News Flash

खाऊचा कट्टा : स्वस्त आणि मस्त

आमच्या खाबू मोशायच्या ‘खाबूगिरी’वरून प्रेरणा घेऊन पुण्याच्या मैत्रिणींनी त्यांच्या शहरातले फेमस खाऊचे कट्टे शेअर केलेत. त्यातला हा पहिला कट्टा - हिराबाग चौक.

| September 20, 2013 01:03 am

आमच्या खाबू मोशायच्या ‘खाबूगिरी’वरून प्रेरणा घेऊन पुण्याच्या मैत्रिणींनी त्यांच्या शहरातले फेमस खाऊचे कट्टे शेअर केलेत. त्यातला हा पहिला कट्टा – हिराबाग चौक.
पूर्वी पुणं सायकलींचं शहर-पेन्शनरांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, आता आयटी हब-ट्रॅफिक सेंटर अशा अनेक नावांनी पुण्याला ओळखलं जात. पण इतक्या वर्षांत एक गोष्ट मात्र बदललेली नाही आणि ती म्हणजे पुणेकरांची खवय्येगिरी. पुणेकर पूर्वीही खवय्ये होते आणि आजही आहेत. पुणं म्हटलं की खाणं ओघाने आलंच. वैशालीचा डोसा, प्रियदर्शनचा चहा, जोश्यांचा वडापाव, यशवंतची दाबेली, कल्याणची भेळ, दुर्गाची कोल्ड कॉफी, कीर्तीचा मसाला पाव, रानडेची मॅगी अशा एक ना अनेक ठिकाणांना पुणेकर खवय्यांनी मनमुराद दाद देऊन मोठ्ठं केलं आहे.
अशा या सर्व खाद्य ठिकाणांच्या मांदियाळीत स्वस्त आणि मस्त खाणं म्हटल्यावर हिराबाग चौकाकडे दुर्लक्ष करता येणं निव्वळ अशक्य आहे. हिराबागचा फॅन क्लब तसा भरपूर मोठ्ठा! खासकरून तिथला गवती चहा.अहा! एकदा हा चहा प्यायल्यानंतर तो तुम्हाला तिथे पुन्हा पुन्हा जायला भाग पाडणारच!
तसं हे ठिकाण रस्त्यावरच्या खाण्यातच मोडणारं. म्हणजे तुम्ही फार हायजिन कॉन्शस वगैरे असाल तर याच्या वाटय़ाला न जाणंच चांगलं. कारण इथे सगळा उघडय़ावरचा कारभार. पण चव मात्र फक्कड. सौ नंबरी!
टिळक रोडवर एस.पी कॉलेजपासून स्वारगेटकडे जायला लागलात की, पाच मिनिटांच्या अंतरावर हिराबाग चौक आहे. तिथून दांडेकर पूल,स्वारगेट, टिळक रोड आणि घोरपडी पेठेकडे रस्ते जातात. म्हणजे अगदी मोक्याच्या ठिकाणी ही खाऊगल्ली (सॉरी .. खाऊचौक!)आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे तिथे पाìकगलाही बऱ्यापकी जागा आहे. पुण्यात कुठेही जाताना हल्ली आधी ही सोय बघणं महत्त्वाचं झालंय.
गाडी पार्क करता करताच लक्ष जातं ते अतिशय आश्चर्यकारक पाटीकडे ‘पाच रुपये डोसा’, ‘पाच रुपये उत्तप्पा’ वगरे पाटय़ा तिथे दिसतात. आजच्या महागाईत हे आश्चर्यच नाही का! जवळ गेल्यानंतर जर गर्दीला बाजूला सारून व्यवस्थित मेन्यूकार्ड पाहिलं तर कळतं की तिथे सर्वात महागडी डिश वीस रुपयांना आहे ती म्हणजे ड्रायफ्रुट उत्तप्पा! सर्व प्रकारचे डोसे आपल्याला इथे खायला मिळतात. तिथली ओसंडून वाहणारी गर्दी उत्तम चवीची पावती देत असते हे वेगळं सांगायला नको. त्याच्या पुढेच धपाटा-पराठा हाऊस आहे आणि इथेही कांदा-मेथी-पालक-पनीर-कोबी-चीज-मिक्स ग्रीन पिस इत्यादी व्हरायटीज फक्त २५- ३० रुपयांत चाखायला मिळतात.
पावसाळ्यात खास भजी खायला येणाऱ्या लोकांचा फेव्हरेट स्पॉटही तिथे आहे. कांदाभजी-बटाटाभजी-मूगभजी इत्यादी भज्यांचे प्रकार फक्त १५ रुपये प्लेट दराने मिळतात. त्याचप्रमाणे मटकी पोहे, उपमा, शिरा, मिसळपाव, सॅम्पल पाव, उडीदवडा, मेदूवडा, इडली-सांबार अशा निरनिराळ्या नाश्त्याच्या पदार्थाची अनेक दुकानं इथे आहेत आणि नाश्ता झाल्यावर गवती चहा प्यायला मात्र विसरू नका हं! तीच तर इथली स्पेशालिटी आहे.
 साबुदाणावडा आणि खिचडी म्हणजे उपवासाचे पदार्थ असा समज असणाऱ्या लोकांनी तर आवर्जून इथे यायला हवं! उपवासाच्या पदार्थाची एक रेंजच इथे आहे. उपवासाची भेळ, उपवासाची मिसळ आणि खमंग खिचडी काकडी अशा अफलातून प्रकारांवर आपण इथे ताव मारू शकतो.
तुम्ही जर जेवणाच्या वेळी तिथे गेलात तर तुमच्यासाठी इथे जेवणाची सोयसुद्धा आहे. पुलाव राइस, पुरी-भाजी, व्हेज डालचा राइस, व्हेज बिर्याणी,चपाती भाजी इत्यादी सगळे प्रकार मिनी लंच होममध्ये फक्त २० ते ४० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
हिराबागेतले सगळे पदार्थ ५० रुपयांच्या आत आहेत आणि इथल्या किमतीपेक्षाही चवीला चाखण्यासाठी लोक येतात. कॉलेज-हॉस्टेलमधल्या मुला-मुलींसोबतच, ऑफिसला जाणारे भरपूर लोकही येथे खास थांबून निरनिराळ्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि ‘कृपया सुट्टे पैसे द्या’,‘एकदा खाल तर परत परत याल’, ‘जिवाला खा! जिवाला खा!’ अशा पाटय़ा आपण पुण्यात आहोत हे विसरू देत नाहीत.
 सकाळी आठ-साडेआठपासून संध्याकाळी पाचपर्यंत कुठल्याही वेळात गेलात तरी हिराबागेच्या चौकात गर्दी नाही असं होत नाही. आसपास असणारी कॉलेज, शाळा, ऑफिस, दुकानं यामुळे सगळ्या प्रोफाइलचे लोक इथे दिसतात. एका हातात प्लेट आणि दुसऱ्या हातात (नोकियाच्या साध्या फोनपासून ते आयफोनपर्यंतची व्हरायटी) फोन सावरत इथे गप्पा मारत खाण्याचा आनंद लुटणारी मंडळी दिसतात. एका आगळ्याच खाद्य संस्कृतीत ते जगताहेत असं वाटतं! त्यामुळेच टिळक रोडवर गेलं की हिराबाग चौकात एक अनिवार्य चक्कर होतेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:03 am

Web Title: khaucha katta cheap and good food
Next Stories
1 नेल आर्ट
2 क्लिक
3 व्हिवा दिवा : प्रियांका कदम
Just Now!
X