मी किती जाड झालीय ना.. मला अजून थोडं बारीक झालं पाहिजे म्हणजे परफेक्ट फिगर वाटेल. मुलगी वयात आली की असे आरशासमोर उभे राहून होणारे संवाद अगदी कॉमन असतात. आपल्याकडे हल्ली अतिबारीक म्हणजे सुंदर, साईझ झिरो वगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. मग जाडी वाढेल या भीतीने गरजेपेक्षा कमी खाण्याकडे कल वाढतो. मागच्या एका लेखात मी उपास करणे किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे आरोग्याला धोकायदायक असल्याचे सांगितलेच होते. त्यापुढची पायरी आहे क्षुधानाश.. अर्थात अ‍ॅनोरेक्सिया. परदेशात अ‍ॅनोरेक्सिया झालेल्या किशोरवयीन मुलींची संख्या वाढली आहे. आता तर फ्रान्ससारख्या देशांनी हे उपाशी राहण्याचे खूळ कमी व्हावे म्हणून फॅशन शोमध्ये अशा अ‍ॅनोरेक्सिक मॉडेल्सवर बंदीही आणली आहे. मुळात अ‍ॅनोरेक्सिया म्हणजे काय? क्षुधानाश वजन कमी करण्याचा मार्ग आहे? याची उत्तरे जाणून घेतली पाहिजेत.
मनोजन्य क्षुधानाश म्हणजेच अ‍ॅनोरेक्सिया हा एक विकार असून वजन वाढेल या चिंतेपायी आहार कमी करण्याच्या आणि त्यातून क्षुधानाश होण्याची ही प्रक्रिया आहे. आपले वजन वाढू नये किंवा बारीक होण्याकडेच सर्वाधिक प्रयत्न असल्याने अशी इच्छा असलेल्या किशोरवयीन मुला-मुलींना हा विकार जडतो.
आरोग्यदायी आणि तंदुरुस्त शरीराऐवजी त्यांच्या दिसण्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत जाते आणि त्यातून या विकाराला ते बळी पडतात. अ‍ॅनोरेक्सिया होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुणसूत्रे आणि संप्रेरकांमुळे याकडे कल वाढतो. बारीक होण्याकडे समाजाची असलेली मनोवृत्तीही त्याला कारणीभूत ठरते. बालपणात नराश्याचा विकार जडणे, अर्भकावस्थेत किंवा बालपणात खाण्यापिण्याची झालेली आबाळ, घरात आहारातील वैविध्याचा अभाव, आरोग्य आणि सौंदर्याविषयीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कल्पना, समवयस्कांचा पडणारा प्रभाव  हीदेखील कारणे असू शकतात.
अ‍ॅनोरेक्सिया कसा ओळखावा?
गरजेपेक्षा कमी वजन असूनही एखाद्या व्यक्तीला वजन वाढण्याची किंवा जाड होण्याची भीती वाटत राहते. वय आणि उंचीच्या प्रमाणात आवश्यक असलेले वजन राखण्यास नकार देणे (सर्वसामान्य वजनापेक्षा १५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी वजन असणे) वजन आणि आकारावर भर देत वजन कमी असण्याच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करत अशा व्यक्ती स्वत:चे मूल्यमापन केवळ वजन आणि दिसण्याच्या आधारेच करतात.
क्षुधानाश झालेल्या व्यक्ती त्यांचे जेवण कमालीचे कमी करतात. त्यांच्या खाण्याच्या पद्धतीही विचित्र होत जातात. जसे जेवणाचे छोटे तुकडे करणे किंवा ते ताटामध्ये फिरवणे. हवामान खराब असो धावपळीचा दिवस असो की तब्येत बिघडलेली असो या व्यक्ती सतत व्यायाम करण्यात गुंतलेल्या असतात. लघवी होण्यासाठी गोळ्या घेणे (वॉटर पिल्स किंवा डाययुरेटिक्स), शौचाला व्हावे म्हणून (एनिमा किंवा लॅक्झेटिव्ह) किंवा भूक कमी व्हावी यासाठीही (डाएट पिल्स) ते गोळ्या घेतात.
क्षुधानाश थांबवणे का गरजेचे आहे?
क्षुधानाश ही शरीराची अशी अवस्था आहे ज्यात शरीराला पोषकद्रव्ये मिळत नाहीत, शरीराची बांधणीच अशक्त झाल्याने गुंतागुंतही निर्माण होऊ शकतात. डागाळलेली किंवा पिवळ्या रंगाची त्वचा होऊन तिच्यावर अतिशय बारीक केस येतात. सतत गोंधळलेपणा किंवा मंदपणा येतो. तसेच स्मरणशक्ती क्षीण होऊन निर्णयक्षमताही कमी होते. तोंड कोरडे होते, थंडी वाजते, हाडे ठिसूळ होतात, स्नायूंचा ऱ्हास होतो, नराश्य येते.
अ‍ॅनोरेक्सिया नव्‍‌र्होसा हा एक सायकोसोमॅटिक विकार असून यामुळे शरीराला अत्यंत गरजेची असलेले प्रोटिन्स, काबरेहायड्रेट्स, फॅट्स तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत. या विकारामुळे शरीर उपासमार होईपर्यंत अन्नाचा त्याग करत राहते. यामुळे शरीर संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.
या विकारावर उपचार करण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे विकारग्रस्त व्यक्तीला हा आजार आहे हे समजावून सांगणे. अनेक व्यक्ती आपल्याला क्षुधानाशाचा विकार आहे हे मान्यच करत नाहीत. जेव्हा त्यांची प्रकृती ढासळू लागते त्याच वेळी या व्यक्ती उपचारांसाठी तयार होतात.
क्षुधानाशावर उपचार करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. वजन वाढवण्यासाठी तीन गोष्टींचा फायदा होऊ शकतो. १. समाजात सहभाग वाढवणे. २. शारीरिक श्रम कमी करणे. ३.    खाण्यासाठी वेळापत्रक आखणे.

अ‍ॅनोरेक्सियावरील उपचार
कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी (ज्यात व्यक्तीशी संवाद साधून उपचार केले जातात), समूह उपचार आणि कुटुंबाला एकत्र आणून उपचार करणे यामुळे रुग्णात झपाटय़ाने सुधारणा होते. या उपचारांचा उद्देश रुग्णाची विचारसरणी बदलून आरोग्यदायी जीवनशैलीकडे त्याला वळविणे हा आहे.
जान्हवी चितलिया- viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट  आणि  वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…