open-upमी आत्ता २३ वर्षांची आहे. इंजिनीयरिंग करत आहे. मध्ये २ वर्षे नापास झाले होते. आता शेवटच्या वर्षांचे ३ विषय पुढच्या महिन्यात देणार आहे. माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान बहीण आहे. ती आत्ता सीएची शेवटची परीक्षा देते आहे. तिची परीक्षादेखील पुढच्या महिन्यात आहे. मी एक मुलगा शोधला आहे. आमच्या रिलेशनशिपबाबत दोघांच्या घरी सर्व माहीत आहे आणि माझं बीई झालं की लग्न करणार असं ठरलेलं आहे.
माझे वडील बिझिनेस करतात. जूनमध्ये कॉलेज संपल्यापासून मी पण बाबांना मदत करते आहे. गेल्या एक वर्षांपासून मला बाबांविषयी काही शंका येत होत्या. पण बाबा असं करूच शकणार नाहीत या खात्रीने मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही. काही काम करत असताना काही फोटो आणि डॉक्युमेंट्स सापडली. त्यातून माझ्या शंका दुर्दैवाने खऱ्या आहेत हे कळलं. बाबा एमए करत असताना त्यांच्याबरोबर एक मुलगी शिकत होती. त्यांच्या ग्रुपमधले सर्व लग्न झालेले होते. पण हृदयाच्या तारा जुळल्या आणि दोघं आता अनैतिक संबंधात आहेत. मला हे माहीत नाही की आई आणि बहिणीला यातील किती माहिती आहे. घरात आई-बाबांची भांडणं तर खूप जुनी आहेत. पहिलीत असल्यापासून ती मला आठवतात. घरात कायम कडकड आणि अशांतता असते. मी आणि बहिणीने खूप पूर्वीच सांगितले आहे वेगळे राहायला दोघांना. पण बाबांचं हे अफेअर मला समजल्यापासून माझी खूप चिडचिड वाढली आहे. शेवटी माझी मित्राने समजूत काढली. पण आता तो आणि मी वेगळ्या टेन्शनमध्ये आहोत. जर माझं लग्न होण्याआधी यातलं बाहेर कोणाला काही कळलं तर आमच्या लग्नात अडथळा येईल अशी भीती आहे. तो म्हणतो काही रिस्क न घेता आपण लवकर लग्न करून टाकू. बाबांविषयी त्याच्या घरी कळलंतर लग्न होण्यास अवघड होईल, असं त्याचं मत आहे. पण मी अजून लग्नाला तयार नाही. लग्न करून जर जबाबदाऱ्या पेलणं जमलं नाही तर उगाच कडवटपणा, दुरावा, भांडणं या गोष्टींना मी तयार नाही. या सगळ्यामुळे मी गोंधळून गेले आहे. बाबा समोर आले की, सगळं आठवतं. मग चिडचिड होते. कायम त्यांच्याविरुद्ध बोलते आजकाल मी. पूर्वी त्यांच्याशिवाय पान हलायचं नाही. या सगळ्याला कसे सामोरे जाऊ ते समजत नाहीये. परीक्षा जवळ आली आहे, पण अभ्यास होत नाही. प्लीज यातून बाहेर पडायला मार्ग दाखवा.
मधुरा

हाय मधुरा,
जाग बदलतंय आणि त्याचबरोबर येणारे प्रॉब्लेम्सही. तू एक उच्चशिक्षित, स्वतंत्र मुलगी आहेस. जगरहाटीप्रमाणे तुझं सगळं व्यवस्थित चालू होतं, इंजिनीयरिंगचं शिक्षण, स्वत: निवडलेल्या मुलाशी ठरलेलं लग्न, वडिलांबरोबर बिझनेस.. पण आता या नवीन सापडलेल्या कॉम्प्लिकेशनमुळे या सगळ्या सुरळीत चाललेल्या गाडय़ाला खीळ बसली आहे. आपण तुझ्या सिच्युएशनमधले पॉझिटिव्ह फॅक्टर्स पाहू. तुझ्या आयुष्याचे निर्णय तू स्वत: घेऊ शकतेयस. तुझ्या मित्रानं हे सगळं अमेझिंगली अ‍ॅक्सेप्ट केलेलं दिसतंय. त्यानं त्याबाबतीत तुला ब्लेम तर केलेलं नाहीच, उलट लवकर लग्न करण्याची तयारीही दाखवली आहे. लग्न म्हणजे फक्त कडवटपणा, दुरावा आणि भांडणं नसतात. पण बाबांच्या या वागण्यामुळे आणि लहानपणापासून घरात पाहिलेल्या आई-बाबांमधल्या भांडणांमुळे लग्न करण्याचा फायनल निर्णय घेणं तुला किती रिस्की वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. तुला आयुष्यभर पुरणाऱ्या या नात्याची अशी निगेटिव्ह सुरुवात नको व्हायला. मला वाटतं तू अजून लग्नाला तयार नसशील तर कुठलाही निर्णय घाईघाईत घेण्याचं तुझ्यावर बंधन नाही. कारण वडिलांविषयी इतरांना लग्नानंतरही कळण्याची शक्यता आहेच. लग्न उरकून घेणं म्हणजे आजारावर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखं होईल.
या सगळ्यामागचा तुझ्या बाबांचा हेतू काय होता, त्यांनाच ठाऊक. मात्र तुझी शंका कन्फर्म झाली, त्यानंतरचे बाबा आणि त्यापूर्वीचे बाबा तेच आहेत, त्यांच्यात काही बदल झालेला नाही, हो ना? बदल झालाय तो तुझ्या त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीमध्ये. तुला नक्कीच वाईट वाटत असणार, कारण वडिलांबाबत असं काही आपण इमॅजिनही करू शकत नाही. तुझ्या आईला बहुतेक या सगळ्याची कल्पना असावी. तिच्याशी ते अर्थातच याबाबत काही डिस्कस करू शकणार नाहीत. तू त्यांच्यावर चिडचिड करून तुमचं नातं बिघडण्यापलीकडे काही अचिव्ह होईल का? ते तुझे बाबा आहेत, पण त्यापलीकडे एक स्वतंत्र व्यक्तीही आहेत.हे अ‍ॅक्सेप्ट करून, तुला हवं असेल तर एकदा तू अ‍ॅडल्ट-टू-अ‍ॅडल्ट त्यांच्याशी बोल. तुझ्या काही प्रश्नांची कदाचित तुला उत्तरं मिळतील. मे बी, बाप-लेकीच्या नात्याची तू एक नवी सुरुवात करू शकतील. कितीही अवघड वाटलं तरी ही संवाद अशक्य नाही.
लग्न आणि बाबा या दोन्हींशी तुला डील करायला लागणार आहेच, पण त्याशिवायही काही गोष्टी तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. उदा. डिग्री मिळवणं. तुझ्या होणाऱ्या नात्याला आणि घरच्या सिच्युएशनला खंबीरपणे तोंड द्यायचं असेल तर तू स्वावलंबी होणं मस्ट आहे. तुझ्या इच्छाशक्तीला एकवटून अभ्यासाला लाग, एका महिन्याचा प्रश्न आहे.
एक गोष्ट आठवतेय – एक हुशार मुलगी होती. पण तिचा एक प्रॉब्लेम म्हणजे कोणतीही अडचण आली की ती अगदीच हतबल व्हायची. एकदा तिच्या बाबांनी तिला किचनमध्ये बोलावलं आणि एक बटाटा, एक अंडं आणि थोडे कॉफी बीन्स आणायला सांगितले. या तीन गोष्टी तीन वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये पाण्यात घालून त्यांनी दहा मिनिटं उकळत ठेवल्या आणि मग बटाटा, अंडं, कॉफी बीन्स बाहेर काढले. आधी कडक असलेला बटाटा उकळल्यावर मऊ झाला होता. नाजूक अंडं टफ झालं होतं. कॉफी बीन्स स्वत: जसेच्या तसे राहिले होते, पण त्यांच्या पाण्याला मात्र कॉफीचा छान दरवळ येत होता. तिन्ही पदार्थाच्या बाबतीत एकच घटना घडली होती, पण परिणाम युनिक घडले होते. परिस्थिती एकच, पण रिस्पॉन्सेस मात्र वेगवेगळे. मधुरा, तुला यातलं काय बनायला आवडेल? बटाटा, अंडं की कॉफी बीन्स?

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.