उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय. एरवी दुपारी १२ वाजता तापणाऱ्या सूर्याचे चटके सध्या सकाळी १०-११ वाजतासुद्धा कडक जाणवत आहेत. अशा रणरणत्या उन्हात जिभेला व मनाला थंडगार चटका देणारा आणि सर्वाचा लाडका पदार्थ म्हणजे ‘आइस्क्रीम’ होय. उन्हाळ्याच्या निमित्ताने खास व्हिवा वाचकांसाठी शेफ विष्णू मनोहर यांनी त्यांच्या पोतडीतल्या होममेड आइस्क्रीमच्या झटपट व सोप्या रेसिपी शेअर केल्या आहेत.

आइस्क्रीम

घरगुती पद्धतीने आइस्क्रीम करताना सर्वप्रथम त्याचा बेस बनवून घ्यावा. एकदा जर का तुमचा बेस तयार असेल तर कुठल्याही फ्लेवरचे आइस्क्रीम आपण सहज तयार करू शकतो.

 

आइस्क्रीम बेस

साहित्य : म्हशीचे दूध-अर्धा लिटर, कॉर्नफ्लोअर – ४ चमचे, सीएमएस पावडर – चिमूटभर, जीएमएस पावडर – दीड चमचा, क्रीम – अर्धी वाटी, साखर – ५ चमचे, जिलेटीन : १० ग्रॅम (जिलेटीन घेताना ज्यावर शाकाहारी हिरवा मार्क असेल असाच विकत घ्यावा. तुम्ही शाकाहारी जिलेटीन वापरत असाल तर त्याला अगरअगर किंवा चायना ग्रास असे म्हणतात. पण याचे प्रमाण दुप्पट घ्यावे लागते. )

कृती : सर्वप्रथम अर्धी वाटी पाणी गरम करून त्यामध्ये जिलेटीन विरघळवून घ्या. अध्र्या लिटर दुधातील अर्धी वाटी दूध बाहेर काढून ठेवा. बाकी दूध तापत ठेवून त्यामध्ये ५ चमचे साखर घाला. नंतर अर्धी वाटी दुधात कॉर्नफ्लोअर मिसळून ते मिश्रण हळूहळू उकळत्या दुधात एकत्र करा. घट्टसर होत आल्यावर गॅस बंद करा. नंतर पाव चमचे मीठ, सीएमएस पावडर, जीएमएस पावडर व तयार केलेले जिलेटीन घाला. नंतर मिश्रण थंड करून फ्रिजमध्ये ८ ते १० तास सेट करायला ठेवा. बाहेर काढून यामध्ये अर्धी वाटी फ्रेश क्रीम घालून भरपूर फेटा. मिश्रण फुगून वर येईल. नंतर पुन्हा ८ ते १० तास फ्रिजमध्ये ठेवून घट्ट करा.

 

मँगो मस्तानी

साहित्य : हापूस आंब्याचा रस- २ वाटय़ा, फ्रेश क्रीम- दीड वाटी, साखर- चवीनुसार, मीठ- चिमूटभर, कॉर्नस्टार्च- अर्धा चमचा.

कृती : सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरवर फिरवा. थंड करून मँगो मस्तानी प्यायला द्या.

 

मँगो आइस्क्रीम

साहित्य : आइस्क्रीम बेस- अर्धा किलो, मँगो पल्प- पाव किलो, हापूस आंब्याचे तुकडे- १ वाटी.

कृती : आइस्क्रीमचा बेस घेऊन मिक्सरमध्ये फेटून घ्या. नंतर त्यात मँगो पल्प घालून पुन्हा एकदा फेटा. नंतर हलक्या हाताने आंब्याचे तुकडे घालून एकत्र करा. नंतर त्याला फ्रिजमध्ये ३ ते ४ तास सेट करायला ठेवा.

 

शहाळ्याचे आइस्क्रीम

साहित्य : आइस्क्रीम बेस – अर्धा किलो, शहाळे – दोन वाटय़ा, कोकोनट इसेन्स – १ चमचा, साखर – १ चमचा.

कृती : शहाळे, साखर एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये आइस्क्रीम बेस घालून फिरवून घ्या. नंतर यात कोकोनट इसेन्स घालून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. सेट करताना शहाळ्याचे काही मोठे तुकडेसुद्धा आतमध्ये घाला.

 

बटर स्कॉच आइस्क्रीम

साहित्य : आइस्क्रीम बेस- अर्धा किलो, बटर स्कॉच इसेन्स- १ चमचा, साखर- १ वाटी, भाजलेले अक्रोड, बदाम- अर्धी वाटी, पिवळे बटर – १ चमचा.

कृती : पिवळे बटर, साखर व २ चमचे पाणी एकत्र करून १५ ते २० मिनिटे वितळवून घ्या. ते साधारण कथ्थ्या रंगाचे झाले की त्यामधे अक्रोड व बदामाचे तुकडे घाला. हे मिश्रण एका पाटावर पसरवून ठेवा. थोडय़ा वेळाने थंड झाल्यावर मोडून छोटे-छोटे तुकडे करा. आइस्क्रीम बेस मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यामध्ये बटर स्कॉच इसेन्स थोडा कथ्था रंग किंवा कॅरामलचे पाणी घाला. नंतर यात तयार केलेले बदाम-अक्रोडचे तुकडे घालून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.

 

हनी व्हॅनिला आइस्क्रीम

साहित्य : आइस्क्रीम बेस – अर्धा किलो, व्हॅनिला इसेन्स – दीड चमचा, मध – ५ चमचे.

कृती : आइस्क्रीम बेसमध्ये व्हॅनिला इसेन्स मिसळून एकत्र करा. नंतर यावर मधाची धार सोडताना पूर्ण भागावर फिरवा म्हणजे सगळीकडे मधाचा स्वाद लागेल. हे मिश्रण न हलवता पाच ते सहा तास फ्रिजमध्ये सेट करून ठेवा.

 

स्ट्रॉबेरी आइस्क्रीम

साहित्य : आइस्क्रीम बेस- अर्धा किलो, फ्रेश स्ट्रॉबेरी- २ वाटय़ा, साखर- पाऊण वाटी, बिटाचा रस- पाव चमचा, स्ट्रॉबेरी इसेन्स- अर्धा चमचा.

कृती : सर्वप्रथम आइस्क्रीम बेस मिक्सरमध्ये फिरवून घ्या. एका भांडय़ात साखर, स्ट्रॉबेरी एकत्र करून शिजवून घ्या. यातच थंड झाल्यावर स्ट्रॉबेरी इसेन्स व बिटाचा रस घालून हे मिश्रण आइस्क्रीम बेसमध्ये ओता. दोन्ही मिश्रण एकत्र करून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. साधारण ३ ते ४ तास. तुमचे स्ट्रॉबेरी आइस्क्रीम तयार आहे.