नवतरुणाईमध्ये तणावाची कारणं काय आणि त्यापेक्षाही त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, मनोविश्लेषक आणि समुपदेशक यांच्याशी संवाद साधला.

नकारात्मक दृष्टिकोन, ताण-तणाव, मनाचा गोंधळ, एकटेपण यामुळे नैराश्य येतं आणि नैराश्याचा कडेलोट होतो तेव्हा आयुष्य संपवण्याचा, स्वत:ला इजा करून घेण्याचा टोकाचा विचार केला जातो. पण मुळात असा नकारात्मक दृष्टिकोन निर्माणच का होतो, सध्या तरुणाई नेमका कुठल्या गोष्टींचा एवढा ताण घेतेय?
पौगंडावस्थेतील मुला-मुलींवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ (अ‍ॅडॉल्संट फिजिशियन) डॉ. वैशाली देशमुख म्हणाल्या, ‘एकटेपणा, करिअर चॉइसबाबतचा गोंधळ, रिलेशनशिप्समधील चढउतार, कौटुंबिक परिस्थिती हे घटक सहसा या वयातील ताण-तणावाला जबाबदार असतात.’ डॉ. वैशाली यांनी त्यांच्या निरीक्षणात आलेल्या अशाच एका घटनेचा उल्लेखही ‘व्हिवा’शी बोलताना केला. आईच्या आजारपणामुळे घरातलं एकंदर वातावरण अचानक बदललं आणि या बदलत्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचा ‘त्या’ मुलीच्या मनावर परिणाम होत होता. वडील आईच्याच शुश्रूषेत व्यस्त असत, कारण आजार तसा गंभीर होता. त्यातच या मुलीचं दहावीचं र्वष होतं. घरातली ही अशी परिस्थिती, वाढता एकटेपणा, त्यातून वाढणारा अबोलपणा आणि कुचंबणा या साऱ्यामुळे ‘त्या’ मुलीने स्वत:च्या मनगटावर ब्लेडने इजा करून घेतल्या होत्या. ‘हे कशासाठी केलं’, असं ‘ती’ला विचारलं तेव्हा – यामुळे मला बरं वाटतं, असं तिनं उत्तर दिलं. हा प्रकार गंभीर होता. त्यामुळे तिला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला. अडचणींवर मात करत जगण्यापेक्षा स्वत:ला आणखी त्रास देणं आणि संपवणं तरुणाईला सोपं वाटू लागलंय की काय अशी शंका डॉ. वैशाली यांनी दिलेल्या उदाहरणातून येते.
तरुणाईचा धसमुसळेपणा नवीन नाही, पण त्यांचा बदलता अ‍ॅटिटय़ूड, ईगो आणि मग सगळ्या वाटा बंद झाल्या या समजुतीने आत्महत्येचा विचार यामुळे हे प्रमाण वाढतं आहे, असं तज्ज्ञांशी बोलताना जाणवलं. आत्मघातकी प्रवृत्तीबद्दल सांगताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे म्हणाले, ‘मजा मारणं हा माणसाचा स्वभाव आहे. हे समजून घेणं कठीण नाही. प्रत्येक मजेदार अनुभवातनं मेंदूत बनणारी मजेची रसायनं आणि तो प्रसंग आठवणीत वेगळा करणारी रसायनं त्याला कारणीभूत असतात. ही झाली शास्त्रीय मीमांसा. पण मजेची सांगड सकारात्मकतेशी घालताना कुठे तरी कमी पडतोय आपण. आत्मविश्वासाचा अभाव हे त्यामागचं कारण असू शकतं. यश, त्याची व्याख्या आणि त्यामागची सहजता कमी होणं ही कारणंही नैराश्य आणू शकतात. आत्मघातकी प्रवृत्तीसाठी ते कारणीभूत ठरू शकतं.’
ताणतणाव, एकटेपणा, चिडचिड या साऱ्याचा रोजच्याच जीवनातील घटनांशी संबंध असतो. याचंच स्पष्टीकरण देत चाइल्ड अ‍ॅण्ड टीनएज काऊन्सेलर निराली भाटिया म्हणाल्या, ‘आजची पिढी डिजिटलाइज्ड युगातली आहे. त्यांचा जीवनाचा संघर्ष कमी झाल्यासारखा वाटत असला, तरी प्रत्यक्षात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे. त्यातून न्यूनगंड निर्माण होतो, त्यातून नैराश्य, एकटेपण येतं.’ सोशल नेटवर्किंग साइट्सचा या परिस्थितीशी संबंध लावताना भाटिया म्हणाल्या, ‘सोशल साइट्सवर काय, कसं शेअर करावं, किती व्यक्त व्हावं, खरं सांगावं की वेगळी प्रतिमा तयार करावी याबाबतचा संभ्रम आजच्या पिढीत दिसतो. एवढय़ा कम्युनिकेश प्लॅटफॉर्म्सवर असूनदेखील त्यांचा आपापसांतील संवाद कमी झाल्याचं दिसतं.’ रिलेशनशिप्स, कुटुंब, करिअर, स्पर्धा आणि सोशल मीडिया यांचा उल्लेख त्यांनी ताणतणावाचे ‘ट्रिगर्स’ असा केला.
करिअरच्या तणावावर कुटुंबाचा सकारात्मक पाठिंबा हे उत्तर आहे, असं सायकॉलॉजिस्ट गिरिजा पटवर्धन म्हणतात. ‘शालान्त परीक्षा, मग प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, अंतिम परीक्षा, मग इंटरव्ह्य़ू आणि मग नोकरीतली टेन्शन्स ही न संपणारी गाडी आहे. परीक्षांच्या निकालावरून पुढे मांडली जाणारी आयुष्याच्या यशापयशाची समीकरणं यामुळे तरुण पिढी प्रचंड दबावाखाली आहे. अशा वेळी कुटुंबाचा पाठिंबा ‘पॉझिटिव्ह बूस्टर’ ठरतो. तणावातून नैराश्य आणि नैराश्यातून आत्मघातकी प्रवृत्तीसारखे प्रकार अनेकदा एखाद्या व्यक्तीला मानसिक रुग्ण बनवण्याच्या वाटेवर नेऊन सोडतात. तरुणाईनं या तणावाचं नियोजन सुरुवातीच्या पातळीवरच करणं आवश्यक आहे, असंही गिरिजा पटवर्धन यांनी सांगितलं. थोडक्यात, आपले स्ट्रेस बस्टर्स आपणच शोधले पाहिजेत आणि कुठलंही अपयश हे अंतिम नसतं, हे ध्यानी ठेवलं पाहिजे.

a young man told a list of reasons why he can not leave Pune
Pune : “मी पुणे सोडू शकत नाही” ‘ही’ कारणे देत तरुणाने स्पष्टच सांगितले, पाहा Viral Video
Video Of Newborn Baby Holding Mothers Face Everyone Is Shocked
Video: यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही! नवजात बाळानं आईला मारली मिठी अन् क्षणात…
how to check purity of wheat flour
Kitchen Jugaad : गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, कसे ओळखायचे? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

ताणतणाव, एकटेपणाची कारणं
* संकोचलेपणा, न्यूनगंड
* वाढत्या अपेक्षांचं ओझं
* चुकीच्या गोष्टींबाबतचं वाढतं कुतूहल
* सोशल नेटवर्किंग साइट्सचा वाढता गैरवापर
* करिअर, रिलेशनशिप्स, भविष्याबद्दलचा संभ्रम
* कुटुंब, मित्रमैत्रिणींमध्ये मुक्त संवादाचा अभाव

स्ट्रेस मॅनेजमेंट
* जवळची व्यक्ती, आईवडील, मित्रमैत्रिणींशी मोकळा संवाद साधा
* करिअरबाबत विचार करताना आपली बुद्धिमत्ता, कल, व्यक्तिमत्त्वही ध्यानात असू द्या.
* अपेक्षा आणि अटींच्या चौकटीत स्वत:ला पाहू नका.
* योग्य तो व्यायाम व डाएट फॉलो करा
* आवडीनिवडींशी तडजोड करू नका