटणी असलेल्या दागिन्यांची खासियत दिसते. गेल्या दहा-बारा वर्षांत तर हे चित्र दिवसागणिक बदलतच गेलं. जागतिक पातळीवर फॅशनच्या परिघात दागिन्यांच्या सौंदर्याला आगळं वळण मिळालं आणि दागिने बनविण्याचं काम वेगळ्या रूपाने जगासमोर आलं. विविध देशांत तिथल्या कारागिरीची एक वेगळी ओळख दागिन्यांच्या निमित्ताने होऊ  लागली आहे.  पूर्वी दागिन्यांच्या डिझाइनला स्वत:ची एक ओळख होती, त्यामुळे त्याला काही मर्यादा होत्या. आता मात्र त्या मर्यादा फारशा राहिल्या नसून त्याची जागा आता दागिन्यांमधल्या जिवंतपणाने घेतली आहे. आज दागिने जितके खरेखुरे आणि जिवंत वाटतील तितके च त्यांचे महत्त्व जास्त, असं काहीसं आत्ताचं समीकरण आहे.

अर्थातच वेस्टर्न ज्वेलरीमध्ये नेकलेससारख्या दागिन्यांना नवीन पद्धतीने खुलविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मोठय़ा फॅशनवीकमध्ये डोकावून पाहिले तर नक्कीच त्याची प्रचीती येते. आकाराच्या बाबतीतही अंगाखांद्यावर ठळकपणे दिसून येतील असे दागिने बनवले जात आहेत. ‘चोकर’सारख्या दागिन्याला थोडंसं मॉडिफाय करत यामध्ये मेटलपासून बनवलेले अर्धवर्तुळाकार चोकर ट्रेण्डमध्ये येत आहेत.  या वेळी सगळे समर कलेक्शन पाहिले तर बऱ्याचदा चेन, चोकर, नेकलेस असेच ट्रेण्ड पाहायला मिळतील. गोल्डन ज्वेलरी ही खासकरून कानात, गळ्यात, हातात दिसते. त्यातही प्रेसा गोल्ड टोन ज्वेलरी, गोल्ड चेन टोगल ब्रेसलेट आणि चेन नेकलेस व चेन ब्रेसलेट अशा गोष्टी ट्रेण्डमध्ये दिसतात. थोडक्यात, मिसमॅच ज्वेलरी, रेसिन ज्वेलरीचा ट्रेण्ड जवळपास सगळ्याच ग्लोबल शॉपिंग हब्समध्ये पाहायला मिळत आहेत. याचं कारण एकच लाइफस्टाइलच्या बाबतीतली आपली बंडखोरी ही आता बऱ्यापैकी दागिन्यांमध्येही उतरली आहे. सामान्य रचना, एकच डिझाइन, तोचतोचपणा आणि रंगांच्या छटांचा एकेरी वापर अशा गोष्टींना ज्वेलरी डिझाइनिंगमधून फाटा देण्यात आला आहे. त्याऐवजी अतिशयोक्तीपूर्ण पण आकर्षक असे क्लासिक आणि कॅज्युअल दागिने बनवले जात आहेत. डार्क शेड्स, लांबलचकपणा आणि एम्ब्रॉयडरीयुक्त दागिन्यांना चिक्कार वाव मिळतो आहे.

रेड कार्पेटवर अवतरणारे दागिने हेदेखील जास्त बोल्ड असतात. त्यामुळे त्याप्रमाणे मेकअप आणि आऊ टफिट्सही तयार केले जातात. ऑस्करच्या रेड कार्पेटवर तीन वर्षांपूर्वी डायमंड आणि चेन या गोष्टींना प्राधान्य होते, त्यामुळे त्या वेळचे त्यांचे ड्रेसही त्याच पद्धतीने डिझाइन करण्यात आले होते. तसं पाहायला गेलं तर चेन, ब्रेसलेट या खुद्द वेस्टर्न स्टाइल्सना ज्वेलरीमध्ये मरण नाही हे वारंवार दिसून आलं आहे. त्यातही शेप आणि साइजचा जास्त विचार केला गेला नव्हता. रेट्रो लुकचा एक वेगळाच प्रभाव त्यावर होता. टर्कोईझ नेकपीस हे जास्त प्रमाणात पाहायला मिळत होते, कारण तसा प्रयत्न रेड कार्पेटवर ७०च्या दशकानंतर आत्ता केला गेला होता. पर्ल, डायमंड, बीडेड अशा ज्वेलरी रेड कार्पेटवर एक काळानंतर पुन्हा अवतरलेल्या पाहायला मिळाल्या. शुभ्र रंगांचे आणि मटेरियलचे दागिने बनविण्याचे कसब जास्त करून इंटरनॅशनल शोपीस या अर्थाने होऊ  लागले. रेड कार्पेटवरचे दागिने बदलले ते काहीसे याच कारणामुळे. या दागिन्यांना जागतिक बाजारात किंमत उपलब्ध करून देण्यासाठी कलेपेक्षा किंवा डिझाइनपेक्षा दागिन्यांमधील मटेरियलला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. जेव्हा मेट गालासारखे इव्हेंट्स येतात, तेव्हा मात्र सर्जनशील डिझाइन्सचे दागिने जास्त ग्लॅमरस ठरतात. त्यात हेअर ज्वेलरीपासून ते फेस ज्वेलरीपर्यंत अनेक पर्याय पाहायला मिळतात.

फेस ज्वेलरीमध्ये लिप रिंग, आयब्रो रिंग, नोझ रिंग, नेट फेस कव्हर वैगेरे गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये हायली ओव्हर डेकोरेटेड हेड गिअरचाही समावेश आहे ज्यातही डायमंडचा वापर केला जातो. त्यामुळे सतत काहीतरी नवीन आणताना त्या त्या दागिन्यांच्या किमतीला ग्लोबल मार्केटमध्ये महत्त्व दिले जाते. यंदा रेड कार्पेटवरचे ज्वेलरी लुक पाहिले तर ६० च्या दशकातील मटेरियलचा वापर करण्यात आलेला दिसून येईल. प्लॅटिनम, अठरा कॅरेट गोल्ड, डायमंड, अठरा कॅरेट व्हाइट गोल्ड अशा विविध मटेरियलपासून बनवलेले हे दागिने होते. व्हाइट गोल्डप्रमाणेच अठरा कॅरेट येल्लो गोल्ड, रोझ गोल्ड यांचाही समावेश होतो. शेप आणि साइजचा विचार करता ७ कॅरेटचे पीअर शेप डायमंड, १० कॅ रेटचे राऊं ड कट डायमंड आणि हार्टशेप रुबी असे नानाविध प्रकार आहेत. यंदाच्या कलेक्शनमध्येही बलगारी (bulgari) यांचे कलेक्शन ऑस्करच्या रेड कार्पेटवर अवतरले होते. बलगारीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर लॉरा हेरियर हिने प्लॅटिनम, डायमंड, रुबेलाइट्स आणि त्यावर मॅचिंग ब्रेसलेट घातले होते.

दागिन्यांचा नवाकोरा लुक हा नेहमीच फॅशनवीक, रेड कार्पेटवरून आपल्यासमोर येतो. प्रत्येक अभिनेत्रीच्या आऊ टफिटचा विचार करूनच तसे दागिने बनवले जातात. या दागिन्यांची किंमत ही सर्रास  ९०,००० ते ९,००,००० डॉलरच्या घरात हमखास जाते. मेन्स ज्वेलरी पाहिली तरी त्यात फेस ज्वेलरीपेक्षा इअरिंग्सना जास्त महत्त्व असते. त्यातही डायमंड, हिप हॉप, फेमिनाइन, स्मूद पर्ल, सिंगल-डबल लेयर्ड आणि स्पार्किंग नेकलेस, पर्ल रिंग्स यांचा समावेश जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ज्वेलरीमध्ये काय आवडतंय आणि काय आवडत नाही याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज भासत नाही. कारण यंदाच्या ट्रेण्डनुसार ऑकवर्ड फॅशन बाजूला सारून साधे डिझाइनर ज्वेलरी ट्रेण्ड्समध्ये आहेत. अगदी जोमेट्रिकल, बॉटनिकल, फॅन्सी, नेमिंग या नानाविध प्रकारच्या आणि आकाराच्या बाबतीतही दागिन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. एकीकडे होट कुटूरसारख्या मंचावर लेयरवर लेयर असणारे क्रिस्टल, डायमंड, मेटॅलिक, प्लॅटिनमचे दागिने येत आहेत आणि दुसरीकडे साध्या नाजूक आकाराचे आणि ओव्हरसाइज्ड नसलेले दागिनेही येत आहेत. हॉट कुटूरमधील ज्वेलरी कलेक्शन हे जास्त मजबूत, बंडखोर, क्लासिक आणि रिजिड आहे. यात प्रामुख्याने कलाकारी आणि कारागिरीची मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रेण्डनुसार आऊ टलुकला प्राधान्य देत जगभरात साध्या पण महागडय़ा मटेरियल असलेल्या कॅ ज्युअल ज्वेलरीचा बोलबोला राहील. आता विंटर फेस्टिव्हल सीझनला तर मोठय़ा दागिन्यांचा फंडा रुजतो आहे ज्यात अ‍ॅसिमेट्रिकल, डेकोरेटिव्ह मोटिव्ह्ज, आणि बारीक एम्ब्रॉयडरीचा फंडा आहे. त्यामुळे टास्सेल, कॉन्ट्रास, ग्लास व स्टोन या सीझनला जास्त पाहायला मिळतील. मॅक्सी नेकलेस, ब्रेसलेट्स असे सोफिस्टिकेटेड ज्वेलरी लुक विचारात घेतले जाणार आहेत. एथनिक पीससोबत शार्प ऑब्जेक्ट असलेले पेन्डंटसुद्धा सहजरीत्या ग्लोबल फॅशनमध्ये उतरले आहेत.

एकू णच जगभरातला दागिन्यांचा कल हा सौम्य, पण ठळक डिझाइन देण्याकडे आहे. एक्झॉटिक आणि ब्राइट लुक हा ट्रेण्डमध्ये येऊ  शकतो. दागिना हा प्रकारच मुळात रोमँटिसिझमशी जोडलेली असल्याने व्यक्तीगणिक ते खुलतच राहतील, आपल्या सौंदर्याने स्त्रीमनाला भुरळ घालत राहतील, यात शंका नाही.

viva@expressindia.com