रेल्वे रुळांवर काम करणारा मजूर, मसणजोगी समाज, मतिमंदत्व, मल्टिपल पर्सनॅलिटी, रॅशनल सेल्फिशनेस, देशप्रेम, हिंदू-मुस्लिम संघर्ष, अतिरेकी आणि बलात्कारी ठरणाऱ्याची मानसिकता अशा वेगळ्या धाटणीच्या, समाजभान असलेल्या एकांकिका या वेळच्या पुरुषोत्तम करंडक स्पध्रेत अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षांतील या स्पध्रेविषयी..
पुण्यातली तमाम नाटय़वेडी तरुणाई ज्या स्पर्धाची आतुरतेने वाट पाहते, त्यामध्ये पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा उल्लेख अनिवार्य आहे. पुरुषोत्तम म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते तरुणाईनं फुललेलं भरत नाटय़मंदिर, आपापल्या कॉलेजला चीअर करण्यासाठी आलेले विद्यार्थी, तिसरी घंटा वाजताच शांत होणारी त्यांची शिस्त..आणि नवनवीन विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या एकांकिका! १९६३ मध्ये सुरू झालेल्या करंडकाचं यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. गेल्या ५० वर्षांत डॉ. जब्बार पटेल, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, उपेंद्र लिमये, सुबोध भावे, प्रसाद ओक, वैभव तत्त्ववादी, लोकेश गुप्ते अशा अनेक मातब्बर कलाकारांनी कॉलेज जीवनात पुरुषोत्तमचा रंगमंच गाजवलेला आहे. अंतिम फेरीत निवडलेल्या ९ संघांमध्ये आजपासून करंडकासाठीची स्पर्धा रंगणार आहे. यंदा आश्चर्यकारकरीत्या पुरुषोत्तमवर मक्तेदारी सांगणाऱ्या नेहमीच्या सर परशुरामभाऊ, फग्र्युसन, सीओईपी आदी मातब्बर कॉलेजना अंतिम फेरीतदेखील पोहोचता आलेलं नाहीये. एकांकिकेचा विषय, त्याचा प्रवास तसंच त्यामागचा विचार जाणून घेण्यासाठी या नऊ फायनलिस्ट्च्या दिग्दर्शकांना आम्ही बोलतं केलं.

हिय्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय.
दिग्दर्शक :  दीपक बाविस्कर
‘रेल्वे रुळावर दगड टाकणारे- पोल खणणारे किंवा तत्सम काम करणारे अनेक कामगार आपण आजूबाजूला पाहतो, परंतु हादेखील एक स्वतंत्र समूह असतो आणि त्यांच्या जगण्याची पद्धत-आपापसातील संबंध यांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न आम्ही एकांकिकेतून केलाय.गोष्ट गुंतागुंतीची न करता साध्या पण सुबक पद्धतीनं मांडायचा आमचा प्रयत्न आहे.’

मळभ एमआयटी अभियांत्रिकी कॉलेज
दिग्दर्शक : शुभेंदू लळीत
‘रॅशनल सेल्फिशनेसवर भाष्य करणारी आमची एकांकिका आहे. मुंबईमध्ये राहणारा एक मतिमंद भाऊ व त्याचे दादा-वहिनी यांचं भावनिक नातं दाखवलंय. काही काळाने परिस्थितीमुळे त्याचे दादा-वहिनी त्याचा सांभाळ करण्यास असमर्थ होतात. परंतु हे दाखवताना आपल्याला कुठेही ते निगेटिव्ह भूमिकेत वाटत नाहीत उलट आपणही कुठेतरी तो रॅशनल सेल्फिशनेस मान्य करतो.’

बॉर्न वन  आयएमसीसी
दिग्दर्शक : अजिंक्य गोखले
‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर आणि क्लायमॅक्स याचं अफलातून कॉम्बिनेशन या एकांकिकेद्वारे मांडलं आहे. उत्तम नाटय़मयता, अभिनयाला असणारा वाव, पात्रांच्या विविध छटा यामुळे एकांकिकेला विशेष रंगत आलीये’.   

खौंफ सिंहगड अभियांत्रिकी,  
दिग्दर्शक : रोहन बनकर
हिंदू-मुस्लिम संघर्ष हा विषय अनेक एकांकिकांमधून मांडला गेला आहे. परंतु धर्माच्या भीतीपोटी माणूस अतिरेकाकडे कसा झुकू शकतो हे  ‘खौंफ’ या एकांकिकेमध्ये दाखवलं आहे. गुलजारांच्या एका कथेवर आधारित ही एकांकिका आहे. परंतु माणुसकीवरचा विश्वास दाखवणारा आशावादी शेवट करायचा प्रयत्न आम्ही केलाय.’

सीन ऑफ सिन अभिनव कला महाविद्यालय
दिग्दर्शक : हर्षवर्धन जाधव व ओमकार मरकळे
‘बलात्कारासारख्या घटनांमध्ये गुन्हेगाराचीदेखील एक बाजू असते व ती बाजू प्रचंड त्रासदायक किंवा अनपेक्षित असू शकते हे  ‘सीन ऑफ सिन’ या एकांकिकेतून समोर येतं. बऱ्याचदा मुलींना छेडछाडीकडे दुर्लक्ष करायला सांगितलं जातं त्यामुळे गोष्टी अजून अवघड होतात, हे आपल्या लक्षात येत नाही. बलात्कारी जन्मत:च कोणी नसतो. समाज आणि परिस्थिती असे गुन्हेगार तयार करतात. या सगळ्या गोष्टी नीट समजावून घेऊन त्यावर विचार केला गेला पाहिजे असा आमचा उद्देश आहे.’

रूह हमारी गरवारे वाणिज्य महाविद्यालय
दिग्दर्शक : नितीश रत्नपारखी
‘आपण शाळेत १० वर्षे प्रतिज्ञा म्हणतो परंतु आपल्याला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत नसतात. या एकांकिकेच्या माध्यमातून देशाबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या एका तरुणीला प्रतिज्ञा जाणून घेण्याची संधी मिळते व तिचं मनपरिवर्तन होऊन ती भारतात राहायचा निर्णय घेते. हा एक सामाजिक मुद्दा आहे, परंतु आम्ही कोणताही उपदेश देण्याच्या फंदात न पडता एक कथा म्हणून तो मांडला आहे.’

‘कडिमचे’ एमआयटी महाविद्यालय.
दिग्दर्शक : साईनाथ गणूवाड.
‘या एकांकिकेतून समाजाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या जमाती व आरक्षण मिळूनही त्यांना त्याचा लाभ का घ्यायचा नसतो हे मांडायचा प्रयत्न केला आहे. मसणजोगी जमातीभोवती ही कथा फिरते व आपण अनभिज्ञ असलेल्या समाजाच्या अनेक पलूंचे दर्शन यामार्फत आपल्याला होते.’

चिठ्ठी
आयएलएस लॉ कॉलेजची चिठ्ठी नावाची एकांकिता एका गावच्या मास्तरांच्या अशिक्षित बायकोभोवती फिरते. मास्तर घरात नसताना एक  बाई येऊन चिठ्ठी देऊन जाते. ‘माझा होकार आहे’ अशा आशयाची चिठ्ठी आल्याचं तिला कळतं आणि नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर प्रकरण असल्याचा संशय तिला येतो. चिठ्ठी वाचता आली पाहिजे या जिद्दीनं मग ती लिहायला वाचायचा शिकते. मास्तर बाहेरगावहून आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो. संपूर्ण नाटकात मास्तरांच्या बायकोचा गैरसमज छान फुलवला आहे.

लुकिंग बीयाँड
कावेरी कॉलेजच्या  या एकांकिकेत स्किझोफ्रेनिया झालेल्या मुलाची गोष्ट आहे. क्लायमॅक्सला भास कोणते आणि सत्य कोणते हे उघड होते. समाजातील प्रचलित पद्धतींना विरोध करताना आभास- भास यांचा खेळ रंगत जातो. ओंकार पेंडसे नाटकाचा दिग्दर्शक आहे.
अंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या सगळ्या एकांकिका सामाजिक जबाबदारीचं भान दाखवतात. समाजातले काही महत्त्वाचे विषय, दुर्लक्षित मुद्दे अतिशय वेगळ्या प्रकारे हाताळण्यात तरुणाईला यश येतंय हे या विषयांमधून दिसून येतं. अतिशय कसून तयारी केलेल्या आणि नवी दृष्टी घेऊन रंगमंचावर अवतरलेल्या ९ संघांपकी एकाचंच नाव सुवर्णाक्षरात पुरुषोत्तमच्या इतिहासात मानाने नोंदवलं जाईल. तरी सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या स्पध्रेचा भन्नाट अनुभव सर्वासाठीच अविस्मरणीय असेल एवढे मात्र नक्की!!

आरोह वेलणकर (चित्रपट : रेगे)
माझी अभिनयाशी ओळख पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमुळे झाली. या स्पर्धेनं मला नाटकाचं वेड लावलं. काय करायला पाहिजे आणि काय नाही, याची क्लॅरिटी दिली. स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढला. अभिनयाबरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम वर्क या गोष्टी शिकता आल्या. नाटकाचा खूप छान ग्रूप झाला. आयुष्यभराचे मित्र मिळाले. पुरुषोत्तमला माझ्या लेखी अगदी हृदयाजवळची जागा आहे.

आलोक राजवाडे (चित्रपट : रमा माधव)
एखादी स्पर्धा सलग ५० वर्षे तितक्याच उत्साहात पार पडते ह्य़ातच ‘पुरुषोत्तम’चं कौतुक आहे. माझ्या मते, पुण्यात आजही नाटक संस्कृती आवडीने जोपासली जाते, याचं श्रेय कुठेतरी पुरुषोत्तम सारख्या स्पर्धाना जातं. माझ्या लेखी, पुरुषोत्तम करंडक ही एक सांस्कृतिक चळवळ आहे आणि माझ्यासारख्या कलाकाराला त्यातून अनेक गोष्टी नव्याने करता आल्या. तसंच खूप काही शिकता आलं. कलाप्रांतात महत्वाची असणारी ‘शिस्त’ ही ‘पुरुषोत्तम’दरम्यान शिकलेली महत्त्वाची गोष्ट आहे.