|| गायत्री हसबनीस

गुढीपाडव्याच्या दिवशी नखशिखान्त नटताना अस्सल मराठमोळ्या परंपरेची सर काही तरुण मुलामुलींमध्ये ओसरल्याचं जाणवतच नाही. दरवर्षी नावीन्य आणि सौंदर्य यात चुकूनही एकमेकींशी स्पर्धा न ठेवता सोज्वळ सौंदर्यवतीच दिसाव्यात अशा आजकालच्या तरुणी पायात कोल्हापुरी चप्पल, अंगावर रेशमी नऊवारी साडी, डोळ्यांवर गॉगल, नाकात नथ आणि डोक्यावर पगडी किंवा फेटा अशा ऐटीत आत्मविश्वासाचा अनोखा ‘स्वॅग’ मिरवतात. भरगच्च पारंपरिक साज असतानाही या तरुणींच्या डोक्यावरचे फेटे सगळ्यात जास्त भाव खाऊन जातात..

‘आजकाल फेटय़ांची फॅशन ही सकारात्मकरीत्या ट्रेण्डमध्ये आली आहे. तरुणाईकडून होणारी फेटय़ांची मागणी आणि गुढीपाडव्याचं वेड दोन्हीही एकाच वेगाने वाढत जातंय’, असं सांगत ८० वर्षे फेटय़ांचा उद्योग करणाऱ्या पुण्याच्या लोकप्रिय ‘मुरुडकर झेंडेवाले आणि फेटेवाले’चे गिरीश मुरुडकर यांनी या आकर्षक पगडी/फेटय़ांच्या ट्रेंडची माहिती दिली.

‘पाडव्याच्या आधी ग्राहक दुकानात येऊन प्रत्येक फेटा कुतूहलाने पाहतात. वेगवेगळ्या व्हारायटी आम्ही डिस्प्लेला ठेवतो म्हणजे ते खरेदी करताना ग्राहक मंडळी त्यांचा फोटोही काढू शकतात. खरं तर पूर्वी मुलींसाठी फेटे घालणं हा प्रकार फारच दुर्मीळ होता, तेव्हा नवरदेवालाच फेटय़ांची गरज पडायची. आता गुढीपाडव्याच्या रॅलीत आवर्जून मुली फेटय़ाची हौस पुरवून घेतात. कॉलेजच्या विद्यार्थिनी, आयटी क्षेत्रातील तरुणी, नोकरी करणाऱ्या मुलींमध्ये फेटय़ांचे जास्त वेड पाहायला मिळतं, असं मुरुडकर सांगतात. गुढीपाडव्यात खासकरून मुलींना आणि मुलांना दिवसभरासाठी फेटा हवा असतो. सर्वाच्या बजेटमध्ये येतील असे स्वस्त फेटे म्हणजे ५०-७० रुपयांपासून सुरू होणारे फेटे उपलब्ध असतात. ज्यांना अगदी डिझायनर फेटे हवे आहेत त्यांच्यासाठी २,००० रुपयांपासून फेटे उपलब्ध आहेत. अनेकदा मुली फेटय़ांचे कापडही घेऊन जातात. तर फोटोसेशन करायचे असेल आणि एखादा ग्रुप असेल तर खास डिझायनर फेटे किंवा पगडी बनवून घेतली जातात, असे त्यांनी सांगितले.

गुढीपाडव्याला दिवसभरासाठी भाडय़ाने फेटे वापरण्यापासून ते विकत घेण्यापर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात. अनेकदा स्त्रिया डिझायनर फेटे भाडय़ाने वापरणे पसंत करतात. कारण दोन ते तीन हजारांचे हे फेटे नंतर त्यांना फारसे वापरता येत नाहीत. मात्र फेटा किंवा पगडी घेताना या वेळी मुलींच्या मागण्या खूप बदलल्या असून फॅ शनेबल फेटा परिधान करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो, असे मुरुडकर यांनी सांगितले.सध्याच्या ट्रेण्डप्रमाणे काही तरी सिम्बॉलिकल डिझाइन त्यांना पगडी-फेटय़ावरही हवं असतं. त्यामुळे यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. फेटय़ांबरोबर मोत्यांची माळ आणि उपरणं अशी सांगड पूर्वी घातली जायची. आताही तो सेट उपलब्ध आहे तर पगडीबरोबर आत्ताच्या मुली कोंडल आणि भिकबाळीही आस्थेने घालतात. नऊवारी साडीवरच नाही तर जीन्स आणि झब्ब्यावरही पगडी घालून मुली मिरवताना दिसतात.

फॅ शनवर चित्रपटांचा सर्वात जास्त प्रभाव असतो हे समीकरण पगडीलाही चुकलेलं नाही. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटानंतर बाजीराव पगडी आणि मस्तानी पगडींना जोरदार मागणी असल्याचे मुरुडकर यांनी सांगितले. आम्हाला खूप लाइक्स मिळाले इथपासून ते एका दिवसापुरतं का होईना आम्हाला झाशीच्या राणीसारखा अनुभव आला, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मुलींकडून व्यक्त होतात, अशी माहितीही त्यांनी दिली. फेटय़ांमध्ये अनेकदा डिझाइन्समध्ये राजकीय चित्रं वगैरेंना फाटा दिला जातो. शिवाय, बऱ्याचदा पांढऱ्या रंगाची किंवा क्लासी, सोबर आणि एथनिक लुक देणाऱ्या पगडीला त्यांची जास्त पसंती असते. अशांसाठी खास क्रीम-मरुन रंगाचा क्रीम शाही नावाचा फेटा खास अशा सोबर लुकसाठी डिझाइन केला असल्याचे त्यांनी सांगितले.

फेटय़ांचे आणि पगडीचे प्रकार

फेटय़ांमध्ये कॉटन फेटय़ांना जास्त मागणी असते. या कॉटनच्या फेटय़ांमध्ये ‘बांधणी फेटा’, ‘कोल्हापुरी फेटा’, ‘भगवा फेटा’ असे प्रकार उपलब्ध आहेत. हे सर्व फेटे कापडी फेटे आहेत. याचबरोबर जरीचे काम केलेले कापडी फेटे आहेत जे ‘जरीचे फेटे’ म्हणून ओळखले जातात. ‘पुष्टय़ांवर बनवलेला तयार फेटा’ हा एक वेगळा प्रकार आहे. जो सहज काढता-घालता येतो. या पुष्टय़ांवरील फेटय़ांची किंमत तीनशे ते दोन हजार रुपये एवढी असते. ‘पुणेरी पगडी’ म्हणजे लोकमान्य टिळक परिधान करायचे ती पगडी आजच्या पिढीत मुलींना सर्वात जास्त आवडते. पुणेरी पगडीवर जरीकाम केले जाते आणि यातही अनेक डिझायनर पगडी उपलब्ध आहेत. ‘पेशवाई पगडी’ हाही पुणेरी पगडीएवढाच लोकप्रिय प्रकार असला तरी सध्या ‘बाजीराव पगडी’ जास्त वापरली जाते.

‘शाही फेटा’ हा डोक्यावर बांधला जात असल्याने तो माप घेऊन बनवला जातो. शाही फेटा हा जास्त कम्फर्टेबल असतो. शाही फेटाच फक्त माप घेऊन बनवला जातो, बाकी सर्व फेटे रेडिमेड मिळतात. शाही फेटा तयार करण्यासाठी पाच ते दहा तास लागतात. ऐन वेळी मिरवणुकीत पटकन कोणाला तरी फेटा हवा असेल तर तो पुष्टय़ांचा फेटाच घेतात. शाही फेटय़ासाठी काही मर्यादा असतात. प्रत्येकाची डोक्याची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला शोभले असा शाही फेटा तयारच करावा लागतो. दिवसभर मिरवणुकीत उन्हात फेटा मिरवणाऱ्या मुलींसाठी ‘शाही फेटा’ सुटेबल असतो. सेलिब्रेटींही गुढीपाडव्यात जास्त करून शाही फेटाच मिरवतात. हल्ली बनारसी कापडाचे जर असलेले फेटे किंवा नेट फॅब्रिकचेही शाही फेटे मिळतात. ब्रोकेड, जरतारी असे फेटेही हमखास बाजारात मिळतात. आता तर फेटय़ांवर किंवा पगडीवर ब्रुचही लावले जातात. ब्रुचमध्ये कोयरी, माळा बसवल्या जातात. यंदा पैठणी फेटय़ाची क्रेझ आहे. पैठणी फेटय़ांची कल्पना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाली आहे. त्यांनी पहिल्यांदा नऊवारी साडीचे फेटे तयार केले होते. या फेटय़ांना तयार होण्यास वेळ लागतो आणि खासकरून त्यांचं वजनही जास्त असतं.

राजकारणी शाही फेटे

आता सगळीकडे निवडणुकांचे वातावरण असल्याने काही विशेष राजकारणी पद्धतीचे फेटे बाजारात आणले आहेत, असं मुरुडकर यांनी सांगितलं. ज्या पक्षाची कोणी व्यक्ती उमेदवार असेल तर त्या पक्षाच्या नावाचे, चिन्हांचे डिझाइन किंवा ब्रुच लावले जाते आणि त्यावर डायमंड असणारे तसे फेटे तयार होतात. ज्या पक्षाच्या ध्वजाचे रंग असतात त्या रंगाचे कापड आणून तसे कलर कॉम्बिनेशन आखून फेटे तयार केले जातात. सोनेरी रंगाचा फेटा आणि सोन्याचे दागिने असाही साज करता येतो. या दोन रंगांशिवाय अन्य कुठला रंग फेटय़ासाठी हवा असेल तर मुली आपल्या आऊ टफिटला मॅचिंग असणाऱ्या पगडय़ांचा आवर्जून विचार करतात.

भगवा रंग ट्रेण्ड-इन

पगडय़ांमध्ये आणि फेटय़ांमध्ये केशरी रंगाला जास्त मागणी असते. पाडव्यासाठी तोच रंग प्रतीकात्मक म्हणून वापरला जात असल्याने त्याचा वापर जास्त होतो. त्याखालोखाल लाल फेटा, भरजरी फेटा, बनारसी फेटा असे प्रकार येतात. केशरी रंग तसा सगळ्या प्रकारच्या कपडय़ांवर उठून दिसतो. मुलींना आपल्या आऊ टफिटला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची पगडी लागते. त्यामुळे केशरी आणि सोनेरी रंग हे जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.