मंजु माळवदे-वेलकर

लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी मी आणि माझा नवरा(सौमित्र वेलकर) आम्ही बालीला जाण्यासाठी खूप उत्सुक होतो. पुलंचं साहित्य वाचताना त्यांनी एके ठिकाणी बालीबद्दल लिहिलं होतं. पुलंनी बालीचं खूप सुंदर वर्णन केलं होतं. त्यामुळे आम्ही दोघेही तिथे जाण्यासाठी खूप उत्सुक होतो. कुठल्याही ट्रिपला जाताना आम्ही खूप संशोधन करतो. दोघांनाही विविध ठिकाणी गेल्यावर तिथल्या खाद्यसंस्कृतीविषयी नव्या नव्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतं.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

बालीची हिंदू संस्कृती आपल्या संस्कृतीशी मिळतीजुळती आहे. त्यांच्याकडे खाद्यसंस्कृतीमध्ये तांदूळ हा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासेही तिकडे छान मिळतात. आपल्या भारतीय समुद्रकिनाऱ्यांलगत जशी खाद्यसंस्कृती आहे. तशीच इथे आहे. इथल्या कोस्टल फूडमध्ये फिशकरी, राईस अशा पद्धतीच्या पाककृती आहेत. तिथल्या पाककृतींमध्ये नारळाचा खास करून नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. या नारळावरून एक आठवण सांगते, तिकडे बालीमध्ये ‘तना लॉट टेम्पल’ आहे. एका मोठय़ा रॉकवरती सीतादेवीचं मंदिर आहे. तिथे पाण्यातून चालत जावं लागतं. ओहोटी असली तरच तिथे जाता येतं. तिथे शहाळ्याचं पाणी प्यावसं वाटलं, तर आम्हाला दिलेला तो नारळ एवढा मोठा होता की आम्ही दोघांनी ते पाणी प्यायलं तरी अजून उरलं होतं. बालीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नारळही आहेत, हे तेव्हा समजलं. शहाळ्याच्या पाण्याबरोबर त्यांनी आम्हाला ताज्या केळ्यांचे वेफर बनवून दिले होते. बालीमध्ये त्यांच्या जेवणात नारळाचा खूप वापर असतो. करीजमध्ये नारळाचा वापर असतो. बालीमध्ये आम्ही खूप ठिकाणी फिरलो. बाटुर लेकच्या जवळील चिंतामणी वॉल्कॅनो हीसुद्धा एक खूप सुंदर जागा आहे. तिथे पर्यटकांची खूप दाटी असते. तिथलं विलोभनीय दृश्य पहात तिथल्या रेस्टॉऐरंटमधील बुफे पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेणं, ही पर्यटकांसाठी पर्वणी असते. आम्ही तिथे गेलो होतो, तेव्हा ढग दाटून आले होते. समोर काहीच दिसत नव्हतं. पण अर्ध्या तासानंतर तिथून निघत असताना ढग बाजुला झाले, तिथलं सुंदर दृश्य आम्हाला दिसलं. डोळ्याचं पारणं फिटणं या शब्दांची अनुभूती तिथे आली.

बालीमध्ये गेल्यावर आम्हाला तिथली खाद्यसंस्कृतीच पुरेपूर अनुभवायची होती. तिथल्याच पदार्थावर ताव मारण्याचं ठरवलं होतं. बालीने आपली वेगळी खाद्यसंस्कृती नीट जपली आहे. पहिल्या दिवशी आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथल्या वेळेनुसार आमच्या घडय़ाळ्याची वेळ बदलली नव्हती. त्यामुळे तिथे नाश्त्याला पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. आम्ही थांबलो होतो, त्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील नाश्त्याची वेळ संपून गेली होती. मग आम्ही तिथे बाजूच्या ठिकाणी नाश्त्यासाठी जाण्याचं ठरवलं. तिथल्या लोकल फूडमध्ये आम्ही आमच्या आवडीचं फिश खाण्याचा विचार केला. तर त्यांनी त्यांची एक फेमस डिश आम्हाला गाडो-गाडो सॉसबरोबर खायला दिली. या पदार्थामध्ये ताजी मोठी कोळंबी एकदम माइल्ड फ्लेवरमध्ये फ्रोय केलेली होती. गाडो-गाडो हा सॉसही खूप सुंदर असतो, तो शेंगदाण्यांपासून बनवलेला असतो. ताज्या कोळंबीबरोबर लेमन ग्रास आणि लिंबाचा फ्लेवर होता. त्यांचा रजांग नावाचा मसाला असतो. त्यामध्ये लसूण, लाल मिरच्या, छोटे कांदे, गूळ, आलं, जायफळ आणि लिंबाची पानं हे सगळं मिक्स करून पेस्ट तयार करतात. आपण जसे वाटणाबरोबर वेगवेगळे मसाले वापरतो, तसा त्यांचा हा रजांग नावाचा मसाला असतो. या मसाल्याचा फ्लेवर वेड लावणारा असतो.

बाली हे बेट आहे. त्यामुळे इथे विविध प्रकारचे ताजे मासे यांचा वापर पाककृतींमध्ये असतो. तिथे फळांचीही रेलचेल असते. आंब्याचे विविध प्रकार, केळी, अननस, कलिंगड, फणस असं सगळं मुबलक प्रमाणात तिथे मिळतं. तिथे केळ्यांपासून पिसांग गोरेंग नावाचा गोड पदार्थ बनवतात. पिकलेलं केळं बॅटरमध्ये बुडवून फ्राय करतात, त्यात पाम शुगर सिरप, किसलेला नारळ आणि व्हॅनिला आइस्क्रीम घालून सव्‍‌र्ह करतात. त्यांच्याकडे खाद्यसंस्कृती जपण्याची ओढ त्यांच्या एका कृतीतून मला दिसली. बालीमध्ये कुठेही छोटं किंवा मॉलमधलं मोठं दुकान असू दे, त्याच्या दरवाजाबाहेर सकाळच्या वेळी प्रसाद ठेवतात. दरवाजासमोरच्या जागेला वेगळं महत्त्व त्यांच्यामध्ये आहे. एका बास्केटमध्ये अंडं, भाताची मूद, एखादं फळ आणि दोन-तीन खाद्यपदार्थ घेऊन ते दरवाजासमोर ठेवलं जातं. तो प्रसाद मग कोणीही उचलत नाही.

बालीचं जेवण अजिबात स्पायसी नसतं, तुम्ही त्यांना तिखट हवंय म्हणून सांगितलंत तर ते तिखट करून देतात. ‘मी गोरेंग’ आणि ‘नासी गोरेंग’ नावाच्या त्यांच्या प्रसिद्ध पाककृती आहेत. ‘मी गोरेंग’मध्ये फ्राइड न्यूडल्स आणि विविध व्हेजिटेबल्स असतात. नॉनव्हेज करताना त्यामध्ये चिकन किंवा प्रॉन्सचा वापर केला जातो. त्याच्याबरोबर छोटे पापड तळून देतात. तिथे चिकन आणि प्रॉन्सचे पापडही (क्रॅ कर्स) देतात. तिकडच्या लिंबाला इतकी चव असते की मला राहावलं नाही, आणि मी येताना डझनभर लिंबं घेऊन आले होते.

तसंच नासी गोरेंग नावाच्या फ्राइड राईसच्या डिशबरोबरही तळलेले पापड देतात. त्याचबरोबर साते (चिकन किंवा प्रॉन्स साते) नावाचा एक पदार्थ मिळतो. स्मॅश्ड चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून गवती चहाच्या काडय़ांना लावून मग ते फ्राय करतात आणि गाडो-गाडो सॉसबरोबर देतात.

बालीमध्ये उलूवाटू इथे शंकराचं मंदिर आहे. तिथे गेल्यावर तिथल्या पुजारींनी आम्हाला विचारलं की, तुम्ही पहिल्यांदा आलात का, मग आम्ही हो म्हटलं, तर त्यांनी आम्हाला तिथे गेल्यावर पूजा कशी करायची ते दाखवलं. आपण जसं हळद-कुंकू लावतो, तसं त्यांनी तांदूळ कपाळाला चिकटवले. वाहायलासुद्धा तांदुळच दिले. त्यांनी आम्हाला जिंबरान बीच नावाच्या सुंदर जागेविषयी सांगितलं. तिथे फिशची मेजवानी असते. तिथे गेल्यावर समुद्राचं अथांग दृश्य दिसतं. तिथे केचक डान्स (मंकी डान्स) बघायला मिळतो. बीचवर अनेक रेस्टॉरेंट आहेत. तिथे एक गंमत म्हणजे पापलेट, चिंबोऱ्या, प्रॉन्स, अजून काही प्रकारचे मोठे जिवंत मासे टँकमध्ये ठेवलेले असतात. ते किलोच्या भावाने देतात. आपल्याला ते विचारतात, तुम्हाला कुठला मासा खायचा आहे. मग आपण मासा निवडल्यानंतर ते विचारतात तुम्हाला कुठल्या स्टाईलने त्याचं प्रिपरेशन करून हवं आहे. मग ते मासे फ्राइड किंवा बार्बेक्यू करून देतात. मग ते ताजे फ्राइड मासे आणि त्याच्याबरोबर बिंताग बिअर देतात. समुद्राच्या पाण्यात पाय सोडून बसून या अशा खाद्यपदार्थाचा आस्वाद तिथे घेता येतो. तो खूप छान अनुभव होता. आम्ही आठवडाभर तिथे होतो. तसंच बालीला बाटूक बुलान नावाचं एक आर्टिस्ट व्हिलेज आहे. तिथे बालीची पेंटिंग्ज खूप फेमस आहेत. तिथे कलाकुसरीच्या सुंदर वस्तू मिळतात. बालीमधली निसर्गदृश्यं पाहताना अगदी कॅन्व्हास घेऊन कुणी तरी पेंटिंग करतंय असं सहज वाटून जातं.