02 June 2020

News Flash

जगाच्या पाटीवर : लक्ष्य व्हाईट कोटचं

अवघ्या अठरा वर्षांच्या मुलावर विश्वास दाखवून त्याला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देणं, ही मोठी गोष्ट होती.

(संग्रहित छायाचित्र)

पार्थ दळवी

मी खोपोलीचा राहणारा. तिथल्या जनता महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीपर्यंत शिकलो. तोपर्यंत वैद्यकीय व्यवसायात यायचं हे नक्की ठरलं नव्हतं. बाबांनी लावलेल्या वाचनाच्या गोडीमुळे भोवतालच्या घडामोडींबद्दल कायम अपडेट राहिलो. सीईटीसाठी ठाण्याला क्रॅश कोर्स केला. तिथल्या काही प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे वैद्यकीय शाखेत जायचा निर्णय पक्का केला. मात्र सीईटीत आवश्यक ते गुण न मिळाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला नाही. तेव्हा मेडिसिनची मुलं चीन, रशिया आदी देशांत शिकायला जात होती आणि अजूनही जातात. त्यांना इथे येऊ न परीक्षा द्यायला लागते. त्या परीक्षेचा निकाल कडक लागतो. थोडी चौकशी केल्यावर जर्मनीतही संधी असल्याचं कळलं. तिथे सरकारी शिष्यवृत्ती मिळते, फी माफ आहे आणि सगळा अभ्यासक्रम जर्मन भाषेमध्ये आहे. या भाषेच्या मुद्दय़ावर अनेकांचं गाडं अडतं. माझा सीईटी पुन्हा द्यायचा विचार सुरू होता, तेव्हा बाबांनी जर्मन भाषा शिकण्याविषयी सुचवलं. ठाण्यातल्या क्लासमध्ये जर्मन शिकू लागलो. जर्मनच्या ए२ लेव्हलपर्यंत परीक्षा दिल्या. मात्र जर्मनमधून वैद्यकीय शिक्षण घेऊ  शकेन की नाही, हे तेव्हा निश्चित सांगणं कठीण होतं. जर्मनीतला वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणारं कुणी आहे का, याचा शोध सुरू होता. सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी विचारणा केल्यावर वैद्यकीय क्षेत्रात जाऊ  नकोस, कठीण असतं प्रवेश मिळणं, असाच सल्ला मिळत होता. शेवटी एकाशी संपर्क झाला. आम्हाला मिळालेली माहिती पडताळली. भाषेवर पकड आणि सबुरी असणं महत्त्वाचं आहे, असा महत्त्वाचा सल्ला त्यानं दिला. दरम्यान घरात आमची याविषयी सतत चर्चा सुरू असायची. मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं. त्याबद्दल घरच्यांशीही बोलणं झालं. ‘निर्णय घ्यायला हवा तितका वेळ घ्या, पण तो घेतल्यावर मागे फिरू नका,’ असं बाबांचं मत होतं. अवघ्या अठरा वर्षांच्या मुलावर विश्वास दाखवून त्याला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देणं, ही मोठी गोष्ट होती.

फेब्रुवारीमध्ये मी हायडेलबर्गमधल्या एफ. यू. यू. या खासगी भाषाशाळेत अर्ज केला. पुढे व्हिसासाठी अर्ज केला. व्हिसा मिळाल्याने लगेच तिकीट काढलं. तिथे सहा महिने शिकलो. इथे आलो तेव्हा कुणीच ओळखीचं नव्हतं. जवळपास दीड महिना मी होमसिक झालो होतो. हॉस्टेलमध्ये राहिलो. हळूहळू स्थिरावलो. भाषा शिकलो होतो तरी गप्पा मारायला जमायचं नाही. मित्रांशी संवाद, मालिका बघणं इत्यादी माध्यमांतून भाषा शिकत राहिलो. सराव करत राहिलो. एकूण सहापैकी साडेचार लेव्हल पूर्ण झाल्या. सप्टेंबरच्या सत्रात प्रवेश घ्यायला जुलैपर्यंत अर्ज करावा लागतो. मात्र तेव्हा माझ्या या लेव्हल पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यानंतर भारतात येऊ न गेलो. जानेवारीत जर्मनीत येऊन परीक्षा दिली आणि माझी निवड हॅनोवरमधल्या लोअर सॅक्सोनी स्टुडिओनकोलेगमधल्या अभ्यासक्रमासाठी झाली. नवीन शहरात घर शोधण्यापासून सुरुवात करायची होती. तिथे स्टुडण्ट कम्युनिटीच्या घरात इतर विद्यार्थ्यांसोबत राहायची सोय असते. त्यामुळे जर्मन संस्कृती, परंपरा शिकायला मिळतात. व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यात विविध विद्याशाखांचे विद्यार्थी असतात. मला स्पोर्ट्स कम्युनिटीमध्ये राहायची संधी मिळाली. त्यामुळे जर्मन विद्यार्थ्यांची जीवनशैली आणि आचारविचार-दृष्टिकोन कळला. माझी जर्मन भाषा खूप सुधारली.

मला प्रवेश मिळेल, याची खात्री वाटत नव्हती. माझ्या आगेमागे आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणाला प्रवेश मिळाल्याचं दिसत नव्हतं. मला मेडिसिनच पाहिजे, असा माझा अट्टहास नव्हता. मला मेडिसिन किंवा अन्य क्षेत्रांचा विचार करता येणार होता. शिवाय काही अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट दिल्यानेही गुण वाढतात. त्यात मला चांगले गुण मिळाले. वर्षभराचं शिक्षण संपल्यावर मला दोन महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्यातील कोलोनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोन’ निवडली. मात्र लगेचच्या सत्रात प्रवेश मिळाला नाही. मग त्या वेळेचा सदुपयोग नोकरीसाठी केला. फोक्सवॅगन कंपनीच्या प्लाण्टमध्ये दोन महिने लेझर कटिंग विभागात नोकरी केली. चांगला अनुभव मिळाला. थोडे पैसे गाठीशी जमले. त्यातून मी पहिला स्मार्टफोन घेतला. जवळपास वर्षभराने घरच्यांशी समाजमाध्यमाद्वारे संपर्क साधता आला. पुढे कोलोनला राहायला आलो. खरं तर इथे प्रवेश मिळाल्यावर घरच्यांचा जीव भांडय़ात पडला. पण मला माहिती होतं की, आता खरी कसोटी सुरू होणार आहे. इथे प्रवेश मिळाल्यानंतर जवळपास ४० ते ५० टक्के विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण न करताच सोडतात. त्यात जर्मन किंवा अन्य देशांतले विद्यार्थी असतात. एक सत्र (सहा महिने) फक्त अन्य देशांतल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलं होतं. खरं तर मी स्टुडिओन कॉलेजमध्ये शिकलो असल्याने मला त्याची गरज नव्हती. तरीही मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोन’मध्ये ‘स्टुडिओन स्टार्ट इंटरनॅशनल’च्या सत्राला हजेरी लावली. पुढे एप्रिल २०१६पासून माझा अभ्यासक्रम सुरू झाला. सध्या मी तिसऱ्या वर्षांला शिकतो आहे.

माझी मित्रमंडळी चीन, जॉर्डन, अल्बानिया, इराण, रशिया, युक्रेन आदी देशांतील आहे. सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या देशांमधले विद्यार्थी एकत्र आलो आणि नंतर पहिल्या सत्रात जर्मन विद्यार्थ्यांशीही ओळख होऊ न एकेक ग्रुप तयार होत गेले. आमच्या प्राध्यापकांपैकी काही प्राध्यापक अन्य देशांमधले असून त्यांनीही जर्मन भाषा शिकून घेतली आहे. त्यांना आणि जर्मन प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांच्या जर्मन भाषिक ज्ञानाची जाणीव असते. त्यामुळे ते आम्हाला समजून घेतात. व्याख्यानाला विद्यार्थीसंख्या खूप असल्याने सगळ्या प्राध्यापकांशी वैयक्तिक ओळख होतेच, असं नाही. जर्मनीतून चालणारी ही व्याखानं अगदी लक्षपूर्वक ऐकावी लागतात. काही वेळा म्हणी वगैरेंचा वापर केला गेल्यास ते समजायला थोडं कठीण जातं. भाषाशाळेत भाषा शिकलो, तरी तिचा प्रत्यक्ष वापर आणि तोही अभ्यासातला वापर कळणं कधीकधी अवघड ठरतं. त्यामुळे काही वेळा काही विद्यार्थी व्याख्यानांना न येता नोट्स ऑनलाइन वाचतात. वर्गातली हजेरी आवश्यक नाही. प्रॅक्टिकल-सेमिनार्ससाठी हजर असणं आवश्यक असतं. प्रॅक्टिकलच्या वेळी छोटे ग्रुप तयार केले जातात. शिवाय व्याख्यानांना सगळ्याच विद्यार्थ्यांना यायला जमतं असं नाही. उदाहरणार्थ, काही नर्स आमच्यासोबत शिकत आहेत. त्यांना त्यांची नोकरी-घर सांभाळून येणं शक्य होत नाही. वेगवेगळ्या वयोगटांतल्या, नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय क्षेत्राबद्दलची ओढ पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते.

आमचा अभ्यासक्रम एकूण पाच वर्षांचा आहे. एक वर्ष इंटर्नशिप असते. त्यात पहिली दोन वर्ष प्री-क्लिनिक आणि नंतरची तीन वर्ष क्लिनिक. अ‍ॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि सायकॉलॉजी-सोशोलॉजी या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरची एक परीक्षा द्यावी लागते. लेखी चार विषय आणि तोंडी परीक्षेला चारपैकी दोन विषय येतात. माझी ही परीक्षा मार्चमध्ये झाली. इथे पास किंवा नापास या दोनच गोष्टी आहेत. त्यात पुन्हा श्रेणी वगैरेचा विचार केला जात नाही. त्यानंतर एप्रिलमध्ये आमचा ‘व्हाइट कोट सेरेमनी’ हा क्लिनिकच्या वर्षांत गेल्याबद्दल समारंभ असतो. तेव्हा प्राध्यापक विद्यार्थ्यांना ‘व्हाइट कोट’ मिळतो. यानंतर अभ्यासात आणखी मजा येते आणि रस वाढू लागतो. पहिली दोन वर्ष साधारणपणे भारतातल्या अभ्यासक्रमासारखाच अभ्यासक्रम होता. प्रॅक्टिकलवर अधिक भर होता. रुग्णांची मानसिकता आणि सामाजिक स्तर समजून घ्यायला मिळाला. के वळ पुस्तकी ज्ञान अवलंबलं जात नाही. आता ‘क्लिनिक’च्या वर्षांत शारीरिक आजार, रोग, कमतरता याचा अभ्यास करतो आहे. आता प्रश्नोत्तरांपेक्षा रुग्णांचे रिपोर्ट आणि हिस्ट्री दिली जाते. त्यावरून रुग्णांच्या आजाराच्या निदानाचा निष्कर्ष काढायचा असतो. अशा परीक्षा आपल्याकडे एमडी, एमएसच्या वर्षांना असतात. अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळतील, असं दिसतं आहे. आम्हाला ठराविक टेक्स्टबुक नाहीत. संदर्भासाठी काही पुस्तकं सुचवली जातात. सुरुवातीला या गोष्टी अवघड गेल्या. मात्र त्यामुळे आपसूकच स्वअभ्यास, ग्रंथालयाचा वाढता वापर, इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणं या गोष्टी होत गेल्या. त्यामुळे त्या विषयाचा अंदाज येऊ न त्या त्या संकल्पना स्पष्ट होतात.

काही वेळा घेतल्या जाणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षेत विद्यार्थी डॉक्टरची भूमिका बजावतात. विद्यापीठातर्फे  काही कलावंत निवडले जातात. ते रुग्ण असल्याचं नाटक करतात. त्यावरून त्यांच्या आजाराचं निदान, विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता आदी मुद्दे विचारात घेतले जातात. या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक वेगळी इमारत आहे. तिथे वेगवेगळ्या मजल्यांवर डमी ठेवलेल्या आहेत. विद्यार्थी तिथे जाऊ न प्रॅक्टिस करू शकतात. गेल्या वर्षी दिल्ली एम्सचे डीन आणि दोन प्राध्यापक इथली परीक्षा पद्धत जाणून घ्यायला आले होते. तेव्हा मला तिथे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बोलावलं होतं. वेळोवेळी निमंत्रित तज्ज्ञ आणि विद्वानांची व्याख्यानं होतात. मात्र अनेकदा ही व्याख्यानं परीक्षेच्या काळात किंवा दोन सत्रांमधल्या सुट्टीत असतात. एरवी शक्य असेल तेव्हा ती ऐकायला जातो. कॅम्पसमध्ये सतत काही ना काही इव्हेंट होतात. त्यात सामील व्हायला आम्हाला वेळच मिळत नाही. सवड असेल तेव्हा गिटार वाजवतो. ‘साऊ थ एशियन स्टुडण्ट असोसिएशन’तर्फे  काही इव्हेंटचं आयोजन होतं. त्यात योग सेमिनार, शास्त्रीय नृत्य, संस्कृती ओळख आदी कार्यक्रम सादर होतात. त्यासाठी विद्यापीठाचं आर्थिक साहाय्य मिळतं. या असोसिएशनमध्ये मी कार्यरत आहे. जर्मन कम्युनिटीत असताना फुटबॉल, टेनिस, बॅटमिंटन खेळायला आणि जिममध्ये जायचो. फुटबॉल शिकताना फार मजा आली. वेळ मिळाला तर क्रिकेटही खेळतो. सध्या एका वृद्धाश्रमात वीकएण्डला नर्सिगचा जॉब करतो. त्यात वेळेची फ्लेक्सिबिलिटी आहे. आता वीकडेजला करता येईल, अशी नोकरी शोधतो आहे. म्हणजे स्वत:ला थोडा वेळ मिळेल. सध्या वेळात वेळ काढून फिरस्तीची आवड जोपासतो आहे.

‘फिफा वर्ल्ड कप २०१४’च्या वेळी जर्मनीत येऊन वर्ष झालं होतं. आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमाइतकं किंबहुना त्याहूनही थोडं अधिकच जर्मनीत फु टबॉलप्रेम आहे. जर्मन माणसं, स्थलांतरित, पर्यटक अशा सगळ्यांमधला भेदाभेद त्या काही आठवडय़ापुरता पुसट होऊ न ते केवळ फुटबॉलप्रेमी म्हणून एकत्र असतात. योगायोगाने तब्बल २४ वर्षांनी जर्मनीनं विश्वचषक जिंकला. हा आनंद मीही मित्रमंडळींसोबत एन्जॉय केला. आमच्यातल्या देशकाल, संस्कृती, विचार, मतं आदीमधला फरक कायम राहिला तरी

फुटबॉलप्रेमामुळे आम्ही साजरा केलेला तो भारलेला क्षण अविस्मरणीय ठरला आहे. लहान वयात इथे आल्याने अनेक गोष्टींचा मला चटकन अंगीकार-स्वीकार करता आला. पूर्वग्रह ठेवले नव्हते. इथे वेळेचं महत्त्व प्रचंड आहे, ते कळलं. चिकित्सकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि वास्तवाची जाणीव हे गुण गेल्या सहा वर्षांत अंगी बाणले गेले आहेत. आता पुढचा विचार करायला लागलो आहे. इथे डॉक्टरांची गरज असल्याने संधी मिळेल. पुढे स्पेशलायझेशन केल्यास भारतातही येऊ  शकतो. भारतात आल्यावर परीक्षा द्यायची अट असल्यास तीही तयारी आहे. स्पेशलायझेशन करणार हे नक्की. पुढेमागे युरोपीय देशांमध्ये जायची संधी मिळाल्यास त्या संधीचाही विचार करेन.

कानमंत्र

* नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अनुभवविश्वाचा आवाका विस्तारण्यासाठी पूर्वग्रहदूषित दृष्टी बाजूला सारा.

* संयम आणि चिकाटी हे गुण अंगी बाणवल्याने ध्येयाच्या दिशेची वाटचाल नक्कीच सुकर होईल.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 12:05 am

Web Title: jagachya pativar article parth dalvi abn 97
Next Stories
1 डिझायनर मंत्रा : ‘जडे’ घट्ट धरून ठेवणाऱ्या डिझायनर्स मोनिका शाह करिश्मा स्वाली
2 शेफखाना : वाट उद्योजकाची
3 गड दुर्गा
Just Now!
X