|| तेजश्री गायकवाड

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

अगदी आठवीमध्ये असल्यापासून टीव्हीवर दिसणाऱ्या अभिनेता, अभिनेत्रींचे सुंदर सुंदर कपडे तिला आकर्षित करायचे. मोठं होऊन आपल्यालाही अशा सेलिब्रिटींसाठी चांगले ड्रेस बनवायचे आहेत हे तिने तेव्हाच पक्कं केलं. आपल्याला काय करायचं आहे हे पक्कंकेल्यावर त्यादृष्टीने तिने अभ्यास करायला सुरुवात केली आणि हळूहळू एकेक पायरी चढत तिने रीतसर फॅशन डिझायनिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून नेहा चव्हाणने फॅशनच्या ग्लॅमरस आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला. शिक्षणानंतर नोकरीची मोठी संधी नाकारत तिने स्वत:चा ब्रॅण्ड स्थापन करायचं ठरवलं आणि त्यातूनच ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ हे लेबल तयार झालं.

नेहाला लहानपणापासूनच डिझायनर ड्रेस खूप आकर्षित करायचे. थोडं थोडं शिवणकाम येत असल्यामुळे अगदी लहान असल्यापासूनच ती आईच्या साडीचे ड्रेससुद्धा बनवायची. ही आवड लहानपणापुरती मर्यादित न ठेवता कपडय़ांविषयीची ही ओढ समजून घेत तिने रीतसर त्याचा अभ्यासही केला. त्याबद्दल ती सांगते, ‘‘मला नक्की कशात करिअर करायचं आहे हे माझं ठरलं होतं. त्यामुळे दहावीनंतरच मी फॅशनडिझाईनची पदवी देणाऱ्या कॉलेजेसचा शोध सुरू केला. फॅ शन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा देणारी अनेक कॉलेजेस होती, पण पदवी देणारी अगदी बोटावर मोजण्याएवढीच कॉलेजेस होती. मी त्यातूनच बेस्ट ५ कॉलेजमध्ये अप्लाय केलं. बॅकअप म्हणून मी दहावीनंतर अकरावी-बारावी कॉमर्समधून केलं होतं.’’ फॅ शन क्षेत्रात उतरण्यासाठी एवढी धडपड करणारी नेहा इथवरच थांबली नाही. तिनेत्याच वेळी एन.आय.एफ.टी. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षेचा अभ्यासही केला आणि पुढे तिला प्रवेशही मिळाला. ‘‘चार वर्षांचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर मला मास्टर पदवीसुद्धा पूर्ण करायची होती. त्यासाठी मी ‘लंडन कॉलेज ऑफ फॅ शन- युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन’ इथे अर्ज केला; पण माझं सिलेक्शन झालं नाही. तिथल्या परीक्षकांना मात्र माझा पोर्टफोलिओ आवडला होता, फक्त त्यात थोडे बदल अपेक्षित होते म्हणून त्यांनी मला दुसरी संधी देऊ केली. मी त्या संधीचं सोन करत अजून काम करून पोर्टफोलिओमध्ये बदल केले आणि लंडनला कुरिअर केलं. पुढे मला तिथे प्रवेशही मिळाला,’’ नेहा उत्साहाने हा सगळा प्रवास कथन करते.

नेहा शिक्षण संपवून मुंबईत आली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या तरुणांप्रमाणेच नेहाही नोकरीच्या शोधात होती. नोकरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तिने अर्ज केले होते. त्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर तिला मोकळं बसवत नव्हतं म्हणून तिने घरीच आईच्या साडय़ा डिझाईन केल्या. या अनुभवाबद्दल बोलताना ती सांगते, ‘‘मी डिझाईन केलेल्या साडय़ांचे फोटो काढून ते समाजमाध्यमांवर पोस्ट केले. मी राहत असलेल्या इमारतींमधील माणसं, नातेवाईक, मित्रमंडळींनी डिझाईन पाहून माझं तोंडभरून कौतुक केलं. काहींनी तर त्या साडय़ा खरेदीही केल्या. असंच माझ्या एका मैत्रिणीने मला साडीच्या फोटोमध्ये टॅग केलं होतं. ते बघून तिच्या इमारतीमधल्या एका साडीच्या व्यापारी काकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना माझ्या डिझाईन्स एवढय़ा आवडल्या होत्या, की त्यांनी मला त्यांच्यासोबत कामाची संधी देऊ  केली; परंतु तेव्हा मी एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरकडे मुलाखत दिलेली होती. त्यांचे अगदी काही टप्पेसुद्धा पार झाले होते. त्यामुळे मी त्यांना नकार दिला,’’ असं नेहा सांगते. मात्र याच व्यक्तीने तिला तिच्या करिअरमधली सुवर्णसंधी देऊ केली, याबद्दलची आठवणही ती सांगते. ‘‘काही दिवसांनी पुन्हा त्याच काकांचा मला फोन आला आणि या वेळी तुझ्यासाठी माझ्याकडे वेगळी ऑफर आहे, असं सांगत त्यांच्यासोबत स्वत:च्या नावाने ब्रॅण्ड सुरू करायची संधी त्यांनी देऊ केली. मला खरं तर काही वर्ष नोकरी करून, अनुभव घेऊन स्वत:चा ब्रॅण्ड सुरू करायचाच होता. म्हणूनच मी त्यांनी दिलेल्या ऑफरचा खूप विचार केला, अगदी घरच्यांशीही चर्चा केली आणि सरतेशेवटी त्या डिझायनरकडून आलेल्या नोकरीच्या संधीला नम्रपणे नाकारले. त्या क्षणी मी स्वत:चा ब्रॅण्ड सुरू करायचा निर्णय घेतला,’’ असं तिने सांगितलं.

याच एका क्षणी तिच्यातील फॅशन डिझायनरची उद्योजिका म्हणून नव्याने वाटचाल सुरू झाली. त्यानंतर नेहाने खूप मेहनत करत ५ महिन्यांत उत्तम कलेक्शन बनवत स्वत:चं लेबल लॉन्च केलं. इतक्या कमी वेळात तिने आपल्या कलागुणांच्या जोरावर स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला. ‘डिझायनर क्लॉथ म्हणजे खूप महाग’ ही संकल्पना मोडीत काढत नेहा काम करते आहे. समोर आलेल्या ग्राहकाला त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशाच पद्धतीने कपडे बनवून देण्याचं काम ती करत आहे. याचबरोबरीने ती समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कामही करते आहे. त्याबद्दल ती सांगते, ‘‘आमचं काम हे अगदीच पॉकेट-फ्रेंडली आहे. ग्राहकाला त्यांनी सांगितलेल्या बजेटमध्ये १००% मेहनत करून आम्ही डिझाईन देतो. याखेरीज आम्ही झिरो वेस्टेज म्हणून उरलेल्या कपडय़ांतून पोटली आणि कापडी ज्वेलरीही बनवून देतो. या दोन्ही गोष्टी मी स्पेशल मुलं, घरकाम करणाऱ्या बायकांची मुलं यांच्याकडून तयार करून घेते. अशा मुलांना मी किंवा माझी टीम आधी वेगवेगळ्या गोष्टी कशा बनवायच्या हे शिकवतो. ही मुलं आनंदाने त्यांच्या सुट्टीच्या काळात ते बनवतात. यातून आम्हाला आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काही तरी केल्याचं समाधानही मिळतं,’’ असं ती सांगते.

सध्या ट्रेण्डमध्ये असलेला प्रकार म्हणजे साडी रियूज. हेसुद्धा आम्ही करून देतो, असं ती म्हणते. एखाद्या जुन्या साडीपासून काही तरी बनवायचं काम टेलरसुद्धा करूच शकतो, पण त्यांच्याकडे तेवढी क्रिएटिव्हिटी आणि डिझाईन्स नसतात आणि आम्ही डिझायनर म्हणून जुन्या साडीला नव्याने डिझाईन करत वेगळ्या रूपांत ग्राहकाला देतो. त्यामुळे ग्राहकांना आमचं कलेक्शन आवडतं, असं नेहा सांगते. तिच्या या कामातूनच ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ हा तिचा ब्रॅण्ड नावारूपाला आला आहे. फॅ शन डिझायनर म्हणून या क्षेत्रात वावरत असताना त्या व्यक्तीची पॅशन महत्त्वाची असते, तशीच त्या त्या डिझायनरची स्वत:ची एक खासियतही असते किंवा एखाद्या कलेवर हुकमत असते. नेहाच्या मते तिच्या कलेक्शनमधूनसमोरच्याचं व्यक्तिमत्त्व अधिक रुबाबदार दिसतं. ‘‘माणूस जे कपडे घालतो त्यातून त्याची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होत असते. हे रिफ्लेक्शन बदलण्याची एका अर्थाने कपडय़ांतून ते व्यक्तिमत्त्व खुलवण्याची ताकद डिझायनरकडे असते,’’ असं नेहा म्हणते. ही ताकदच नेहाला जास्त आवडते आणि तीच तिची खासियतही आहे. नेहा या इंडस्ट्रीमध्ये पाय रोवू इच्छिणाऱ्या तरुणाईला सांगते की, फॅ शन इंडस्ट्री म्हणजे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. त्यामुळे तुम्हाला सतत अगदी दिवसाचे चोवीस तास काम करावं लागतं. बाहेरून जितकी ही इंडस्ट्री ग्लॅमरस आणि सोपी वाटते तितकी ती सोपी मुळीच नाही; किंबहुना या क्षेत्रातला प्रवास हा शंभर टक्के अवघडच आहे हे धरूनच तयारी केली पाहिजे, असा आग्रह ती धरते. एखाद्या न्यूरो सर्जनपेक्षाही अवघड काम या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक ३ महिन्यांतील बदलांमुळे डिझायनरला करावं लागतं. सातत्याने स्वत:ला बदलत राहणं, आपल्या कलेच्या बाबतीत अपडेट करत राहणं आणि आपलं कलेक्शन हटके असावं यासाठी मेहनत करणं हे सगळं आव्हानात्मक आहे आणि म्हणूनच या क्षेत्राचा आब काही औरच असल्याचं नेहा सांगते.

viva@expressindia.com