परेश कुलकर्णी

दिवस कसे पटापट जातात ते कळत नाहीत.. तब्बल सहा वर्ष झाली आहेत डब्लिनमधल्या माझ्या वास्तव्यास. अजूनही आठवतो आहे तो पहिलावहिला आंतरराष्ट्रीय विमानप्रवास. दीड वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रथमच घरापासून दूर राहण्याची वेळ असल्यामुळे वाटलेली थोडीशी हुरहुर, परदेशी जाण्याची उत्सुकता, परदेशी विद्यापीठात उच्चशिक्षण घ्यायच्या स्वप्नाच्या वाटचालीचा श्रीगणेशा होत असल्याचा आनंद आणि तेव्हा नवख्या वाटणाऱ्या जीवनमानाविषयीचं कुतूहल अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या होत्या. मी ‘डब्लिन बिझनेस स्कूल’मध्ये फायनान्समध्ये एमबीए करायला निघालो होतो. परदेशी शिक्षण घ्यायचं असं स्वप्नबिप्न नव्हतं. उलट मी परदेशी जायच्या विरोधात होतो, पण अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेलेल्या मित्रांचे अनुभव ऐकून प्रभावित झालो आणि हा निर्णय घेतला.

मी मूळचा पुण्याचा. पदवीपर्यंतचं शिक्षण, पहिली नोकरी.. पुण्यातच असल्यामुळे पुण्याबाहेर जायची संधी मिळालीच नाही. त्यामुळे घराच्या सुरक्षित भिंतींबाहेर डोकावून, खंबीरपणे एकटं राहून, स्वत:ची जबाबदारी घेऊन स्वत:लाच पडताळायचं होतं. ही संधी डब्लिनमुळे मिळाली. इथे यायच्या आधी जगाबद्दलचा दृष्टिकोन संकुचित होता. इथल्या वास्तव्यामुळे आयुष्य, समाजाबद्दलच्या अपेक्षा बदलल्या, विचारांच्या कक्षा रुंदावून ते प्रगल्भ आणि परिपक्व झाले. स्वत:ची मतं निर्भयपणे मांडण्याचा आत्मविश्वास डब्लिनने दिला. हा निर्णय घेतला तेव्हा बाबा निवृत्त झाले होते. आई नोकरी करत होती. त्यामुळे त्यांना माझी गरज असतानाच मी परदेशी आलो आहे, अशी अपराधीपणाची टोचणी मनाला लागायची. त्यांनी कधीच मला तसं वाटू दिलं नाही. मानसिक, भावनिक, आर्थिक बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला. आता लहान बहिणीने घराची जबाबदारी पूर्णपणे घेतली आहे.

खरं तर एकटं राहणं किंवा स्वत: स्वयंपाक करणं, इथल्या लोकांचा ‘अ‍ॅक्सेंट’ समजणं किंवा मास्टर्सचा अभ्यास झेपणं या सर्व गोष्टींचं थोडंसं दडपण होतं, पण सगळ्यात मोठं आव्हान ठरलं ते म्हणजे हवामान. उणे २ ते १० अंश सेल्सिअस इतक्या गोठवणाऱ्या थंडीने पहिल्याच दिवशी स्वागत केलं आणि खऱ्या अर्थाने ‘दातखिळी बसणे’ याचा शब्दश: प्रत्यय आला. सुरुवातीचे काही दिवस धडपडीचे गेले. कालांतराने सगळ्या गोष्टींशी मिळतंजुळतं घेत प्रवास सुरू झाला. त्या दरम्यान, ‘इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल’मध्ये ‘फू ड अ‍ॅण्ड बेव्हरेज’ असोसिएटचं काम करत होतो. कालांतराने फायनान्समधला अभ्यासक्रम पूर्ण झाला. दरम्यान, मी अमेरिकन ‘होम मॉर्टगेज’ या अमेरिकन कंपनीत सीनिअर फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट म्हणून तब्बल तीन वर्ष काम करत होतो. मात्र नंतर जाणवलं की, स्वत:ला आणखी अपडेट करायची गरज आहे. हातातली नोकरी सोडून पुन्हा शिक्षणाकडे वळणं सोपं नव्हतं, पण कदाचित आताशा आव्हानं स्वीकारायची सवयच झाली आहे. सध्या मी ‘आयसीडी बिझनेस स्कूल’मधून ‘मास्टर्स इन अकाऊंटिंग’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम शिकतो आहे. या शिक्षणामुळे करिअरच्या आणखी संधींची प्रवेशद्वारं खुली होतील, अशी आशा आहे.

‘मास्टर्स इन अकाऊंटिंग’ हा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. यूके आणि युरोपमध्ये सर्वात उच्च म्हणजेच ‘लेव्हल ९’ समजला जाणारा हा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचं चांगलं मार्गदर्शन लाभतं. माझे सुपरवायजर प्राध्यापक लिअम पॉल हे ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’चे माजी विद्यार्थी आहेत. एक चांगला शिक्षक होणं किती महत्त्वाचं असतं हे त्यांच्याकडे पाहून कळतं. पॉल यांचे विचार सुस्पष्ट असतात. त्यांचं विषयाचं सखोल ज्ञान, उत्तम भाषाज्ञान आणि अभ्यासविचार खेळीमेळीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य वादातीत आहे. नुसती पुस्तकी ज्ञानाची चौकट न आखून देता त्याचा मूळ गाभा समजावून देत विद्यार्थ्यांना त्याबद्दल संशोधन करायला लावून, त्याची माहिती गोळा करायला सांगून विद्यार्थी स्वअभ्यासासाठी तयार करण्याची कला त्यांना अवगत आहे. कदाचित त्यामुळेच संशोधन करता करता नकळत त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी कधी लागते हे त्यांनाही समजत नाही. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांची सांगड घालत रंजक पद्धतीने व्याख्यान देण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. इथे लेखी परीक्षांपेक्षा असाइनमेंटवर खूप भर असतो. त्यामुळे ग्रंथालयात तासन्तास बसून केलेला अभ्यास, अनुभवी तज्ज्ञांना भेटून घेतलेली माहिती आणि त्यांचे अनुभव हे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचे आहेत. आमच्या वर्गात भारतीय, आयरिश, ब्रिटिश, पोलिश, फ्रेंच, पाकिस्तानी, नेपाळी, आफ्रिकन आदी देशांमधले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येकाचे अनुभव, पार्श्वभूमी खूप वेगवेगळी आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून, गप्पांतून त्यांच्या विश्वाची तोंडओळख होते आहे.

इथले सगळेच विद्यार्थी शिक्षण घेताना अर्धवेळ नोकरी करतात. स्वत:च्या अभ्यासाची आणि निवासाची जबाबदारी लहान वयातच उचलली जाते. वयाच्या अठराव्या वर्षी मुलांनी घर सोडल्याने मिळणारं स्वातंत्र्य, त्याबरोबर आलेली जबाबदारी आणि स्वावलंबी जीवन जगण्याची पद्धत आत्मसात केली जाते. पालक मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत नाहीत. त्यामुळे त्यांना मतस्वातंत्र्य मिळतं, मात्र लवकर घराबाहेर पडण्यामुळे काही वेळा नुकसानही होऊ  शकतं. लहान वयात कुसंगती लागल्याने व्यसनी होण्याची शक्यता असते. इथे प्रत्येक कामाला समान दर्जा दिला जातो. ही गोष्ट पचवणं सुरुवातीला मला थोडंसं कठीण गेलं, कारण आपल्याकडे अशी पद्धत नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये चहाचं काळं झालेलं पातेलं किती घासूनघासून काढावं लागायचं. तेव्हा आठवलं की, पुण्यात असताना किती तरी वेळा चहाचं पातेलं गॅसवर ठेवून मॅच बघायचो किंवा सतत फोनवर बोलत असायचो. आमच्याकडे काम करायला येणाऱ्या काकू  मला त्याबद्दल नेहमी सांगायच्या. त्याकडे मी कानाडोळा करायचो. इथे पहिल्यांदा चहाचं पातेलं घासायची वेळ आली, तेव्हा मनात फार अपराधी भाव दाटून आला. लगेच दुसऱ्या दिवशी आईला फोन लावला आणि काकूंना सॉरी म्हणून त्यांची माफी मागितली..

जवळपास दिवसभर आम्ही अभ्यासातच व्यग्र असतो. लेक्चरनंतर ग्रंथालयामध्ये असाइनमेंटसाठी संदर्भ शोधतो. घरी येताना रोजचं सामानसुमान आणतो. घरी आल्यानंतर स्वयंपाक आणि घरकाम करतो. भारतात कधीही स्वयंपाकघरात न फिरकलेल्या मला आता स्वयंपाकाची चांगलीच गोडी लागली आहे. इथे आल्यावर सँडविचेस, मॅगी अशा झटपट होणाऱ्या पदार्थाशी असलेली ओळख आता थालीपीठ, छोले-भटुरेपासून ते पास्ता, लसानिया अशा पदार्थागणिक वाढत चालली आहे. या पाच वर्षांत डब्लिनने आर्थिक शिस्तीचे खूप धडे दिले. सुरुवातीला अर्धवेळ नोकरी करत असल्याने पैशांची गणितं सोडवणं अवघड काम असे. महिन्याच्या घरभाडय़ापासून ते मोबाइलच्या बिलापर्यंत अनेक गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता. रोज बाहेरचं जेवण परवडत नसल्यामुळे स्वयंपाक शिकावा लागला. मात्र नाइलाजाने का होईना शिकलेला हा स्वयंपाकच आज सगळ्यात मोठा स्ट्रेसबस्टर ठरला आहे. परदेशात साधारण प्रत्येकाला आपापले सामाजिक भान आणि जबाबदारीची पूर्णपणे माहिती असते आणि त्यानुसार सगळे नागरिक वर्तन करतात. मनोरंजनासाठी चटकन पसंती दिली जाते ती पब्जना. आपल्यापैकी काहींना पब्ज म्हणजे दारूभट्टी असं वाटतं, पण पब्जचं अस्तित्व त्याहीपलीकडे आहे. समाजातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचं मनोरंजन पबमध्ये होतं. वैचारिक गप्पा, राजकारणी चर्चा, सामाजिक वादविवाद, फुटबॉल-क्रिकेटचं थेट प्रक्षेपण किंवा वीकेंड्समध्ये असलेले लाइव्ह म्युझिकल बँड्स यामुळे पब्जची क्रेझ पन्नास वर्षांहून अधिक काळ कायम आहे.

या काळात आलेले नाना अनुभव मला माणूस म्हणून घडवायला फार महत्वाचे ठरले. सुरुवातीला मीही थोडासा काही बाबतींमध्ये ठाम, पूर्वग्रह असणारा होतो. मात्र अनेकांच्या भेटीगाठी होत गेल्या तसतसा मी अनुभवसमृद्ध होत गेलो. देश, वर्ण, आर्थिक परिस्थिती, लिंगभाव यांचा साचेबद्ध रीतीने विचार न करता माणूस म्हणून प्रत्येकाला दिला जाणारा आदर हे खऱ्या अर्थाने सुशिक्षितांचं लक्षण वाटतं. इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक न खुपसता, कुणाच्या वैयक्तिक आवडीनिवडीवरून त्याची पारख न करता तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, हे पाहिलं जातं. हा अनुभव अगदी नवीन आणि नकळत बरंच काही शिकवणारा होता. नोकरीच्या ठिकाणीही वशिला किंवा व्यक्तीची पार्श्वभूमी न बघता उमेदवाराची प्रतिभा, गुणवत्ता आणि मेहनतीमुळे मिळणारी संधी नैतिक आणि योग्य वाटते. मधल्या काळात दोनदा भारतात येऊन गेलो. २०१५ मध्ये आईच्या कार्यालयीन निरोप समारंभाच्या वेळी बहिणीच्या मदतीने आवर्जून हजर राहिलो होतो आणि आईबाबांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. हा अभ्यासक्रम संपल्यावर काही वर्ष व्यावसायिक अनुभव घेऊन भारतात परतायचा विचार आहे.

परदेशी एकटं राहणं वाटतं तितकं सोपं नाही. नुसत्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरच्या चकचकीत छायाचित्रांना बळी पडू नका. इथल्या वास्तव्यात खूप मेहनत आणि चिकाटीची गरज असते. अनेक मानसिक, आर्थिक तडजोडी कराव्या लागतात. समोरच्या व्यक्तीबद्दल आदर, करुणा, संवेदनशीलता, माणुसकी आणि जगाकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन हा खऱ्या अर्थाने आपल्याला जागतिक नागरिक म्हणून घडवतो. आतापर्यंतच्या प्रवासात खूप चांगलेवाईट अनुभव आले आहेत. केवळ एकेक शैक्षणिक पदवी वाढून उच्च पदवीधर न होता खऱ्या अर्थाने एक चांगला माणूस म्हणून घडणं, ही गोष्ट माझ्या लेखी अतिशय महत्त्वाची आहे. माझा आजवरचा प्रवास लक्षात घेता मला वाटतं की, येस्स.. आय कॅन डू इट!

कानमंत्र

* माझे प्राध्यापक जेम्स फ्लायन यांनी ‘नो द रुल्स ऑफ द गेम’ असा सल्ला मला दिला होता. हाच सल्ला मी आता इतरांनाही देतो.

*ल्ल रोज नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम तयार राहा. ‘व्हाय नॉट? इन्स्टेड ऑफ व्हाय मी?’ हा मूलमंत्र मी अंगीकारला आहे. याच सकारात्मक दृष्टिकोनामुळे मी बरीच आव्हानं पेलली आहेत. कोणत्याही गोष्टीचा अनुभव हा कधी ना कधी पहिलावहिला असतोच. तो खूप काही शिकवणारा असतो. सो, इन्स्टेड ऑफ व्हाय मी? टर्न इन टू व्हाय नॉट..

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com